मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २ रा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २ रा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्तसमर्थ ॥ करोनी साष्टांग नमन ।
दीपक करीतसे प्रश्न ॥
म्हणे गुरुजी माझें मन । समाधान करावें ॥१॥
कोणी म्हणती दत्तात्रेय । हा ऋषीचा पुत्र होय ।
कोणी म्हणती देव होय । कोणी ध्येय म्हणताती ॥२॥
श्रीदत्त हा परब्रह्ममूर्ती । असें कोणीही बोलती ।
भ्रांत होते माझी मती । सांगा निगुती सत्य काय ॥३॥
काय कारणें अवतरला । कैशा केल्या एथें लीला ।
शिष्यसंग्रह कसा केला । हें सर्व मला ऐकवा ॥४॥
परिसोनी सिष्याचा प्रश्न । सद्गदित झालें गुरूचें मन ।
म्हणे शिष्या हो सावधान । लावोनि कान ऐक तूं ॥५॥
एक भार्गवकुलोत्पन्न । होता उत्तम ब्राह्मण ।
त्यासीं नवसें करून । वृद्धपणीं पुत्र झाला ॥६॥
योगंभ्रष्ट तो सर्वज्ञ । परि जडसा वागे सुज्ञ ।
त्याच्या पिता विप्र प्राज्ञ । शिकवी प्रयत्नें तयासी ॥७॥
करूनियां मौजीबंधन । पिता करवी अध्ययन ।
हांसोनि पुत्र बोले वचन । किमर्थ यत्न हा तुझा ॥८॥
पिता म्हणे करी अध्ययन । गृहस्थाश्रम करोन ।
करी मोक्षार्थ कर्माचरण । तेणें निर्वाण पाविजे ॥९॥
पुत्र म्हणे ताता ऐक । शिकलों मी वेदादिक ।
कर्में केलीं सकळिक । भोग अनेक भोगिले ॥१०॥
झालों मंत्री झालों राजा । झालों भृत्य झालों प्रजा ।
असती उत्तमाधम योनी ज्या । त्या त्या सर्व अनुभविल्या ॥११॥
तें मी सर्व स्मरें स्पष्ट । पूर्वींचा मी योगभ्रष्ट ।
आतां कर्तव्य नसे अवशिष्ट । कां हे कष्ट करसी तूं ॥१२॥
मी जातबोध केवळ । नको आतां कर्माचा खेळ ।
मनाचा झाडूनी मळ । वैराग्यें सबळ आहें मी ॥१३॥
पूर्वीं होतों मी ब्राह्मण । सत्संगें विद्याभ्यास करून ।
वैराग्यें एकाग्रमन । करूनि ध्यान केलें म्यां ॥१४॥
ज्ञानाला प्रतिबंध येऊन । अकस्मात पातलें मरण ।
पूर्वाभ्यासें विस्मरण । न झालें जाण मज ताता ॥१५॥
जसा निजेंत विद्या विसरे । जगा होतां सर्व स्मरे ।
त्याप्रमाणें उपजतांचि सारे । अभ्यास स्मरे दृढवृत ॥१६॥
तीनी भूमिवरोनि फिरे । तोही अभ्यास न विसरे ।
मीं पंचम भूमिका आदरें । सेविली तें सारें आठवे ॥१७॥
आतां झाली वृत्तींची उपरती । मिळाली परम शांती ।
दृढतर झाली विरती । पुनरावृत्ति आतां कैची ॥१८॥
करावयाचें तें म्यां केलें । मिळवायाचें मिळविलें ।
आतां कांहीं नाहीं राहिलें । यथार्थ जाणविलें तुजलागीं ॥१९॥
ऐकोन पुत्राचें वचन । पिता वैराग्य पावून ।
बोले मग होऊन दीन । तूं नंदन धन्य धन्य ॥२०॥
कुळ केलें पावन । पूर्वजांचें केलें उद्धरण ।
आतां परिसें माझें वचन । सांगे ज्ञान मजला हें ॥२१॥
मी संसारा भिऊन । ऐहिक पारलौकिक सुख सोडून ।
केवळ इच्छितों विज्ञान । ज्ञान वैराग्यसहित जें ॥२२॥
तूं म्हणसी हा तात । तरी मी हा अज्ञानावृत ।
केवळ होईन तुझा सुत । श्रुति संमत असे येथें ॥२३॥
पुत्र म्हणे ऐक वचन । श्रीदत्तें उपदेशिला अर्जुन ।
तो योगाभ्यासें लाधला ज्ञान । तसा यत्न करी तूं ॥२४॥
पिता म्हणे कोण श्रीदत्त । अर्जुन हा कोणाचा सुत ।
त्याला कसें झालें ज्ञान प्राप्त । हें समस्त सांगावें ॥२५॥
पुत्र म्हणे दु:खसंयोग । त्याचा करी जो वियोग ।
परी त्याला म्हणती योग । श्रीदत्तें तो सांग कथियेला ॥२६॥
हें सर्व करीन निरूपण । ऐके होवूनी सावधान ।
प्रतिष्ठानीं होतां ब्राह्मण । कौशिकगोत्रोत्पन्न जो ॥२७॥
दैवें व्यसनार्त होवोनी । सदा राहे वेश्यासदनीं ।
भोग भोगितां प्रतिदिनीं । कुष्ठें व्यापून त्रस्त झाला ॥२८॥
बीभत्सरूप देखोन । वेश्येनें दिधला काढून ।
तेव्हां विवाहित स्त्रीला आठवून । आला ब्राह्मण निजसदनीं ॥२९॥
असी लोकीं हे राहटी । सुज्ञें ठेवावी पोटीं ।
पति येतां उठाउठीं । पायीं मिठी घाली सती ॥३०॥
म्हणे धन्य आजी सुदिन । सोन्याचा आला कीं पर्जन्य ।
झालें इष्ट देवाचें दर्शन । आनंदघन दाटला ॥३१॥
उत्तमासनीं बसवून । देवापरी करे अर्चन ।
भावें करून शुश्रुषण । घाली स्नान आवडीनें ॥३२॥
करी पादोदक प्राशन । स्वशरीरीं करी प्रोक्षण ।
करूनियां परमान्न । करवी भोजन सादरें ॥३३॥
पूय रक्तें भरतां वसन । नित्य करी क्षालन ।
उत्तम वस्त्रें नेसवून । अंगवाहन करी नित्य ॥३४॥
बोलोनि मंजुळ भाषण । करी औषधादि लेपन ।
श्लेष्म मूत्र मळ क्षालन । करितां मन न विटे तिचें ॥३५॥
एवं अत्यंत विनीत होवून । करी जरी नित्य सेवन ।
तरी तो कोपाविष्ट होवून । करी निर्भर्त्सन सतीचें ॥३६॥
जरी झाला पराधीन । तरी न सुटे वेश्येचें चिंतन ।
पत्नीला शिव्या देऊन । म्हणे सेवन न करसी ॥३७॥
वेश्येनें करवितां अंगसंवाहन । त्याणें मन न हो खिन्न ।
पत्नीनें करितां पादसंवाहन । वाटे शीण दुर्जना ॥३८॥
कसा कसो पतीचा भाव । सतीनें ठेवावा अनन्य भाव ।
हें असो एकदां तो धव । डोळा देखे एक वेश्या ॥३९॥
वेश्या केवळ व्याध जाण । निर्गुण भ्रूधनुष्य ओढून ।
कटाक्षबाणें अचुक संधान । करून विप्रमनमृग वेधला ॥४०॥
वेश्या हा कामाचा शर । तेणें वेधिलें द्विजशरीर ।
विद्ध होतांचि सत्वर । निर्लज्ज होवोनी बोलतसे ॥४१॥
प्रिये तूं धर्मज्ञा अससी । म्हणोनी कठोर वाग्बाण सोससी ।
तरी आतां या समयासी । माझी मानसी व्यथा वारी ॥४२॥
जिवलग मित्र आणि गुणी भृत्य । प्रिय भार्येसि नित्य ।
साधूंलाही सांगावें सत्य । दु:ख आपुलें सुखार्थ ॥४३॥
हे वेश्या घटस्तनी । स्वरूप सौंदर्य दावूनी ।
माझें मन दुरूनी । हरूनी जातसे ॥४४॥
देह दाहला अशक्त । परि मन नोहे विरक्त ।
तत्स्वरूपीं जाहलें अनुरक्त । ह्याला मुक्त करी तूं ॥४५॥
वेश्येगृहीं नेई मला । नातरी मृत्यु पातला ।
उपाय दुजा नाठवे मला । येवो तुला काकुळती ॥४६॥
कामाची विपरीत ग अती । ब्रह्मादिकांची खुंटे मती ।
मी तो बापुडा मंदमती । केवी विरती पावेन ॥४७॥
ऐकोनी पतीचें वचन । हृष्ट झालें सतीचें मन ।
सत्वर कमर बांधोन । तथास्तु म्हणून उभी ठेली ॥४८॥
वेश्या वश्य व्हावी म्हणून । तिला द्यावया घेईं काढून ।
अलंकार ते पदरीं बांधून । पतीस खांद्यावरी घेतलें ॥४९॥
पतीस व्यथा न व्हावी । म्हणून हळु हळु चाले पदवी ।
मनीं शीण न वागवी । तों अंधकार पातला ॥५०॥
विद्युत्तेजें धरी खूण । मंद मंद ठेवी चरणी ।
तों पातलें विघ्न दारुण । दैववशें करूनी ॥५१॥
सुळीं देतां एक चोर । पळोनि गेला सत्वर ।
राजदूतीं शोधितां दूर । तत्समान नर देखिला ॥५२॥
तोचि चोर मानुनी । राजाची आज्ञा घेऊनी ।
तया सुळावरी चढवूनी । राजधानीप्रती दूत गेले ॥५३॥
चोर नव्हे तो मांडव्य मुनी । सुळीं असे ध्याननिष्ठ होवोनी ।
ध्वांतीं तया नेणुनी । चाले तेथूनी सती ते ॥५४॥
तव कौशिकाचा धक्का लागूनी । शूळें त्रस्त झाला मुनी ।
शाप देतसे कोपोनि । विवेक मनीं न धरितां ॥५५॥
धक्का दिधला मज जाणें । सूर्योदय होतांचि क्षणें ।
तो मरो असें म्हणे । ऐकतां शिणे ती साध्वी ॥५६॥
मग पतिव्रता म्हणे । पतीवांचोनी कायसा जिणें ।
यास्तव वाक्य ऐक तरणे । उदय न करणें त्वां आपला ॥५७॥
जरी मी पतिव्रता नारी । तरी माझें वाक्य अवधारी ।
भस्म होशी नातरी । हें अंतरीं ठेव सूर्या ॥५८॥
ऐसा शाप देवूनी । पतीचा मनोरथ पुरवूनी ।
पुन: तयासह सदनीं । विप्रपत्नी पातली ॥५९॥
कामी पुरुष अविचारी । कार्याकार्य न विचारी ।
पापाची पर्वा न करी । उपशम अंतरीं नसे ज्याच्या ॥६०॥
वेश्या हे कामाग्नीची ज्वाळा । रूपकाष्ठें पेटली सोज्वळा ।
कामी जाळीती पडोनी गळा । यौवनकळां आणि घनें ॥६१॥
अहो योनी हे दुर्गंधी व्रण । तेथें रमतां नये शीण ।
तरी किड्याला याहून । काय न्यूनत्व आहे हो ॥६२॥
थुंकी कफ आणि शेंबूड । यानें भरलें जें तोंड ।
त्याला चंद्रोपमा देती मूढ । मायेनें दृढ आलिंगिलें ॥६३॥
स्वस्त्री स्वाधीन असतां । नीच वांछी परवनिता ।
तळें भरलें असतां । जेवी काक कुंभोदक ॥६४॥
विषय भोगितां झाला रुग्ण । तरी विषया न सोडी ब्राह्मण ।
असो त्याचें हें मूर्खपण । धन्य जाण सती ते ॥६५॥
सवतीचे मत्सरें प्राण देती । ही तरी स्कंधीं वाहोनि पती ।
आली वेश्येच्या गृहाप्रती । धन्य पतिव्रता हो ॥६६॥
तिच्या शापा भिऊन । सूर्य राहिला लपून ।
पडला अंधकार गहन । भ्याले जन सर्वत्र ॥६७॥
सर्व मनुष्य गडबडले । पशु पक्षी तडफडले ।
काळाभावें अडले । विप्र पडले संकटीं ॥६८॥
त्रिकाळ संध्यावंदन । सायंप्रातर्भोजन ।
कैसे करतील ब्राह्मण । दिनरात्रीमान न होतां ॥६९॥
यज्ञ याग लोपले । देवा उपवास घडले ।
सर्व संकटीं बुडाले । सर्वांचें खचलें बुद्धिबळ ॥७०॥
स्वर्गी देव म्हणती । नर आम्हां बळी देती ।
वृष्टिद्वारा त्यांची तृप्ति । करितों आम्ही निरंतर ॥७१॥
आम्ही वृष्टिद्वारा अन्न देतां । मनुष्यीं यज्ञ न करितां ।
उपसर्गें पीडावें तत्वतां । तरी आतां तसें नाहीं ॥७२॥
अतिवृष्टिरनावृष्टिर्मूषका: शलभा: शुका: । स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥१॥
धाडाव्या ह्या सात ईति । तरी केवळ अनीती ।
काळलोपें यज्ञ न करिती । भयांत भीती काय द्यावी ॥७३॥
आतां जावें ब्रह्मयापाशीं । सर्व सांगावें तयाशीं ।
तो उपाय आम्हांशीं  । निश्चयेंशी सांगेल ॥७४॥
असें म्हणोनी देवगण । सत्यलोका जाऊन ।
ब्रह्मयातें वंदून । सर्व निवेदन करीती ते ॥७५॥
ब्रह्मा म्हणे सतीच्या शापें । भिवूनी सूर्य लोपे ।
जरी एकदां सती कोपे । थरथरां कांपे ब्रह्मांड ॥७६॥
आतां उपाय एक असे । तेजें तेज लोपतसे ।
सूर्यापुढें दिवे जसे । सतीसमूह तसे अनसूयेपुढें ॥७७॥
पतिव्रताग्रगणनीया । मनस्विनी अनसूया ।
तिला तुम्ही प्रार्थुनियां । चला घेऊनियां पैठणासी ॥७८॥
त्या कौशिकपत्नीस । अनसूया उपदेशील खास ।
निवारील तुमचा त्रास । हें इतरांस न घडेल ॥७९॥
देव म्हणती आपणही यावें । तथास्तु म्हणून ब्रह्मदेवें ।
पैठणीं गमन केलें जवें । देवांसवें तत्क्षणीं ॥८०॥
तया पाहूनी अत्री अनसूया । यथायोग्य पूजोनियां ।
विनयावनत होवोनियां । पुसलें तयां सर्व कुशल ॥८१॥
मग वंदूनी म्हणती देव । अनसूये त्वत्पदीं भाव ।
ठेवोनि घेतली धांव । तुझें नांव ऐकोनि ॥८२॥
सतीनें सूर्या शाप दिधला । सूर्य नभीं लोपला ।
कर्ममार्ग खुंटला । अनर्थ घडला जगांत ॥८३॥
तरी तूं होईं प्रसन्न । सतीचें करी समाधान ।
उदया पाववी तपन । ऐसें तप न त्वदितराचें ॥८४॥
सती म्हणे तुम्ही देव । लोकपालक सदैव ।
तुम्ही म्हणतां घेतली धांव । वाटे अभिनव आश्चर्य हें ॥८५॥
असो तथापि चला जावूं । त्या सतीला समजावूं ।
युक्तीनें तिला वळवूं । म्हणोनी निघाली अनसूया ॥८६॥
पतीसह सती चाले । देवही समागमें आले ।
कौशिकगृहीं पातले । हर्ष पावले मनांत ॥८७॥
कौशिकपत्नी येवोन । घेतलें अनसूयेचें आलिंगन ।
अनसूयेसी सत्कारून । कुशल प्रश्न केला ॥८८॥
अनुसया म्हणे गे साध्वी । तुझी वाणी लागे माध्वी ।
लोकीं ज्या ज्या साध्वी । कीर्ति स्वाद्वी तयांची ॥८९॥
देवाहूनही अधिक । पती वाटे कीं त्याचें मुख ।
पाहतां ब्रह्मसुखादिक । वाटे सुख काय बोल ॥९०॥
काया वाचा मनेंकरून । करितां पतीचें सेवन ।
सती होवोनी पावन । इतरां पावन करीतसे ॥९१॥
नारी तीर्थ पतिव्रता । असे ही उक्ती विख्याता ।
पतीची शुश्रुषा करितां । ऋणमुक्तता नारीची ॥९२॥
धर्म अर्थ काम हे । पतिसेवेनें नारी लाहे ।
काळाचीही भीती न वाहे । जी न पाहे यातना ॥९३॥
पतिव्रताधर्मपालन । हे क्लेश वाटती कठिण ।
जी दुर्भगा मानी शीण । ती दारुण यातना भोगी ॥९४॥
मनासारखी न मिळता साडी । जावोनी माहेरीं करी चाडी ।
न मिळतां बाळी बुगडी । फुगडी घाली पतीपुढें ॥९५॥
बरें बरें खाणें पिणें । काय करावीं भूषणें ।
येती इहपर दूषणें । त्याला शिने ती धन्य ॥९६॥
कसाही असो पती । त्यावरी ठेवी जी प्रीती ।
पतीसह तिला गती । लाभे पतिलोकीं ॥९७॥
स्त्रियांला नाहीं वेगळें कर्म । पती देतो अर्धा धर्म ।
उभयलोकीं मिळे शर्म । हें मुख्य वर्म धरावें ॥९८॥
म्हणोनी न्तिय पतिव्रते । भावें सेवी स्वधर्मातें ।
ऐहिकामुष्मिक सुखातें । घेशील माते निश्चयें ॥९९॥
मीही ह्या धर्मेंकरून । आत्मा केला पावन ।
म्हणोनी सर्वदा माझें मन । समाधान भर्तृचरणीं ॥१००॥
पतीच परब्रह्म माझें । जेणें उतरलें संसाराचें ओझें ।
त्रिविध तापही विझे । आतां न दुजें आठवे ॥१०१॥
ऐकोनी अनसूयेचें वचन । सती होवोनी सुप्रसन्न ।
करद्वय जोडून । बोले वचन मधुरपणें ॥१०२॥
धन्य हो अये अनसूये । पतिव्रते महामाये ।
धन्य हो अत्रिप्रिये । निगमगेये तुज नमो ॥१०३॥
मी नेणें निज धर्मं । मी नेणें स्वकर्म ।
मी नेणें निजवर्म । न ठावे शर्म कारणही ॥१०४॥
मज आवडे पतिसेवन । त्याला त्वां दिलें उत्तेजन ।
आह्मां दैवत काय याहून । प्राणजीवन पूर्णाधार ॥१०५॥
तप करितां नोहे भेटी । ती तूं कंठीं घालूनि मिठी ।
प्रेमें धरिसी पोटीं । काढूनि हिंपुटी अनसूये ॥१०६॥
त्वां केला उपदेश । तेणें हर्ष झाला चित्तास ।
पतिसेवेचें हें खास । फळ आम्हांस मिळालें ॥१०७॥
देवांसह तुझें दर्शन । झालें मज न होतां यत्न ।
पावन कीलं हें सदन । आजचा सुदीन अहो भाग्य ॥१०८॥
तूं अससी पूर्ण काम । तथापि कां केला आगम ।
हा मच्चित्ताचा भ्रम । वारी विश्राम घेऊनी ॥१०९॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये द्वितीयोsध्याय: ॥२॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP