खंड ९ - अध्याय ६
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष म्हणे मुद्गलासी । योगाचा अनुभव सांग आम्हांसी । जेणें शांति लाभेल मनासी । रस त्यागून तें सुशांतियुक्त ॥१॥
मुद्गल तेव्हां सांगत । दक्षा तेथ जगद्ब्रह्म सुख न वर्तत । त्याच्या मायामयग पाहून होत । त्यापासून निर्वृत्त ॥२॥
मी ना देह न मला देह । न मीं नानाभ्रममय । न मी चराचरमय । त्या उभयवर्जितही मीं नसे ॥३॥
मी न समष्टिसमायुक्त । न व्यष्टिग असत । ब्रह्म मीं अखिल वस्तूंत । त्या त्या भावें विवर्जित ॥४॥
मीन ब्राह्य सुख भोक्ता । न आंतरस्थपरायण तत्त्वतां । मी न समानगत आतां । ना आत्मप्रतीतिधारक ॥५॥
मी स्थूल कधीं नसत । तैसाचि सूक्ष्म नसत । न आनंदग कदापि असत । न मीं नाददेहस्थित ॥६॥
सर्वाकार मी सदा ज्ञात । माझे चार पाद मायाधृत । मायाहीन प्रभावें असत । पादहीन मीं निश्चित ॥७॥
मायायुक्तवियुक्तत्व नसत । कदापि माझ्यांत प्रतिष्ठित । द्वंद्वमायासंस्थापित । तेंही आश्चर्य एक उत्तम ॥८॥
ऐशा अनुभवें योगी होत । सदा बिंदुगत सतत । तेथ लीनस्वभावें होत । सदा शांतियुक्त तो ॥९॥
तैसाच मीं भेदहीन । माझ्यांत भेद नसे म्हणून । सतत संतत भावानें प्रसन्न । स्थित असें मीं निरतर ॥१०॥
मीं कांहीं न निर्मित । न हरण करित न पाळित । हें असें निश्चित । जग भासतें स्वयमेव ॥११॥
तें माझ्यांत धारण होत । स्वस्वभावें उत्पन्न स्थित । तें जरी नष्ट होत । तरी माझी न हानि वृद्धी ॥१२॥
न मी विश्वांत जीव । न तैसा साक्षिभूत शिव । भ्रांतीनें मायायुत वा मायाहीनत्व । साक्षात् भाव मानिती अयोगी ॥१३॥
जैसे मेघांचें पटल नभांत । जरी पसरलें सर्वत्र युत । तरी सुर्यास तें कैसें आच्छादित । सत्यार्थें सांग दक्षा ॥१४॥
कारण ढगांचें अभ्र नष्ट होत । तैं सूर्य आच्छादनवर्जित । तैसेंच संयोगीजन मानतात । मोहविमोह माझ्यांत ॥१५॥
सदा एकात्मस्वरूप युक्त । मीं सदैव जरी असत । तरी मोह विमोह माझ्यांत । कैसे भेद हे मायोत्पन्न ॥१६॥
तथापि विश्वसंयुक्त । मीं होतों मोहित निश्चित । आत्मरूप जाणून मोहयुक्त । सदा साक्षी मीं निःसंशय ॥१७॥
मायेमुळें मी जीवसंज्ञ । तैसाचि मीच शिव प्राज । माझ्यांत ब्रह्मांत विश्व सर्वज्ञ । दिसे अथवा न दिसतें ॥१८॥
ऐसें जाणून स्वयं योगी वर्तत । द्वंद्वभाव त्यागून सतत । सोऽहं ब्रह्मांत स्थित । परम शांतियुक्त राही ॥१९॥
आतां यापुढें सांगेन । ब्रह्मानुभव महान । न देह मी देह्स्थ न । मी यांतलें न कांहीं ॥२०॥
संतत विश्व माझ्यांत नसत । मी विश्वांत न राहत । भेदाभेदविहीनत्वें रत । ब्रह्म मी सदा ब्रह्मांत ॥२१॥
विश्वरूप मीच हें असत । माझ्यांत सर्व प्रतिष्ठित । विश्वहीन यांत संदेह नसत । सदा एकरूपधारक मीं ॥२२॥
मी न कांहीं निर्मित । न पाळित वा नाश करित । विश्व हें सृष्ट पालित हृत । मायाबळें मीच सदा ॥२३॥
माझ्यांत संतत भाव न दिसत । न विश्व विविधाकार मानित । नानादेहपरायण जें असत । सदा बोधमय मीं असे ॥२४॥
देहदेहियुत असून । मला न बंधाबंध जाण । मायासंयुक्त नित्य म्हणून । देहदेहिमय ज्ञात ॥२५॥
मायाहीनप्रभावें होत । देहदेहि विवर्जित । परी मायायुक्त विमुक्तत्व । माझ्यांत ऐसें दिसणार ॥२६॥
सदा मीं वोधरूपाख्य वर्तत । ब्रह्मांत ब्रह्मस्थित । ऐश्या बोधात्मक अनुभवें सतत । योगी योगसमायुत ॥२७॥
सदा शांतीनें प्रवर्तत । आतां विबोधात्मक तुज मीं सांगत । ब्रह्मभूतक जें निश्चित । न मीं पुरुष प्रकृति न मीं ॥२८॥
त्यांच्या योगें मीं बोध । ब्रह्मा मीं मज न भोग । सदा ब्रह्मस्थित । अभोग । क्रीडाहीनप्रभावें मी ॥२९॥
मिथ्यारूप जग समस्त । जगदात्मा तैसा संमत । त्यांचें योगकर ब्रह्म ख्यात । मिथ्यामूलप्रकाशक ॥३०॥
मी ब्रह्म नसे माझ्यांत । प्रकृति का पुरुष क्वचित । त्यांचा योग भ्रमाकार वर्तत । सदा क्रीडापरायण ॥३१॥
बोधानें उत्थान भाव जन्मत । ब्रह्माचा तोही मिथ्याभूत । तो कैसा असेल माझ्यांत । सत्य ब्रह्म ऐसें वेद म्हणती ॥३२॥
त्या सत्य ब्रह्मांत । अनृताकार खेळ कैसा असत । सदा ब्रह्ममय जो ब्रह्मांत सक्त । ब्रह्मभावित सर्वदा ॥३३॥
तेथ भेदादिक नसत । स्त्री पुरुष भावमय न वर्तत । मायेने हें सर्व रचित । सर्व मिथ्याभूत न संशय ॥३४॥
ती माया न माझ्यांत स्थित । दक्षा निराधारा भ्रमान्वित । ब्रह्मरूप मज पाहून नष्ट । स्वयमेव ती होत असे ॥३५॥
जेव्हां माया नष्ट होत । सत्यरूप मींच उरत । जर मीं असलों मायायुक्त । स्त्री पुरुषमय जग त्यायोगे ॥३६॥
मी जर तिज निर्माण करित । तरी ती माझ्यांत कैसी असत । जेथ अनृत स्वरूप नसत । वेदवादाच्या आधारें ॥३७॥
तेंच सत्य आख्यात । म्हणून बोध न दिसत । हें अखिल विश्व अनृत । प्रकृतिपुरुषात्मक असे ॥३८॥
म्हणून मी भिन्न असत । एकरूप सत्यरूप शाश्वत । ऐश्या योगेंच शांतियुक्त । होईल नर निःसंशय ॥३९॥
संख्या त्यागून तो होत । स्वभावेंचि ब्रह्मभूत । आतां स्वानंदयोग तुजप्रत । सांगतो हितकारक जो ॥४०॥
तो ऐक प्रजानाथा एकचित्त । सत्य असे उत्थानरहित । अनृत तें उत्थानसंयुक्त । द्विविधत्व नसे ब्रह्मांत ॥४१॥
तें स्वस्वरूप नित्यद । बोधयुक्तत स्वतः उत्थान विशद । सांख्य उत्थानवर्जित शुद्ध । त्यायोगें ब्रह्म असत्स्वानंद ॥४२॥
मीं उत्थानवर्जित । मीं नसे उत्थानयुक्त निश्चित । उत्थानयुक्त तैसाचि हीन असत । पहा माझा उत्तम योग ॥४३॥
ब्रह्मांत माझ्या स्वरूपांत । तें सर्व एक होत । तेथ उत्थानयुक्तत्व नसत । तैसेंचि उत्थानहीनत्व नसे ॥४४॥
मायाप्रभावें मज म्हणती । उत्थानयुत हीन निजस्वरूपरत जगतीं । उत्थानसंयुत ब्रह्म ख्याती । तैसेंचि तें उत्थानहीन ॥४५॥
ब्रह्मांत तन्मय तें सर्व । संयोग अयोगभावें सदैव । ब्रह्मयांत माझ्या रूपात संयोग । योग्यांचा जेव्हां होतसे ॥४६॥
तेव्हां उत्थानयुत वा हीन । कोण पाहील निरुपम भिन्न । समाधि हीनभावें मोहून । विविधत्व ते पाहती सदा ॥४७॥
ऐसे ते अयोगी असत । योग्यांत हा संदेह नसत । सर्व ब्रह्म हें वचन वेदांत । वेदवादी सांगती ॥४८॥
म्हणून माया त्यागून । ब्रह्माकार नरें व्हावें प्रसन्न । या विधीनें योगसाधन । करावें समाधियोगानें ॥४९॥
ब्रह्मांत होऊन ब्रह्मभूत । त्यास शांति लाभेल शाश्वत । आतां सत्स्वरूपाचा विधि तुजप्रत । योग याविषयीं सांगतों ॥५०॥
तो जाणून योगमार्ग अनुसरत । तो मानव योगी होत । सर्व ब्रह्म हें वचन वेदांत । असे यांत न संशय कांहीं ॥५१॥
तेंच उपाधिसंयुक्त । मायाप्रभावें होत । एकमेव अद्वितीय असत । ब्रह्म वेदवादानुसार ॥५२॥
तरी सर्व कुठलें विलसत । जें नानाभावयुक्त । मीं उत्थानसंयुक्त नसत । नसे उत्थानवर्जितही ॥५३॥
त्यांच्या योगमय मी असत । अद्वितीयांत न स्थित । न सत्य न असत्य माझ्यांत । न त्यांचा संयोगही ॥५४॥
ब्रह्म संयोगद नसत । सदा मी ब्रह्मसंज्ञ वर्तत । न मीं सत्यरूप निर्मित । न अनृतरूपही तैसें ॥५५॥
त्यांचा योगही नसत । न मीं आत्मभावें अमृत । आदिमध्यान्तभाव माझ्यांत । कुठून असती सांग तरी ॥५६॥
सदा अमृतमयांत स्थित । आत्मा मीं ब्रह्मभावित । मायासंयुत सर्व असत । सर्वांचें जीवन परम ॥५७॥
मज म्हणती विशेषयुत । माझ्यांत सर्व न वर्तत । सर्वात्मक परब्रह्म असत । नाना खेळ पूर्ण तें ॥५८॥
तैसेंचि तें खेळहीन । किंवा तयांचा संयोग न । तेथ मीं न आगत ना गत असून । स्वयमेव माझें जीवन पहा ॥५९॥
तेथ सर्वात्मविकार माझ्यांत । कैसा दिसणार सतत । भ्रांतियुक्त मज म्हणत । ब्रह्मांचें जीवन परम ॥६०॥
ब्रह्मांचें अथवा जगताचें । धारण जीवन मीं न करी तयांचें । स्वयमेव प्रभावें तयांचें । माझ्या वृथा दर्शन ॥६१॥
सदा ब्रह्मांत मीं स्थित । भेदाभेदविवर्जित । अद्वितीयप्रभावें मी असत । आत्मा पूर्ण स्वभावें ॥६२॥
या योगमुख्यें होत । योगी मानवा या जगांत । ब्रह्मांत ब्रह्मभूतत्वें वर्तत । शांतियुक्त तो सदा ॥६३॥
अतःपर जें वर्णनीय । ब्रह्म अनुभवरूप होय । तें महाप्रीतीनें योगमय । सांगतों तुज योगलाभार्थ ॥६४॥
न मीं दक्षा सर्वात्मक । न कदापि आत्मात्मक । आनंद मीं त्यांच्या साम्यें एक । ब्रह्मांत ब्रह्मभावानें ॥६५॥
मायाबळेंच प्रतिष्ठित । सर्वात्मक माझ्याच प्रभावें सतत । एकमेव अद्वितीय असत । त्यांच्या साम्यांत मीं असें ॥६६॥
ब्रह्मांत सर्वभाव असत । भावहीन कुठून वर्तत । अमृतमृतमूल जें ज्ञात । तें न माझ्यां सर्वंदा ॥६७॥
अनंत लीलायुक्त असत । लीलाहीन न नें असत । माझ्यांत लीलायुत हीन वर्तत । उभय हे बळ माझें असे ॥६८॥
अखंडरूप भावें मीं स्थित । सदा अमल विश्वांत । नाना विकारहीनत्वें ख्यात । उभहीन मीं निश्चयें ॥६९॥
ब्रह्मांत सर्वभाव असत । यांत संशय कांहीं नसत । सदात्मभाव तेथेच ज्ञात । साम्य वेदांत । स्मृत असे ॥७०॥
जे जें वेदांत वर्णित । त्या सर्वांत ब्रह्म स्थित । जें असे वर्णनातीत । न तें खरोखर ब्रह्ममय ॥७१॥
म्हणून ब्रह्म सम ज्ञात । वेदविवादें सतत । आनंद उभयानंदें ख्यात । आसंमतांत विचार करी ॥७२॥
आनंद मीं यांत संदेह नसत । ब्रह्म ब्रह्मांत स्थित । याच अनुभवें नर होत । शांतियुक्त सर्वदा ॥७३॥
म्हणून तुज व्यक्त संज्ञस्थ सांगेन । ब्रह्मानुभव महिमान । त्यायोगें योग जाणून । मानव योगी होईल ॥७४॥
मीं तिघांनी हीन अव्यक्त । मोहविहीन त्रिनेतिकारक असत । सर्वात्मक माझ्यांत नसत । तैसेंचि अमृतमय नसे ॥७५॥
साम्य स्वाधीन संज्ञात । नंदनात्म ब्रह्मांत । उत्थानयुक्त हीनाख्य स्थित । मोह सर्वमयांत सदा ॥७६॥
अमृतमय मोह वर्तत । अखंड ब्रह्मांत सतत । नंदन सर्व भावांत । मोहरूप समत्वें ॥७७॥
सदा स्वाधीनता त्यांच्यात । तें कैसें तिघांत स्तिमित । तिघांनीं मी युक्त अत्यंत । तोही त्रिविध मोहानें ॥७८॥
भिन्न मीं त्या तिघांत । मी कर्ता नसे निश्चित । नानाभावसमायुक्त । भावहीन त्याहून पर ॥७९॥
साम्य उभयग त्याहून । पर अव्यक्त असून । त्रिविधा माया निर्मून । मी खेळतों मोदानें ॥८०॥
मोहहीन मी असत । मायेच्या स्वप्रभावें वर्तत । माझ्या आज्ञेनें त्रय सतत । नित्य चाले यांत न संशय ॥८१॥
स्वस्वव्यापारसंयुक्त । स्वाधीन मीं प्रभावयुक्त । तिघांच्या मध्यें प्रज्ञास्थित । यांत संशय कांहीं नसे ॥८२॥
माझ्या अंतरीं कोणी नसत । प्रेरक साधुश्रेष्ठ विश्वांत । स्वस्वभावांत नित्य स्थित । प्रेरक या तिन्हींत ॥८३॥
तथापि मज न मोह असत । मी प्रेरकही नसत । मी असे अव्यक्तरूप ख्यात । वेदमताप्रमाणें ॥८४॥
येथ नाना नसे हा भावयुक्त । सवा नानाविवर्जित । न येथ नानाप्रमाणें ज्ञात । अव्यक्त ब्रह्म सनातन ॥८५॥
तेव्हांच मीं सुखांत सक्त । सदा ब्रह्मीं योगरत । सर्वांचा मीं कर्ता नसत । महादंडधर प्रभू ॥८६॥
माझा कर्ता कोणी नसत । मी कोणासी न निर्मित । त्यायोगें मीं अव्यक्त । ऐसें विश्चित जाणावें ॥८७॥
मनोवाणीविहीन । मी अव्यक्त परम शोभन । या अनुभवें शांति लाभून । मानव धन्य होतसे ॥८८॥
पूर्ण निजानंदाचा अनुभव । सांगतों ऐक सौख्यद भाव । ज्यायोगें स्वानंदयुक्त अभिनव । होशील तूं महामते ॥८९॥
मी ब्रह्ममय साक्षात । माझ्यांत मोहविवर्जित । कोठून ब्रह्म मोहयुक्त । निजरूपीं होईल केव्हां ॥९०॥
वेद महावाक्ययुक्त । जेव्हां समाधीनें लीन होत । तेव्हां स्वानंदग ख्यात । पहा वेदांत महात्म्यांचे ॥९१॥
अहंभावयुत जंतु होत । मायेनें तुर्यभावें मोहहीनयुक्त । भ्रमभावें तो होत । ऐसें रहस्य जाणावें ॥९२॥
मीं चतुर्विध जग निर्मित । नानाभावपरायण जें असत । भावहीन समान त्यांत स्थित । अव्यय तैसें जाणावें ॥९३॥
ब्रह्मदोषविहीन दोषयुक्त । साम्य नेतिमय कीर्तित । वेदांत चतुर्हीनपर असत । योगी स्वानंदांत तन्मय ॥९४॥
जो समाधीनें तन्मय होत । तो स्वात्मरूप चत्वार मोहित त्यांत । न पाहतां समाधियुक्त । निज रूपांत लीन होई ॥९५॥
पुनर्दर्शन त्याचें होत । कैसा मीं ही माया असत । तिज त्यागून योगसंयुक्त । ब्रह्मांत ब्रह्मभूतस्वरूप मीं ॥९६॥
जेव्हां ब्रह्मांत योगतन्मय । होतो योगी स्वयमेव उभय । तेथ स्वपरादिक ज्ञेय । कोठून तेव्हां राहील सांग ॥९७॥
अहं ब्रह्म ऐसें उक्त । जें महावाक्य वेदांत । तें उमजून कृतकृत्य होत । योगसेवेनें सर्वदा ॥९८॥
ऐशापरी संयोग योगानें होत । तन्मय तो ब्रह्मांत । योगी तो शांतियुक्त । साक्षात शांतिप्रधारक ॥९९॥
आतां यानंतर आयोगाख्य सांगतों । योग उत्तम जो असतो । त्याच्या अनुभव घेतां होतो । शांतियुक्त नर तत्क्षणीं ॥१००॥
अहं ब्रह्म ऐसें कथित । हें कैसें शक्य होत । तन्मयत्व प्रजानाथ होत । ब्रह्म संस्थित जर ब्रह्मांत ॥१०१॥
ब्रह्मवाणीविहीन । मनोगतिहीन । त्याचें कुठेंही न आगमन । न गमन कदापिही ॥१०२॥
जेव्हां विहारांत भिन्न । संसक्त होतें शोभन । तेव्हां योगें स्वानंदघन । अन्यथा तें न होतें ॥१०३॥
जरी ब्रह्म ब्रह्मांत स्थित । आगमन गमन त्यांत नसत । तरी योगानें तन्मय त्यांत । कैशा परी होय नर ॥१०४॥
सदा मी ब्रह्मरूप असत । न कदापि मायासंयुक्त । भ्रान्तीनें मज न जाणत । स्वमहिम्यांत सदा स्थित ॥१०५॥
सर्व संयोगयोगाख्या वर्तंत । माया नाना भ्रमयुक्त । ब्रह्मरूप माझ्यांत । कैसी राहील ती ब्रह्मवर्जिता ॥१०६॥
जैसें मृगजलांतील तोय । व्यर्थ भ्रमप्रद न माय । तैसी महामाया माझ्यांत संयोगसोय । धरी परीती व्यर्थ असे ॥१०७॥
ब्रह्म दोष विहीन ज्ञन । ऐसें जरी वेदांत कथित । तेंच मायायुक्त मोहित । कैसें होतें हें न कळे ॥१०८॥
भ्रांतियुक्त जें तें भ्रांतिहीन । सुयोगानें कैसे होत पावन । ब्रह्म मायायुक्त वचन । ब्रह्मवर्जित ते मूर्ख म्हणती ॥१०९॥
म्हणून मी जगांत वा ब्रह्मांत । प्रभु कदा नसत । न पुनः जात ब्रह्मांत । योगसेवेनें पुनरपि ॥११०॥
ब्रह्मांत विविधाकार वर्तत । माया ती परी तिच्यांत । ब्रह्म कदापि न वसत । अपवाद प्रभावेंही ॥१११॥
अयोग त्रिविध ख्यात । मृदु मध्य अधिमात्रगत । त्यांचा भेद तुज सांगत । मायामूलनिकृंतन ॥११२॥
स्वतोत्थान भ्रम सोडून । मी ब्रह्म अपवादें जाण । जो नर ऐसें करी वर्तन । तो मृदुयोगयुक्त असे ॥११३॥
परतोत्थानज भ्रम सोडून । दक्षा अयोगानें पावन । राहतो जो मध्यग म्हणून । योगमार्गांत ज्ञात असे ॥११४॥
स्वतः परत । उत्थानहीन । संयोगधारक जें ब्रह्म पावन । त्याचा भ्रम त्यागून । जो राहतो तो अधिमात्रग ॥११५॥
मी न आलों जगांत । भ्रांतीनें वा ब्रह्मांत । तरी गमन माझें खचित । योगानें कुठें होणार ॥११६॥
ब्रह्मभूत स्वभावें राहत । नरोत्तम जो निवृत्तियोगांत । सदा शांतियुक्त असत । आतां पूर्णयोग अनुभव ऐक ॥११७॥
पूर्ण योग जाणतां नर होत । योगी गणेशप्रिय सतत । मीं न ब्रह्मवेदोक्त । भेद भ्रांतिद द्विविध जें ॥११८॥
ब्रह्मांत द्वितीयत्व कुठून । जगद्रूप महचित्त असून । पंचविध चित्त त्यागून । योगी होतो मानव ॥११९॥
जगद्रूप महा चित्त । ब्रह्मरूप तैसें मत । जगद्ब्रह्माच्या संयोगें ख्यात । अयोगचित्त जाणावें ॥१२०॥
भ्रांतियुक्त चित्त होत । नाना मायांनी मोहित । योगसेवेंत जे रत । तें भ्रांतिहीन होतसे ॥१२१॥
मी कुठून तैसेच ब्रह्म कुठून । त्याचा संगम कुठून । अभेद सर्वगत वाटून । चित्त क्रीडा करी तेथ ॥१२२॥
मी न सर्वत्र योगानें वसत । संयोग अभेदभावें सतत । चित्तमोहानें राहत । ऐसें अयोगी वृथा म्हणती ॥१२३॥
ब्रह्म ब्रह्मांत स्थित । जें न आगमन गमन रत । अयोगधारक मी असत । चित्त न तेंच संमत ॥१२४॥
स्वधर्म चित्त वांछित । भ्रमयुक्त तथा अर्थयुक्त । मोक्ष ब्रह्मभूत असत । पंच भूमिप्रभावानें ॥१२५॥
चित्ताचा त्याग करून । महायोगी सुशांतिसंपन्न । ब्रह्मभूत तो होऊन । चिंतामणि नाम प्रभो ॥१२६॥
चित्तरूप महाबुद्धि । तेथ भ्रांतिप्रदा सिद्धी । त्यांचा पति साक्षात् सर्वधी । खेळतो आपुल्या इच्छेने ॥१२७॥
त्यास जाणून ब्रह्मभूत । होतो योगी संशय नसत । सिद्धिबुद्धिमय सर्व त्यागित । योगी होतो गणेशरत ॥१२८॥
ब्रह्मांत संयोग अयोग नसत । सिद्धिबुद्धिभ्रमें वांछित । त्यांचा पति जो अतीत । उभय शक्तींच्या वर्ततसे ॥१२९॥
गणेश मीं यांत न संदेह । कोठून माझ्यांत हा मोह । सिद्धिबुद्धिकृत सर्व संदेह । तोअ त्यागितां योगी होतसे ॥१३०॥
सिद्धिबुद्धिसमायुक्त । ब्रह्मभूत नर होत । शांतियोगानें शांतिस्थ । राहतो नित्य आदरानें ॥१३१॥
ब्रह्मांत योगभावानें सतत । मायायुक्तविहीन वर्तत । शांति लाभूत स्वयं त्यागित । योग तेव्हां योगी होतो ॥१३२॥
ऐश्यापरीच्या अनुभवें युक्त । भ्रांतिभव हें चित्त । रस त्यागून वर्तत । योगांत रसयुक्त तें ॥१३३॥
रसयुक्त तें सदा होत । तत्पर निश्चल शांतियुक्त । मायामलानें विवर्जित । ऐसें हें सुख अनुभवजन्य ॥१३४॥
जें जाणून ब्रह्मभूत । योगी होत्त संशय न यांत । जो हें वाचीत वा ऐकत । योगानुभवाचें माहात्म्य ॥१३५॥
त्यास सर्व वांछित लाभत । अंतीं शांतिलाभ निश्चित । योगचित्तानुभव शांति वर्णनातीत । अनुपम असे हें सुख ॥१३६॥
ॐ तत्सदिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन योगिचित्तानुभवशांतिसुखवर्णनयोगो नाम षष्ठोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP