मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद...

पानपतचा तिसरा पोवाडा - भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रदय फुटल कडाकडी । मुक्त पावले साहेब नाना कशा केल्या देवा तडातोडी ॥ध्रु०॥
भाऊसाहेबाची अचळ बुद्ध, प्रसन्न त्याला भगवंत । अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित्त ॥ बारा सरदार बारा उमराव बसोनि करिती खलबत । घटका तिथी भट सांगतां बरवा आहे मुहूर्त ॥ बाईसाहेबाची आज्ञा घेतली जावे हिंदुस्थानांत । ओटयांत घातले विश्वासराव केला हवाला म्हणवीत ॥ अष्ट उमराव भाऊसाहेब घेऊन गेले पानपतावरत ।......॥ केला हकारा दिला नगारा स्फुरण आलें त्याच घडी । बुद्धीचे सागर सदोबा घालुनि गेले कशी उडी ॥ भाऊ नानाच० ॥१॥

हत्ती घोडे लाबलष्कर ते एक एक होता हंबीर । त्यांचीं नांवें तुम्हां सांगतों ऐकुन घ्या जरा सत्वर ॥ धाकले नाना कुळाक्षरि त्याच्या मोहरलें फुलशहर । महिपतराव तेही पानसे तोफखान्याचे सरदार ॥ गोविंदराव बुंदेले अग्रीचा पुल्ला गेला होता रस्त्यावर । बळवंतराव रणशूर खासा पडला नजरेसमोर । विठ्ठल शिवदेव मर्द जातीचा क्षणभर नाहीं धरला धीर । त्याच्या मागें पळोन गेले अंताजी माणकेश्वर ॥ बाजी भिवराव अष्ट उमराव रणामधिं झाले चूर । दिल्लीमधिं तक्त स्थापलें ठेवले नारो शंकर ॥ असे एक एक ब्राह्मण कितेक लढाऊ लाज वाटती मज थोडी । अशुद्धाच महापुरे वाहती शिरें उडालीं झडाझडी ॥ भाऊ नानाच० ॥२॥

पांडव दलचा जसा क्षत्रियवीर तारक अर्जुनाचा । इभ्रमखान व्याघ्र जातीचा सोबती झाला मरणाचा ॥ ज्यानें सूड घेतला हेतु पुरविला गिलचांचा । असला दुसरा चाकर होईना निमकहलाल भाऊसाहेबाचा ॥ वनीं राहिले विश्वासराव जीव गोपिकानानाचा । तिथें भाऊची शुद्ध हरपली सागर होता बुद्धीचा ॥ अवघ्या लोकांनी हिंमत टाकिली खांभ बुडाला दौलतीचा । सज्जन म्हणती भाऊ बुडाले मोठा घात झाला आमुचा ॥ दुर्जन म्हणती बरवें झालें कांच मिटला जगाचा । जे गिलचासंगें मळोन राहिले हरी ठाव पुसेल त्यांचा ॥ भाऊसंगे ब्राह्मण मेले नाहीं लागला अर्धघडी । काय तयाची कीर्त सांगावी? साहेब नाम धडाधडा ॥ भाऊ नानाच० ॥३॥

होळकर भले झुंजार पळ काढिला लौकरी । जेव्हा गिलचाचा मार सुटला ठाव देईना त्याला धरत्री ॥ सोनजी भापकर मानाजी पायगुडे रणांत राहिल्या रणभेरी । मोठमोठे सरदार जवळ पडला जनकोजी शिंदा यशवंतराव धारकर ॥ राव दमाजी निघून चालले असे गळाले क्षत्री । समशेर - बहादर रणीं थकले कर्त्याची गत आहे न्यारी ॥ भाऊ नानाच० ॥४॥

आम्हीं गाइलें पद सजना जिवा लागल्या झुरणी । भाऊसाहेबाच दुःख एकतां थरथर कांपे मेदिनी ॥ रामचंद्रांनी सीता टाकिली जशी येऊं दे भवानी । रडे गोपिकाबाई एकटी छत्र दिसेना नयनीं ॥ विश्वासराव भाऊ बुडाले पानपताचे मैदानीं । भाऊवांचून आम्हांला कोण नेईल पैलतिरीं ॥ श्रीमंत महाराज ह्याला प्रसन्न गौरासुरेपाणी । विश्वासराव भाऊ बुडाले पानपताचे मैदानीं ॥ सटवा राम नित्य हमेशा चरणीं वाजतो चौघडा । हाच पोवाडा ऐक शाहिरा नित्य होती घाडामोडा ॥ भाऊ नानाच० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP