स्फुट अभंग - ३०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


३०
सप्रचीत वली मिथ्या कोण करी । धन्य तो विवरी विवेकानें ॥१॥
विवेकाचे जन भेटतां संकट । ज्याची खटपट सुखरूप ॥२॥
सुखरूप संत सत्य साभिमानी । तयासीच मानी येरां नाहीं ॥३॥
येरां नाहीं गती सत्यावांचूनीयां । असत्याचा पायां कोण पडे ॥४॥
कोण पडे आतां संदेहाचें डोहीं । कोणावीण नाहीं चाड आम्हां ॥५॥
आम्हां नाहीं चाड ते कोणीं येकाची । दृढ राघवाची कास धरूं ॥६॥
कास धरूं जेणें पावनची केलें । तेथें माझें जालें समाधान ॥७॥
समाधान जालें प्रत्ययासी आलें । धन्य तें पाउलें राघवाचीं ॥८॥
राघवाचीं पदें मानसीं धरीन । विश्व उद्धरीन हेळामात्रें ॥९॥
हेळामात्रें मुक्त करीन या जना । तरीच पावना राघवाचा ॥१०॥
राघवाचा दास मी जालों पावन । पतीत तो कोण उरों शके ॥११॥
उरों शके ऐसें कल्पांतीं घडेना । जो कोण्ही पुसेना त्यासी उणें ॥१२॥
उणें न सगतां माझ्या सूर्यवंशा । कोण्हाची दुराशा नाहीं आम्हां ॥१३॥
आम्हीं नाहीं उणें राघवाच्या गुणें । ब्रीदची राखणें पावनाचें ॥१४॥
पावनाचें ब्रीद आम्हां प्राप्त जालें । प्रचीतीस आलें कितीयेकां ॥१५॥
कितीयेक जन ज्ञानें उद्धरीले । कृतकृत्य जाले तत्काळची ॥१६॥
तत्काळची मोक्ष हें ब्रीद रामाचें । होत आहे साचें येणें काळें ॥१७॥
येणें काळें मोक्ष जरी मी देईना । दास म्हणवीना राघवाचा ॥१८॥
राघवाचा वर पावलों सत्वर । जनाचा उद्धार करावया ॥१९॥
कराया समर्थ राम सूर्यवंसी । मज कासयासी रागेजता ॥२०॥
रागेजतां राग येईल समर्थां । हे तों कांहिं सत्ता माझी नव्हे ॥२१॥
माझी सर्व चिंता जानकीजीवना । आतां मी लेखीना ब्रह्मादिकां ॥२२॥
ब्रह्मादिक माये जानकीपासूनी । तयासी व्यापूनी राम आहे ॥२३॥
राम आहे जनीं राम आहे वनीं । राम निरंजनीं सारिखाची ॥२४॥
सारिखाचि राम सृष्टी पाहों जातां । तोची पाहा आतां निरंतर ॥२५॥
निरंतर राम कांहो अंतरीतां । सोडूनीयां जाता येकेकडे ॥२६॥
येकीकडे जातां तेथेंहि तो राम । सांडुनीयां भ्रम बरें पाहा ॥२७॥
बरें पाहा तुम्ही आतांची पावाल । पावनची व्हाल रामरूप ॥२८॥
राम रूपें सर्व रूपें निवारलीं । आसतची जालीं नाही ऐसी ॥२९॥
नाहीं ऐसीं रूपें भित्ती चित्रकार । तैसा हा आकार स्वप्न जैसें ॥३०॥
स्वप्नीचा आकार कल्पनेसी भासे । रामरूप असे निर्विकल्प ॥३१॥
निर्विकल्प राम कल्पितां होईजे । मिळोनी जाईजे रामरूपीं ॥३२॥
रामरूपीं सर्व समाधान जालें । पावनचीं केलें पावनानें ॥३३॥
पावन हा राम जो कोण्ही पावेल । रामची होईल निजध्यासें ॥३४॥
निजध्यास नीज वस्तूचा धरावा । श्रवणें करावा साक्षात्कार ॥३५॥
साक्षात्कार होतां सत्य निर्गुणाचा । मग या गुणाचा पांग नाहीं ॥३६॥
पांग नाहीं ऐसें नेमस्त जाणीजे । शीघ्रची सुटीजे संवसारीं ॥३७॥
संवसारीं सुटिजे संसार करितां । सर्वही भागीतां भोगातीत ॥३८॥
भोगातीत जैसा श्रीकृष्ण दुर्वास । आत्मज्ञानी तैसा सर्वकाळ ॥३९॥
सर्वकाळ देहीं असतां विदेही । रामदासीं नाहीं जन्ममृत्यु ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP