खंड ९ - अध्याय ३४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगतो महात्म्य अद्‍गल पुरान श्रवणाचें साद्यंत । आश्वलायनवंशीय वसत । ब्राह्मण एक सुरुचि नाम ॥१॥
स्वधर्मनिष्ठ तो ब्रह्मज्ञानपर । नाना योग धुरंधर । शमदमादि साधनपर । योगचर्या पालन करी ॥२॥
अंतीं सहज योगस्थित । तेथ स्वाधीनता पाहत । त्यायोगें होत विस्मित । म्हणोनि गेला स्वगुरूकडे ॥३॥
प्रणाम करून त्यास म्हणत । महायोग्या सांग मजप्रत । शांतिप्रद योग सर्वभावें सांप्रत । आमुचा तूं वंशगुरु ॥४॥
ज्ञानाची पराकाष्ठा तूं वाटत । आश्वलायन तें ऐकून म्हणत । पैलानें जो कथिला मजप्रत । तो योग मीं तुज सांगेन ॥५॥
चित्त पंचविध त्यागून । अहंब्रह्म हा बोध जाणून । सरस जेणें शांतिस्थ होऊन । स्वानंद प्राप्त करशील ॥६॥
सरस चित्त ज्यापासून । संभवतें तन्मय तें असून । अंतीं ज्याच्यांत लय पावे प्रसन्न ॥ तें तत्त्व गज जानावें ॥७॥
तेंच आनन त्याचें भजन । करी पाळून सर्व विधान । ऐसा पूजितां गजानन । सुशांतिस्थ तूं होशील मुने ॥८॥
ऐसें बोलून तो थांबात । तेव्हां त्यास नमून जात । आपुल्या आश्रमीं मुदितचित्त । सुरुचि ब्राह्मण निश्चयें ॥९॥
गजाननपर होऊन भजत । नित्यनेमें त्यास आदरयुक्त । गजानन चरिताचा खंड वाचित । मुद्‍गल पुराणीं जो असे ॥१०॥
त्यायोगें होऊन मुदित । गणाधीश प्रकट होत । प्रशांतिद योग तयाप्रत । दिला गणेश प्रभूनें ॥११॥
भक्ताची वांछा पूर्ण । करितसे गजानन । भक्त सुरुचि जाणे ज्ञान । चार वेदस्थ रहस्थ जें ॥१२॥
गजाननाख्य परब्रह्मांत । जे सर्वदा असे स्थित । जेथ विश्वें ब्रह्में पावत । लीनत्व योगरूपांत ॥१३॥
ऋग्वेदांत जें ख्यात । सर्वग ब्रह्म निश्चित । तेंच ‘ग’ अक्षरें ज्ञात । गजाननाच्या नांवांत ॥१४॥
विविध विश्वें निर्माण होत । तैसीच ब्रह्में शाश्वत । म्हणून ‘ज’ अक्षर ख्यात । द्वितीयात्मक एक जें ॥१५॥
आदिमध्यान्त भावांत । ज्या स्वरूपें तें असत । यजुर्वेवांत ब्रह्म प्रख्यात । तोच अज गजानन हा ॥१६॥
पंचचित्तमय जें असत । तें नाशिवंत समस्त । नष्ट होत हें दर्शवित । ‘न’ अक्षर हें रहस्य जाण ॥१७॥
नष्ट भावांत जें राहत । आसमंतीं तेंच ब्रह्म असत । सामवेदांत ख्यात । आन शब्द गजाननीं ॥१८॥
पंचचित्तमय सर्व नष्ट । होतसे तेच योगभावें कीर्तित । ब्रह्मरूप कीर्तित । तें अथर्वणांत निःसंशय ॥१९॥
मीच आत्म्या ऐसें ज्ञात । अज्ञानें परी न होय स्मृत । गजाननांत तें न ज्ञात । ऐसा हा शब्द गजानन ॥२०॥
चार वेदांचें सार ख्यात । गजानन या एका शब्दांत । ऐशा गजानना जाणून भजत । सुरुचि तो सर्वदा ॥२१॥
त्याचें माहात्म्य वाचित । तेथ एक आश्चर्य घडत । एक कबुतर वृक्षस्थित । ऐकतसे गजानन खंड ॥२२॥
तें कबूतर रोगी पापयुक्त । श्रवणमात्रें रोगहीन होत । पापापासून विमुक्त । अंतीं गजानन लोकीं गेलें ॥२३॥
तेथ गजाननास पाहून । ब्रह्मीभूत तें होत तत्क्षण । नकळत करी पुराण श्रवण । त्याचें फळ एवढें जरी ॥२४॥
तरी हेतु धरून मनांत । जे नाना जहा हा खंड ऐकत । त्या पाठाच्या वाचका जें लाभत । तें फळ वर्णनातीत ॥२५॥
ऐहिक भोग भोगून । ते अंतीं मुक्त होऊन । स्वानंदलोकीं करिती गमन । ब्रह्मभूत तेथ होती ॥२६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे मुद्‍गलदक्ष संवादे गजाननचरितश्रवणपठनमाहात्म्यवर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP