मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - ५

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


श्रीमंत महाराज पेशवे अमोलिक सुरती मोती । सवाई माधवराव सवारी निघाली नबाबावरती ॥ध्रुपद॥
मिळून फौजा ऐकून घ्याव्या नामी नामी सरदार । रघुजि भोंसले दौलतराव शिंदे तुकोजी होळकर ॥ प्रथम दिवशी सशे सशे आपाजी बळवंतराव मुजमदार । सखाराम पानशे परशुराम भाऊ भले हैत झुंजणार ॥ रास्ते लक्षुमण ऐका बाबा फडके बिनीवर । गणपतराव शिवदिन भेरी आबा होते होते शालुकर ॥ मानकरी मराठे लोक ऐका त्यांचा विस्तार । मालोजी घोरपडे आदी नाइक राजे निंबाळकर ॥ सोनवळे सरकले वाघमारे सयाजी भापकर । गोविंदराव चवाण हैबतराव नांदुरकर ॥ भालवणीचे दाजीसाहेबे चौराज्यामधिं महशूर । श्रीमंतांच्या बावन पागा त्यामधिं बावन सरदार ॥ शिंद्यांचे सरदार जिवबादादा एक वीर भारती । पन्नास हजार फौज फिरंगी तिन कंपू संगें जाती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥१॥

भोसल्याचे विठ्ठलपंडित आणिक खासा पठाण । मर्द शिपाई जाउनि भिडती व्याघ्र जसे पंचानन ॥ पन्नास हजार फौज सातशे कैची उंटावर बाण । शंभर हत्ती स्वारीत झुलतो आणिक भोंसल्याचा मान ॥ गाजविली तलवार रणामधिं भले शिपाई ब्राह्मण । गणपतराव शिवदिन भेरी पंधरा हजार तिघेजण ॥ रावसाहेब फडणीस नाना पन्नास हजार सैन्य ॥ याशिवाय मराठे लोक बरोबर फिरंगी दहा पलटण ॥ हपशियान आरबी परदेशिक कइक जाती सवाई माधवराव पेशवे बसुनि नित्य मुजरा घेती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥२॥

पहिली श्रीमंतांची स्वारी पाहुन चांगला मुहूर्त । निघाली बाहेर तमाशा पहाती मग जणुं लोक ॥ सफेत पोशाक घालून अंगावर गहिना हा जडित । दंडि पाचरत्नांच्या पेटया सोन्याचीं कडिं हातांत ॥ सोन्याचें पडदळें गळ्य़ा मधिं शिपाइबाणा शोभत । सजवुन हत्ती बहु खुश होती राव बसले अंबारींत ॥ बसूनशानी दाजी फडके वरती चौरी उडवीत । चोपदार छडिदार पुकारी ‘नका बोलूं’ ललकारीत ॥ दोहों बाजूंनीं उभे शिपाई रामराम मुजरा घेत । ऐशी फौज चालली दर्यामधिं सागर हालवीत ॥ बारा कोस लांबी रुंदी ज्या फौजेचे तळ पडती । दरमजली दरकुच चालून आले नागलवाडीवरती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥३॥

मंगळवारी नबाबांनीं पुढें धाडिलें सेनेस । कळलें श्रीमंताला बोलून नेले आपल्या सरदारांस ॥ “ कशी करावी मसलत नबाब जाईन म्हणतो पुण्यास ।” परशुराम भाऊ म्हणे किं मारूं, मरूं जरी या समयास ॥ नाना फडणिस सखारामबापू पुसती जिवबादादास । जिवबा बोले गर्जुन मोंगल काय आणिला जिन्नस ॥ उडविन बाविस टोप्या झेंडे नेऊन लाविन आकाशास । केली वस्त्रें पांचजणांशी
दिली आज्ञा झुंजावयास ॥ पेंढार्‍याच्या लष्करावरी जाऊन ताकिद करिती । “ज्याची लुट त्याला मुभा कुणी कुणाची ना घेती ।” श्रीमंत महाराज पेशवे ॥४॥

मोंगलाचे उजवे बाजुला जिवबादादाचें लष्कर । भरून तोफा तयार मागें लाऊन दिलें पेंढार ॥ आघाडीला परशुरामभाऊ झेक त्याची तलवार । सीतर पहाड पहा जिवबादादा कंबरक्यांत सोडी बार । धडाधडा तोफेचे बार लागतां पडती स्वार ॥ घ्या घ्या म्हणून घाव घालती रक्ताचे वाहती पूर ॥ पळाया कोठें रीघ दिसेना मध्ये शिरलें पेंढार । भाल्यानें टोंचून पाडिती लुटुन घेतलें लष्कर ॥ मामलसे शेनखान बसुन हौद्यांतून मारीती तीर । भले हाणणार. त्या दोघांवर चालविले वार ॥ त्यावर मग रावरंभानें भली गाजविली तलवार । चारपांचशे लोक पाडले भले शिपाई रणशूर ॥ परशुरामभाऊचे पुतणे बळवंतराव झाले ठार । चार प्रहर झुंज झाली साहा घटका चढली रात्र ॥ तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार ॥ नबाब कहे रावरंभाकु “क्य हुवा मुजेपर कहर । बचाव जान” “ आब तो मेरी चल जलदी तो खरडेपर ।” वांचवला नबाब बाजी न आले परतुन खडर्यावर ॥ जळती चंद्रजोती । नबाब गेला निघुन देखुन फौजा भोंताल्या पळती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥५॥

मोडल्या पालख्या पडले उंट हत्ती सरदार किती । कोण करीत गणीत त्याची कोण कोणाला ना पुसती ॥ बाराशें तोफेचे गोळे चौदाशे बाण सुटती । तोफांच्या धोधाटयाखालीं गाई बैल घोडे पळती ॥ गांवोगांवचे आले लुटारी तीं धरून घेऊन जाती । पडली गांठ जर पेंढार्‍यांची धन तेही स्वतां नेती ॥ कैक झाले गबर कैकांच्या तोंडीं पडली माती । लुटला दारू गोळा खजिना हत्यारांस नाहीं गणती ॥ खडर्यावर नबाबाभोवती श्रीमंताची झाली जप्ती । रसदा पाणी बंद केली रुपया शेर दाणे विकती ॥ रुपयाचें तांब्याभर पाणी त्यामध्ये अधीं माती । सिनेवर झाला येकच कहर फौजा तटातट मरती ॥ दहापांच सरदार मिळुन नबाबास अर्जी करीतीं । करा सल्ला नाहीं तर पाण्याविना फौजा मरती ॥ उमजला नबाब वकील पाठविले रावसाहेबाप्रती । गेले वकील रावसाहेबापुढें जाऊन मुजरे करिती ॥ टाकिले कागद साग्र वृत्त लिहून पुढें लिहून ठेविती । जें मागाल तें देऊं साहेब सांपडले तुमचे  हातीं ॥ नाना भाऊनें चालवलें तुम्ही चालवा तेच रीती । रावसाहेब नानाफडनवीस मग बसून मुनसुबा लिहिती ॥ पासष्ट लाखांची जहागीर मश्रुल‍मुलुख दे म्हणती । आले परतुन वकील कागद नबाबास वाचून दाखवती । नबाब म्हणे बरें झालें मश्रुल‍मुलुख दे हातीं ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥६॥

सोडला नबाब रावसाहेबांचा झाला लौकिक । पांसष्ट लाखांची जहागिर दिला धाडून मश्रुल‍मुलुख ॥ निघाला मोंगला भागानगरचा धरला रोंख । दरकुच दरमजलीनें श्रीमंतांचें चाललें कटक ॥ झाले दाखल पुण्यावर मुजरे करिती पाहुन जन लोक । यशवंत महाराज सवाई माधवराव झाले अधिक ॥ केल्या मेजवान्या सरदारां दिले पोषाख । जरी झोंक कडीं तोडे कंठी चौकडे दिले हत्ती घोडे मुलुख ॥ शालिवाहन शके १७१६ चा शिमगा ऐक । दोन प्रहरीं बुडला खळ ज्यावर गोगुलस ॥ गुरुदत्तात्रय माहुरगडीं शिष्याशीं दिली भाक । चिमणराव रंगनाथ हरीचरणीं ठेवूनियां मस्तक ॥ गांव पाटुंदे बीड प्रगणे वाजाचा तडाखा । दुस्मानावर कमचा उडतां त्यला पडला धाक ॥ राणुगुदाजी गदाजी गडगा वनहार दासीबाणा जरी झोंक । खंडु फकीरा फुलनाथ गोसावी डफ घेऊन हातीं ॥ साहेबखान गातो बाणीवर गावया पळोन जाती ॥ श्रीमंत महाराज पेशवे० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP