स्फुट अभंग - सगुणनिर्गुणसंवादशतक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


करीं चाप बाण माहेश्वरीं ठाण । रूप हें सगुण राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप निर्गुण जाणावें । सगुण स्वभावे नाशवंत ॥२॥
नाशवंत देव कदा म्हणों नये । निर्गुणासि काये पहाशील ॥३॥
पाहतां निर्गुण देवासी दुर्लभ । त्याचा होय लाभ पूर्वपुण्यें ॥४॥
पूर्वपुण्यें लाभ ब्रह्मादिकां झाला । कैवारी जोडला रामचंद्र ॥५॥
रामचंद्र नाम रूप हें माईक । बोलिला विवेक वेदशास्त्रीम ॥६॥
वेदशास्रीं भक्ति राघवाची सार । तेणें पैलपार पाविजेतो ॥७॥
पाविजेतो पार आत्मनिवेदनें । भक्तीचीं लक्षणें नवविध ॥८॥
नवविध भक्ति करितां तरले । जीव उद्धरले नेणों किती ॥९॥
नेणोनियां देव माईक भजतां । मुक्ति सायुज्य ता अंतरली ॥१०॥
अंतरली मुक्ति भक्ति मागें धांवे । राघवाचीं नांवें निरंतर ॥११॥
निरंतर देव अंतरों न द्यावा । विवेक पहावा सज्जनाचा ॥१२॥
सज्जनासंगतीं चुके अधोगति । राम सीतापति ज्याचें नाम ॥१३॥
नाम ज्याचें ध्यावें त्यास ओळखावें । देवासी धुंडावें आदरेंसी ॥१४॥
आदरेंसी जपे रामनाम वाणी । स्वयें शूळपाणी महादेव ॥१५॥
महादेवें गुरुगीता निरूपिली । तेथें मन घाली आलीयारे ॥१६॥
आलीया संसारीं रामनाम तरी । दुजें पृथ्वीवरी आढळेना ॥१७॥
आढळेना परी संतसंग धरीं । तेणें तूं अंतरीं निवसील ॥१८॥
निवालें अंतर रामासी भजतां । दुजें कांहीं आतां आवडेना ॥१९॥
आवडेना जया संतांचीं संगति । तया अधोगति गर्भवास ॥२०॥
गर्भवास माझे राम चुकवील । मज सोडवील अनाथासी ॥२१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । तया संतजन दाखविली ॥२२॥
दाखविती संत वाटे निजधामीं । माझें मन रामीं विश्वासलें ॥२३॥
विश्वासलें परी रामासी नेणवे । तो राम जाणवे संतसंगें ॥२४॥
संतसंग करी निसंग होइजे । मग तो जाणिजे राम केवीं ॥२५॥
रामासी मिळतां संतांचे मिळणीं । मग दुजेपणीं उरी नाहीं ॥२६॥
उरी त्या रामाची रान्मोजन्मीं असे । मन हें विश्वासे रामा पायीं ॥२७॥
रामापायीं मन होतसे उन्मन । तेथें भिन्नाभिन्न ऐक्यरूप ॥२८॥
ऐक्यरूप ज्ञान तें मज नावडे । गाईन पवाडे राघवाचे ॥२९॥
राघवासी गुण नाहीं तो निर्गुण । ठाईं पडे खूण संतसंगें ॥३०॥
संतसंगतीचा निर्गुण पवाड । मज वाटे गोड रामकथा ॥३१॥
कथा निरूपण श्रवण मनन । होय समाधान संतसंगें ॥३२॥
संतसंगें बोध होय निर्गुणाचा । मोडे सगुणाचा भक्तिभाव ॥३३॥
भक्तिभाव करीं निर्गुण पावावें । मग काय व्हावें सांग बापा ॥३४॥
बाप माय राम विश्वाचा आधार ॥ भक्ता निरंतर सांभाळी तो ॥३५॥
सांभाळीतो काय प्रारब्धावेगळें । होणार न टळे ब्रह्यादिकां ॥३६॥
ब्रह्मादिकां मान्य तो नव्हे सामान्य । असावें अनन्य सगुणाची ॥३७॥
सगुणासी ठाव उदेना कल्पांतीं । म्हणोनि सांगती संतजन ॥३८॥
संतजन ज्ञानी पूर्ण समाधानी । तेही जपध्यानीं सर्वकाळ ॥३९॥
सर्वकाळ ध्यान करीती सज्जन । परी तें निर्गुण ध्यान त्यांचें ॥४०॥
ध्यानीं आकळेना मनासी कळेना । तयासी कल्पना केवीं धरी ॥४१॥
धरीला विश्वास साधूचे वचनीं । अवस्था जन्मनी तेणें गुणें ॥४२॥
गुणेंचि निर्गुळ कळे सर्व खूण । म्हणोनी सगूण देव धरीं ॥४३॥
धरावा सगुण निर्गुणाकारणें । तयाविण येणें चाड नाहीं ॥४४॥
चाड नाहीं ऐसें कासया म्हणावें । सगुणें पावावें निर्गुणासी ॥४५॥
निर्गुणासी पावे निर्गुणाकरितां । सगुण पाहतां तेथें नाहीं ॥४६॥
नाहीं कां म्हणसी सद्रुरु सगुण । आणि निरूपण बहुविध ॥४७॥
बहुविध रूप नव्हे सद्रुरूचें । निर्गुण बा याचें जाण बाप्पा ॥४८॥
जाण आतां बापा तूं तरी सगुण । झालासी शरण सद्नुरूसी ॥४९॥
सद्नुरूसी गेला जो कोणी शरण । सयासी सगुण कोण म्हणे ॥५०॥
म्हणशील काय सगुणावांचोनी । सर्वही करणी सगुणाची ॥५१॥
सगुणाची नव्हे निर्गुणा़ची सत्ता । निर्गुण करितां सर्व झालें ॥५२॥
सर्व झालें जेव्हाम निर्गुणाकरितां । तेव्हां सगुणता निर्गुणाची ॥५३॥
निर्गुणाची लीला वांझेची कुमारी । बोलतां अंतरीं मानीजेना ॥५४॥
मानीजेना तरी सृष्टीस रचीलें । सर्व कोणें केलें तयावीणें ॥५५॥
तयावीनें दुजें काय सत्य आहे । अनुभवें पाहें आपुलीया ॥५६॥
आपुला विचार निर्गुणीं सर्वदा । निर्गुणासी कदा विसंबेना ॥५७॥
विसंबेना घडे सत्संग नसतां । संग विचारितां सगुण की ॥५८॥
सगुणांचा संग ज्ञानीयासी नाहीं । ज्ञानीया विदेही पुरातन ॥५९॥
पुरातन देही तरीच विदेही । देहावीण नाहीं विदेहता ॥६०॥
विदेहता बोले स्वभावें लागली । निर्गुणाची खोली कोण जाणे ॥६१॥
जाणे सुख दु:ख जाणे गुणागुण । तयासी निर्गुण बोलवेना ॥६२॥
बोलवेना परी निर्गुण कळावें । विवेकें मिळावें निर्गुणासी ॥६३॥
निर्गुणी सगुणीं मिळतां संकट । व्यर्थ खटपट कां करिसी ॥६४॥
कां करिसी भक्ति सगुणदेवाची । तुज निर्गुणाची शुद्धि नाहीं ॥६५॥
शुद्धि नाहीं झाली जया आनंदाची । तयां विवादाची उरी नाहीं ॥६६॥
उरी नाहीं कदा निर्गुणीं भजतां । निर्गुण तत्त्वतां सार आहे ॥६७॥
सार तें साकार भक्तीचा निर्धार । भक्ति पूर्वापार सगुणाची ॥६८॥
सगुणाची भक्ति धरावी । सज्ञानें करावी निर्गुणाची ॥६९॥
निर्गुणाची भक्ति या नांव अभक्ति । अव्यक्तासी व्यक्ति लावूं नये ॥७०॥
लावूं नये भाव सगुण देवासी । व्यर्थ पाषा-णासी काय काज ॥७१॥
काय कारण हा विवेकें पाहिजे । भावार्थे लाहीजे सर्व कांहीं ॥७२॥
सर्व कांहीं नाहीं जैसें मृगजळ । वायां खळबळ कां करिसी ॥७३॥
कां करिसी सर्व देहाचा संबंध । जरी झाला बोध निर्गुणाचा ॥७४॥
निर्गुणाचा बोध संसार निरसी । तेथें अज्ञा-नासी रीघ नाहीं ॥७५॥
रीघ नाहीं जया भावार्थ भजनीं । तया हदयधूनीं शून्याकार ॥७६॥
शून्याकार होय विवेकवासना । मग समाधाना काय उणें ॥७७॥
उणें झालें दुणें निर्गुणाच्या गुणें । अभाविकां कोणें उद्धरावें ॥७८॥
उद्धरावें एका सज्जनसंगतीं । ऐसें वेदश्रति बोल-ताती ॥७९॥
बोलताती परी नाहीं आठवण । म्हणोन सगुण आवडेना ॥८०॥
आवडेना मिथ्या मायिक भजन । असत्यासी मन विश्वासेना ॥८१॥
विश्वासेना मन सगुणासी जरी । तयासी कैवारी देव कैंचा ॥८२॥
कैंचा देवभक्त कल्पना आपुली । ते सर्व नाथिली ज्ञानी-यांसी ॥८३॥
ज्ञानीयांसी देव दुरी अंतरला । संदेहीं पडला अंतकाळीं ॥८४॥
अंतकाळ कैंचा अनंत ठाईंचा । संदेह देहाचा मिथ्याभूत ॥८५॥
मिथ्याभूत शब्दज्ञानें माया जाणा । अभक्त तरेना मायापूरीं ॥८६॥
मायामोहपूर दुस्तर संसार । अद्वैत विचार जंव नाहीं ॥८७॥
जंव नाहीं भावें श्रीहरी अर्चिला । तंव नव्हे भला ज्ञानगर्वीं ॥८८॥
ज्ञानगर्वी नव्हे ज्ञान त्या दुर्लभ । जयाचेनी लाभ स्वरूपाचा ॥८९॥
स्वरूप रामाचें मनीं आठवावें । नाम उच्चारावें रात्रंदिवस ॥९०॥
दिवस ना रजनी मनीं ना जन्मनीं । ज्ञाता जनीं वनीं सारि-खाचि ॥९१॥
सारिखाचि भाव तया भेटे देव । येर सर्व वाव शब्दज्ञान ॥९२॥
ज्ञाना-वीण सर्व व्यर्थचि जाणावें ।  जंव नाही ठावें आत्मज्ञान ॥९३॥
ज्ञाता दाता हरी मनीं दृढ धरी ॥ तोचि यमपुरी चुकवील ॥९४॥
चुकवील ज्ञान सर्वही अज्ञान । पाविजे विज्ञान संतसंगें ॥९५॥
संतसंगें जरी सगुणीं भजन । स्वधर्मसाधन क्रिया कर्म ॥९६॥
क्तिया कर्म कैंचें ज्ञानियाचे अंगीं । मुक्त ज्ञानी जनीं विचरती ॥९७॥
विचरी जे देही तो कीजे सर्वही । क्रिया कर्म कांहीं सोडूं नये ॥९८॥
सोडूं नये भक्ति स्वधर्मविरक्ति । ब्रह्मज्ञानप्राप्ति रामदासीं ॥९९॥
रामदास म्हणे रामउपासकां । भक्ति सोडूं नका राघवाची ॥१००॥

N/A

Last Updated : March 28, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP