खंड ९ - अध्याय १०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष म्हणे मुद्गलाप्रत । विभूतियोगीशा गणेशाच्या मजप्रत । महात्म्याच्या ज्या होतां ज्ञात । समाराधून गणेशज्ञ होय नर ॥१॥
मुद्गल म्हणती अपार । गणनाथाच्या विभूति थोर । शंकरादीहि समर्थ नसत खरोखर । त्यांचें कथन करण्यास ॥२॥
क्षणोक्षणीं गणेशान । नानाविध खेळपरायण । विभूतींनीं युक्त होऊन । सर्व जगता प्रकाशवितो ॥३॥
लोकांत तत्त्व मुख्यांत । जगांत तैसे ब्रह्मांत । जे श्रेष्ठ ते विभूतिपद युक्त । समस्त ऐसें जाणावें ॥४॥
त्यांचें करण्या वर्णन । कोण असणार समर्थ नूतन । म्हणोनि संक्षेपें तुज सांगेन । विभूति गणनाथाच्या ॥५॥
नानासिद्धिप्रदायिनी । जगांत ब्रह्मांत योगरूप राहूनी । कैसे भिन्न भाव नसे म्हणोनी । वर्णन त्याचें अल्प करितों ॥६॥
उभयमाया संयुक्त । तो नाना वेष धारण करित । अयोग्यांच्या ह्रदयांत । सत्य भासे सर्वदा ॥७॥
मायायुक्त प्रभावें न संभवत । काय काय गणेश संबंधांत । मायेचा आश्रय घेऊन मनांत । त्या विभूति तुज सांगतों ॥८॥
कलांश कलायुक्त । कलांशांश कलात्मक ख्यात । त्यांच्या अंशधराने असत । ते समस्त विनूतिधर ॥९॥
ऐसाच प्रश्न नारद विचारित । तैं गणनाथ स्वयं सांगत । त्या विभूति परमाद्भुत । श्रीगणेशोक्त ऐक दक्षा ॥१०॥
श्रीगणेश तेव्हां सांगत । चित्तरोधयोग श्रेष्ठ पूर्णयोगांत । मायाहीन प्रभावांचा वर्तत । मी अयोग महामुने ॥११॥
स्वानंद मीं निजभूतांत । तुर्यांत अव्यक्त संज्ञित । आनंदासम भावांत जीवांत । आत्मा मी नित्य विलसत असे ॥१२॥
नाना भेदांत मी ब्रह्म । असद्रूपधारक परम । सत्यांत सांख्यरूप मनोरम । बोध क्रीडाकरांत ॥१३॥
देहाभिमान युक्तांत । सदा एक मी वर्तत । देहांत बिंदुरूप ख्यात । चेतनांत गुणेश्वर ॥१४॥
कोशांत मी आनंदकोश । सूक्ष्म जातींत विज्ञान एक । विवेकांत मन मी विशेष । चालकांत वायू मीं ॥१५॥
स्थूलांत अन्नस्वरूप ख्यात । समष्टींत ईश्वर ज्ञात । व्यष्टींत प्राज्ञरूप विलसत । अणूंत महाविराट मीच असे ॥१६॥
इंद्रियांत मी मन । भूतांत आकाश संज्ञा मज लागुन । तन्मात्रांत मी शब्द असून । देवतांत ज्ञाता मीं ॥१७॥
महत्तत्त्व विविध तत्त्वांत । मी गुणात गुणप असत । पालकांत जनार्दनरूप वर्तत । संहारकर्त्यांत हर मी असे ॥१८॥
स्त्रष्टयांत मीं पितामह असत । कर्त्यांत अर्यंमा विख्यात । मोहकांत आत्मा वर्तंत । शक्तिरूप मींच असे ॥१९॥
देवांत इंद्र आदित्यांत विनायक । तेजयुक्तांत भानुरूप प्रकाशक । अमृतांत चंद्र मीं पोषक । प्रतापदांत अग्नि असे मीं ॥२०॥
समप्रवृतींत मीं धर्म । नियामकांत मीं यम । रक्षसांत निऋति परम । जळांत वरूण मीच असें ॥२१॥
बळवंतांत समीरण । निधींत धनदाता महान । रुद्रांत शंकर प्रभू शोभन । धनुर्धरांत कामदेव मीं ॥२२॥
भोगांत रति भोगदा असत । ती माझेंच रूप ख्यात । शेष मी सर्व नागांत । सर्पांत तक्षक मींच असे ॥२३॥
नागांत वासुकि वर्तत । द्वीपांत जंबुद्वीप प्रख्यात । समुद्रांत स्वादूदक असत । पर्वतांत मेरु पर्वत मीं ॥२४॥
पितरांत मीं यमरूप । वृक्षांत शमिका दूक्षरूप । देव दूक्षांत मंदार कामद स्वरूप । धेनूंत कामधेनू मी ॥२५॥
मीं दूर्वा औषधींत । पक्ष्यांत मयूर सिंह मृगांत । मासांत श्रावणमास वर्तत । चोरांत मूषकाधिप मीं असे ॥२६॥
वाहनांत अश्ववाह मीं असत । ऐश्वर्यांत सिद्धिरूप वर्तत । बुद्धिरूप सकल विद्यांत । प्रकाशकारकांत मीं चित्त ॥२७॥
वेगांत मी मन । योद्ध्यांत अभिमान । नरांत नराधिप महान । वर्णात ब्रह्माण मीं असे ॥२८॥
आश्रमांत चतुर्थ आश्रम । पोषकांत गृहस्थ मनोरम । त्यागी जनांत अवधूत परम । तिथींत चतुर्थी मीं तिथी ॥२९॥
प्रजापतींत दक्ष मी असत । ब्रह्मर्षीत भृगु साक्षात । देवर्षीत नारद दत्त अवधूतांत । तत्त्वज्ञांत कपिल मीं असे ॥३०॥
योग्यांत शुक विदेहांत जनक । निःसंगानें सनकादि पावक । ज्ञानी जनांत बादरायण एक । वसिष्ठ कर्मकार्यांत ॥३१॥
मुद्गल मी गाणपत्यांत । भ्रुशुंडी एकनिष्ठ भक्तांत । बृहस्पति ब्रह्मिष्ठांत । अन्नांत तिळस्वरूप मींच असे ॥३२॥
गव्यांत मी असे घृत । मध स्वादिष्ठ सर्वरसांत । मकर सर्व जळचरांत । नदींत कौमंडली नदी मीं ॥३३॥
तीर्थांत गाणप परम असत । मयूरक्षेत्र क्षेत्रांत । सुभुद्धींत काशिराजा ख्यात । अवतारांत मयूरेश ॥३४॥
गार्ग्य मीं उपासकांत । गृत्समद सर्व ध्याननिष्ठांत । सुबोध दैत्यजातींत । द्वेषकरांत ज्ञानारी ॥३५॥
मन मीं दुर्जय गोष्टींत । ओंकार सर्व वर्णांत । भाविकांत शुक्र असत । शुद्धचित्तांत त्रिशिर मीं असे ॥३६॥
याज्ञवल्क्य प्रतापी उपदेश ज्ञात्यांत । सूत पौराणिकांत । शौनक मुनि मी श्रोत्यांत । स्कंद मीं सर्व सेनानींत ॥३७॥
यशस्विजनांत मी । विष्णु असत । अनुत मीं पापांत । भेदधारकांत कलहरूपें वर्तत । लोभरूप मी प्राप्तींत ॥३८॥
चिंतामणि मी मण्यांत । ज्ञान पवित्र भावांत । सामगायक धर्ग्यांत । वेदांत अर्थ मी असे ॥३९॥
परशु मीं सर्वं शस्त्रांत । साक्षी निमेष जगांत । गज समग्र राज्यश्रीत । भ्रांतिदांत विषय मीं असे ॥४०॥
विषय मी भ्रांतिद पदार्थांत । रंभारूप अप्सरांत । चित्ररथ मीं गंधर्वांत । वैद्यनायक वैद्यांत मीं ॥४१॥
भिषग्वरांत धन्वंतरी असत । सरसांत मी सागर ख्यात । जान्हवी सर्व नद्यांत । मंत्रांत एक वर्णज मीं ॥४२॥
ब्राह्मणस्पत्य सूक्त मीं सूक्तांत । ज्ञानरूपधर मीं यज्ञांत । समान मीं सर्व प्राणांत । शक्तिमंतांत शक्ति मीं ॥४३॥
बृहदाख्य मीं सर्व उपनिषदांत । योगशास्त्र सर्व शास्त्रांत । मुद्गल पुराण पुराणांत । दंडकारण्य महा अरण्यीं मीं ॥४४॥
नियंत्यांत मीं दंड असत । भावकारण्यांत मायारूप वर्तत । याज्ञावल्क्य स्मृती सर्व स्मृतीत । तीच स्मूति सर्वंश्रेष्ठ ॥४५॥
गायत्री मी छंदांत । स्वानंदपुर मीं नगरांत । व्याकरण मीं वेदांगांत । योगदा मीं कलांत ॥४६॥
शुक्र मीं बीज निपुणांत । वृषभ भूमिधारकांत । नंदिकेश सर्वं वृषभांत । भैरवांत नग्न भैर्व मीं ॥४७॥
एसे नानाविध आकार । गणपाच्या विभूति पर । त्याचें वर्णन अशक्य अक्षर । साररूप मीं कथिलें हें ॥४८॥
जें जें श्रेष्ठमय असत । ती ती विभूति प्रख्यात । गणराजाची ती लोकांत । ऐसें जाण रहस्य तूं ॥४९॥
मुद्गल म्हणे दक्षाप्रत । ऐसें सांगून गणेश थांबत । नारद त्यास प्रणाम करित । नंतर गेला स्वच्छंद ॥५०॥
जो ही कथा वाचील । अथवा प्रयत्नें ऐकेल । त्यास मोह न लाभेल । सामर्थ्योत्पन्न तेज जाणून ॥५१॥
जे जे जीव जगांत । अपार महिमायुक्त असत । ते ते परमेश्वर विघ्नराजाचे ज्ञात । विभूतिपदाचे धारक ॥५२॥
ऐसे जाणून जे भजती । गणेशासी भावभक्ति । ते सर्वही ब्रह्मभूत होती । प्रजापते निःसंशय ॥५३॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गणे नवमे खंडे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पंणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP