स्फुट अभंग - २८

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२८
पहिले प्रथम मुळीं परब्रह्म । व्यापक सूक्ष्म जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें वस्तु आहे निराकार । शुद्ध व्योमाकार प्रगटित ॥२॥
प्रगटित आहे दिसेना ना नासे । विचारें विलसे ज्ञानियांसी ॥३॥
ज्ञानियांसी मान न कळे निरंजन । आणी जन वन सारिखेंचीं ॥४॥
सारिखेंची आहे देवा वोळखतां । जेथें तेथें जातां देव भासे ॥५॥
देव भासे मनीं नित्य निरंतर । बाह्याभ्ययांतर व्यापूनीयां ॥६॥
व्यापूनीयां आहे सर्वाचें अंतरीं । अनुभवें हरी वोळखावा ॥७॥
वोळखावा परी वोळखतां नये । म्हणानी उपाये साधुसंग ॥८॥
साधुसंग धरी श्रवण विवरी । सारासार करी विचारणा ॥९॥
विचारणा करी देवाब्राह्मणांची । आणी सगुणाची उपासना ॥१०॥
उपासना कर्म हें आधीं पाळावें । मग सांभाळावें ब्रह्मज्ञान ॥११॥
ब्रह्मज्ञान नसे ते जन आंधळे । सन्मार्गीं पांगुळे क्रियाभ्रष्ट ॥१२॥
क्रियाभ्रष्ट कर्म उपासनेवीण । नेणतां निर्गुण सर्व मिथ्या ॥१३॥
मिथ्या जंव ब्रह्मज्ञान नाहीं । क्रिया कर्म कांहीं सोडवीना ॥१४॥
सोडवीना कर्म या कर्मापासूनी । भगवंतांवांचुनी तारांबळी ॥१५॥
तारांबळी जाली देवासी नेणतां । कर्मीं गुंडाळतां देव कैचा ॥१६॥
देव कैचा भेटे कर्म उफराटें । संशयोची वाटे सर्वकाळ ॥१७॥
सर्व काळ गेला संशईं पडतां । नित्य चोखाळितां कळेवर ॥१८॥
कळेवर काये नित्य धूत गेला । लावितो कोणाला उपकार ॥१९॥
उपकार कैचा सेवक देहाचा । आणि कुटुंबाचा भारवाही ॥२०॥
भारवाही जाला देवासी चुकला । लोकिकची केला जन्मवरी ॥२१॥
जन्मवरी केलें अंतीं व्यर्थ गेलें । कासावीस जालें वांयांवीण ॥२२॥
वायांवीण काळ गेला कीं निर्फळ । कर्म हें सबळ सुटेना कीं ॥२३॥
सुटेना कीं कर्म कोण सोडविता । सांडुनी अनंता कर्म केलें ॥२४॥
कर्म केलें देह चालतां निर्मळ । खंगतां वोंगळ देह जालें ॥२५॥
देह जाला क्षीण सदा हागवण । मृत्तिकेचा सीण कोण करी ॥२६॥
कोण करी तेव्हां कर्मांचे पालण । जाली भणभण शरीराची ॥२७॥
शरीराची जाली जेव्हां भणभण । तेव्हां नारायण भजों पाहे ॥२८॥
भजों पाहे तेव्हां नारायण कैचा । गेला अभाग्याचा सर्व काळ ॥२९॥
सर्व काळ गेला देवा न भजतां । देहे चोखाळीतां चोखाळेना ॥३०॥
चोखाळेना देहे वाढवी संदेहे । अंतकाळीं पाहे दैन्यवाणा ॥३१॥
दैन्यवाणा देह देवा न भजतां । लेटतुला आतां कोण सोडी ॥३२॥
कोण सोडी देव धुंडिल्यावांचुनी । म्हणोनी भजनीं सावधान ॥३३॥
सावधानपणें देवासी शोधावें । तेणेंची साधावें परलोक ॥३४॥
परलोक साधे संतांचे संगती । चुके अधोगती गर्भवास ॥३५॥
गर्भवास चुके ज्ञान अभ्यासितां । वस्तुसी पाहतां वस्तुरूप ॥३६॥
वस्तुरूप होणें विवेकाच्या गुणें । नित्यनिरूपणें सारासार ॥३७॥
सारासारें घडे असाराचा त्याग । योगिये निःसंग सहजची ॥३८॥
सहजचि कर्मापासुनी सुटला । बोध निवटला परब्रह्मीं ॥३९॥
परब्रह्मीं हेतु लागतां अहेतु । दहीं देहातीतु रामदास ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP