खंड ९ - अध्याय ३६
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगत । अश्वत्थामा द्रोणपुत्र ख्यात । प्रतापवंत तो असत । एकदा गेला उत्तमवनीं ॥१॥
आपुल्या मामाच्या संगतीत । कृपाचार्यांच्या तो राहत । भारताचें सार जाणत । कृष्णमुखातून जें स्त्रवलें ॥२॥
बुद्धीच्या परतर । ब्रह्म असत । त्याची लालसा त्याच्या मनांत । बुद्धिपति गणेशाचें स्वह्रदयांत । ज्ञान कैसें होईल ॥३॥
परिपूर्ण तें होण्या ज्ञान । गौतमासी जात शरण । कृप त्यास करी वंदन । आपुल्या भाच्यासह तेव्हां ॥४॥
एकदा योगिजनांसमवेत । होता गौतम संस्थित। तो त्यास योगशांतिप्रद सांगत । योगसेवेनें जो प्राप्त ॥५॥
तेथ हर्षयुक्त अश्वत्थामा विचारित । विचारी कृपसान्निध्यांत । संशय मनिचा हरण्या इच्छित । प्रश्न त्या गौतम मुनीसी ॥६॥
योगप्रप्तिस्तव मोदयुक्त । कोणाची उपासना असे प्रशस्त । योगरूपाचें योगीशा सांप्रत । वर्णन सर्वंज्ञा सांगावें ॥७॥
गौतम म्हणे तयास । गणेश उपासना मुख्य सर्वांस । पूर्ण शांतिप्रद जीवांस । योगाकार जाणावी ॥८॥
योगाकार तो वेदांत । गजमय तत्त्व नरदेहांत । पंचचित्तात्ममोहें जगत । विमोहित हें सारें ॥९॥
त्यायोगें परम भाव न जाणत । गणनायक त्यास अज्ञात । परी मोहयुक्त चित्त त्यागित । तेव्हां ज्ञान उपजेल ॥१०॥
तें प्राप्त होतां गणेशज्ञान । स्वयं चिंतामणि होत महान । म्हणून विकट भक्तीनें प्रसन्न । विकटाचा लाभ होई ॥११॥
पंचचित्तमय जें जें असत । तें तें विकटभावें व्यकत । भ्रम त्यागून स्वचित्तस्थ । भज त्या गजानना श्रद्धेने ॥१२॥
तें ऐकून विस्मित । सर्व मुनि तयास वंदित । आपापल्या आश्रमांत । परतून विकटाचें भजन करिती ॥१३॥
अश्वत्थासा कृपासहित । आपुल्या आश्रमीं उपासना करित । विकटभजनीं तोही रत । विकटचरित्र खंड वाची ॥१४॥
महाभक्तीनें मुद्गलस्थ । तो खंड वाची श्रद्धायुत । नित्य गणेश्वरास पूजित । संतुष्ट त्यायोगें विकट ॥१५॥
स्वल्पकाळानंतर देत । पूर्ण शांतियोग तयाप्रत । तथापि ते नित्य वाचित । तदनंतरही हा विकटखंड ॥१६॥
ते दोघे हा खंड वाचित । नित्य नेमें आश्रमांत । तेथ एक श्वान येऊन बसत । कृपाचार्यांच्य पुढयांत ॥१७॥
अश्वत्थाम्याच्या समीप बसत । मांजर एक तेंही ऐकत । त्यायोगें रोगविहीन होत । उभयही कुत्रा मांजर तें ॥१८॥
न जाणतां जरित ते ऐकत । श्रवणमात्रें उण्यवंत । होऊन स्वानंद लोकीं जात । त्याहून महिमा काय सांगू ॥१९॥
अश्वत्थामा कृप स्वांशांत । आनंदानें होत संगत । अंतीं झालें योगयुक्त । विकटभजनीं मग्न ते ॥२०॥
शौनक तें ऐकून विचारित । योगयुक्त ते स्वअंशांत । कैसे झाले तें आश्चर्य वाटत । गणेशांत एकाकार ॥२१॥
सूत त्यास उत्तर देत । देव कलांशानें अवतरत । भूभारहरणार्थं होत । मानवादी ते स्वासमर्थ्यानें ॥२२॥
येथ पाप करून जात । जेव्हां मानव यमसदनांत । तेव्हां ते पडती नरकांत । दशरथादींच्या प्रमाणें ॥२३॥
अथवा पुण्य उग्र करून । स्वर्गांत जाती प्रसन्न । भोगसंयुक्त होऊन । विलसती रामाप्रमाणें ॥२४॥
ते योगयुक्त होती । स्वस्वअंशांत राहती । तदाकार ते कल्पांतीं । गणेशाकार सर्व होती ॥२५॥
ऐसें विदूरादिक कौरव जात । पक्षीय यमलोकांत । यमाकारा गणेशाय भजत । भक्तिभावें तेथ ते ॥२६॥
अंतीं योगसमायुक्त । यम परम पावन होत । गणेश्वराजवळीं जात । ब्रह्मभूत होत स्वभावें ॥२७॥
ऐसें हें पूर्ण चरित । विकट खंड श्रवण माहात्म्ययुत । सर्व सिद्धिप्रद तुजप्रत । सांगितलें महा अद्भुत ॥२८॥
ऐशियापरी नाना जन । ऐकून हा खंड महान । सुख भोगून पावन । ब्रह्मीभूत झाले शेवटीं ॥२९॥
सूत हें माहात्म्य सांगत । शौनक प्रेमें ऐकत । विघ्नराज खंड श्रवणाचें असत । महिमा वर्णन पुढिलें अध्यायीं ॥३०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनपिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते दक्षमुद्गलसंवादे योगामृतार्थशास्त्रे विकटखंडमाहात्म्यवर्णनं नाम षटत्रिंशोऽध्यायः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP