स्फुट अभंग - बाळक्रीडा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


नमस्कार माझा हा विघ्ननाशना । शारदा आंननाभाजीं राहो ॥१॥
राहो सर्वकाळ गोविंदाचें नाम । कीर्तन उत्तम यादवाचें ॥२॥
यादवाचे कुळीं गोकुळीं गोविंद । आनंदाचा कंद अवतरला ॥३॥
अवतरला पूर्ण अवतारी अच्युत । आयुधें मंडित चतुर्भुज ॥४॥
चतुर्भुज हरी डोळस सांवळा । वैजयंतीमाळा पीतांबर ॥५॥
पीतांबरधारी प्रकटे मुरारी ।  मथुरेमाझारीं कारागृहीं ॥६॥
कारागृहीं माता पिता वसुदेव । तेथें आले देव सोडवणें ॥७॥
सोडवणें आला वैकुंठींचा राव । येतांचि लाघव थोर केलें ॥८॥
थोर केलें कर्म सर्वां भुलवीलें । स्वयें आच्छादीलें निजरूप ॥९॥
निजरूप देवें सोडुनी कौतुक । जहाला बाळक नंदजीचें ॥१०॥
नंदजीचें बाळ करि पंथ मोकळा । जावया गोकुळा विश्रांतीसी ॥११॥
विश्रांतीसी आलें स्थळ पालटलें । नवल जाणवलें कंसराया ॥१२॥
कंसराया जाय मारूं आपटोनी । मन गडबडोनी उसळली ॥१३॥
उसळली म्हणे कंसा तुझा वैरी । गोकुळा-माझारीं वाढतसे ॥१४॥
वाढतसे तैरी नंदाची कुमारी । बोलोनी अंबरीं गुप्त झाली ॥१५॥
झाली तळमळ ऐकतां कंसासी । लागली मानसीं थोर चिंता ॥१६॥
थोर चिंता करी म्हणे माझा वैरी । वाढतसे मारी कोण आतां ॥१७॥
कोण आतां तरी करावा उपाय । वैरीया अपाय होय जेणें ॥१८॥
होय जेणें मृत्यु तया बाळकासी । तंव आले जोशी म्हाबळभट ॥१९॥
म्हाबळभट आले रायें सन्मानीले । तयाप्रति बोले कांहीं एक ॥२०॥
कांहीं एक भटो मांडिलें संकट । तंव येरें पॅट उकलीला ॥२१॥
उकलीला पट पाहिला मुहूर्त । म्हणे चिंता व्यर्थ कां करिता ॥२२॥
कां करिता चिंता तया बाळकाची । बधूनि शीघ्रचि येतों आताम ॥२३॥
येतों आतां ऐसें बोलेनि वचन । शीघ्रचि गमन आरंभीलें ॥२४॥
आरंभीलें तेणें ब्रह्मांडगभन। पावला भुवन नंदजीचें ॥२५॥
नंदजीचें बाळ आलें मुळावरी । बैसऊनि नारी सांगतसे ॥२६॥
सांगतसे म्हणे हें तुम्हां वाईट । कुळाचा शेवट करूं आलें ॥२७॥
करूं आलें घात सर्वांचें अनहित । वोखटें बहुत दिसतसे ॥२८॥
दिसतसे दुष्ट सांगतों मी स्पष्ट । बुद्धीनें वरिष्ठ आहों आम्ही ॥२९॥
आम्हां तुम्ही माझे कीं हो यजमान । म्हणोनि सांगणें लागे आम्हां ॥३०॥
लागे आम्हां शब्द ऐसें न करावें । सत्वर वधावें लेंकुरासी ॥३१॥
लेंकुरासि क्रोध ऐकूनि वचन । मग पीडेंदान आरंभीलें ॥३२॥
आरंभीलें थोर कठिण द्विजासी।  उठोनि त्वरेसीं पळतसे ॥३३॥
पळतसे पुढें मागें पीडेंदान । पृष्ठीचें कंदन तें होतसे ॥३४॥
होतसे ताडन काष्ठाचें चहुंकडून । कष्टला ब्राह्मण पळतसे ॥३५॥
पळतसे भय भरलें अंतरीं । म्हणे हरी हरी नारायण ॥३६॥
नारायणें मज रक्षीलें जीवेसीं । दावी रायापासीं पृष्ठभाग ॥३७॥
पृष्ठभागीं थोर झालेंसे ताडण । भटो बहु शीण पावलेती ॥३८॥
पावली ती पूतना म्हणे काय झालें । बाळकें मारिलें ब्राह्मणासी ॥३९॥
ब्राह्मणासी जेणें दिल्हें पीडेंदान । तयासी मारीन शीघ्रकाळें ॥४०॥
शीघ्रकाळें विषें भरी पयोर्धर । पावली मंदिर पूतना ते ॥४१॥
पूतना मावशी होय गोविंदासी ॥ म्हणोनी वेगेंसी पाहों आली ॥४२॥
पाहों आली परी कपट अंतरीं । भाव वरीवरी दावीतसे ॥४३॥
दावीतसे भाव शब्दाचें लाघव । जाणीयेली भाव बालकाने ॥४४॥
बाळकासी पुढें घेऊनि चुंबन । देत स्तनपान आदरेंसी ॥४५॥
आदरेंसी हरी स्तनपान करी । पूतना अंतरीं जाजावली ॥४६॥
जाजावली म्हणे पुरे बापा आतां । जाऊं दे अनंता सोड वेगीं ॥४७॥
सोड वेगीं होतें लोटिलें श्रीमुख । निघेना बाळक शोषीतसे ॥४८॥
शोषिली पूतना आकंदे मानसीं । मुकली प्राणासी कृष्णमुखें ॥४९॥
कृष्णमुखें रिठासूर रगडीला । लातीं विदारीला शकटासुर ॥५०॥
शकटासुर लातीं हाणे बाळपणीं । वृक्ष जन्मळोनी सांगतसे ॥५१॥
सांगतां सांगतां देवें गिळियेला । उदरीं दाविला विश्वलोक ॥५२॥
विश्वलोक नांदे जयाचे अंतरीं । गाई राखे हरी गौळियांच्या ॥५३॥
गौळियांच्या गाई राखी तये वेळीं । खेळे चेंडूफळी गोपाळांसीं ॥५४॥
गोपाळांसीं चेंडू खेळतां उडाला । जाउनी बुडाळा डोहामध्यें ॥५५॥
डोहामध्यें कृष्णें टाकियेली उडी । पहाताती थडीं सवंगढे ॥५६॥
सांगताती कृष्ण बुडाला तुमचा । जेथें काळीयाचा डोहो आहे ॥५७॥
डोहो आहे तेथें दाविती गोपाळ । मिळाले सकळ विश्वजन ॥५८॥
विश्वजन सर्व पहाती गोविंदा । आक्रंदे यशोदा दीनरूप ॥५९॥
दीनरूप माता करीते रोदन । संबोखिती जन यशोदेसी ॥६०॥
यशोदेसी ठाव दाविला गोपाळीं । मोडली डाहाळी कळंबाची ॥६१॥
कळंबाची छाया दिसे जळावरी । बुडाला श्रीहरी तये ठाईं ॥६२॥
तयेठाईं माता घालूं पाहे उडी । धरिती देवगडी नगरलोक ॥६३॥
नगरलोक सर्व गोपाळ रुदती । गाई हंबरती कृष्णालागीं ॥६४॥
कृष्णालागीं सर्व जन आक्रंदती । मग संबोखिती येरयेरां ॥६५॥
येरयेरां संबोखूनियां निघाले । कृष्णें काय केलें डोहामाजीं ॥६६॥
डोहामाजीं क्तूर काळिया विखार । परस्परें थोर युद्ध झालें ॥६७॥
युद्ध झालें थोर काळिया नाथिला । गोकुळासी आला कृष्णनाथ ॥६८॥
कृष्णनाथें अघबक विभांडिले । घेनुका मारिलें आपटूनी ॥६९॥
आपटूनी मांडी खेळती गोपाळ । घूमरी कल्लोळ पावयांचे ॥७०॥
पावयांचे नाद वाजती मोहरी । तेणें नगरनारी लुब्ध होती ॥७१॥
लुब्ध होती पक्षी नर वनचर । यमुनेचें नीर तुंबळलें ॥७२॥
तुंबळले गोप लागला वणवा । गिळूनियां अश्र्वा वधीयेले ॥७३॥
वधीयेलें कृष्णें पन्नग आवर्ता । दुष्ट तृणावर्णा मारियेलें ॥७४॥
मारियेला गर्व थोर ब्राह्मणाचा । जाहाला सर्वांचा समुदाय ॥७५॥
समुदाय सर्व गोपाळ स्वजन । बळें गोवर्धन उचलीला ॥७६॥
उचलीला तळीं राखिलें गोकुळ । इंद्राचा सकळ गर्व नेला ॥७७॥
नेलें मथुरेसी अक्तूरें कृष्णासी । मल्ल चाणूरासी वधीयेलें ॥७८॥
वधीयेला कंस घातलें आसन । तेथें उग्रसेन बैसवीला ॥७९॥
वैसवीला उग्रसेन नृपासनीं । चद्यासी त्रासुनी मारियेलें ॥८०॥
मारी शिशुपाळ आणि भौमासुर । वधीला असुर जरासंध ॥८१॥
जरासंध काळयवन मह्कासुर । मारीले असुर थोर थोर ॥८२॥
थोर ख्याती केली अर्जुना रक्षीलें । सर्व साह्य केलें पांडवांचें ॥८३॥
पांडवांचा सखा सर्व साहाकारी । संकटीं कैवारी द्रौपदीचा ॥८४॥
द्रौपदीचा सखा द्वारकेभीतरीं । सोळा सहस्र नारी गोपांगना ॥८५॥
गोपांगना राधा रुक्मिणी सुंदरी । सुखें राज्य करी यादवांसीं ॥८६॥
यादवांसी शाप दिल्हा ऋषीश्वरीं । मांडिली बोहरी तेणें मिसें ॥८७॥
तेणें भिसें सर्व आटले यादव । ते काळीं उद्धव उपदेशिला ॥८८॥
उपदेशिला दास श्रीकृष्णें आपुला । 3अवतार झाला पूर्ण आतां ॥८९॥

N/A

Last Updated : March 28, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP