मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३३ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३३ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे शिष्यासी । परिसूनी गुरुवचनासी ।
राया पुसे भावेंसी । श्रीगुरुसी वंदूनी ॥१॥
अभ्यासाच गुण दोष । म्हणे सांगा नि:शेष ।
जेणें होय विशेष । हा निर्दोश अभ्यास ॥२॥
ऐकून त्याचें वचन । बोले मुनिनंदन ।
भूपा ऐक सावधान । दोष निरूपण करितों ॥३॥
जाणूनी गुणदोष । करितां योगाभ्यास ।
सिद्धी मिळे खास । हा विश्वास धरावा ॥४॥
पीडित अथवा क्षुधित । किंवा व्याकुळ चित्त ।
क्रोधभरें व्याप्त । किंवा अशान्त हो जरी ॥५॥
ह्याणें करितां अभ्यास । उपशम न ये चित्तास ।
तेव्हां वारूनी हे दोष । मग अभ्यास करावा ॥६॥
जवळी असतां दुर्जन । न करावें अभसन ।
विघ्न होय दारुण । यास्तव दुर्जन वर्जावा ॥७॥
होतां अतिशीतकाळ । किंवा अतिउष्णकाळ ।
किंवा अतिवृष्टिकाळ । वर्जावा तो वेळ अभ्यासा ॥८॥
अति वात उठतां । किंवा पुढचें भय कळतां ।
अभ्यासीं न योजावें चित्ता । ध्याना विघड पडेल ॥९॥
अभ्यास न करावा नदीतीरीं । किंवा स्मशानांतरीं ।
शुष्कवृक्षातळीं जरी । करी तरी अनर्थ ये ॥१०॥
आड नसतां जरी । उघड्या जागीं जप करी ।
तरी विघ्न ये निर्धारीं । हें अंतरीं धरावें ॥११॥
हें जरी न मानून । अशा ठायीं बसून ।
मूढ करी अभ्यसन । त्याला व्यसन ओढवेल ॥१२॥
तया स्मृतिलोप होईल । आणि बाधिर्य येईल ।
किंवा मुका होईल । किंवा होईल आंधळा ॥१३॥
किंवा जडात्व येईल । उचकी श्वास उठेल ।
किंवा वायू होईल । किंवा क्षोभेल कफपित्त ॥१४॥
अलर्क म्हणे गुरूसी । जरी मूधपणेंसी ।
केलें असेल्दोषासी । विघ्न तयासी येईल ॥१५॥
तरी त्या दोषावर । काय करावा प्रतिकार ।
ज्याणें दोष जाईल दूर । होईल क्षिप्र आरोग्य ॥१६॥
असा सांगा उपाय । जेणें हटे अपाय ।
असें म्हणोनी पाय । धरी राय गुरूचे ॥१७॥
ऐकोनी त्याची विनंती । श्रीगुरु तयाप्रती ।
प्रेमभरें सांगती । ऐके नृपती एकाग्रें ॥१८॥
भलते ठायीं जरी । योगी अभ्यास करी ।
मग दोष उठती जरी । तरी उपाय हा असे ॥१९॥
अर्धपाव साळीचे तांदूळ । सहापट घालावें जळ ।
मंदाग्नीवरी सुवेळ । पाक करावा ॥२०॥
याला यवागु म्हणती । योगी याला सेविती ।
सर्वदोष घालविती । ही युक्ती बरी असे ॥२१॥
( श्लोक ) यवागू: षड्गुणजले रचिता विरलोदना ॥२२॥
असें युवागूचें लक्षण । वैद्यकीं योग्य असे निरूपण ।
हें उत्तम साधन । प्रत्येका अनुपान भिन्न असे ॥२३॥
हें अनुपान । स्वबुद्धी योजून ।
करितां यवागूसेवन । दोषोपशमन होईल ॥२४॥
उष्ण यवागू घेऊन । त्यांत घृत घालून ।
तें मिश्र करून । त्याचें प्राशन करावें ॥२५॥
यवागू पिऊन । दोषाकडे लक्ष्य देऊन ।
बसावें समाधान । दोषशमन होईल ॥२६॥
ज्या ठायीं वातादिक । तेह्तें चित्त लावावें एक ।
चिंतिता सम्यक् । वातादि जातील ॥२७॥
अंग राहे कांपोन । तरी यवागू पिऊन ।
चित्तीं पर्वत आणून । राहतां कंप नष्ट होईंल ॥२८॥
दोषें अकूं न येतां । कर्णीं लावावें चित्ता ।
मग बाधिर्य जातां । ऐकूं येईल ॥२९॥
जरी बोलूं न येतां । वचनीं चित्त लावितां ।
यवागूनें मूकता । जाई वक्त्रुत्वता ये नरा ॥३०॥
जन्माचे जे दोष । ते न जाती नि:शेष ।
अभ्यासें येती जे दोष । ते नि:शेष जातील ॥३१॥
आपुलें दोषस्थान । बरवें ओळखून ।
यवागू पिऊन । त्या स्थानीं मन लावावें ॥३२॥
अशी धारणा करितां । दोष जाई सर्वथा ।
देहीं दाह होतां । शीतचिंता करावी ॥३३॥
देहीं शीत होतां । सूर्यध्यान करितां ।
परिहरे शीतता । ये उष्णता शरीरीं ॥३४॥
करितां वाताग्निध्यान । भूत जाती पळोन ।
द्यावापृथ्वीचें ध्यान । पळे विघ्न बारा वाटा ॥३५॥
जरी लक्ष्य चुकोन । भलतेकडे जाई प्राण ।
किंवा ब्रह्मरंध्रांतून । न उतरे कांहीं केलिया ॥३६॥
उठतां दोष हे । स्वयें परिहार नोहे ।
जरी तसाची राहे । तरी नोहे बरवें ॥३७॥
सन्निध असे जो जन । त्याणें हें धोरण ।
ठेवून करावा यत्न । प्राण यावया स्थानावरी ॥३८॥
स्निग्धद्रवेंकरून । करावें टाळूचें मर्दन ।
वरी काष्ठ ठेवून । करावें ताडन काष्ठानें ॥३९॥
असें ताडितां हळू हळू । प्रान उतरे तत्काळ ।
न होई व्याकूळ । न हो निर्बळ या उपायें ॥४०॥
अथवा उभय भाग गळ्याचे । लेपन करूनी स्निग्ध द्रव्याचें ।
मर्दन करितां योग्यांचे । प्राण येई जाग्यावर ॥४१॥
अथवा शृंगी घेऊन । दक्षिनकर्णसन्निधान ।
हळू हळू वाजवितां प्राण । येई स्थान लक्षूनी ॥४२॥
हें मळकट शरीर । परी असे मोक्षद्वार ।
त्याच्या रक्षणीं सादर । योगीश्वर राहती ॥४३॥
जरी कां हें शरीर । असे खास नश्वर ।
तरी ध्रुव जें परात्पर । तत्प्राप्तिद्वार हेंच एक ॥४४॥
योगयागादिक । किंवा करणें श्रवणादिक ।
तरी द्वार हें एक । नृशरीर चोख न दुजें ॥४५॥
असें राखून शरीर । अभ्यास करावा सादर ।
मग विघ्न पळे दूर । सिद्धी ये लवकर योगाची ॥४६॥
होतां चित्त प्रसन्न । सुस्वर अग्निदीपन ।
इंद्रियचापल्य जाऊन । होई आरोग्य शरीरीं ॥४७॥
विष्ठामूत्र अल्प होई । अंगीं सुगंध येई ।
दृष्टी स्वच्छ होई । पहिलें लक्षण सिद्धीचें ॥४८॥
शरीर कृश होई । अंतरींझ आनंद होई ।
अंगावरी कांती येई । यें दुसरें लक्षण सिद्धीचें ॥४९॥
शीतोष्णादि न कळती । मनामध्यें न ये भीती ।
दृढ होई स्थिती । हें तिसरें लक्षण सिद्धीचें ॥५०॥
सिद्ध होऊं येतां योग । तेव्हां येती उपसर्ग ।
अभ्यास टाकी योगी मग । करी व्यासंग सिद्धीचा ॥५१॥
जरी सिद्धीकडे फिरे । तरी योग अंतरे ।
मग ध्यान नुरे । व्यर्थ फिरे योगी तो ॥५२॥
अलर्क म्हणे गुरूसी । ते उपसर्ग योगियासी ।
विघ्न करिती ते आम्हांसी । विस्तारेंसी निरोपावे ॥५३॥
श्रीदत्त म्हणे पार्थिवा । उपसर्ग ऐकावे तुवां ।
अभ्यास न आवडे देवा । ते हे उपसर्ग दाविती ॥५४॥
तया उपसर्गाची । योगिया लागतां लालुची ।
रुची उडे योगाची । इच्छा भोगाची उपजे तया ॥५५॥
तया काम्यकर्माची । बरवी लागे रुची ।
आवडी धरी अनुष्ठानाची । देती देव त्यांचीं फळें शीघ्र ॥५६॥
मग तयासी द्रव्याची । बरीच लागे लालुची ।
द्रव्य मिळतां भोगांची । इच्छा साची धरी तो ॥५७॥
देव होती सानुकूळ । द्रव्य देती विपुल ।
सुंदरी होती अनुकूळ । मिळे भोगबळ तेंही ॥५८॥
नाना काम उठती । देव ते ते पुरविती ।
ऐहिक भोग मिळती । मिळती तया दिव्य भोग ॥५९॥
लक्ष्मी मिळे इच्छितां । फळ ये संकल्प करितां ।
विद्या मिळे यत्न न होतां । जय ये हाता अनायासें ॥६०॥
साधे तया इंद्रजाळ । मंत्रजाळ तंत्रजाळ ।
सफळ होई यंत्रजाळ । यश विपुळ मिळे तया ॥६१॥
राज्यही इच्छी मग । देवत्वा करी याग ।
ते सर्व होती सांग । नोहे व्यंग कदापी ॥६२॥
इच्छा होई स्वामित्वाची । आणि रसायनक्रियेची ।
चाड धरी किमयांची । त्याची सिद्धि होत जाय ॥६३॥
मला लोकीं मानावा । मला लोकीं पुजावा ।
मोहें धरी अशा भावा । म्हणे व्हावा लाभ मज ॥६४॥
किंवा तो भोजन । उत्तरोत्तर करी न्यून ।
लोकां दे कळवून । मी अनशन असें की ॥६५॥
इच्छी आकाशगमन । भूत भौतिक वशीकरण ।
इच्छी स्वैर गमन । सर्वांचें मन ओळखाया ॥६६॥
देवतामंत्रसिद्धी । नवीन कर्माची प्रसिद्धी ।
बरीच चालवी बुद्धी । योगसिद्धीबळानें ॥६७॥
भूत भविष्य ज्ञान । सांगून दे वर्तमान ।
लोकीं मिळावा मान । असें मन होतसे ॥६८॥
हें सर्व विघ्न जाण । योगनाशकारण ।
यां देतां सोडून । योगसाधन होतसे ॥६९॥
हे उठती उपसर्ग । जरी मिळती नाना भोग ।
तरी निष्फळ होई योग । तपो भंग होतसे ॥७०॥
जो असेल ज्ञानी । मनी विचार करूनी ।
यांचें भय मनीं । तो ध्यानीं रत होईल ॥७१॥
ईश्वरीं ठेवितां भाव । होई विघ्नांचा अभाव ।
त्याचा प्रवृत्तिस्वभाव । फिरे भावबळानें ॥७२॥
योगसिद्धी हाता येतां । ये वेदशात्रज्ञता ।
करूं येई कविता । शिल्पनिपुणता होतसे ॥७३॥
सर्व येई भासून । ही प्रतिभा म्हणून ।
सिद्धी मानिती योगीजन । हें विघ्न मोठेंच ॥७४॥
होई सर्व शब्दार्थज्ञान । ऐके शब्द दुरोन ।
हिचें नाम श्रवण । योगविघ्न करी सिद्धी हे ॥७५॥
श्रवणसिद्धी होतां । तया दिसती देवता ।
योगविध्वंसता । करी तत्वता सिद्धी हे ॥७६॥
निरालंबें फिरे । पाहिजे तसा वावरे ।
तेणें योग अंतरे । विभ्रमनामक सिद्धी ये ॥७७॥
होई सर्वज्ञान । न खुंटे कोठें मन ।
हें विघ्न दारुण । आवर्तकसंज्ञक सिद्धी हे ॥७८॥
देव ह्या सिद्धी देती । योगी तयां भुलती ।
ते संकटीं पडती । तया गती न होय ॥७९॥
जातां राजदर्शना । पाहतां पदार्थ नाना ।
तेथें रमवितां मना । राजदर्शना मुकती ॥८०॥
येथेंही तेच गती । जे सिद्धी पाहती ।
तेथें जरी भुलती । ते मुकती आत्मदर्शना ॥८१॥
इकडे तिकडे न पाहे । तो न फसे मोहें ।
तो न घे सिद्धीफळ हें । तो पाहे स्वात्मया ॥८२॥
ईश्वरावर भरंवसा । ठेवूनी करितां अभ्यासा ।
तो न फसे तसा । अभक्त जसा फसतो ॥८३॥
अभ्यासें प्रत्याहार । योगियानें साधिल्यावर ।
अभ्यास धारणेवर । वारंवार ठेवावा ॥८४॥
ठेवितां पृथ्वीधारणा । तद्रूप मानी आपणा ।
घेई पंचगुणा । स्थूलपणा सोडूनी ॥८५॥
पादादि जानुपर्यंत । चतुरस्त्र पीत ।
लं बीजानें युक्त । हे योगिसंमत भूधारणा ॥८६॥
जान्वादिनाभिपर्यंत । धनुराकार उदकश्वेत ।
वं बीजानें युक्त । हे योगिसंमत आपधारणा ॥८७॥
नाभ्यादि हृदयपर्यंत । अग्नी त्रिकोण रक्त ।
र बीजानें युक्त । हे संमत अग्निधारणा ॥८८॥
हृदयादि भ्रूमध्यपर्य्म्त । ध्वजाकार धूम्रवात ।
यं बीजानें युक्त । हे संमत वातधारणा ॥८९॥
भूमध्यादि ब्रह्मरंध्रांत । नीलवर्ण आकाशवृत्त ।
हं बीजानें युक्त । हे संमत आकाशधारणा ॥९०॥
ह्या धारणा करितां । योग्या ये सूक्ष्मता ।
मग निर्विकारता । ये सहज योगिया ॥९१॥
ह्या पांच धारणा होतां । मग चंद्रदेवता ।
धारणेनें मना ध्याता । निर्गुणता येतसे ॥९२॥
बृहस्पती जिची देवता । जिला निश्चयात्मता ।
त्या बुद्धीतें चिंतितां । संकल्प विकल्पता न उठे ॥९३॥
ह्या सात धारणा । करितां योगिराणा ।
सोडी सूक्ष्मपणा । विरागपणा पूर्ण ये ॥९४॥
विषयासक्ती जाय । होई योगी जितेंद्रिय ।
सर्व दैव सुखमय । निरामय होय तो ॥९५॥
ह्या करितां धारणा । गंधादिकांच्या वासना ।
नाठविती त्याच्या मना । तो जनाहूनी विलक्षण ॥९६॥
जया गंधादिकांची आसक्ती । तया ये पुनरावृत्ती ।
तया न मिळे गती । योगी सेविती जियेतें ॥९७॥
ह्या धारणा होतां । संगती न करी सर्वथा ।
तयाची वशीकार विरक्तता । निर्विघ्नता सिद्धी घे तो ॥९८॥
ह्या करितां धारणा । मुक्तसंग योगीराणा ।
स्वच्छंदें धरी प्राणा । देव तच्चरणा वंदिती ॥९९॥
तो न होई अहंवादी । मग कैसा अनृतवादी ।
तया ह्मणतील अतिवादी । ब्रम्हानंदीम निमग्न हो ॥१००॥
धारणेनें सौक्ष्म्य कळतां । सहज ये वशता ।
मग ध्यानीं बसतां । त्याच्या चित्ता स्थैर्य ये ॥१०१॥
तयानें जिंकिलें आसन । त्याणेंच जिंकिला प्राण ।
त्याचाच प्रत्याहार सुगुण । ज्याणें केल्या धारणा ह्या ॥१०२॥
म्हणूनी धारणा सात । अभ्यासाव्या सतत ।
सिद्धी त्याचे हस्तगत । होईल स्थितप्रज्ञ तो ॥१०३॥
जरी जिंकेल आसन । स्वाधीन केला पवन ।
तरी सिद्धी पाहून । योगी फसून जातसे ॥१०४॥
विलासी पुरुष जसा । विलासिनीला भुले तसा ।
सिद्धी पाहतां योगी सहसा । भुएल अभ्यासा सोडूनी ॥१०५॥
विश्वामित्रमुनी । जसा मेनका पाहूनी ।
भुलला तसा सिद्धी पाहूनी । योगी भुलोन जातसे ॥१०६॥
तरी सावधान होऊन । सिद्धी द्याव्या सोडून ।
आपलें जें ध्यान । तें साधन अचूक राखावें ॥१०७॥
सिद्धेचें जें फळ । तें असें निष्फल ।
म्हणूनी चित्त करूनी विमल । ध्यानीं निश्चल असावें ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये त्रयस्त्रिंशतितमोsध्याय: ॥३३॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP