श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४ था
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
कृतयुगीं सोमवंशांत । हैहयकुळीं विख्यात ।
जाहला कृतवीर्य जिताहित । धर्मरत सार्वभौम ॥१॥
त्याला शतपुत्र झाले । च्यवनशापें ते मेले ।
राजाला तें दु:ख झालें । राज्य सोडिलें शोकानें ॥२॥
तों एके दिनीं अकस्मात । गुरु येऊनी भेटत ।
राजा पडे दंडवत । खिन्न चित्त होवोनी ॥३॥
राजा ह्मणे हाय हाय । अपुत्र मी करूं काय ।
दैवें देखिले हे पाय । माझा अपाय दुरावेल ॥४॥
गुरु ह्मणे धरीं धैर्य । तुज सांगतों उपाय ।
जेणें घडेल श्रेय । तुझा अन्वय वाढेल ॥५॥
असे एक रविव्रत । सर्व पापा करील शांत ।
देईल सुख अत्यंत । उत्तम सुत देतें जें ॥६॥
हो कां जातिवंध्या नारी । मृतवंध्या होई जरी ।
ती हें व्रत करी तरी । होईंल निर्धारीं सुपुत्र ॥७॥
जीचा गर्भ स्रवेल । किंवा पोटीं धरील सल ।
नवमासांपूर्वीं पडेल । मरोनी उपजेल बालक ॥८॥
उपजतांची शून्य पडेल । किंवा सटवी शिवेल ।
किंवा बाळपणीं मरेल । जड होईल सर्वथा ॥९॥
होई ग्रहभूतरोगार्त । किंवा आकस्मित प्राणांत ।
ऐसे हे दोष समस्त । हें व्रत निवारील ॥१०॥
सप्तमी रविवार दिनीं । पंचांगशुद्धी पाहोनी ।
चंद्र अनुकूल जाणोनी । व्रतारंभ करावा ॥११॥
व्रतसंकल्प करून । करावें पुण्याहवाचन ।
नांदीश्राद्ध करून । आचार्यवरण करावें ॥१२॥
आचार्यें गृहशुद्धी करून । करावें अग्निस्थापन ।
विधीनें कलश मांडून । त्यावरी देवता स्थापाव्या ॥१३॥
सूर्य रुद्र सप्त मातृका । ह्यांच्या स्वर्णप्रतिमा देखा ।
पूजोनी तदुत्तरभागें ऐका । शांत्यर्थ ठेवा सात कलश ॥१४॥
ते विधीनें पूजोन । शांतिसूक्त जपून ।
करोनियां अन्वाधान । करावें हवन विधीनें ॥१५॥
समित्तिल यव पायस । अष्टोत्तरशत प्रत्येकास ।
आहुती द्याव्या होमशेष । बळीदानादि करावें ॥१६॥
पूर्णाहुती करूनी । जीवत्प्रजा सुवासिनी ।
त्यांकरवीं कलशोदकांनीं । अभिषेक करवावा ॥१७॥
दीर्घायु होवो ह्यांचा बाळ । सूर्यादि ग्रहमंडळ ।
त्रिमूर्ती लोकपाळ सकळ । सर्वथा बाळ रक्षोत ॥१८॥
सर्वही रक्षोत अनुदिनीं । बालग्रह भूत अग्नि शनी ।
न पीडोत निशिदिनीं । असें चिंतुनी अभिषेकावें ॥१९॥
स्नान करोनी वस्त्रें तीं । द्यावीं आचार्याचे हातीं ।
सुवासिनी ब्राह्मणाप्रती । यथाशक्ती दक्षिणा द्यावी ॥२०॥
आचार्या द्यावें गोप्रदान । तिलपात्रीं काळमूर्ती पूजोन ।
ती ब्राह्मणा देवोन । ब्राह्मणभोजन करावें ॥२१॥
यथेष्ट वाढावें पायसान्न । दक्षिणा तयां देवून ।
घ्यावें आशीर्वचन । अरिष्टनिरसन होईल ॥२२॥
दीर्घायु होवो बालक । शंभर वर्षें भोगो सुख ।
जें याचें दुरितदु:ख । तें वडावामुखांत पडो ॥२३॥
ब्रह्मा हरिहर षडानन । इंद्र वायु हुताशन ।
करोत अरिष्टानिरसन । विप्रें आशीर्वचन असें द्यावें ॥२४॥
करावें कर्म ईश्वरार्पण । करावें कुटुंबासह भोजन ।
सूर्यप्रसादें अरिष्टनिरसन । होवोनी संतान वाढेल ॥२५॥
असें ऐकोनी गुरुवचन । राजा गुरूस पुजून ।
भक्तिभावेंकरून । व्रताचरण करिता झाला ॥२६॥
मैत्रेयी एके दिनीं । स्वच्छंदें आली राजसदनीं ।
राणी लागे तिचे चरणीं । निवेदून दु:ख आपुलें ॥२७॥
मैत्रेयी म्हणे अनंतव्रत । करी तेणें होईल सुत ।
भूमंडळीं प्रख्यात । गुणवंत समरधीर ॥२८॥
मार्गशीर्ष पौर्णिमेसी । आरंभावें व्रतासी ।
एक वर्ष नियमेंसी । प्रति पूर्णमेसी पूजिजे ॥२९॥
पूर्वीं करोनी स्वस्तिवाचन । विधिवत् व्रत आरंभोन ।
प्रदोषीं पूर्णिमेसी पूजन । कीजे हविष्यान्न वर्षभर ॥३०॥
कामपूरक भगवान् अनंत । हर्षें करितां हें महाव्रत ।
फळ दे सर्वेश्वर अनंत । देवो सुत भद्र दे जो ॥३१॥
असें करावें पूजन । वर्ष होतां संपूर्ण ।
उद्यापन करून । गोप्रदान विप्रा द्यावें ॥३२॥
बारा उदकुंभ देवून । कीजे शक्त्या विप्रभोजन ।
एवं करितां आचरण । पाप शमन होईल ॥३३॥
लोकोत्तर गुणी पुत्र । चक्रवर्ती पवित्र ।
होईल मान्य सर्वत्र । यशस्वी अमित्रदमन दाता ॥३४॥
ब्रह्मवादिनी मैत्रेयी । असें सांगोनी आज्ञा घेई ।
शीलधरा राज्ञी वंदी पायीं । ह्मणे आई लोभ ठेवीं ॥३५॥
मैत्रेयीचें वचन । तें भूपा कळवोन ।
पतीच्या आज्ञें करून । व्रताचरण करितसे ॥३६॥
एक वर्ष हविष्यान्न । ब्रह्मचर्य भूमीं शयन ।
कामक्रोधादि वर्जून । धरी मौन शीलधरा ॥३७॥
तिला दत्ताची उपासना । व्रतीं ठेवी तीच भावना ।
सावरोनियां मना । व्रत संपूर्ण करी यत्नें ॥३८॥
व्रतें श्रीदत्त झाला प्रसन्न । स्वप्नीं निजरूप दाखवून ।
बोले सुहस्यवदन । साधु साधु म्हणोनियां ॥३९॥
अत्युत्कट धर्मफळ । राज्ञी मिळेल तत्काळ ।
तुला पुत्र होईल सबळ । सप्तद्वीपपाळक ॥४०॥
जो अकुंठितगती । स्मरतां देईल भेटी ।
असें बोलोनी भक्तपती । गुप्त होती तत्क्षणीं ॥४१॥
राणी मग उठोन । तें स्वरूप स्मरून ।
अत्यंत हृष्ट होऊन । सांगे स्वप्न राजातें ॥४२॥
कृतवीर्य संतोषला । राणीचे पोटीं गर्भ राहिला ।
उत्तम डोडाळा लागला । रायें केला पूर्ण तो ॥४३॥
केले संस्कार यथाकाळीं । उच्चीं पांच ग्रह जे वेळीं ।
उदित असती ते वेळीं । निशीथकाळीं प्रसवली ॥४४॥
दिशा झाल्या प्रसन्न । मंद वाहे पवन ।
अग्निज्वाला प्रदक्षिण । वाहती गगन स्वच्छ हो ॥४५॥
ब्रह्मांडीं हर्ष झाला । देवीं दुंदुभिनाद केला ।
अप्सरा नाचती सलीला । गंधर्व गाती समरसें ॥४६॥
पुष्पें वर्षती दिविज । बाळाचें फांकलें तेज ।
दीप झाले निस्तेज । वाटे लाज नक्षत्रां ॥४७॥
धर्मीं राहिलें जनाचें मन । सज्जन होती प्रसन्न ।
सिद्ध देती आशीर्वचन । आयुष्यमान् हो म्हणोनी ॥४८॥
राजा बोलावी गणकां । करवी बाळाच्या जातका ।
धन धान्य वस्त्रादिकां । देई लोकां यथायोग्य ॥४९॥
द्विजां दिधलें सुवर्ण । केलें अमित गोदान ।
ज्योतिषी साधूनी लग्न । बोलती वचन सुहर्षें ॥५०॥
दैवशाली हा कुमार । श्रीदत्तात्रेय कृपापात्र ।
तपोबळें पवित्र । होईल सर्वत्र प्रख्यात ॥५१॥
याचें घेतां नाम । नष्ट वस्तूचा आगम ।
स्मरतां करील आगम । निगमागमप्रवीण हो ॥५२॥
सप्तद्वीप महीपती । होईल हा चक्रवर्ती ।
अनंत व्रतें निश्चिती । पंचाशिती सहस्त्र वर्षें ॥५३॥
सूर्यव्रतें रोगरहित । लक्षायु होय निश्चित ।
जितेंद्रिय विजयी संतत । जो संमत सर्वांला ॥५४॥
ऐसें ऐकोन गणकवचन । राजा करी त्यांचें पूजन ।
सोळावे दिवशीं अभिधान । ठेवी अर्जुन सुताचें ॥५५॥
यौवराज्या योग्य अर्जुन । हो तों पिता गेला मरून ।
म्हणती पौर प्रधान । करीं राज्य अर्जुना ॥५६॥
अर्जुन म्हणे नको राज्य । मनापासोन केलें त्याज्य ।
तें जरी हो का पूज्य । अंतीं प्राज्य कष्ट दे ॥५७॥
भूमीचा षष्ठांश । व्यापाराचा द्वादशांश ।
घेवूनी जो प्रजेस । न पाळी प्रजेस न्यायानें ॥५८॥
चोरादिकांपासून । न करी प्रजासंरक्षण ।
न हो हें राज्यलक्षण । नरक दारुण तया अंतीं ॥५९॥
असोनियां समर्थ । अधर्म न वारितां व्यर्थ ।
सांठवी अन्यायें अर्थ । तो धूर्त नरकीं पडेल ॥६०॥
जो नीती सोडूनी । क्रोधलोभ जोडूनी ।
अदंड्यातें दंडूनी । दे सोडूनी दंड्यातें ॥६१॥
तुम्ही म्हणाल हें असें । कळे तरी त्वां वागावें तसें ।
हें तों घडेल कसें । परविश्वासें राज्य करूनी ॥६२॥
जे भृत्य ठेवी भूप । ते करिती जें पाप ।
चतुर्थांशें आपोआप । तें नृपमस्तकीं पडे ॥६३॥
एवं मी एकला । कसें जोडूं साधुफला ।
मग ह्या राजाच्या बोला । ऐकोनि बोलला गर्गमुनी ॥६४॥
अर्जुना तूं धन्य होसी । हें यथार्थ बोलसी ।
जो दोहील भूधेनूसी । तेणें प्रजावत्सासीं पाळावें ॥६५॥
धरितां तीक्ष्ण दंडा । होईल प्रजेला पीडा ।
कीं धरितां मृदु दंडा । तया वेडा करितील ॥६६॥
जसा नातिशीतोष्ण । मनोहर वाटे पवन ।
युक्तदंड तसा जाण । प्रजारंजन करी भूप ॥६७॥
जरी पराव्याच्या विश्वासा । तूं न धरिसी सहसा ।
तरी तूं योगाभ्यासा । करी साध्वसा वारील तो ॥६८॥
योगें नाना देह धरिसी । तूं एकला राज्य करिसी ।
मनोवेगें तूं फिरसी । सर्व जाणशील साक्षित्वें ॥६९॥
अनसूयागर्भरत्न । दत्तत्रेयाभिधान ।
सह्य पर्वतीं आसन । असें जाण जयाचें ॥७०॥
ज्याला म्हणती योगींद्र । यन्नामें सुके भवसमुद्र ।
नित्य जो विनिद्र । ध्याती वितंद्र मुनी ज्यातें ॥७१॥
निस्त्रैगुण्यमार्गें चाले । भक्ता रक्षी योगबळें ।
योगानंदें जो डुले । ज्या देखिलें समदर्शनीं ॥७२॥
महात्मा तो विश्वसाक्षी । सर्वां समान निरीक्षी ।
भजकांचा जो पक्षी । दुष्टां शिक्षी स्वयेंची ॥७३॥
तरी त्या नये विषमत्व । नये ज्याला निर्दयत्व ।
नित्य धरी समत्व । योगी सत्वबळानें ॥७४॥
माता बाळाचें लालन । किंवा करी ताडन ।
तिला निर्दय म्हणोन । दोष कोण ठेवील ॥७५॥
तसें संतांचें पालन । दुष्टां करितां शिक्षण ।
नियंत्या नये दूषण । हें भूषण गुणदोषातीता ॥७६॥
जगद्धाता अत्रिनंदन । तपस्वी योग्यांचें ध्यान ।
जो भक्तां दे इष्टदान । त्याचें आराधन करीं तूं ॥७७॥
जंभ दैत्यें स्वर्गस्थान । हरिलें तेव्हां येऊन ।
इंद्रें केलें आराधन । त्याला स्थान पुन: दिलें ॥७८॥
अद्यापि इंद्र सेवा करी । देवासह नित्य दर्शन करी ।
म्हणोनी नाहीं त्याला सरी । सुखें राज्य करी स्वर्गाचें ॥७९॥
ज्याचें दुष्कर आराधन । दुर्मतीला वाटे कठिण ।
सुमतीला सुकर जाण । जो कारण आत्मभूत ॥८०॥
देहाभिमानी बहिर्मुख । जे न सोडिती विषयसुख ।
न दिसे तयां भगवन्मुख । कैचें सुख मग तयां ॥८१॥
दुर्मतीला तो दूर । भक्तांसमीप निरंतर ।
व्यापक जो योगीश्वर । त्यापासून वर मिळवीं तूं ॥८२॥
ज्याचें नित्य गंगास्नान । माहूरीं करीं शयन ।
सह्याद्रीवरी आसन । करी ध्यान गाणगापुरीं ॥८३॥
कुरुक्षेत्रीं आचमन । धोपेश्वरीं जाऊन ।
करी जो भस्मधारण । संध्यावंदन कर्हाडीं ॥८४॥
कोल्हापुरीं भिक्षाटन । पांचाळेश्वरीं जाऊन ।
नितुय करी भोजन । विचित्राचरण जयाचें ॥८५॥
पंढरपुरीं जाऊन । नित्य सुगंध लेवून ।
पश्चिम सागरीं येऊन । करी अर्घ्यदान सायंकाळीं ॥८६॥
जो जो करील स्मरण । त्या त्या देई दर्शन ।
व्यापिलें जेणें त्रिभुवन । असो नमन तच्चरणा ॥८७॥
ज्याची लीला ऐकोन । तृप्त होती कान मन ।
त्याला कोण कां नमन । न करील जनमान्य जो ॥८८॥
जो मायाध्यक्ष होऊन । करी जग उत्पन्न ।
त्याचें करीं पालन । जो स्वयें उदासीन निगर्व ॥८९॥
ब्रह्मरूपें उत्पादक । विष्णुरूपें पालक ।
रुद्ररूपें संहारक । करी एक तो सर्व ॥९०॥
तो भक्तीचा भुकेला । भक्ताधीन राहिला ।
अंतर न देतां भक्तांला । खेळ भला करी तो ॥९१॥
योग क्षेम भजकाचें । वाहे हें बिरुद त्याचें ।
आगम गाजवी तयाचें । दर्शन करी अर्जुना ॥९२॥
भावें करितां सेवन । तो होईल प्रसन्न ।
ना तरी त्याचें मन । वळवील कोण कसें बा ॥९३॥
त्याणें देतां वरदान । एकला करशील तूं जाण ।
सप्तद्वीप पृथ्वी पालन । स्वेच्छाचरण होवोनी ॥९४॥
तो देईल तुला धृती । तो देईल नाना शक्ती ।
भावें करीं त्याची भक्ती । दे जो सन्मती मुक्तिदाता ॥९५॥
जें जें मनीं आणसी । योगप्रभावें तें मिळविसी ।
मानूनी माझ्या वचनासी । सेवीं दत्तासी सत्वर ॥९६॥
ऐकोन गर्गाचें वचन । वेधलें तत्काळ मन ।
गर्गा करोनी नमन । प्रेमें अर्जुन बोलतसे ॥९७॥
धन्य धन्य तूं मुनी । श्रीदत्ताच्या स्मरणीं ।
योजिलें मजलागोनी । हा मी मानीं अनुग्रह ॥९८॥
सकाम हित दावूनी । माझी वृत्तीं वळवोनी ।
लाविली श्रीदत्तभजनीं । झाला मनीं परम हर्ष ॥९९॥
धन्य धन्य अत्रिमुनी । धन्य अनुसया साजणी ।
परात्मा आणिला ज्याणीं । नामरूपा आश्चर्य हें ॥१००॥
असा जो अत्रिपुत्र । दत्तात्रेय पवित्र ।
ज्याणें घातलें योगसत्र । असे सर्वत्र जो ॥१००॥
ज्याचे ऐकोनी दिनचर्या । मी पावलों आश्चर्या ।
तो कसा भेटला देववर्या । मुनिवर्या हें सांगावें ॥१०२॥
देवेंद्रें जाऊन । कोठें केलें दर्शन ।
कसें केलें आराधन । वळविलें मन केवी त्याचें ॥१०३॥
त्याच्या राज्याचा जंभासुर । कसा करे अपहार ।
असुरांशीं कीं समर । अमरेम्द्रा वर काय दिला ॥१०४॥
हें चरित्र अपूर्व । ऐकावें वाटे सर्व ।
कान पसरूनही शर्व । सोडोनी गर्व नायकेल कीं ॥१०५॥
मी असे श्रद्दधान । माझें करी समाधान ।
दत्तचरित्र पावन । ऐकवा कान भरोनी ॥१०६॥
मग मीही करीन । श्रीदत्ताचें सेवन ।
जेणें होय प्रसन्न । देईल वरदान श्रीदत्त ॥१०७॥
असें बोलतां अर्जुन । गर्ग पावे समाधान ।
बोले उत्तर वचन । चित्तीं चिंतोनि श्रीदत्त ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये चतुर्थोsध्याय: ॥४॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2016
TOP