नामदेवाचें चरित्र - विनवितो देवा बहुत प्रकारी...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
विनवितो देवा बहुत प्रकारीं । जेवावें श्रीहरी मायबापा ॥१॥
दोनी कर जोडोनी घाली लोटांगण । द्यावें जीवदान देवराया ॥२॥
अझुनी नये तुज बा करुणा । काय नारायणा करूं आतां ॥३॥
मारील गोणाई घेईल माझा जीव । कायतरी कींव नये माझी ॥४॥
काय करुं जातां विठ्ठल रुक्माई । मारील गोणाई मजलागीं ॥५॥
नये तुज कांहीं कींव माझी पाहीं । वाहीन आतां पायीं शिरकमळ ॥६॥
वाहीन शिरकमळ म्हणे नामदेव । धरिला सद्भाव ऐसा मनीं ॥७॥
देह त्याग त्यानें मांडिला शरिरीं । फांसा रुकनी दोरी लावियेली ॥८॥
गळां घालूनि फांस बांधिला काष्ठासी । त्यागितां प्राणासी धरिलें देवें ॥९॥
उठविला नामा पांडुरंगें करीं । आलिंगी श्रीहरी गोंदा म्हणे ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015

TOP