स्फुट अभंग - २६

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२६
संसार करितां होय सायुज्यता । ऐसें कांहीं आतां सांगा स्वामी ॥१॥
सांगा स्वामी कोण स्थिती जनकाची । राज्य करितांची मुक्त कैसा ॥२॥
मुक्त कैसा होता देहींच विदेही । कैसा लिप्त नाहीं करूनीयां ॥३॥
करूनीयां सर्व आपण वेगळा । सांगा तेचि कळा आम्हांलागी ॥४॥
आम्हांलागी सांगा त्याचें समाधान । रामदास खूण पुसतसे ॥५॥
पुसतसे आतां पाहिजे बोलिलें । कैसें राज्य केलें विदेहानें ॥६॥
विदेहानें सत्य स्वामीचें वचन । थेथें विश्वासोन वर्ततसे ॥७॥
वर्ततसे जनीं अहंता सांडुनी । आदीकारणी प्रकृती हें ॥८॥
प्रकृतीचा प्रांत आद्य मद्य अंत । तेंचि तें निवांत रूप तुझें ॥९॥
रूप तुझे सदा सर्वदा संचले । वेदाचेनि बोलें महावाक्य ॥१०॥
महावाक्य तें तू स्वरूप आहेसी । जाण निश्चयेंसीं आपणासे ॥११॥
आपणा पाहातां जाली तन्मयता । सोहं हें तत्वता मनीं धरीं ॥१२॥
मनीं धरीं साहं आत्मा हें वचन । तेणें समाधान पावसील ॥१३॥
पावसील निज स्वरूप आपुलें । जरी विश्वासलें मन तेथें ॥१४॥
मन तेथें जाये वचनासरिसें । तवं मनीं नसे मनपण ॥१५॥
मनपण गेलें स्वरूप पाहातां । तैसेंची राहातां समाधान ॥१६॥
समाधान बाणे त्यगितां संगासी । जनकें शुकासी सांगितलें ॥१७॥
सांगितलें ‘ संगंत्यक्त्वा सुखी भव ’ । मग अनुभव शुक पाहे ॥१८॥
शुक पाहे संग काय म्यां धरीला । विवरों लागला स्वस्वरूपीं ॥१९॥
स्वस्वरूपीं शुक नामरूप नाहीं । जनक विदेही आडळेना ॥२०॥
आडळेना तुटी तेथें कैची भेटी । आठवण पोटीं स्वरूपाची ॥२१॥
स्वरूपीं आठविं आपुला विसरू । शुग योगेश्वरू संगातीत ॥२२॥
संगातीत जाला निःसंगा पाहतां । येणें रीती आतां समाधान ॥२३॥
समाधान बाणे सज्जनसंगती । तिन्हीहि प्रचीती ऐक्यरूप ॥२४॥
ऐक्यरूप वेद स्वामीचें वचन । आपुलेंहि मन सत्य मानी ॥२५॥
सत्य मानी ब्रह्म येर सर्व भ्रम । अहंतेची सीम वोलाडिली ॥२६॥
वोलांडिली सीमा देहेसमंधाची । जालें असतांचि स्वप्न जैसें ॥२७॥
स्वप्न जैसें मनीं जागृती आत्ते । परी ते जाणावें मिथ्याभूत ॥२८॥
मिथ्याभूत माया सद्गुरूवचनें । देह प्रारब्धानें वर्ततसे ॥२९॥
वर्ततसे परी देह तूं नव्हेसी । विश्वास मानसीं दृढ धरीं ॥३०॥
दृढ धरीं अहं ब्रह्म ऐसी खुण । देहाचें करण प्रकृतीचें ॥३१॥
प्रकृतीचें रूप नव्हे तूं स्वरूप । पुण्य आणि पाप देहसंगें ॥३२॥
देहसंग बापा निःसंगासी कैचा । वृतीनिवृत्तीचा शून्याकार ॥३३॥
शून्याकार देहो काईसा संदेहो । वृतीशून्य पाहो संतजन ॥३४॥
संतजन तेणें सुखें सुखावले । तेंचि हें बोलीलें वोवीमीसें ॥३५॥
वोवीमीसें गुप्त पंथ हा सांपडे । गुज ठाईं पडे योगियांचें ॥३६॥
योगियांचें गुज योगीच जाणती । जेथें नेति नेति वेद बोले ॥३७॥
वेद बोलियेला त्रिविध वचन । कर्म उपासना आणि ज्ञान ॥३८॥
ज्ञानाचा निश्चयो बोलीला वेदांतीं । आणि शास्त्रमतीं बहुसाल ॥३९॥
बहुसाल शास्त्रें पाहातां सरेना । आयुष्य पुरेना जन्मवरी ॥४०॥
जन्मवरी वाया संदेहीं पडावें । केधबांघडावें समाधान ॥४१॥
समाधान घडे साधूचे संगती । गीताभगवतीं हेंची आहे ॥४२॥
हेंचि आहे सार जाणावें साचार । करावा विचार शाश्वताचा ॥४३॥
शाश्वताचा भाव सर्व ठाईं पडे । जरी भावें घडे संतसंग ॥४४॥
संतसंगें देव पाविजे तत्वता । शास्त्रें धांडोळितां आडळेना ॥४५॥
आडळेना जनीं दिसेना लोचनीं । तें या साधुचेनी पाविजेतें ॥४६॥
पाविजेतें निज स्वरूप आपुलें । मन भांबावलें जये ठाईं ॥४७॥
जये ठाईं तुटे सर्वहि आशंका । तेंचि लाभे येका गुरूमुखें ॥४८॥
गुरूमुखें सत्य मानावें अंतरीं । वेगीं सोय धरीं आलया रे ॥४९॥
आलया रे संग साधूचा धरावा । संसार तरावा साधुसंगें ॥५०॥
साधुसंगें ज्ञान रामदासीं जालें । शरीर लागलें भक्तीमार्गें ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP