मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
कमि नव्हते पृथ्वींत अवंतर...

सवाई माधवरावाचा मृत्य़ू - कमि नव्हते पृथ्वींत अवंतर...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


कमि नव्हते पृथ्वींत अवंतर प्राणी न्यायाला । औक्ष कसें कमि झालें सवाई माधवरायाला ॥ध्रपुद॥
प्रभू नारायणराव धुरंधर दक्षिणचे नृपती । प्रसन्न वदनें करुनि जयाला सकळ प्रजा जपती ॥ पतिव्रता किती धनाढय गंगाबाई भोंवत्या खपती । सुशील सति सौभाग्यवतीपुढें रूपवत्या लपती ॥ सवाई माधवराव प्रसवली कुळदीपक दिपती । पुरंदरीं रक्षणार्थ मंत्री रात्रंदिवस जपती ॥चाल)॥ शके सोळाशें शहाण्णवाच्या मूळ जय संवत्सरीं । अधिक होता वैशाख शुद्ध सप्तमी चंद्र वासरीं । पुनर्वसू नक्षत्र कडकडित दुपारचे अवसरीं ॥(चाल)॥ झाल जन्म हा दैदीप्यमान पूतळा । जणु सूर्य़ उगवता प्रकाश करी भूतळा ॥ दिलें द्र्व्य कंचुक्या नाही गणती पातळा ॥(चाल पहिली)॥ महोत्साह घोराघरीं लागले लोक करायाला । परशुराम प्रत्यक्ष आले काय छत्र धरायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥१॥

पुरंदराहुन पुण्यास आणिले राव पंचम वर्षी । गुढया तोरणें उभवुन केली मुंज प्रथम सरशी ॥ विवाह कार्या भूप मिळविले अति हर्षा हर्षीं । देतिं धाडून करभार ढिगाचे ढिग कोरे फरशी ॥ स्वार्‍या करून सरदार बुडविती रिपु चुरसाचुरशी । थरथर किति कांपती वयस्कर उभे टाकुन खुरशी ॥(चाल)॥ प्रताप महिमा थोरे जळामधिं परि जळचर अडविला । नवी मोहिम दरसाल देउनी शाह टिपू तुडविला । अपार सेना लढवुनि मोंगल खडर्यावर बडविला ॥(चाल)॥ एकेक पदरचा सेवक साहेब सुभा । समरांगणीं सन्मुख कोणि न राहे उभा । ज्या दिशेस ज्याचा रोंख ती त्याला मुभा ॥(चाल पहिली)॥ विजेपासूनि करि प्रभा चंद्र तारांगण ठायाला । प्रौढ होतां संपूर्ण लोक आले खरेच उदयाला ॥ कमि नव्हते०॥ ॥२॥

काही दिवस भयरहित सदोदित स्वराज्य चालविलें । दरिद्र अटकेपार जनांचे ज्यानें घालविलें । तीर्थरूपांहुन सकळ भूमंडळ बसून हालविलें । रीतभात इनसाफ लवण नाहीं दुधांत । कालविलें ॥ क्षीरसागरीं कृष्णास मुदत भरतांक्षणि बोलविलें । रीतभात इनसाफ लवण नाहीं दुधांत कालविलें ॥ क्षीरसागरीं कृष्णास मुद्त भरतांक्षणि बोलविलें । तसें रावसाहेबांस अकल्पित वरून पालविलें ॥(चाल)॥ उदास झालें चित्त परोपरि त्या दिवसापासुनी । विचुक बोलती शब्द घडोघडिं ह्रदयांतरी त्रासुनी । बाजीराव साहेबांस आणा जा गुज सांगा निरसुनी ॥(चाल)॥ शिक्के दऊत पट कटार दुसरी करा । आडवलें मनांतुनी विधि विष्णू शंकरा । ठेवुं नका निराळें दादांच्या लेंकरा ॥(चाल पहिली)॥ तुम्ही सेवक ते धनी होऊनि एक आवरा राज्याला । अशानें तरले जाल चिरंजिव रहाल पहायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥३॥

वर्तमान कळतांच असें आलि गोष्ट ती निकरास । नये नानाचे मनास जाहले विपरित इतरांस ॥ झिडकारुनि एकांतीं वदती नित्य सरकारास । स्वस्थ असावें आपण जेऊन पंचामृत सुग्रास ॥ बहुत हट्ट जरि कराल तरि तुम्ही मुकाल प्राणांस । त्यांचि अवस्था तीच तुमची पुढे येईल आकारास ॥(चाल)॥ शब्दशरें ताडितां लोचनीं जळबिंदू वाहती । दसर्‍याचे दिशीं अंबारीतुन उडि घालुं पाहती । धरी अप्पा बळवंत झगा दृढ दडपुन आपुले हातीं ॥(चाल)॥ फिरविली निशाणें नाहिं सोनें लुटलें । शहरांत सैन्य चहुं रस्त्यांनीं लोटलें । पुढें भेट घ्यावया किति माणुस दाटलें ॥(चाल पहिली)॥ झालि न झाली नजर उठले एवढयांतच जायाला । नवल नविन वाटलें तेथें सकळ समुदायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥४॥

प्रवेशतां माहालांत अडखळुन पडले खांबाला । त्वरित उतारे करून देती लोह उडीद डोंबाला ॥ खरी खबर कळतांच एकांती बाईसाहेबांला । धांव धांव धांवण्यास म्हणती विनवुन सांबाला ॥ घरांत राहू ग्रासुं पाहतो चंद्रबिंबाला । गोत्रपुरुष किड कठिण लागली मुळकुळकोंबाला ॥(चाल)॥ करिं घेऊन पंचारति प्रभुला घनभर ओंवाळुनी । समाचार फुंद फुंदून पुसती नीर नेत्रीं ढाळुनी । पहा पहा नीट मग राव बोलती मुख आमचें न्याहाळुनी ॥(चाल)॥ तुझी आमुची भेट हीच सगुणसुंदरी । रहा खुशाल आपल्या झुलत राजमंदिरीं । द्वाहीलेखी तुझी जन वंदितील आदरीं ॥(चाल पहिली)॥ जड पडल्या करि स्मरण सदोदित संकटसमयाला । अशा परी निरवून धरती कंटाळुन ह्र्दयाला ॥ कमि नव्हते०॥ ॥५॥

प्रति उत्तर परिसोन विश्वमाउली मनीं गहिंवरली । नेऊन रंगमहालीं सख्यांनीं चहुंकडून सांवरली ॥ विरक्त झाले श्रीमंत हिकडिल स्नेहममता सरली । स्नानदान देवपूजा गलबलिंत अगदींच अंतरली ॥ एकादशीची रात्र बर्‍यांमधि सहज मात्र सरली । उजाडतां द्वादशीस कुणीकुन कुबुद्धि संचरली ॥(चाल)॥ तिसरे मजल्यावरुनि घातली उडि कारंज्यावरी । एकाकीं, हालचाल न होतां गेलि वार्ता
दुरवरी । सेवकजन सर्वांग विकळ कडे खांद्यावर आंवरी ॥(चाल)॥ शके सत्राशें भर सत्राच्या अवसरीं । दक्षिणा यनामधिं राक्षस संवत्सरी ॥ आश्वीन शुद्ध पौर्णिमा भौम वासरीं ॥(चाल पहिली)॥ रवि मावळतां वरी मरण झडकरी आलें सखयाला । इथुन आतां प्रारंभ दिसंदिस अद्‍भुत प्रळयाला ॥ कमि नव्हते०॥ ॥६॥

हाहाकार जाहल प्रगटतां पुकार शहरांत । बंद पडलिं भणभणित दुकानें भर बजारांत ॥ वृद्ध तरुण नरनारि बुडाल्या आकांतकहरांत । कुंक गंध किति सूज्ञ पुसुनी धुळ बांधिती पदरांत ॥ स्वयंभू दीप विझतांच विवशी व्यापली दरबारांत । ठायीं ठायीं थिजले लोक शोक संचारतां संधेरांत ॥(चाल)॥ बंदोबस्त कडेकोट करूनियां शनवारांतुन अधीं । अखंड स्वारि रायाची निघाली चौथीच्या अमलामधीं । दुर्लभ दर्शन ज्याचें प्रभु तो नदींत निजायचा कधीं ॥(चाल)॥ पसरुनी तुळशी कर्पुर बेल चंदन । रचियलें सरण त्या शेवटचा स्पंदन । आरुढले वीरवर नारायणनंदन ॥(चाल पहिली)॥ अनेक रिपूंचें करुनी कंदन दवडुन विलयाला । दर्भासन घातलें विष्णुलोकास बसायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥७॥

बाईसाहेब कल्पांत जिवाचा तळतळूनी करती । कां ग कुळस्वामिणी कोपलिस आजी मजवरती ॥ पतिपूर्वी सौभाग्यवत्या ज्या पुत्रवल्या मरती । इहलोकीं परलोकीं धन्य त्या कुळास उद्धरती ॥ कसें माझें दुर्दैव उपजलें चांडाळिण पुरती । म्हणुन श्रीमंत प्रभुची मजला अंतरली मूर्ती ॥(चाल)॥ निरोगी सात सहस्त्र उंट न पार स्वामीचे । वीस सहस्त्र तुरग निवडक भीमथडी ग्रामीचे । सबल दोनशे नव्वद कुंजर विशाल हरकामीचे ॥(चाल)॥ म्हशी दोन सहस्त्र कठिदार बाणीच्या । सहा सहस्त्र गाई फारतरी वाणीच्या ॥ काही सफेत कपिला व्याघ्रांवर खाणीच्या ॥(चाल पहिली) बैल बारा सहस्त्र एवढया जिवांस खायाला । कोण श्रीमंतांवाचून दुसरा समर्थ द्यायला ॥ कमि नव्हते०॥ ॥८॥

शिकारि चित्ते व्याघ्र पटाइत वृक सांबर हरणें । जंबुक चितळे रोही भेंकरें कुरवाळुन धरणें ॥ रीस एडके गंडे सशांना बनात पांघुरणें । आपण खावें तें त्यांस पुत्रवत्‍ किति माया करणें ॥ सुंदर रूप रायाचें नाहीं कुणावर रागें भरणें । कलगीतुरा शिरपेंच कंठिचीं पडत होतिं किरणें ॥(चाल)॥ सदयह्र्दय साक्षात्‍ पितांबर परिधानाचा प्रभु । कृष्ण कुळीं दैदीप्य जसा काय मकरध्वज आत्पभू ॥ तसा करुन दिग्‍विजय शेवटी अवघड रचिला विभू ॥(चाल)॥ पाहु द्या मला तें एक वेळ श्रीमुख । जन्म तों आतां ह्या जिवास होईल दुःख ॥ भोगिलें रमाबाईनें काहीतरि सुख ॥(चाल पहिली)॥ हरी जाहला विन्मुख विसरलें पूर्विं पुजायाला । प्रयागीं जावें उठुन वाटतें ॥ समाधि घ्यायाला ॥ कमि नव्हतें०॥ ॥९॥

अश्व आवडते कुंजर धेनु मृग मैना रडती । मोर खबुतरें तितर सांबरें मूर्च्छांगत पडती ॥ स्वर मंजुळ कोकीळपक्षि ते पिंजर्‍यामधीं तडफडती । पोपट भारद्वाज चाष परदुःखानें खुडती ॥ भूकंपा उलुका भालु रीत घन विजवा कडकडती । असंख्य तुटती तारे नभमंडळीं किरणें पडती ॥(चाल)॥ ग्रामसिंह दिवसास भयंकर सद्नद भुंकारिती । सवत्स नित अपरात्रीं गाई कितीक हंबरतीं ॥ भुतें पिशाचें खवीस डाकिणी काय हांका मारितीं ॥(चाल)॥ दोहों द्वारीं बसुनी लक्ष्मी पिंपळावरी । करी दीर्घ रुदन मध्यान्ह होतां शनिवारीं ॥ नाहीं राहात आतां होईल आकाशवाणी वरी ॥(चाल पहिली)॥ शक्ति घेऊन श्रीहरी निघुन जातां मूळ ठायाला । सव्यसाचि सारखे लागले मागें पाहायाला ॥ कमि नव्हते० ॥ कमि नव्हते०॥ ॥१०॥

प्रमुख नानासहित शहाणपण सगळ्यांचे खूटलें । तबीबांनी वैद्यांनी रसायण स्वहिताचें कुटलें ॥ परंतु मंगळसूत्र गळ्यांतिल मुळिं माझें तुटलें । राजहौस पांखरु हातांतिल दैवदशें सुटलें ॥ जन्मांतरी सुतर्शन घेऊन असेल काही लुटलें । सौभाग्याचें तारूं म्हणुन वैधव्यजळीं फुटलें ॥(चाल)॥ मनीं एक एक आठवुन सुशोभित कुरळ केंस तोडिती । आतां दृष्टि कधीं पडाल टाहो करुण स्वरें फोडिती ॥ वदनेंदुवर बिंदु पटपटां डोळ्यांतुन सोडिती ॥(चाल)॥ सातशें दासी गुणी नाटकशाळा किती । पाहतांच प्रभु कांही ओवाळुन टाकिती ॥ त्या आतां अजीत अजास दैन्य भाकिती ॥(चाल)॥ चौदाशें घरगुलाम मुकले ह्या निजपायांला । चाकर तर लक्षानुलक्ष लागतिल फिरायाला ॥ कमि नव्ह्ते०॥ ॥११॥

मरण यावें काय ब्राह्मणशापानें । दंश करावा काय किडीच्या तक्षक सापानें ॥ तसेंच जहालें काय प्रभूंना कोणाचे कोपानें । संकट पडलें काय दिलासेल जिव संतापानें ॥ जांवई पहाले काय श्रीमंत माझ्या बापानें । वाटे आतां वैराग्य होइल काय ह्या अनुतापानें ॥(चाल)॥ एकवीस वर्षें पूर्णमासावर सवा पांच, अग ॥ दिसं दिवस भाग्याचा उदय हे दयाळु महाराज ग । अंतरले ते मला आतां आण जहर तरी पान ग ॥(चाल)॥ ईश्वरा कशी मजवर आग पाखडलिस ॥ आयुष्यदोरि तूं मधेंच कातरलिस ॥ का पेशव्यांची ही वंशवेल खुडलिस ॥(चाल)॥ अपार दिधलिस संपदा सुख भोगायला । शतायु केलेंस नाहीं तसें हरी प्राणविसाव्याला ॥ कमि नव्हते०॥ ॥१२॥

हरि घरचा नाहीं नेम टळाचा परंतु हा टळला । पहा पहिल्या प्रहरांत सूर्य नारायण मावळला । गरिब गाइवर विशाळ पर्वत समूळ कोसळला । वंशवनावर चहुंकडून क्षयदावाग्री वळला ॥ बाळाजी विश्वनाथ तारक सर्वांना मिळाला । रत्नदीप झळझळीत केवळ कुळांत पाजळला ॥(चाल)॥ काशी बाइ ती धन्य सती रावबाजी पुत्र प्रसवली । छत्तीस महिने लढुन वसई पुढें आपानीं वसविली । दक्षण साडे सहा सुभ्यांत सरदेशमुखी बसविली ॥(चाल)॥ नानांची कंची वासना नाहिं राहिली । पुरुषार्थ करुन दादांनीं अटक पाहिली ॥ भाऊंनीं कुरुक्षेत्रास कुडी वाहिली ॥(चाल पहिली)॥ रणीं जागा विश्वासराय ती पाहिली निजायाला । जनोबांस मारून मूठ काय मिळालें बायाला । कमि नव्हते०॥ ॥१३॥

दर रिकिबीस तलवार जरब सर्वोवर दाबाची । हुकूम मोडिल कोण कठिण मेहनत रावसाहेबांची ॥ निवडक चाळिस सहस्त्र बरोबर फौज कराराची । शौर्यतेज पाहून छाती तडके नबाबाची ॥ कावेरी उत्तर तीर हद ठरवून शिवाराची । भोंसल्याची रग जिरवुन धरली आस हेरंबाची ॥(चाल)॥ थेवरास ते समाप्त होतां वैरी फिरून पोसती ॥ वीर पदरचे दिलगिर सारे रायांविन असती । करून निर्वानिरव रमाबाईसाहेब गेलि सती ॥(चाल)॥ नंतर नारायणराव तें पद पावले । दहा महिने मात्र सौख्याचे दिवस दावले ॥ गारद्यांस दुपारी अडचशीत पावले ॥(चाल)॥ घाबरून चुलत्यांचीच गेले पाठ रिघायाला । ढकलुन देतांक्षणी साधली संध शिपायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥१४॥

झाला जन्म त्या कुळांत माझ्या बाई राजेंद्राचा । केवळ माधव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराचा ॥ अणीक मंत्री मर्द मराठ बंद्रोबंद्रांचा । ऐरावत बांधूत आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥ येथे न चाले यत्न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा । उपाय असता तरी न मरता बाप्‍ रामचंद्राचा ॥(चाल)॥ हरहर जगत्रिवासा, अतां काय करूं । पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरूं ॥ राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा करकरूं ॥(चाल)॥ पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवूं । हिरकणी कुटुन जाऊं पाण्यामध्ये कालवूं ॥ ती पिउन पौढत्यें नका ग मज हालवूं ॥(चाल)॥ जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला । जिवंत मी असल्यास उद्यां या नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते०॥ ॥१५॥

धन्य वंश एकेक (जणु) कल्पवृक्ष पिकले । शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ॥ जलचर हैदर नबाब सन्मुख रण करितां थकले । ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ॥ असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले । गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥(चाल)॥ संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती । ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबत ॥ कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥(चाल)॥ महादेव गुणीराज श्रुती गादिचे । नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ॥ पीळ पेच अर्थ अक्षरांत वस्तादिचे ॥(चाल पहिली)॥ प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेंत गायाला । अशा कवीची बुज नाही कोणि करायला ॥ कमि नव्हते०॥ ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP