खडर्याची लढाई - ९
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
श्रीमंत धनी महाराज माधवराव । गोकुळीं उभारल्या गुढया जन्मला देव ॥ध्रुपद॥
तो पांडवांचा अर्जुन यशेश्वरी । ती पहिली निघाली स्वारी मोंगलावरी ॥ त्यांनी डेरे दिले गारपीरावरी । तो मोंगलाचा अर्जुन यशेश्वरी । ती पहिली निघाली स्वारी मोंगलावरी ॥ त्यांनी डेरे दिले गारपीरावरी । तो मोंगलाचा वकील विनंत्या करी ॥ ते दवलतराव शिंदे अघाडीबिनीवरी । त्या होळकराची फौज धासत भारी ॥ त्या बाबा फडक्याची कोरबंदी न्यारी । त्या जरीपटक्याखालीं हुजुरात चाले सारी ॥(चाल)॥ राव माने मानकरी । धाडगे पाटणकर भोंसले की सुपेकर स्वारी बरोबर । मोहिते न शिरके येऊन मिळाले रणाचे वर । ते गणेशपंत ढमढेरे आले बहादरकि सवते दूर । ते मानाजी फाकडे भले रणशूर मारी तलवार ॥(चाल)॥ चालताना स्वारी शोभती । कोरबंदी जपुन चालती ॥ अशा सरदाराच्या गणती । कालुकणें बाजे होती ॥ आपलाल्या बिनीवर हत्ती । पुढें सांडणीस्वार धांवती ॥(चाल पहिली)॥ घोडदळ पायदल कुठवर पाहूं गोकुळीं ॥ श्रीमंत धनी० ॥१॥
तो पहिला शहाणा नांव साज । त्यानें श्रीमंताचे भलें राखिले राज्य ॥ अशीं पुण्यपवित्र खलबतें होती रोज । ते पंतप्रतिनिधी सूर्वाचें तेज ॥ ते आपाजी बळवंतराव भुजेशीं भुज । ते वामनराव घाटगे नांव साज ॥ त्या पानशावर रावसाहेबाची रीझ । त्या राज्याचा हमेश डंका वाज ॥(चाल)॥ अशी गडबड झाली फार शिलेदारा घोडे मिळेना । दोशांचे घोडे चौशांला अशा खाशाला कोणी देईना ॥ विसाचें तट्टु साठाला अशा दाटीला कुठें निळेना । भीवरेवर पडला तळ रयत तळमळे नजर थांबेना ॥ दाण्याचे झालें हांतरुण खुशाल पाहून कोणी घेईना । बायकोचें काढले मोतीं घेतलें हातीं गुजर ठेविना ॥ टक्क्याचें रुकें पायलीला दळणवालीला दळुन देईना ॥(चाल)॥ तीन लक्ष मिळालें दळ । आपुलाले धरती बल ॥ लष्करांत पडली भुल । मोठे मोठे कीं लढनेवाले ॥ ते विठ्ठल शिवदेव नारो शंकरभाऊ ॥ गोकुळीं० ॥ श्रीमंत धनी० ॥२॥
गेले कागद नागपुरा कीं भोंसल्याला । दरकुच येऊन सिनेवरती मिळाला ॥ तो जिवबादादा बक्षी अलबेला । ते वेळे काय बोलला रावसाहेबाला ॥ तो कसला कसा मोंगल आहे पाहुंद्या मजला । तो डीबाय फिरंगी गोळा मारनेवाला । फौजेत केली ताकीद सडे स्वारीला । त्या गणेशपंत बेहर्याला बाबा फडक्याला ॥ त्या परशुराम भाऊला जिवबा दादाला । तुम्ही मिळुनशेनी जावें झुंजायाला ॥(चाल)॥ मोंगलानें गलिम पाहिला घोडा उठविला की त्या रंगणांत । भले भले माईचे पूत सुरई हातांत मारिती हात ॥ तो रावरंभा सरदार बसून हौद्यांत तिरंदाजींत । ते मश्रुलमुलुख हत्तीच्या हौद्यांत बसून हणा हणा म्हणवीत ॥ बहु कोस मागें सारिला मार पडली हुजरातिला ॥ त्या परशुरामभाऊला बाबा फडक्याला । जखमा चढल्या मरदांला ॥ अशा कैक एकांडयाला । रणखांब रोविला मुक्काम घोडेगांव ॥ गोकुळीं० ॥ श्रीमंत धनी० ॥३॥
आला मोंगल देशावरी कळल्या खबरी । गांवनगांव ओस पडलीं सारीं ॥ ही पुण्यप्रतापी रावसाहेबाची स्वारी । त्या शाहूराजाचा हात पुरता शिरीं ॥ त्या बुधवारच्या दिवशीं तिसर्या प्रहरीं । त्या जिवबादादानें तोफा लाविल्या दोहिरी ॥ त्या भोंसल्याच्या बाणाच्या भरारी । त्या हनुमंतानें लंका जाळिली सारी ॥ तेंवि सवाई माधवराव यशस्वरी । हणा हणा म्हणून निशाणें उठली सारीं ॥(चाल)॥ मोंगलानें गलीम पाहिला पळ काढिला धीर कोंदला । पाहुण्यांनी दिल्या मुंढाळ्या ओढिती तट करिती अल्ला अल्ला ॥ मर्दानीं दिल्या डुया घेतल्या लुटी रात्री समयाला । खडर्यास नेऊन घातला नबाबसाहेबाला ॥ पाण्याचा झाला कहर दाणा शेरभर ! आला कवकाला ॥(चाल)॥ राव देतों मी खंडणी । घ्या मुलुख तुम्ही लिहूनी ॥ मशिरुल्ला देतों धनी । तेव्हा परशुरामभाऊनीं ॥ रावसाहेब नाना फडणीसांनीं । मनसुबी केली बैसुनी ॥ दिलीं निशाणे सोडुनी । आले पुण्याशीं निघुनी ॥ यश घेतलें पांडवांनीं । बहुरंग्याची लावणी ॥ पवाडा केला मर्दानी । त्या गुरुरायाचें वदन नित्य पाहूं ॥ गोकुळीं० ॥ श्रीमंत धनीं० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP