मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३ रा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३ रा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्त ॥ गुरु म्हणे शिष्या परीस । सतीप्रश्न ऐकोनी सुरस ।
अनसूया पाहूनी देवांस । म्हणे सतीस तेधवां ॥१॥
हे देव आले तव सदनीं । सूर्योदय व्हावा म्हणोनी ।
हेंच मागती विनवूनी । मीही मनीं तेंचि आणीं ॥२॥
सूर्य न दिसतां कालोच्छेद्र । कालोच्छेदें कर्मोच्छेद ।
कर्मोच्छेदें लोकोच्छेद । होई स्वच्छंद सत्वर ॥३॥
तेव्हां साध्वी किमर्थ । करावा असा हा अनर्थ ।
आग्रह करूं नको व्यर्थ । गेलिया परार्थ देहही ॥४॥
सती म्हणे अनसूये ऐक । काय सांगती हा विवेक ।
जेणें मजला घडेल शोक । महादु:ख ओढवेल ॥५॥
मांडव्यशाप दारुण । पती केवळ माझा प्राण ।
सूर्योदयें पावेल मरण । हें तों कठिण नेणसी कीं ॥६॥
अनसूया म्हणे गे सती । जरी मरे तुझा पती ।
तत्क्षणीं वांचवीन सुमती । नको खंती करूं त्याची ॥७॥
तुझा पति नि:शंक । निरोगी होऊनी उठेल ऐक ।
मनीं आणूं नको दु:ख । देतें भाक त्रिवाचे ॥८॥
असें अनसूयेचें वचन । तिनें तें अंगिकारून ।
तथास्तु ऐसें म्हणून । केलें नमन आदित्या ॥९॥
जय सूर्या तूं तेजोराशीं । समर्थ असोनी मर्यादेशीं ।
न टाळसी तूं पाळसी । मद्वाक्यासी विश्वकर्त्या ॥१०॥
माझें वाक्य म्यां घेतलें परत । त्वां शीघ्र व्हावें उदित ।
असें तिणें वदतां त्वरित । आदित्य उदित जाहला ॥११॥
जिच्या वानें झाला लीन । तिच्या वचनें तोचि तपन ।
तत्काळ उदया पावोन । हें त्रिभुवन सुखी करी ॥१२॥
चिरकाळ प्रवास करून । निजपती येतां देखोन ।
करी वदन सुप्रसन्न । कमळिणी प्रसन्न तेंवी हो ती ॥१३॥
सूर्य उदित होवोन । तत्काळ करी कृत्यें दोन ।
नि:शेष अंधकारहरण । विप्रप्राणशोषणहि ॥१४॥
सतीचें म्लान मुख देखून । अनसूया वदे प्रौढ वचन ।
नको भिवूं हो सावधान । माझें वचन आठवोनी ॥१५॥
जरी मी अनन्य भक्तीनें । देह झिजविला पतिसेवेनें ।
जरी काया वाचा मनें । धर्मानें सेविला निजपती ॥१६॥
पतीहूनी परदैवत । दुसरें स्वप्नींही नेणत ।
साध्वीधर्म संतत । जरी यथार्थ घडला ॥१७॥
त्या धर्माच्या लेशेंकरून । ब्राह्मणा मिळो पुन: जीवन ।
निरोगपणें उठोन । वांचो हा शत वर्षें ॥१८॥
कोठेंही ह्याचें मन । गेलें असेल निघोन ।
त्याचें होवो आवर्तन । देई जीवन असुनी ते ॥१९॥
ऐसें बोलतां अनसूया । विप्र सजीव होवोनियां ।
बैसला स्वयें उठोनियां । त्याची भार्या हर्षली ॥२०॥
बाह्यांतर्भाव पालटला । विप्र तो देवसा भासला ।
आनंद झाला सर्वांला । पुष्पें वर्षती सुरवर ॥२१॥
सर्व देव वंदन करिती । अप्सरा हर्षें नाचती ।
गंधर्व तेही प्रेमें गाती । करिती ख्याती अनसूयेची ॥२२॥
जयजय सतीवर्ये वेदगेयेsत्रिभार्ये । जय निजवृषवीर्ये भर्तृंसेवासुचर्ये ।
जयजय कृतकार्ये दर्शितत्रस्तसूर्ये । सततनिहतधैर्ये ते नमो मातरार्ये ॥२३॥
देव म्हणती अनसूयेसी । त्वां वांचविलें विश्वासी ।
केलें अघटित कार्यासी । यश आम्हांसी समर्पिलें ॥२४॥
आम्ही झालों प्रसन्न । तुला देतों वरदान ।
अनसूया वदे वंदून । काय मागोन घेऊं मी ॥२५॥
स्वधर्में मी कृतार्थ आतां । जरी तुम्ही वर देतां ।
तरी हेंचि मागतें आतां । यावत् जीव असो पतीयोग ॥२६॥
ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । हे व्हावे माझे पुत्र ।
याहूनि न इच्छीं इह परत्र । न जाई अन्यत्र मन माझें ॥२७॥
देव म्हणती हे दिले वर । पुत्र होतील विधिहरिहर ।
करितील जागाचा उद्धार । धरी निर्धार अनसूये ॥२८॥
ऐसा देव वर देती । आज्ञा घेवोनी स्वर्गा जाती ।
अत्रीसवें अनसूया सती । आश्रमाप्रती पावली ॥२९॥
त्या रायें मांडव्या जाणोनी । उतरला सुळावरोनी ।
प्रार्थिला शांतवचनीं । तो यमसदनीं पातला ॥३०॥
यमाप्रती येवोनी तो । म्हणे दिक्पालांशें राजा होतों ।
राजा जो दंड करितो । करितो दंड दिक्पाल ॥३१॥
त्वां कां मातें सुळावर । चढविलें बोल सत्वर ।
यम बोले तूं असतां कुमार । कंटकें पक्षी वेधिला ॥३२॥
त्या पापाचा परिपाक । शूलारोहण नि:शंक ।
येरू बोले हा अविवेक । लागे पातक पितयातें ॥३३॥
धर्मा तुझा हा अधर्म । दासीपोटीं घेसी जन्म ।
मग विदुर झाला यम । तेव्हाम अर्यम दंड धरी ॥३४॥
असो आतां ऐक शिष्या । त्रिमूर्ती देववरा मानुनियां ।
अनसूयेच्या उदरीं येवोनियां । गर्भरूपें वाढती ॥३५॥
ज्यांच्या स्मरणें तुटे फांस । त्यासी कैंचा गर्भवास ।
अज असोनी दाविती खास । भक्ताधीनत्व या लोकीं ॥३६॥
अनसूये डोहळे होती । उत्तम ज्ञान बोले ती ।
ऐसे नवमास लोटती । करी संस्कार अत्रीमुनी ॥३७॥
मार्गशीर्ष पौर्णिमेसी । बुधवारीं प्रदोषसमयासी ।
मृग नक्षत्रीं शुभ दिवशीं । अनसूयेसी पुत्र झाले ॥३८॥
तव अत्रिऋषी येऊन । पाहीन म्हणे पुत्रवदन ।
तों अकस्मात् त्रिमूर्ती पाहून । विस्मित मन जाहला ॥३९॥
माला कमंडलु अध:करीं । डमरू त्रिशूल मध्यकरीं ।
शंखचक्र ऊर्ध्वंकरीं धरी । भक्तकैवारी त्रिमूर्त्यात्मक ॥४०॥
काषायवस्त्र परिधान । विभूतीचें लेपन ।
मस्तकीं जटामंडन । वातसल्यरसायन धाम जें ॥४१॥
तें दिव्यरूप पाहून । करसंपुट जोडून ।
अनसूया अत्रि वंदून । करिती स्तवन सद्गद ॥४२॥
जयजया परात्परा । अजा अव्यया निर्विकारा ।
जगत्कारणा जगदाधारा । सत्या असंगा उदासीना ॥४३॥
सावकाश ज्याच्या पोटीं । परिभ्रमती ब्रह्मांडकोटी ।
तो तूं व्यापक आमुचे पोटीं । येसी हे खोटी गोष्ट होय ॥४४॥
सृष्टीपूर्वीं तूं एक सत्य । स्थितिकालींही न होसी असत्य ।
प्रळयीं निर्बाधत्वें सत्य । त्वद्वचन असत्य होय कीं ॥४५॥
निज बिरुदावळी पाळिसी । वासनावन जाळिसी ।
भक्तजनां संभाळिसी । आळसी न होसी भक्तकाजीं ॥४६॥
स्वयें असोनी स्वतंत्र । भावाच्या भुकेनें होसी परतंत्र ।
कोण जाणे तुझा मंत्र । भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व ॥४७॥
ह्या रूपा आमुचा नंदन । म्हणणें हें जगीं विडंबन ।
म्हणूनि तूं बाल होऊन । राहतां मन हर्षेल ॥४८॥
पुत्रभावेंकरून । तुझें करितां लालन पालन ।
जाईल आमुचें मायावरण । म्हणोनी चरण धरियेले ॥४९॥
मग बोले वनमाळी । तुम्हीं तप केलें कुलाचळीं ।
तीन स्वरूपीं त्या वेळीं । तुम्हां दर्शन दीधलें ॥५०॥
एकाचें करितां ध्यान । तुम्ही आलेंत कोण तीन ।
ऐसें तुम्हीं पुसतां दिलें वचन । आम्ही तीन एकरूप ॥५१॥
पुढें अतिथी होऊन । जसें मागितलें भिक्षादान ।
त्सेंच देतां नग्न होऊन । अनसूयेपुधें तीन बाळ झालों ॥५२॥
आमच्या शक्त्या येऊन । आम्हां मागती प्रार्थना करून ।
तेव्हां हा पाळणा न व्हावा शून्य । म्हणोनि वरदान मागितलें ॥५३॥
तसाच वर देऊन । शक्तींसह केलें गमन ।
निजभक्त देवगण । त्यांहीं वरदान तुम्हां दिलें ॥५४॥
तें सर्व सत्य करावया । पूर्व वरा स्मरावया ।
लोकीं भक्तिख्याती व्हावया । प्रगट केलें ह्या दिव्यरूपा ॥५५॥
तुमचा भाव पाहोन । तुम्हां दिलें म्यां माझें दान ।
राहीन तुमच्या स्वाधीन । देतों वचन त्रिवार ॥५६॥
माझें दर्शन न हो निष्फळ । जें गती दे तत्काळ ।
असें म्हणोनि तीन बाळ । झाला घननीळ विश्वनाटकी ॥५७॥
मग अत्रि करी स्नान । करे जातकर्मविधान ।
मिळोनियां मुनिजन । जयजयकार करिती ॥५८॥
पुष्पें वर्षती सुरवर । वारा चाले मनोहर ।
जगीं आनंद होय थोर । परात्पर अवतरतां ॥५९॥
वांझ वृक्ष झाले सफळ । वंध्येपोटीं आलें बाळ ।
पळोनि गेला दुष्काळ । अवतरतां मूळ पुरुष हा ॥६०॥
अनसूया धन्य पतिव्रता । विधिहरिहरांची झाली माता ।
जिचें स्तनपान करितां । ये तृप्ता त्रिमूर्तीला ॥६१॥
बारावे दिनीं अत्रिमुनीं । नामकर्म करोनी ।
अन्वर्थक नामें तिन्ही । तयांचीं ठेविलीं प्रेमानें ॥६२॥
ज्यानें केलें स्वात्मदान । त्याचें दत्त हें अभिधान ।
सर्वां देई आल्हादन । म्हणोनि चंद्राभिधान ब्रह्मांशा ॥६३॥
दुर्वासा नाम रुद्रांशा दे । मग अनसूया आनंदें ।
पाळणा बांधूनी स्वच्छंदें । बाळा निजवूनी गातसे ॥६४॥
( पाळणा ) ॥ जो जो जो जो रे परात्परा ॥ भजकांच्या माहेरा ॥ध्रु०॥
सह्याद्रीवरि जो । अत्रिसुत । अनसूया जठरांत ।
प्रगटुनि विख्यात । हो दत्त ॥ तारिल जो निजभक्त ।
जय जगदुद्धारा । उदारा ॥ भजकांच्या माहेरा ॥ जो जो जो जो रे ॥६५॥
प्रर्‍हादा देशी । विज्ञान । येतां अर्जुन शरण ।
सिद्धी देऊन । उद्धरून । स्वपदीं देशी स्थान ॥
अलर्क यदुतारा । योगिवरा । भजकांच्या माहेरा ॥ जो जो जो जो रे ॥२॥६६॥
( पाळणा ॥२॥ ) जोजो रे जोजो जयविश्वात्मन् ।
परावर भूमन् । जयजय जय भगवन् ॥ध्रु०॥
चारभूत खाणी । पाळणा बांधोनी । चोवीस तत्वें । दृढतर ओंवोनी ॥६७॥
गुणसोसोत्रें माया । स्तंभीं बांधुनीयां ।
कर्मदोरी धरूनी । झोंके घेसी वायां ॥६८॥
चाळाचाळी टाकूनी । श्रुतिगीत ऐकूनी ।
घे झोंप उन्मनी । स्वानुभवें करूनी ॥६९॥
( पाळणा संपूर्ण ) ॥ जो सृष्टिस्थिति संहार करितीं । तयास पाळण्यांत निजवी सती ।
स्वकरें पुन: पुन: झोंके देती । काय गती भक्तीची हो ॥७०॥
जे त्रैलोक्याचे पालक । त्यांला लागली भूक ।
अनसूयेपुढें करती शोक । भावाची भूक असी असे ॥७१॥
दोघां लावी दोन स्तनीं । तिसरा रडे आक्रंदोनी ।
तया कृपादृष्ट्यमृतपानीं । थोरवी साजणी अनसूया ॥७२॥
यज्ञ याग जयाला । अद्यापि न देती तृप्तीला ।
सती स्तनपानें तयाला । ढेंकर आला तृप्तीचा ॥७३॥
ऐहिक जे भोग मिळती । तीं भक्तीचीं फळें न होती ।
जी मिळे सायुज्य गती । अवांतर स्थिति ती केवळ ॥७४॥
नि:सीम प्रेम म्हणों भक्तींचें फळ । तरी लालनादिकांचें काय फळ ।
म्हणों जरी उद्धरील पितृकुळ । हेंही निष्फळ बोलणें ॥७५॥
स्वयें पिता पितामह झाले बाळ । तेथें कैचें पूर्वजकुळ ।
तरी हा केवळ विशाळ । ज्याचा खेळ तो जाणो ॥७६॥
चंद्र तो करोनि वंदन । चंद्रमंडळीं राहिला जावून ।
ओषधींला देई जीवन । वाढलें संतान तेथें ज्याचें ॥७७॥
दुर्वासाही उद्धत । स्वच्छंदें जगीं धुंडत ।
जे असती दुर्वृत्त । करी सद्वृत्त तयांतें ॥७८॥
निघोन जातां दोघे सुत । दु:ख्ही झालें अनसूयेचें चित्त ।
तेव्हां पुढें येऊनी श्रीदत्त । पूर्व वृत्तांत स्मरें म्हणे ॥७९॥
मग स्मरतां वृत्तांत । तव त्रिमूर्ति दिसे दत्त ।
सवेंचि विश्वरूप दिसत । झाली चकिते अनसूया ॥८०॥
सवेंचि बाळ होऊन । योगमाया पसरून ।
तीतें मोहित करून । अंकीं बैसोनी स्तन्य पिये ॥८१॥
आप्तकामही असून । योगमाया पसरून ।
बालभाव धरून । करी क्रीडन कौतुकें ॥८२॥
बोलोनि बोबडे बोल । मुग्ध चेष्टा करी केवळ ।
मुक्या करी जो वाचाळ । त्याचा खेळ काय हा ॥८३॥
जो वागवी पांगुळा । तो अडखळे वेळोवेळां ।
विश्वाधार तो अनसूयेच्या गळां । मिठी घाली लवलाहें ॥८४॥
ज्या ज्या बाळलीला सकळ । दावी मातेसी करून खेळ ।
जमवूनी मुनींचे बाळ । सवयें खेळे त्यांसवें ॥८५॥
अनसूया बोलावी भोजनार्थ । न ये गुंतूनी क्रीडार्थ ।
माता धरावया येत । धुडुधुडु धांवत जातसे ॥८६॥
माता पाठी लागतां । योग्यां अगम्य तो न ये हाता ।
तिची देखोनी श्रांतता । तिच्या हातीं येई स्वयें ॥८७॥
ब्रह्मांडें ज्याचे उदरीं । त्याला धरी कमरेवरी ।
न्हाणूनि बैसवितां मंदिरीं । मृतिका शरीरीं माखी दत्त ॥८८॥
दाखवूनि नाना लीला । हर्ष देई मातापितरांला ।
भक्तवशता दावी जगताला । जो एकला असंग ॥८९॥
आठ वर्षें होतां व्रतबंध । अत्रि करी विद्याबोध ।
शास्त्रयोनि जो निर्बाध । लीला अगाध तयाची ॥९०॥
कौपीनादिक टाकून । स्मशानीं जावूनि बैसे नग्न ।
नासाग्रदृष्टि ध्याननिमग्न । यत्पदसंलग्न होती योगी ॥९१॥
पिंगल नाग आणि साध्यदेव । रूप पाहतां अपूर्व ।
प्रश्न करिती सगर्व । पाहूनी खर्वमूर्ती ते ॥९२॥
त्यांतें सदुपदेश करून । दिधलें योगपूर्वक ज्ञान ।
त्या दिवसापासून । प्रसिद्धि झाली श्रीदत्ताची ॥९३॥
दुष्टशिक्षक शिष्टपाळक । योगमार्गप्रवर्तक ।
जाणूनि येती मुनीबाळक । विश्वचालक काय करी ॥९४॥
तत्परीक्षार्थ त्या वेळीं । श्रीदत्त बुडे अगाध जळीं ।
भिवूनि पळती त्या काळीं । कित्येक मंडळी सत्वर ॥९५॥
तो मानूनि खेळ । तेथें राहिले कित्येक बाळ ।
त्यांची परीक्षा करावया केवळ । भलता खेळ आरंभी ॥९६॥
एक नग्न स्त्री घेऊन । श्रीदत्त तीरीं येवून ।
स्वयें नग्न होवून । क्रीडा करूनि राहिला ॥९७॥
स्वाश्रया जी स्वविषया । नारी झाली ती आदिमाया ।
ती अंकीं बैसोनियां । वाद्यें वाजवोनियां गातसे ॥९८॥
तीतें करवोनियां पान । शक्तीचें उच्छिष्ट घेई आपण ।
तिला देइ वीर चर्वण । बाळ पाहोनी पळाले ॥९९॥
तेजीयसां नाहीं दोष । ह्मणोनि राहिले जे शेष ।
त्यावरी करूनि तोष । योग सविशेष सांगीतला ॥१००॥
ईश्वर करी साहस । धर्मव्यतिक्रम खास ।
तेजीयस्त्वामुळें नाहीं दोष । अग्नि निर्दोष ज्यापरी ॥१०१॥
ऐश्वर सामर्थ्य नसोन । मूढ एवढा घेई गुण ।
तो नष्ट होई न लागतां क्षण । कर्म दारुण गती दे ॥१०२॥
धर्मातीत वागे हर । तो गुण घेती पामर ।
काळकूट जिरवी शंकर ।  मरे पामर त्या शिवतां ॥१०३॥
ईश आणि गुणातीत । धर्माधर्मविवर्जित ।
श्रुतीमस्तकीं राहतात । ते वायुवत् निर्दोषी ॥१०४॥
त्यांचीं आचरणें प्राय: न घ्यावीं । वचनें मात्र न टालावीं ।
दोन्हीशीं योग्य तीं पाळावीं । सांभाळावीं धर्मार्ह ॥१०५॥
त्यांचीं सुचरितें घ्यावीं । असी बोले श्रुति बरवी ।
त्याचे सरीस ये न रवी । नर वीर्यहीन कायसा ॥१०६॥
काय सारिखा दिसला तरी । ज्ञानी अज्ञानी यांची न हो सरी ।
हें जाणिजे सूज्ञ चतुरीं । कुतर्क करी तो मूर्ख ॥१०७॥
असो असें बीभत्सही पाहून । सर्व कष्ट सोसून ।
टिकला कार्तवीर्य अर्जुन । योगज्ञान लाभला ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये श्रीदत्तावतारकथनं नाम तृतीयोsध्याय: ॥३॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP