श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४३ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
दत्ता वंदितों तुझे चरण । अपराधक्षमापन ।
करीं असें म्हणून । पडे भूमीवरी भूप ॥१॥
म्हणे वेदधर्मा दीपकासी । त्या आयुराजासी ।
चिंता जाहली अशी । होय मानसीं उद्वेग ॥२॥
चार दत्ताचे भक्त । पहिला अर्थी दुजा आर्त ।
तिसरा मुमुक्ष चौथा मुक्त । पुण्यवंत हे सर्व ॥३॥
जरी सुकृत असे पदरीं । तरी भक्ती जोडे ईश्वरीं ।
ना तरी क्षुद्रदेवतांतरीं । भक्ती जडे खास ॥४॥
जै इषुकार लक्ष्यावरी । चित्त ठेवी तयापरी ।
मुक्ताची वृत्ती त्यापरी । ईश्वरीं सादर ॥५॥
सुषुप्त हो कां जरी । लक्ष्य त्याचें ईश्वरीं ।
लक्ष्य न चुके निर्धारीं । त्यापरी न दुज्याचें ॥६॥
अवस्था ही मुक्तांची । अंतर्निष्ठा ईश्वराची ।
जशी जरीं जारिणीची । वृत्ती जडे दृढ ॥७॥
जें मन:पूर्वक । होई तेव्हां तें सम्यक ।
न तसें तें कायिक । न घडे सम्यक केवळ ॥८॥
मुक्त प्राय: अंतर्निष्ठ । जरी होई बहिर्निष्ठ ।
तरी चिदन्वयें स्पष्ट । व्यवहार त्याचा ॥९॥
हा प्राज्ञोत्तम वरिष्ठ । चहूंमाजी श्रेष्ठ ।
त्याहूनी तो कनिष्ठ । मुमुक्षु जो प्रेमळ ॥१०॥
घरीं मन त्याचें न लागे । उदासीनपणें वागे ।
भगवद्भजनीं जागे । तया न लागे विषयगोडी ॥११॥
टाकी काम्य कर्म । करी निष्कामकर्म ।
आदरे भागवतधर्म । सेवी शर्म व्हावया तो ॥१२॥
ईश्वरप्रीत्यर्थ क्रिया । करी भाव ठेवूनियां ।
तिसरा आर्त म्हणोनियां । तो याहूनी कनिष्ठ ॥१३॥
जी विस्तृत आशा संसारीं । ती एकाएकीं भंगे तरी ।
आर्त होय निर्धारी । तो तत्क्षणीं जाण ॥१४॥
किंवा तीव्र पीडा होईं तरी । जरी पुण्य असे पदरीं ।
आर्त भक्ती होय तरी । ईश्वरीं केवळ ॥१५॥
व्हावया ज्ञानिभक्तता । आधीं पाहिजे जिज्ञासुता ।
ही अशी येतां आर्तता । जिज्ञासुता सहज ये ॥१६॥
जो कामार्थी लोकीं । धन स्त्री पुत्रादिकीं ।
दृष्टी ठेवी अविवेकीं । न विलोकी परमार्थ ॥१७॥
तो पुत्रादिक अर्थ इच्छी जरी । पुण्य असतां पदरीं ।
भक्ती जडे ईश्वरीं । ना तरी क्षुद्रदैवतीं ॥१८॥
अर्थ मिळावया जरी । क्षुद्रदेवभक्ती करी ।
भजनासी असे बरोबरी । परी मूढ भुलती ॥१९॥
देवतेचा प्रेरक । फलदाता ईश्वर एक ।
हें न जाणती लोक । म्हणूनी दु:ख पुन: भोगिती ॥२०॥
ईश्वर सर्वही देतो । असें जो जाणतो ।
तो ईश्वरासी भजतो । सुकृती तो अर्थार्थी होय ॥२१॥
जो पापी अर्थाअर्थी । त्याची ईश्वरीं न वळे मती ।
तो शीघ्र फलाची प्राप्ती । इच्छी ती नश्वर ॥२२॥
देवतेपरी ईश्वर । फल न दे सत्वर ।
भजनें पापाचा संहार । होतां वर देतसे तो ॥२३॥
हे पूर्वार्जितानुसार । भक्ती घडे जीणें नर ।
हो कां जरी पामर । तरी सत्वर पावन्हो ॥२४॥
जरी मिळे एखादी भक्ती । तरी नये दुर्गती ।
ती आणि तयावरती । दुर्मती पालटूनी ॥२५॥
जे नानोपाय मुक्तीचे । ते सर्व कष्टाचे ।
सुलभ साधन भक्तीचें । हें सुखाचें साधन ॥२६॥
सुमति मग तो जरी । दैवयोगें पडे तरी ।
ईश्वर खास तयावरी । कृपा करी सर्वथा ॥२७॥
हें महत्व भगवद्भक्तीचें । पतन न होऊं दे भक्ताचें ।
दुर्वर्तन जें पूर्वीचें । तेंही तयाचें पालटी ॥२८॥
दुष्ट वासना ज्या असती । त्याही नष्ट होती ।
उत्तरोत्तर ये शांती । जडे विरक्ती अनुक्रमें ॥२९॥
असें इतर साधन । दीपका नसे जाण ।
पहा हा ऊर्वशीनंदन । पुण्यवान निश्चित ॥३०॥
राजा दंभादि टाकूनी । पुत्रार्थी होऊनी ।
दत्तापाशीं येऊनी । सेवा करूनी राहिला ॥३१॥
त्याचें सर्व पाप जाऊन । पुत्ररूपी अर्थ मिळवून ।
राहतां सुखेंकरून । आर्तपण दैवें ये ॥३२॥
तो पूर्वभक्तयनुसार । आर्त झाला तरी सत्वर ।
दत्तपदीं निर्धार । ठेवी सादर आर्तत्वें ॥३३॥
सकाम भक्ती एकपट । ती आर्त होतां दुप्पट ।
ती करावी तिप्पट । म्हणूनी स्पष्ट देव इच्छी ॥३४॥
शोकें पीडित होऊन । राजा राहिला हें जाणून ।
नारदाप्रती वचन । अत्रिनंदन बोलतसे ॥३५॥
नृपति शोकें व्यापिला । दैवें आर्त भक्त झाला ।
उपदेशूनी तयाला । भला बोध करीं तूं ॥३६॥
तपश्चर्या करून । झाला शुद्धांत:करण ।
आतां बोध घेऊन । मुमुक्षु होऊन राहिला ॥३७॥
असें भगवद्वचन । तें नारद मानून ।
स्कंधीं वीणा घेऊन । हरिभजन करित आला ॥३८॥
मुनी वदे हरिहरी । वीणा वाजवी करीं ।
राजा त्या अवसरीं । नमन करी नारदाला ॥३९॥
नृपति म्हणे स्वागमन । झालें दैवें करून ।
असें म्हणून बसवून । त्याचें पूजन करी तो ॥४०॥
विनयपूर्वक बोले । आजि सुदिन हें आपुलें ।
मला दर्शन झालें । संतपाउलें पूजिलीं ॥४१॥
संतांएवढे उपकारी । नसती ब्रह्मांडोदरीं ।
जे कोमळ अंतरीं । मेघापरी दया वर्षती ॥४२॥
ज्याला वंदितां दैवत । सर्व होती संतृप्त ।
नर जे अज्ञानसुप्त । तयां जागृत करिती जे ॥४३॥
मी ये वेळी दु:खाब्धींत । बुडालों हें श्रीदत्त ।
जाणुनी द्यावया हात । तुम्हां येथें धाडी कीं ॥४४॥
मला दत्तानें पुत्र दिला । तो अकस्मात् नष्ट झाला ।
त्याचा विरहशोक मला । झाला आतां काय करूं ॥४५॥
त्याचें असें तें वचन । हंसे नारद ऐकून ।
म्हणे ज्याचें एकदां स्मरण । करितां भवभंजन होतसे ॥४६॥
राजा माहुरीं तूं राहून । त्या दत्ताचें सेवन ।
शंभरवर्षें करून । अजून शोक करसी कीं ॥४७॥
तो पुत्र गौणात्मा तुला । जरी असता कळला ।
तरी अवकाश या शोकाला । कसा झाला असता रे ॥४८॥
हें आश्चर्य वाटे फार । पुत्रदारादि नश्वर ।
तसेंचें कलेवर । परी नर शाश्वत मानिती ॥४९॥
राजा तुला भ्रम हाची । म्हणूनी गौणात्म्यची ।
चिंता करिसी वायाची । मुख्यात्म्याची वार्ता सोडूनी ॥५०॥
समर्थोक्ती अवधारी । देह घटसा विकारी ।
त्याचा साक्षी तूं अविकारी । जाण अंतरीं अजरामर ॥५१॥
नको व्यर्थ करूं भ्रमण । प्राण इंद्रियें मन ।
बुद्धी अहंकार यांहून । साक्षी तूं आन जाण रे ॥५२॥
देह वधू पुत्रादिक । ज्याला आवडे तो तूं अधिक ।
लोहचुंबकसा चाळक । तूं एक केवळ ॥५३॥
हें देहादिक तुझ्या योगें रे । चेतनसे होती सारे ।
तो तूं ह्या मनाचे फेरे । पाहसी ए स्वस्थपणीं ॥५४॥
अनार्य: स तु विज्ञेयो देहेंद्रियमनोधियां ।
साक्षिणं परमात्मानमसंगं यो न वेत्त्यजं ॥५५॥
बुद्धी प्रलीन होतां । मग ये सुषुप्त्यवस्था ।
तीच बुद्धी जागी होतां । जागृतावस्था दिसतसे ॥५६॥
हा प्रपंच बुद्धिनिष्ठ । तूं तिचा साक्षी स्पष्टे ।
तों अससी अदृष्ट । तुला शोकाकष्ट कसा ये ॥५७॥
मी वांचोनी असावें । हे प्रेम घे स्त्रीपुत्रादिक अवघें ।
जो स्वप्रीत्यर्थ जोडूनि घे । न होई आपण तत्प्रीत्यर्थ ॥५८॥
जो हा पर सर्वांहूनी वेगळा । तो तूं आतां सांगतों तुला ।
सर्वज्ञ म्हणती ज्याला । पाळी लोकांला ईश्वर जो ॥५९॥
प्रति शरीरीं जीवरूपें खेळे । ज्याला जाणतां सर्व कळे ।
जीवा कर्तृत्व ये ज्यामुळें । कर्मफळें देतो जो ॥६०॥
जो तम:कार्या न शिवे । ज्याला स्थूल सूक्ष्म न म्हणवे ।
सर्वानंदाचे ठेवे । जेथें विसावा घेतात ॥६१॥
हेंचि शिव परमात्मरूप । तें मी असे लक्षितां रूप ।
मग दु:ख शोक कामकोप । पाप ताप कोठें रे ॥६२॥
देह ओवळा मिथ्यात्मा । साक्षी सोहळा मुख्यात्मा ।
पुत्र जाण गौण आत्मा । तो दु:खात्मा निरंतर ॥६३॥
हें अद्वैत ज्याला न विदित । त्यांना न होतां सुत ।
दु:ख देई संतत । येतां गर्भात पीडी मग ॥६४॥
तो सुत प्रसूतिसमयीं । मरणप्राय वेदना देई ।
उपजतां चिंता देई । गृहपीडा होईल कीं याला ॥६५॥
व्याधी एकाएकीं येती । तेणें मायबापां ये भीती ।
थोर होता माळी येती । गाळी देती सेजारी ॥६६॥
होतां वयानें थोर । वाटे मूर्ख होईल कीं पोर ।
विद्या न येतां थोर । चिंता घोर वाढवी तो ॥६७॥
वर्षें मोजिती तयाचीं । म्हणती अजूनी याची ।
योजना नोहे विवाहाची । पुढें याची काय गती ॥६८॥
ही शंका थोर वाटे । दैवें विवाह होतां पुढें ।
परस्परांची प्रीती न जडे । चिंता पडे ती मोठी ॥६९॥
ते परस्पर हृष्ट असतां । तया संतती न होतां ।
मग दुसरा विवाह आतां । करावा कीं याचा ॥७०॥
दैवें आपत्काळ येई । संतती बहुत होई ।
तरी चिंता येई । काय सोई निर्वाहाची ॥७१॥
पुत्रात्मैकदृष्टी देऊन । जे राहती जन ।
तया उत्तरोत्तर दारुण । आमरण दु:ख घोर ॥७२॥
प्रसवन झाल्यापासूनी । हा पुत्रशोक अग्नी ।
मायाबापां जितेपणीं । टाकी जाळुनी निश्चयें ॥७३॥
असें संतानसुख जाणून । गौणात्म्याचें प्रेम टाकून ।
मुख्यात्म्या प्रीती धरून । समाधान राहें तूं ॥७४॥
तूं ज्याविषयीं शोक करिसी । हुंडासरें त्या सुताशी ।
शत्रू मानूनी मारावयासी । नेला नगरासी आपुल्या ॥७५॥
तोचि शत्रूच्या हातांतून । दैवयोगें सुटून ।
एका मुनीच्या हातीं मिळून । सुख पावूनी असे तो ॥७६॥
पुढें त्या शत्रूला मारून । विद्यावंत होऊन ।
स्वयें विवाह करून । भेटेल येऊन स्त्रियेसह ॥७७॥
त्या आत्मजाची नको चिंता । तो राज्य करील आतां ।
पुढें इंद्रपदावरता । त्याच देहानें बसेल ॥७८॥
असें नारद सांगोन । गेला त्वरें निघोन ।
राजा समाधान होऊन । बोले वचन प्रियेप्रती ॥७९॥
जो आत्मानात्मविवेक । नारदानें केला सम्यक ।
त्याचा करूनी विवेक । सर्व शोक टाकी तूं ॥८०॥
कोण नंदन कोणाचा । कासया मोह वायांचा ।
तोडी पाश स्नेहाचा । मग होय मनाचा उपशम ॥८१॥
मी प्रयन्त करून । श्रीदत्ता केलें प्रसन्न ।
माग म्हणतां वरदान । पुत्रावांचून न मागें मी ॥८२॥
मग एकची वरदान । मागतां दत्त दे सुचवून ।
शोक देईल नंदन । हें उमजून घेतलें ॥८३॥
माझा वंश वाढावा म्हणून । कपाळांत वेड भरून ।
व्यर्थ गेलों फसून । आतां उमजून आलें तें ॥८४॥
वदे वेद परोक्ष जें । तें मूढां न उमजे ।
तें भलतेंच समजे । मग होईजे तो अनर्थ ॥८५॥
नारद बोलिला जें वचन । तें आलें उमजोन ।
जें केलें दत्ताचें सेवन । फळ जाण त्याचेंहें ॥८६॥
तपो यज्ञ जप दान । करितांही न दे दर्शन ।
जो भक्तिगम्य अत्रिनंदन । मला दर्शन दे तो ॥८७॥
त्याचा एवढा हा उपकार । असें बोले नरेश्वर ।
तें ऐकतांचि सत्वर । राणीचें अंतर द्रवलें ॥८८॥
राणी वंदून दत्तासी । प्रेमें दाटूनी मानसीं ।
म्हणे प्रिया या वचनासी । मृतसंजीवन मानी मी ॥८९॥
सर्ववेदसारभूत । तें नारदाचें भाषित ।
ऐकतां माझें मन शांत । होऊनी निवांत राहिलें ॥९०॥
त्या श्रीदत्तें कृपा केली । म्हणूनी नारदाची फेरी झाली ।
मनाची भ्रांती फिटली । भक्ती जडली दत्तपदीं ॥९१॥
जय भगवंता दत्ता । पुरुषोत्तमा अनंता ।
अधोक्षजा तूंचि कर्ता । भर्ता संहर्ता विभु तूं ॥९२॥
गुणद्रव्यक्रियात्मक । भाससी तूं ज्ञानशक्तिक ।
नानारूपनायक । मायीकसा दीससी तूं ॥९३॥
तूं शड्कर संहारक । तूं ब्रह्मांड उत्पादक ।
तूं विष्णू जगत्पालक । तूंचि एक अनेक होसी ॥९४॥
अपर्णेश्वरा लक्ष्मीवरा । सावित्रीहृदयसंचारा ।
तुज नमो सर्वाधारा । परात्परा सगुणरूपा ॥९५॥
मायाभि: पुरुरुपस्त्वं प्रतिरूपो विभासि यत् ।
रूपं रूपं स्वभक्तानामुद्धारायेंद्र ते क्रिया ॥९६॥
मोह शृंखला माझी तोडी । हे देह खोडी मोडी ।
कामादि पायिकां दवडी । लावी गोडी त्वद्भजनाची ॥९७॥
मी नेणुनी त्वत्पद । केले हे नाना फंद ।
आतां त्वद्भजनस्वाद । देऊनी भेद दवडी माझा ॥९८॥
विषया इच्छितां विषय देशीं । मुमुक्षूला मोक्ष देशी ।
मुक्ता स्वपदीं रमविशीं । तूं भाससी चिंत्तामनीसा ॥९९॥
तूंची मम सद्गती । अशी प्रार्थी इंदुमती ।
मग हात जोडूनी नृपती । दत्ता प्रार्थी सप्रेम ॥१००॥
देव देवा दत्ता । तव पदीं चित्ता ।
ठरवी विश्वनाथा कथा गातां ॥१०१॥
माझी वाणी गूण तुझे वाखाणून ।
रमो हेंचि धन दान दे गा ॥१०२॥
तुझ्या भजकांची सेवा करो कर ।
हाची देइं वर वरदेशा ॥१०३॥
मन द्रवो माझें गुण गातां तुझे ।
उतरे कर्मओझें माझें जेणें ॥१०४॥
सकम्प रोमांच अंगीं व्हावे उंच ।
न दिसावें उच्च - नीच कोठें ॥१०५॥
जेवी श्येन जाळें तोडोनियां पळें ।
तसें भवजाळें बळें तोडावी हें ॥१०६॥
आतां माझा भाव तव पदीं ठाव ।
घेवो हें वैभव नित्य असो ॥१०७॥
असा क्षमापति सादर । दत्ता स्तवी वारंवार ।
राहे तो संसारसागर । गोष्पदाकार मानूनी ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये त्रिचत्वारिंशोsध्याय: ॥४३॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2016
TOP