स्फुट अभंग - वैराग्यशतक
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
नमन योगिया स्वामी दत्तात्रया । गाईन ओविया संसारींच्या ॥१॥
संसारींचें दु:ख आठविलें मनीं । मागें नाना योनी भोगियेल्या ॥२॥
भोगयिएल्या परी नाहीं आठवण । दु:ख नें कठीण विसरलों ॥३॥
विसरलों राम चित्ती दृढ काम । तेणें गुणें श्रम थोर झाला ॥४॥
झालो कासावीस थोर गर्भवासीं । नको त्या दु:खासी सांगवेना ॥५॥
सांगेवना शीण अत्यंत कठीण । रामा तुजवीण दु:ख झालें ॥६॥
दु:ख झाले भारी मातेच्या उदरीं । नवमास वरी कोंडीयेलें ॥७॥
कोडीयेलें मज अत्यंत सांकडी । रामा कोण सोडी तुजवीण ॥८॥
तुजवीण मज जाहलें बंधन । जठरीं शयन जननीचे ॥९॥
जननीचें जठर संकोचित थोर । विष्ठा आणि मूत्र नाकीं तोंडी ॥१०॥
नाकीं तोंडीं जंत वांति आणि पित्त । निर्बुजल चित्त वायु नाहीं ॥११॥
वायु नाहीं जेथें वन्हीचा उबारा । तेणें या शरीरा दु:ख होय ॥१२॥
दु:ख होय थोर सर्वांग आहाळे । तेणे गुणें पोळे अस्थिमात्र ॥१३॥
अस्थिमात्र पंजर शिरीं वेटाळिला । नाहीं गुंडाळीला मेदमांसें ॥१४॥
मेदमांस कृमी कुत्सित कातडी । गलती आंतडीं लवथवीत ॥१५॥
ऐसें अमंगळ अत्यंत कुश्चीळ । प्राण हा व्याकूळ होय दु:खें ॥१६॥
दु:खें आला त्रास तेणें कोढे श्वास । कोंडिलें उबेस घेतां नये ॥१७॥
नये नये येताम सर्वथा बाहेरीं । ऐसी दाटी थोरी उकडीलों ॥१८॥
उकडीतां प्राणी करी तळमळ । तवं जन्मकाळ आला पुढें ॥१९॥
आलें पुढें अंत काळीचें संकट । कष्टावरी कष्ट थोर झाले ॥२०॥
थोर झाले नष्ट मातेच्या उदरीं । शीणलों श्रीहरी दास तुझा ॥२१॥
दास्य मी करीन ऐसें होतें ध्यान। जन्मकाळीं प्राण गेला माझा ॥२२॥
गेला माझा प्राण झाले विस्मरण । स्वामीचे चरण विसरलों ॥२३॥
विसरलों सोऽहं मग म्हणे कोऽहं । जन्मकाळीं बहू दु:ख झाल ॥२४॥
दु:खें दुखावलों म्हणे आहा आहा । जन म्हणे टाहा फोडीयेला ॥२५॥
फोडीयेला टाहो पडतां भूमीवरी । दिवसेंदिवस हरी विसरलों ॥२६॥
विसरलों बुद्धि स्वहिताची शुद्धि । अज्ञानाची वृद्धि होत असे ॥२७॥
होत असे वृद्धि दृढ देहबुद्धि । तुज कृपानिधि अंतरलों ॥२८॥
अंतरलों सुख तुज विसंबतां । विषय भोगितां दु:ख झालें ॥२९॥
दु:ख झालें फार ऐसा हा संसार । पुढें षड्विकार उद्भवले ॥३०॥
उद्भवले तेणें सुख दु:ख कळे । प्राण हा आंदोळे दु:ख होतां ॥३१॥
दु:ख होय देहीं माता नेणे कांहीं । मज वाचा नाहीं काय करूं ॥३२॥
काय करूं दु:खें पोळे अभ्यंतर । मातेसी अंतर जाणवेना ॥३३॥
जाणवेना माझें दु:ख मी अज्ञान । मग मी रोदन करीं देवा ॥३४॥
करी देवा आतां माझी सोडवण । दु:ख हें दारुण भोगवेना ॥३५॥
भागेवेना दु:ख संसारीचें आतां । धांव बा अनंता पाव वेगीं ॥३६॥
पाव वेगीं दास सोडवी आपुले । लोभोचि वाहिले माया जाळीं ॥३७॥
मायाजाळीं झालें दृढ माझें मन । रामा तुझें नाम आठवेना ॥३८॥
आठ-वेना चित्तीं स्वहिताचें ज्ञान । मायबापें लग्र केलें लोभें ॥३९॥
लोभें लग्र केलें मानीली आवडी । पायीं ओविली बेडी बंधनाची ॥४०॥
बंधनाची बेडी प्रबळला काम । मग कैंचा राम आठवेना ॥४१॥
आठवेना राम स्वामी त्रैलोक्याचा । झालों कुटुंबाचा भारवाही ॥४२॥
भारवाही झालों रामा अंतरलों । बंधनीं पडलो काय करू ॥४३॥
काय करूं मज कामाचें सांकडें । संसाराचें कोडें उगवेना ॥४४॥
उगवेना मन आठवे कांचन । सर्वकाळ ध्यान प्रपंचाचें ॥४५॥
प्रपंचाचें ध्यान लागलें मानसीं । चिंता अहर्निशीं दुश्चंचळ ॥४६॥
चंचळ मानस संसारउद्बेगें । क्षणक्षणीं भंगे चित्तवृत्ति ॥४७॥
वृत्ति कांता धन पाहे जनमान । इच्छेनें बंधन दृढावलें ॥४८॥
दृढावलें वोस प्रपंचाच्या माथा । तेणें गुणें व्यथा थोर झाली ॥४९॥
थोर होय व्यथा तारुण्याच्या भरें । कामाचे कावरें आवरेना ॥५०॥
आवरेना क्तोध तेणें होय खेद । वृत्तीचा उच्छेद करूं पाहे ॥५१॥
करूं पाहे घात थोर पुढीलाचा । मार्ग स्वहिताचा अंतरलों ॥५२॥
अंतरलों भक्ति ठाकेना विरक्ति । देवा तुझी प्राप्ति केवीं घडे ॥५३॥
केवीं घडे प्राप्ति मज पतितासी । झाल्या पापराशी सांगूं किती ॥५४॥
सांगूं किती दोष झाले लक्ष कोटी । पुण्य माझे गांठीं आढळेना ॥५५॥
आढळेना पुण्य पापाचे डोंगर । करितां संसार माझें माझें ॥५६॥
माझी माता पिता माझे बंधू जन । कन्या पुत्र धन सर्व माझे ॥५७॥
सर्व माझें ऐसा मानिला भरंवसा । तुज जगदीशा वीसरलों ॥५८॥
वसि-रलों तूज वैभवाकरितां । शेखीं माता पिता राम जालीं ॥५९॥
राम जाली माता देखत देखतां । तरी म्हणे कांता पुत्र माझे ॥६०॥
माझे पुत्र माझे स्वजन सोयरे । दृढ देही भरे अहंभाव ॥६१॥
अहंभावें मनीं दु:ख आच्छादूनी । वर्ततसें जनीं अभिमानें ॥६२॥
अभि मान माथां वाहे कुटुंबाचा । अंतरी सुखाचा लेश नाहीं ॥६३॥
नाहीं नाहीं सुख संसारीं पहातां । पुरे देवा आतां जन्म नको ॥६४॥
नको नको आतां घालूं या संसारीं । पोळलों अतंरीं काय करूं ॥६५॥
काय करूं माझें नेणती स्वहित । आपुलालें हित पहातात ॥६६॥
पहातात सुख वैभवाचीं सखीं । कोणी मज शेखीं कामा नये ॥६७॥
कामा नये कोणी तुजवणि रामा । नेई निजधामा माहीयेरा ॥६८॥
माहेरही माझें अंतरलें दुरी । लोभें दुरा-चारीं गोवीयेलं ॥६९॥
गोवीयेलें मज आपुलीया हिता । माझी कोणी चिंता केली नाहीं ॥७०॥
केली नाहीं चिंता लोभें गुंडाळीलें । पिळूनी घेतलें सर्व माझे ॥७१॥
सर्व माझें गेले झालें नि:कारण । स्वामीचे चरण अंतरलों ॥७२॥
अंतरलों देवा आयुष्य वेचलें । अंतर पडलें काय करूं ॥७३॥
काय करूं आतां शरीरही गेलें । मज वोसंडिलें जीवालागीं ॥७४॥
जीवालागीं मज मोकळीक देवा । काय करूं ठेवा प्रारब्धाचा ॥७५॥
प्रारब्धाचा ठेवा प्रपंचीं रंगला । देहांतीं खंगला वृद्धपणीं ॥७६॥
वृद्धपणीं माझें चळलें शरीर । श्रवण अधिर नेत्र गेले ॥७७॥
नेत्र गेले मज पहातां दिसेना । स्वयें उठवेना पाय गेले ॥७८॥
पाय गेले तेणें दु:ख होय भारी । तेथेंचि बाहेरीं जाववेना ॥७९॥
जाववेना तेणें झालें अमंगळ । अत्यंत कुश्चीळ वातपित्त ॥८०॥द
वात पित्त जन देखोनी पळती । दुर्गंधि गळती नवनाळीं ॥८१
नवनाळीं वाहे दुर्गंधि न साहे । वांति होऊं पाहे देखतांची ॥८२॥
देखतां सकळ सुटले पाझर । मळ मूत्र धीर धरवेना ॥८३॥
धरवेना क्षुधा निद्रा आणि तृषा । परधनीं आशा प्रबळली ॥८४॥
प्रबळली आशा झाली अनावर । चिंता तृष्णातुर सर्वकाळ ॥८५॥
सर्वकाळ चित्तीं थोर लोलंगता । खायासी मागतां नेदी कोणी ॥८६॥
नेदी कोणी कांही क्षीण झालों देहीं । जीवलग तेहीं वोसंडीले ॥८७॥
वोसंडलिं मज वैभव गेलीया । देह खंगलिया दु:ख झालें ॥८८॥
दु:ख झालें थोर क्षुधा आवरेना । अन्नही जिरेना वांति होय ॥८९॥
वांति होय तेणें निर्बुजे वासना । स्वादिष्ट चावेना दांत गेले ॥९०॥
दांत गेले तेणें जिव्हेसी बोबडी । कंठ गडगडी बोलवेना ॥९१॥
बोलवेना अंतकाळींच्या विपत्ति । सर्वही म्हणती मरेना कां ॥९२॥
मरेना कां आतां कासया वांचला । देवा वीसरला नेणोनियां ॥९३॥
नेणोनियां याची मर्यादा खुंटली । सकळां लागली चिंता मनीं ॥९४॥
चिंता मनीं वाटे कृत्याची सकळां । सर्वांसी कंटाळा आला थोर ॥९५॥
आला थोर त्रास जिवलग बोलती । देवा याची माती उचलावी ॥९६॥
उचलावी माती सर्वांचे अंतरीं । सुखाचीं सोयरीं दुरी ठेलीं ॥९७॥
दुरी ठेले सर्व दु:खाचीं चोरटीं । कोणीच संकटीं सोडवीना ॥९८॥
सोडवीना कोणी श्रीरामावांचूनी । संकटीं धांवणी राम करी ॥९९॥
राम करीतसे दासाचा सांभाळ । भक्तांचा स्नेहाळ राम माझा ॥१००॥
Last Updated : March 28, 2014
TOP