मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
श्रीमंत पंतप्रधान उभैता भ...

पेशवे भोसले भेटीचा पोवाडा - श्रीमंत पंतप्रधान उभैता भ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


श्रीमंत पंतप्रधान उभैता भेटी ॥ होताची हर्षली धरा झाली सुखवृष्टी ॥ मुक्काम फणींद्रपुराहून महाराज श्रीमंत ॥ सुमुहुर्ते डेरे दिधले संगमावरत ॥ आपण निघाले बाहेर सर्व हुतरात ॥ आणि भले सरदार लोक नामांकित ॥ नानासाहेब मातुश्री कुटुंबासहित ॥ बाबासाहेब आणि आबा भवानीपंत ॥(चाल)॥ दरकूच मग उमरावतीवर मुक्काम केला ॥ चौ रोजामध्ये राजे मतलब उगविला ॥ कुल रोजमुजरे झाडून दिधले लोकाला ॥ गावीलची बंदोबस्ती किल्लेदाराला ॥ राजारामपंतांचे स्वाधीन केला ॥ कुल समुदाय सर्वांशी निरोप दिला ॥ कुल - दैवत मातुश्रीचे पदीं घाली मिठी ॥ म्हणजे विजयी होऊन यावे अखंड दृष्टी ॥१॥

बबु राजनीति सांगोन नानासाहेबा ॥ सहकुटुंबा बिदा केले आत्मजे बाबा ॥ सह मुख्य विचारुनि असे भवानि आबा ॥ दर मजल निघाले सेना साहेब सुभा ॥ मुक्काम जाऊनि वाशमीं केला मनसुबा ॥ पलटण बेनीसिंगाचे स्वाधीन अरबा ॥(चाल)॥ कूल मुखत्यारी महमदअली ॥ मोहर्‍याची डावी बाजू त्यासी नेमिली ॥ विठ्ठल सुभ्यास जलद सांडणी गेली ॥ सैन्यास येऊन भेटला खुशाली झाली ॥ बहू गौरवून दिलभरीचीं वस्त्रे दिली ॥ आघाडीस दरकूचाची आज्ञा केली ॥ नाईकवडी गंगथडीस धाडी चिठी ॥ तुम्ही वसूल करावे सब कुल बारा हत्ती ॥२॥

दररोज हजरी सुरु चालते स्वारी ॥ तेथे पांडुरंगदादाची खबरदारी ॥ कुल गणती फौज साठ सहस्त्र स्वारी ॥ तेथे कारखाने महाराजाबरोबरी ॥ सवेनामी लोक सरदार मोठे अधिकारी ॥ त्याहांचीं नामें म्या सांगावी कोठवरी ॥(चाल)॥ बरें असो जी ऐकाजी महम्मद अमीरखान ॥ किती खानदान सय्यद मोगल पठाण ॥ यावरी रिसाले नामें कोण कोण ॥ तो गुजर कुशाजी सर्वा बहु सन्मान ॥ उघुपत बक्षी बापु संगीन ॥ साबत खानाचे लोक अति तीक्ष्ण ॥ जरीपटक्या संगे - जमाव झाली दाटी ॥ हुजरात लोक मोठे पागेचे हट्टी ॥३॥

हत्तीवर अंबारीमध्ये गुजाबादादा ॥ त्या मागें चालवी शाबुतीने हौदा ॥ सवे गुजर महादजी आप्त लोकासुद्धां ॥ बाणाच्या कैचाअ पुढे धरून मर्यादा ॥ मागे स्वारी श्रीमंत चालवी बिरुदा ॥ पुढे बारेदार जिलबेसी नेमिला हुद्दा ॥(चाल)॥ डाकेवर बातमी पंतप्रधानाची ॥ पत्रावर पत्रें येतीं आस भेटीची ॥ मग जलद निघाली स्वारी श्रीमंतांची ॥ गंगेवर योग साधिला सिंधि ग्रहणाची ॥ दर मजल कडेवर आलि नेमिली प्राची ॥ स्वांगे बंदोबस्ती केली फौजेची ॥ अरब जरब मोहर्‍यास फलटण मोठी ॥ शुभ तिथि विचारून दिले सुदिन शेवटीं ॥४॥

नाना फडणीस चालून दर्शना आला ॥ श्रीमंत करी हो सन्मान गौरवे त्याला ॥ दिले वस्त्राभुषण मग बसूनि विचार केला ॥ शनिवारीं एकादशी नेम भेटीला । सडी स्वारी तयार झाली भले हो लाला ॥ हत्तीवर अंबारी बसावी सर्वाला ॥(चाल)॥ सवे गुजर महाडीक आणि अहेरराव ॥ साळुंके पालकर शिर्के मुकुटराव ॥ घाडगे पाटणकर नामी उमराव ॥ पन्नी पठाण इकडे सिंदे खांडेराव ॥ विठ्ठलासी ताकीद केली तयार व्हावं ॥ कुल मराठ मंडळी स्वारी घेऊन यावं ॥ पर्‍ह्यांनी फौजा उभ्या दर्शनासाठी ॥ उभैता मिळाली सैन्यें झाली दाटी ॥५॥

तर्‍हेदार पिवळ्या अंबारीमध्यें श्रीमंत ॥ तिकडे त्वमके और्‍यांत प्रधानपंत ॥ गज उभे सैन्यामाजीं स्थिर मिरवत ॥ हौद्यासी हौदा भिडे पुढे हुजरात ॥ उतरले दोघे महाराज छबिन्यावरत कंठाकंठ मिलविती आनंदभरित ॥(चाल)॥ त्या हर्षे सुटल्या सरबत्ती धुंद गगना ॥ आनंदी मानकरी देती सन्माना ॥ दक्षिण देर्शमिंसलती एक फडणीस नाना ॥ तो सेनासाहेब नानास करी प्रार्थना ॥ आज मोगल करावा जेर अशी वासना ॥ उभैता सैन्यासह गेले स्वस्थाना ॥ पुढे युद्ध होईल घनघोर हा भास पोटीं ॥ निंबाजी विनंती करी जोडुनि पोटीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP