अकीवाटच्या वेढयाचा पोवाडा - सोमवाराचे दिवशीं निघाले प...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
सोमवाराचे दिवशीं निघाले परशरामभाऊ ॥ अकीवाटावर हल्ला नेमिली सैन चला जाऊं ॥धृ॥
मिळूनियां उमराव अवघ्यांनी मनसोबा केला ॥ जासूदाच्या जोडया पत्र पाठविलें मिरलेला ॥ सवाई माधवराव नाना फडणीस बोलला ॥ मिळवा सारी शाही आज्ञा केली भाऊला ॥ राजासंगे खरा दावा लावला ॥ मुलखाची वसाडी दिवा लागेनासा जाहला ॥ महाराजांची दया आम्हांवर परसन्न शाहू ॥१॥
भोवानराव भगवंत दोघे बंधू अष्टप्रधान ॥ हरीपंत फडक्याचें त्याजवरी लिहिलें सैन ॥ बावडयाची बंदोबस्ती खबर ऐकून ॥ करवीराला वेढा घातला माहादजी शिंद्याने ॥ खासा सेनापती सखाराम पाठविला त्याने ॥ पेंढार्याच्या धुमा अवघे लोटलें सैन । कुलक्षेत्राची जागा अवघे देव चला उठवूं ॥२॥
सवाई माधवराव जन्मले खानदान । गोकाकच्या नदीवर जाऊं दे सैन । मनोळीची बारी लुटली सडया रावताने । सिरोट्टीला वेढा हादर्या आला राव चालून ॥ सामानगडची खंडणी घेतली रगाडले सैन ॥ आदी घेऊन आकीवाट मग काय शिरोळास जाऊं ॥३॥
अष्टकारकून अष्टउमराव उभा देवडीला ॥ चिटणीस फडणीस पोतनीस विचार त्यांनी केला ॥ बारा हजारा घोडा त्यामधि खासा निवडीला ॥ जरिपटका चौघडा नौबत वाजे बिन्नीला ॥ गारद्याचा बाजा भार रोहिल्याचा चालला ॥ सिदरायाचा माळ तयाने जागा नेमिला ॥ करुनिया मतलब मोचें दिले राव गांवाला ॥ सिदरायाने कौल दिल्ला आहे प्रसन्न तुजला । आज पंधरावे रोजीं किल्ला येईल हाताला । नका करू अनमान किल्ला घटकेमधिं घेऊ ॥४॥
आकीवाटाला वेढा गांव लढविला शरतीन । तेव्हां येल्यापा जेठयापा किल्यामधि बंधू दोघेजण । लिहूनियां कागदपत्र पाठविले भाऊन । बेगी सोडा किल्ला तुम्हांला देतो जीवदान । ह्मणे आपाजीपंत सल्ला करावा जलदीन । विचार नाही बरा जी अवघें सरलें सामान । सुभेदाराची कुमक कोठें दिसत नाहीं आझून । मायापा बाळापा त्यानी आणले बलावून ॥ म्हणे बच्याजीपंत तुम्ही भीम अर्जुन ॥ महाराजांचें अन्न खाल्लें भोंदून ॥ इतकें वचन आईकतां धांवले समशेर उपसून ॥ आम्ही यातीचे लव्हार दोघे झुजुं शरतीन ॥ वकत पडल्यावर अवघे मरून खरे होऊं ॥ पर किल्ला ना देऊं ॥५॥
आईतवाराचे दिशीं ताकीद होती सैनेला ॥ सोमवाराचे दिवशीं तयानें हल्ला नेमीला ॥ पहिले प्रहररात्रा हल्ला निनदां मोडला ॥ बरकंदासाचे बार झडती गणता नाही त्याला ॥ दारू आणि गोळ्यांने सूर्या झाकुळला ॥ भांडयाच्या माराला कोण वळखिना कवणाला ॥ दोन कोतवाल हत्ती नीट चालविला वेशीला ॥ विक्रमाची उज्जनी तिते रणखांब गाडला ॥ तीनशे साठ मुडदे तयानें कागद वाचिला ॥ आम्ही धाक माहाराठी फौज हिचा दर्प सकळाला ॥ श्रीमंत महाराज पेशवा याला तोंड कसें दावूं ॥६॥
इतके वचन ऐकतां भाऊला क्रोध फार येऊन ॥ रघुनाथ दादा जवळ घेतले बलावून । खेडयाखेडयासी ताकीद शिडया येवूं दे जलदीनं । खोरें आणि कुद्ळी बिगारी काढा सामान । लव्हार आणि सुतार अवघे मिळविले सैन । असे अठराहि कारखाने गोळ्या झडती खणाखण । कामाठे बेलदार लाविले मोर्चा कारण । गंगाधर फडणीस गेला बिन्नी धरून । त्यासी लागल्या जखमा ठार पडला दिवाण । तेव्हा येल्यापा जेठयापा किल्यांत बंधू दोघेजण । शिंग आणि हलग्याचा बाजा होता कडाक्यान । चवरी अबदागिरी रुमाल काय उडती मौजेन । टकमका पाहती शाही झळकती रुप्याचेंम्यान ॥ भला होता सरदार त्यासी चला कीहो पाहूं ॥७॥
इतकें वचन ऐकितां भाऊला ईर चढली फार ॥ चंदी चंदावर दिल्ली ओरंगाबाद शाहर । उदंड घेतले किल्ले काय या खेडयाचा पडीबार ॥ आकीवाटच्यासाठी बुडाली कैकांची घर ॥ मारून चकाचूर गांव करूं बरोबर ॥ चहूं वेशीला च्यार शिडया लावा लौकर ॥ आंतल्यांनी मारा केला आगीचा फार ॥ वहिल्या वेशीनें हल्ला चढली हर बोला सार ॥ खायले वेशीने लव्हार दोघे जाहले तयार ॥ ढाल पट्टा चढवून आला हणमंता ह्योर ॥ बलभीमाचे नांव घेतां लगी आहे समशेर ॥ समशेरीने लोक कापले अवघे लहान थोर ॥ अशुद्धाचे पाट चालिले वेशी बाहेर ॥ कौरव पांडव झुंजले जाहला संव्हार ॥ जाळी मधि व्याघ्र कोंढून केला की हो जेर ॥ दोघे लव्हार ठार पडले हणमंता ह्योर ॥ भले होते लव्हार त्यासी चला कीं हो पाहूं ॥८॥
आकीवाट घेऊन भाऊ यशवंत झाला ॥ चौघडा वाजवीत शहर पुण्याशी गेला ॥ सवाई माधवराव नाना फडणीस बोलला ॥ महाराजाचा कळस तुम्ही कैसा पाडिला ॥ नऊलाखाचा खर्च जाहला सांगी पेशव्याला ॥ शिरोळा मधि ठाणें फौजा गेल्या देशाला । करूनिया वस्त्रें भाऊला परगणा दिला । येथून जाहला पोवाडा आईका सांगेन तुम्हाला । धीनगीरी गोसावी शिव प्रसन्न त्याला ॥ म्हणे मानशिंग भोवाना रजपूत गातो सभेला ॥ किती गासी नागीशा आतां किंमत तुझी पाहूं ॥ आकीवाटावर हल्ला नेमिली सैन चला जाऊं ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP