खंड ९ - अध्याय १

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगणेशशारदागुरुभ्यो नमः ।
शौनक म्हणती सूताप्रत । धूम्रवर्ण अवतारचरित्र उदात्त । ऐकून तें उत्तम आख्यानयुक्त । परी तृप्त न झालों मी ॥१॥
म्हणोनि महामते सांप्रत । सांगावा पुढें दक्ष मुद्‍गल संवाद पुनीत । दक्षें पुनरपि मुद्‍गलाप्रत । विचारिलें तें मज सांगा ॥२॥
सूत म्हणती तें ऐकून । धूम्रवर्णाचें चरित्र महान । ऐकून प्रजापति आनंदूत । रोमांचितशरीर सांगतसे ॥३॥
धन्य मीं सर्वभावयुक्त । तुझ्या मुखांतून । अति अद्‍भुत । ऐकिलें धूम्रवर्णाचें चरित । सर्वसिद्धिप्रदायक जें ॥४॥
आतां सांगा विप्रेशा मजसी । पूर्णपदप्रद योगज्ञानासी । आठ विनायकांच्या स्वरूपासी । योगांत ज्याचें वर्णन असे ॥५॥
स्वानंद योग कैसा असत । अयोगाचें कैसें वृत्त । सुशांतिप्रद पूर्णयोग ख्यात । त्यांचें रूप विस्तारें ॥६॥
सूत सांगे शौणकासी । ऐसे प्रार्थितां मुद्‍गलासी । महायोगी तो तैं दक्षासी । सांगे तें ज्ञान तुम्हीं ऐका ॥७॥
स्वानंदापासून स्वेच्छेनें निःसृत । विविध ब्रह्में जगतांत । असत्‍ सत्‍ सम नेति चार ज्ञान । निर्मितो गजवक्त्र मायाप्रभावें ॥८॥
त्यांच्या आश्रयजन्य बोधापासून । सोऽहं उत्पन्न तदनंतर बिंदु पकडून । महामते स्थूल सूक्ष्म चतुर्विध शोभन । विश्व निर्माण जाहलें ॥९॥
नादांत ही सर्व ब्रह्में संमीलित । दैवयोगें निजसत्ताविहीन होत । स्वव्यापारोत्पन्न भोग न लाभत । तयांसी दक्षा कदाचन ॥१०॥
तेव्हां ती घोर तप करिती समस्त । चित्त एकाग्र करून म्हणत । जे कोणी मूलभूत असत । त्यांस नमस्कार आमुचा ॥११॥
दिव्य वर्षें सहस्त्रें जपत । ऐसा संदिग्ध मंत्र प्रणत । तेव्हां गणेश प्रसन्न होत । ह्र्दयांत दाखवी मंत्र त्यांना ॥१२॥
एकाक्षर मंत्र स्वकीय दाखवित । तो पाहून तीं हर्षंयुक्त । ब्रह्में मंत्र नंतर तो जपत । शंभर वर्षें श्रद्धेनें ॥१३॥
तेव्हां तयासी स्ववपु दाखवित । नरकुंजर रुप पाहून विस्मित । त्याच्या कृपनें त्वरित । तद्रूपबोधक ज्ञान लाभलें ॥१४॥
त्या स्वानंदनाथास जाणून । तीं ब्रह्में हर्षित होऊन । त्यासीच ह्रदयांत ध्याऊन । मंत्र जपती सिद्धिसाठीं ॥१५॥
एक वर्ष ऐसा क्रम । आचरिती ब्रह्में मनोरम । तेव्हां विघ्नेश सुप्रसन्न अभिराम । प्रकटला वर देण्यासी ॥१६॥
त्यांच्या पुढें तो प्रतापवंत । प्रकटतां तीं त्यास पाहत । पूजोनिया स्तवित । करसंपुट जोडोनियां ॥१७॥
आपुलें सामर्थ्यं सिद्धि होण्यास । दक्षा तीं ब्रह्में करिती स्तुतीस । परेशास विघ्नाधिपतीस । परास सौख्यदात्या नमन तुला ॥१८॥
स्वसंवेद्य स्वरूपासी । आनंदासी निजानंदयोगासी । ढुंढीसी अनाथासी नाथासी । सर्वात्म्यासी नमन तुला ॥१९॥
सदा मोहहीनासी । नेतिधरासी शिवासी । त्रैविध्य भाव प्रदात्यासी । निजानंदयोगा ढुंढे तुज नमन ॥२०॥
समासी मायास्वरूपासी । द्वंद्वप्रकाशासी सर्वात्मकासी । विष्णूसी महानंदरूपासी । सर्वातिगा निजानंद योगा नमन ढुंढे ॥२१॥
सदा सत्यरूपासी सर्वात्म्यासी । विकारविहीनासी सूर्यासी । भूम्नासी अनंतासी भेदवर्जितासी । निजानंदयोगा ढुंढे तुज नमन ॥२२॥
अपारस्वरूपासी नानामयासी । विहारांत सक्तासी पूर्णात्मकासी । महाशक्तीसी शक्तिरूपासी । निजानंदयोगा ढुंढे नमन ॥२३॥
मोहकर्त्यासी बुद्धिस्थेर्यकर्त्यासी । निरोधस्वरूप जी ऐसी । निजानंद भ्रांतिपदा सिद्धिरूपासी । नमन ढुंढे आमुचें तुल ॥२४॥
तुर्यांत प्रवेशून बिंबात्मकासी । निजानंदयोगासी ढुंढीसी । सांख्यरूप निर्मून तुर्यपदासी । तदाकाररूपा बोधका नमन ॥२५॥
सदा स्वात्मनिष्ठासी । संकल्पहर्त्यासी निजानंदयोगासी  । बोधरूप निर्मून बोधस्वरूपासी । मायामयकार धामन्‍ तुज नमन ॥२६॥
सदा खेळकासी नानाप्रचारीसी । निजानंदयोगासी ढुंढीशी । देहिरूप निर्मात्यासी । सदैकप्रबोधा तुज नमन ॥२७॥
भ्रांतिधरासी स्वतः भ्रांतिहीनासी । सोऽहंप्रदासी निजानंदयोगासी । बिंदुमात्रें चतुष्पादरूप क्रीडापरासी । अनंतस्वरूपा तुज नमन ॥२८॥
देहप्रचारकासी निजानंदयोगासी । नादरूप निर्मून नादस्वरूपासी । तत्स्थासी चैतन्यदात्यासी । अजासी त्रैविध्यदेहस्थिता नमन ॥२९॥
निजानदयोगासी ढुंढीसी । बाह्मांतरीं संस्थितासी । सुषुप्तिरूप निर्मात्यासी । तेथ निवासी तुज नमन ॥३०॥
तदाकाररूपें आनंदासी । निजानंदयोगासी ढुंढीसी । सदा स्वप्नरूपासी सर्वांतरस्थासी । सूक्ष्मासी सत्त्वात्म्या नमन तुला ॥३१॥
खेळकरासी सूक्ष्मनिर्मात्यासी । त्रिधा त्यांत संस्थितासी । निजानंदयोगासी । ढुंढे तुजला नमस्कार ॥३२॥
स्थूलरूपासी अन्नभूतासी । जागृत तदाकाररूपासी । बाह्मात्मकासी निजानंदयोगासी । ढुंढे तुजला नमस्कार ॥३३॥
गणेशात्मरूपें जें निर्मित । तें तुझें अंश गण असत । त्यांसी संरक्षी ब्रह्मेशा सतत । दास तुझे ते असती ॥३४॥
सदा तुझ्या पादपद्मीं रत । त्यांसी करी श्रद्धायुक्त । निजानंदयोगा तुजसी वंदित । ढुंढे तुजसी नमन असो ॥३५॥
गजाकारतुंडासी लंबोदरासी । चतुर्बाहूसी शूर्पकर्णासी । त्रिनेत्रासी पाशांकुशादियुक्तासी । निजानंदयोगा ढुंढे तुज नमन ॥३६॥
कंठाखाली नराकार रूपासी । एकदंतासी रक्तांबरासी । महाआखूध्वजासी आखुवाहनासी । निजानंदयोगा ढुंढे नमन ॥३७॥
अनंतप्रसूनि वाम भागांत । महासिद्धि तैसी उजवीकडे शोभत । त्या उभय पूर्णमायांसी धरित । निजानंदयोगा ढुंढे नमन ॥३८॥
स्वसंवेद्य नाम पुरीं संस्थितास । प्रमोदादिगण सेवितास । इक्षुसमुद्रीं लीलाकरास । निजानंदयोगा ढुंढे नमन ॥३९॥
समाधिस्वरूपा गणेशास । ब्रह्मांच्या ब्रह्मभूत महात्म्यास । कैसें तोषवावें करून स्तवनास । तथापि स्वबुद्धीनें स्तविलें असे ॥४०॥
निजानंदयोगा ढुंढीसी नमन । आम्हीं धन्यरूप केलें स्तवन । गणाधीशा तुझ्या पूजनें प्रसन्न । दीनबंधो नमन तुला ॥४१॥
नमस्ते होई प्रसन्न त्वरित । निजानंदयोगा सांप्रत । ढुंढे तुजला वंदित । स्तविलें जैसें स्फुरलें तैसें ॥४२॥
मुद्‍गल म्हणती ऐसें स्तवन । ऐकून गणाधीश मुदितमन । त्यांचा प्रणाम स्वीकारून । तयांसी म्हणे हर्षभरें ॥४३॥
श्रीगणेश गजानन म्हणत । ब्रह्मांनो वर मागा ह्रदयस्थित । मी संतुष्ट झालों अत्यंत । तुमच्या या स्तोत्रानें ॥४४॥
देईन जें जें तुम्ही वांछित । जरी तें दुर्लभ असेल जगांत । तुम्ही रचिलेलें हें स्तोत्र सतत । संतोषप्रदा मज होईल ॥४५॥
यांत संदेह नसत । ह्यानें सर्वसिद्धि होतील प्राप्त । जो वाचीत अथवा ऐकवित । मानवोत्तम वा जो ऐकेल ॥४६॥
तो येथ सर्व भोग भोगून । अंतीं स्वानंदलोकीं करी गमन । विजयप्रद हें स्तोत्र महान । पुत्रपौत्रप्रद असे ॥४७॥
धनधान्य पशुप्रद । अंगहीनासी अंगद सुखद । रोगनाशक अलक्ष्मीसंकटदाहक मोदद । पाठकांसी सर्वदा ॥४८॥
विद्या ज्ञानादिक सर्व लाभत । ह्याच्या योगें निश्चित । भुक्तिमुक्ति लाभूत ब्रह्मभूत । पठणें श्रवणें खरोखर ॥४९॥
षट्‍कर्म साधन सिद्ध । परकृत्य विनाशक समृद्ध । राजबंधहर ऋद्ध । भक्तोत्तमांसी होत असे ॥५०॥
एकवीस वेळा एकवीस दिवस । जो वाचील हें स्तोत्र सुरस । त्यास ईप्सित लाभ हो खास । संशय यांत कांहीं नसे ॥५१॥
ऐसें गणपतीचें वचन ऐकून । ब्रह्में करिती वंदन । हर्षयुक्त सगळी होऊन । प्रजापते त्यास म्हणाली ॥५२॥
जरी गणाधीशा तूं वरद । तरी तुझी भक्ति उत्तम दे सुखद । जेणें महामोह विशद । नष्त होईल ना संशय ॥५३॥
आमुच्या कार्यांत बोध द्यावा । तेणें कार्यलाभ व्हावा । तुमच्या आज्ञेंत रहावा । आमुचा जीवनक्रम सारा ॥५४॥
सर्व भक्तांस्तव आमुच्या सन्निध । सदा राहून होई सौख्यद । सर्वत्र निर्विघ्न करी मोदप्रद । गजानना तुज नमन असो ॥५५॥
आपुल्या समान करी आम्हांस । पादाश्रित तुझ्या आज्ञेंत । समरस । तुझ्या प्रसादें भजनकर्त्यास । सर्व वांछित सदा झालें ॥५६॥
जें जें आम्ही इच्छित । नाथा तें सफळ होवो त्वरित । सत्यसंकल्पज सौख्य आम्हांप्रत । गणनायका देई सदा ॥५७॥
ऐसें त्यांचें ऐकून वचन । भक्तिभावें तुष्ट होऊन । तथाऽस्तु ऐसें आश्वासून । गजानन अंतर्धान पावला ॥५८॥
आठ विनायक प्रख्यात । त्यारूपें गजानन जगांत । त्या बह्मांच्या समीप वसत । सर्वार्थसिद्धि कारणें ॥५९॥
हे स्वसंवेद्याचें सारें चरित । सांगितलें तुज समस्त । ऐकतां वाचितां नरांप्रत । सर्वसिद्धिप्रदायक ॥६०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते स्वसंवेद्यस्वरूपवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP