स्फुट अभंग - २७

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२७
गणेश नमावा आणि सरस्वती । मारूती गभस्ती चंद्रमौळी ॥१॥
विष्णु खंडेराव भगवती । भैरव । पांडुरंगीं भाव शामराज ॥२॥
हरिदिनीं निर्‍हार पापाचा संव्हार । व्रतें सोमवार थोर आहे ॥३॥
गोमुख गोकर्ण गोमय गोमुत्र । गोशृंग पवित्र तर्पणासी ॥४॥
तुळसी काळोत्री बेल गंगावती । रूद्राक्ष विभूती पापनाशी ॥५॥
विष्णु द्वारावती तुळसीच्या माळा । पाहिजे गोपाळा दहिंभात ॥६॥
आषाढी कार्तिकीं आंवळीचीं बनें । घालावीं भोजनें ब्राह्मणांसीं ॥७॥
ब्राह्मणांच्या तीर्थें पापक्षय होतो । जन उद्धरतो विप्रवाक्यें ॥८॥
लिंगाची लाखोली लिंगा अभिषेक । येणेंही विवेक पाविजेतो ॥९॥
अश्वत्थाची पूजा आणि प्रदक्षणा । ध्यावा क्षणक्षणा नारायण ॥१०॥
शालीग्रामीं पुण्य बहुतची जोडे । नर्मदे रोकडे हनुमंत ॥११॥
बाण चक्रांकित सोमसूर्यकांत । तांदळे दुरित नाशिताती ॥१२॥
अन्न ब्रह्म आहे विचारूनि पाहे । शरीर हें राहे तयाचेनी ॥१३॥
आपोनारायण सकळांचें जीवन । कारण पर्जन्य पाहिजे तो ॥१४॥
चंदनाचीं काष्टें आणी बेलकाष्टें । थोर दंड काष्टें पळसांची ॥१५॥
मृगाचें कातडें डुकराचे केश । कमळाक्ष भद्राक्ष पुण्यमाळा ॥१६॥
भूमंडळीं तीर्थे तें किती सांगावीं । सर्वहि फिरावीं कोण्ही येकें ॥१७॥
आघाडा दुरूवा कोमळा अपूर्वा । तेणेंचि पूजावा लंबोदर ॥१८॥
रूई मांदादाचीं फुलें कन्हेराचीं । आणि जास्विनची आरंगुंद ॥१९॥
भूमंडळावरी थोर शिलोदकें । नासती पातकें ततक्षणीं ॥२०॥
कांउंजी भींउजी पाठोरेपीठोरे । हतीगा पुजा रे येक भावें ॥२१॥
डाउते आनंत थोर शाकाव्रत । द्विदळे नेमस्त सेऊं नये ॥२२॥
भोजनाचे वेळे येकवाढी करा । आणी मौन्य धरा स्वपाकी हो ॥२३॥
स्नानसंध्या प्रदक्षिणा नमस्कार । श्राद्ध पक्ष थोर सांडूं नये ॥२४॥
ब्राह्मणांसी वैश्वदेवे उपासना । करावें तर्पण आदरेंसी ॥२५॥
करावीं आलोढ्यें वेद आणी शास्त्रें । मंत्र स्तुतिस्तोत्रें नानापरी ॥२६॥
तपें पुरश्चण ध्यानस्त बैसावें । सांग संपादावें देवार्चनें ॥२७॥
धरणीं पारणी नित्य उपोषणें । तेणें होती क्षीण महा दोष ॥२८॥
काव्यें अभ्यासावीं पुराणें सांगावीं । कवित्वें करावीं सावकास ॥२९॥
फाल्गुनमाहात्में तेंहि संपादावीं । देवकें पुजावीं वीलगटें ॥३०॥
मांगिणी जोगिणी राहाण गोंधळ । डांकाचे कुल्लाळ जेऊं घालावे ॥३१॥
बुलगावा मुंज्या नरसीयां झोटिंग । पूजा कीजे सांग देवतांची ॥३२॥
देवतें तें भूतें सिद्धशिवकाळा । पुजावा आगळा पंचाक्षरी ॥३३॥
नाना तीर्थें व्रतें सांग संपादवीं । अघोरें करावीं नाना कर्में ॥३४॥
बगाडें कुलुपें राडी आणि बेडी । कामना रोकडी पुरतसे ॥३५॥
गळहिं टोंचावें निंबही नेसावे । खोडेही घालावें हातीं पांई ॥३६॥
गुगुळ जाळावे पोतही खेळावे । जोगी ते पुजावे भैरवांचें ॥३७॥
दया दानधर्म करावा स्वधर्म । चुकवावें वर्म संसाराचें ॥३८॥
संसाराचें वर्म तोडितां तुटेना । मार्गची फुटेना विवेकाचा ॥३९॥
विवेकाचा मार्ग संतसंगें कळे । उदंड निवळे विवेकानें ॥४०॥
भ्रष्ट शाक्त मुक्त अविवेकी नसाव । केवळ दंडावा अनाचारू ॥४१॥
अनाचारें ज्ञान कदा निवळेना । इहलोक कळेना परलोक ॥४२॥
परलोक माया सांडूनी पाहावा । अष्टदेचा गोव घालूं नये ॥४३॥
घालूं नये वाद वाउगा वेवाद । तेणों गुणें खेद होत आहे ॥४४॥
होत आहे पुढे जयास कल्पांत । सर्वनाशिवंत सांडा मागें ॥४५॥
सांडा मागें बंड पाषांड थोतांड । चिंतावा अखंड गुणातीत ॥४६॥
गुणातीत देव त्रिगुणापरता । तेथें तूं सरता होई बापा ॥४७॥
बापमाये सखे कोण्ही कामा नये । धुंडाळावी सोये मूळाकडे ॥४८॥
मुळाकडे फळ फळाकडे मूळ । मूळचि निर्मूळ भक्तियोगें ॥४९॥
बापमाये सखे कोण्ही कामा नये । धुंडाळावी सोये लाहिजे दास म्हणे ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP