स्फुट अभंग - १ ते ५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
१
त्याचे पाय हो नमावे । त्याचें कीर्तन हो ऐकवें ॥१॥
दुजियासी सांगे कथा । आपण वर्ते त्याचि पथा ॥२॥
कीर्तनाचें न करी मोल । जैसे अमृताचे बोल ॥३॥
सन्मानितां नाहीं सुख । अपमानितां नाहीं दुःख ॥४॥
किंचित दिलें दातयानें । तेंहि घेत आनंदानें ॥५॥
ऐसा आहे हरिदास । लटकें न वदे रामदास ॥६॥
२
वाणी शुद्ध करीं नामीं । चित्त शुद्ध होय प्रेमीं ॥१॥
नित्य शुद्ध होय नामीं । वसतांहि कामींधामीं ॥२॥
कर्ण शुद्ध करी कीर्तनीं । प्राण शुद्ध करी सुमनीं ॥३॥
त्वचा शुद्ध करी रज । मस्तक नमितां पदांबुज ॥४॥
करशुद्धी राम पूजितां । पादशुद्धी देउळीं जातां ॥५॥
नेमें लिंग करी शुद्ध । अंतर निर्मळ करी गुद ॥६॥
रामपायी राहतां बुद्धी । रामदासा सकळ शुद्धी ॥७॥
३
माझें सर्व जावें देवानें राहावें । देवासी पाहावें भक्तपणें ॥१॥
भक्तपनें मज देवचि जोडला । अभ्यास मोडला सर्व कांहीं ॥२॥
सर्व कांहीं जावो एक देव राहो । माझा आर्तभावो ऐसा आहे ॥३॥
जो हेत अंतरीं देव तैसा झाला । हा दिन पाहिला कोणी एक ॥४॥
कोणी एक पुण्य जें होतें संचलें । दास म्हणे झालें समाधान ॥५॥
४
दीनाचा दयाळु कीर्ति ऐकियेली । म्हणूनि पाहिली वाट तुझी ॥१॥
अनाथाचा नाथ होशील कैवारी । म्हणोनियां हरी बोभाईलें ॥२॥
तुजविण कोण जाणे हें अंतर । कोणासी जोजार घालूं माजा ॥३॥
दास म्हने आम्ही दीनाहुनी दीन । करावें पालन दुर्बळाचें ॥४॥
५
आम्हां पतितांची सांड की जरी । आमुचा कैवारी कोण आहे ॥१॥
आम्ही भरवंसा कोणाचा धरावा । सांगावें केशवा दयानिधे ॥२॥
तुजविण आम्हीं नाहीं त्रिभुवनीं । धांवें चक्रपाणी दीनबंधो ॥३॥
पतितपावन ब्रीद हें बांधिलें । तारावें वहिलें दासालागीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2017
TOP