सोलापूरच्या लढाईचा पोवाडा - श्रीमंत म्हाराज पेशवे धनी...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
श्रीमंत म्हाराज पेशवे धनी मुकले राज्याला ॥ शिरी सलामत इंग्रज बहाद्दर दख्खनी झेंडा लाविला ॥ध्रुवपद॥
श्रीमंत गेल्यावर पाठीमागे वर्तमान काय झाला । सोलापूरच्या किल्ल्याजवळ तोफखाना लढूं लागला । त्या किल्ल्याचा धनी गणेशपंत काय बोले फिरंग्याला । लक्ष बांगडी फुटेल परंतु किल्ला देईना तुह्याला । दारुगोळी भांग तमाखू कमी नाही पैशाअला । दाणापाणी उदंड भरले अराब कोरडीला । कडीतोडे बक्षिसी पोशाग देईन शिपायाला । हरतर्हेने लढवीन किल्ला नका खवळूं आह्यांला । तीन हजार गारदी शिपाई अरब चाफेलीला । बंदोबस्तीने किल्ला रेखला हुकुम केला तोफेला । नव्हते किल्ल्याचें लगीन लागलें बाशिंग बांधलें रणमंडळाला ॥१॥
चौभौवतेनें घालून वेडा वाजवी तंबूर । अकराशें पलटण शिवाय दुलेखान सरदार । तुरुप स्वारानें वेंठ उठविला तोफ किल्यासमोर । व्यर्थ जिवासी तुह्यी कां मरतां धाडा मनसुबदार । सल्यामामल्यासाठी फिरंगी चालून गेला म्होर इश्वासानें आत घेतला सांगतसे मुजकुर । अवधी दखन घेतली तुह्यी कायल बहुत आह्यांवर । गडकिल्ले सोडून पळाले बातमी दुरवर । किल्लेदाराने धरून फिरंगी कापलें कापलें शीर । वेशीवरतें शीर ठेविलें पाहातसे लष्कर । आग तळव्याची गेली मस्तका लईन पुढें तंबूर । रेवनीला होता आरब तोफखान्यासमूर । खननन तलवार झडली एक सवा पार । सतरा हजार अरब छाटिला जालासे धुंदकर । पांच पलटन घायाळ झाली डोली करा तयार । त्या वेळेला खासा पडला फिरंग्याचा सरदार । घायाळ मुडदे पावून कयकजन नवस करती पिराला । येवढी लढाई पार पडू दे करीन कंदुरी तुला ॥२॥
तोफा बाणाच्या माळा ओढुनी नेल्या लष्करांत ॥ भर दुपारा हल्ला नेमिला आला किल्ल्याभोवत ॥ रणमंडळाहून तोफ सोडिली गोळा लष्करांत ॥ दिल्या मुडद्यावर हात फिरंगी शिरला गोळा पुरांत ॥ दुल्लेखानाने लूट घेतली जलमाची संगत ॥ सावकारानें प्राण सोडिला होईल कोणची गत ॥ गल्लोगल्लीने पडले मुडद्याचे पर्वत ह्यांकाळ बुरुजावरून बळावली तोफचि विपरीत । खुर्दा घालुनी तोफ ठांसली धरी मुजरा पेठेत । हजार बाराशें लहिन उडाली पावएक घटकेत । दरवाज्याला जाऊन भिडले शिडया लावी खंदकांत । किल्यामधिं झाला फितुर मग पडली मसलत । ठाणें मोकळें करून देतों वाट द्यावी आम्हांला । सोडून किल्ला जाला वायला ॥ नीर फुटला लोकांला ॥३॥
दखनेमधिं पयस फिरविला राजे आले हाताला । सातारा देश प्रांत चांगला दिला गरुड सायबाला । गराड साहेबाची फार चौकशी जाहिरनामा फिरविला । चौहप्त्याने द्यावा पैसा कौल दिला रयतेला । गड किल्ले हे आड बावडया चट मांडाया लागला । झाडझुड मुलमाणस चट ल्हिया लागला । चाक घेऊनी गोरा हिंडतो जमीन मोजियला । हरबाबतीने कुळें रक्षिली ताकीद शेकदाराला । लांचलुच जो म्याल खाल तर वतन पडल जप्तीला । हजार रुपये अम्हि वसुल करावे काय प्राप्ति आम्हाला । तपकीरीला पैसा मिळेना व्यर्थ जाच ल्हियाला । तुरा लावुनी रयत हिंडतो दूःख जमेदाराला । वाघाहातची मेंढी सुटली मारि पंजा धरणीला । असे युक्तीने राज्य चालवी गरड सायब तो भला । राव मजकुरी संगे शिपाई रत्नराव बोलला । भैरवनाथ गर्जे सभेला त्याने पवाडा केला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP