श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३१ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे दीपकासी । पराजय होतां अलर्कासी ।
विषम लागलें मनासी । म्हणे वनासी आतां जावें ॥१॥
असें त्याचें मन । सुबाहू ओळखून ।
म्हणे अलर्क जातां निघून । कोणीं रोखून न ठेवावा ॥२॥
असें सर्वां सांगून । मार्ग ठेवी खुलोन ।
रात्रौ अश्वावरी बसून । अलर्क निघून चालिला ॥३॥
चिंताग्रस्त होऊन । वनीं एकला जाऊन ।
एक आश्रम पाहून । तेथें जाऊन बैसला ॥४॥
सुख आठवून चित्तीं । नानापरी करी खंती ।
म्हणे प्रारब्धाची गती । येथें मती खुंटली ॥५॥
असें म्हणोनि भूप । करीतसे विलाप ।
म्हणे हें कैचें पाप । जें दे ताप अत्यंत ॥६॥
माझी माता असती । तरी ऐसी हे स्थिती ।
मला कदापि न येती । आतां गती काय पुढें ॥७॥
आठवितां मातेसी । स्मरण झालें त्यासी ।
म्हणे जातां वनासी । या भविष्यासी जाणे माता ॥८॥
तिनें दिली खूण । त्याची झाली आठवण ।
आतां प्रात:काळीं न्हाऊन । तें पाहीन लिखित मी ॥९॥
असा विचार करून । म्हणे कां सूर्य अजून ।
मला नये दिसून । रात्रीमान किती हें ॥१०॥
अशी चिंता करितां । उदया आला सविता ।
राजा झाला आठविता । तेव्हां माताचरणातें ॥११॥
करूनी प्रात:स्नान । केलें पेटीचें पूजन ।
पत्र बाहेर काढून । पाहे वाचून अलर्क ॥१२॥
( श्लोक ) त्याज्य: सर्वात्मना संग: स चेत्त्यक्तुं न शक्यते ।
सद्भि: सहू स कर्तव्य: संतो दु:संगभेषजं ॥१३॥
काम: सर्वात्मना हेयो हातुं चेच्छक्यते न स: ।
मुमुक्षां प्रति कर्तव्य: सैव कामार्तिभेषजं ॥१४॥
संग सोडावा सर्वथा । हें न घडे तत्वता ।
तरी साधूचा संग धरितां । भवव्यथा नासेल ॥१५॥
टाकावा सर्वथा काम । हें न करवे जरी काम ।
मुमुक्षेचा करावा काम । मिळेल धाम अनायासें ॥१६॥
असें मातेचें लिखित । वाचूनी जाणिलें हृद्गत ।
म्हणे कोठें वसे संत । मला विदित नसेची ॥१७॥
त्या आश्रमीं जाऊन । एका ऋषीला वंदून ।
म्हणे अलर्क कर जोडून । संत दाखवून द्यावा मला ॥१८॥
मी त्याला सेवून । माझें दु:ख घालवीन ।
असें त्याचें वचन । ऋषी ऐकून बोलतसे ॥१९॥
म्हणे दक्षिणेसी सह्यगिरी । श्रीदत्त राहती त्यावरी ।
तूं त्यांचें दर्शन करी । कृपा तुजवरी करितील ॥२०॥
प्रसिद्ध जें मातापुर । तेथें रेणुकाश्रम सुंदर ।
असे त्याचे समोर । गिरिशिखर श्रीदत्ताचें ॥२१॥
अनसूयेचा सुत । नाम ज्याचे श्रीदत्त ।
योगियांचें दैवत । ज्याला संत वंदिती ॥२२॥
घेतां त्यांचें दर्शन । होईल भवभंजन ।
ऐकतां असें वचन । अलर्काचें मन द्रवलें ॥२३॥
अलर्क त्वरित निघाला । सह्याचळीं पातला ।
श्रीदत्ताश्रम देखिला । तेथें चालिला एकला तो ॥२४॥
आश्रमीं जाऊन । श्रीदत्ता पाहून ।
भावें नमन करून । करी प्रश्न भूपती ॥२५॥
म्हणे जी भक्तवत्सला । अपार दु:ख झालें मला ।
अनुग्रह होतां आपुला । मी कुशला पावेन ॥२६॥
आपुली होतां कृपादृष्टी । दु:ख राहील कीं पोटीं ।
म्हणूनी काढी हिंपुटी । म्हणे शेवटीं हेच पाय ॥२७॥
त्याचें वचन ऐकून । मनीं म्हणे अत्रिनंदन ।
हें मदलसागर्भरत्न । येथें यत्न नलगेची ॥२८॥
असें मनीं चिंतून । श्रीदत्त बोले हंसून ।
म्हणे दे दाखवून । दु:खस्थान मज आतां ॥२९॥
दु:खाचें स्थान सांग । तयावरी देऊं डाग ।
आधीं तूं कोण सांग । वारूं मग दु:ख तुझें ॥३०॥
असें वचन ऐकूनी । झाला विवेकी तत्क्षणीं ।
पाहे विचार करूनी । नृप मनीं मी कोण हें ॥३१॥
म्हणे हा स्थूल देह जड । यासीं भुतांची सांगड ।
नाना विकारांची धाड । पडे यावरी निर्धारें ॥३२॥
आत्मा सर्वगत पूर्ण । हा दिसे परिच्छिन्न ।
हा मी चिदात्मा त्याहून । असें भिन्न सद्रूपीं ॥३३॥
बळें इंद्रियां चाळवी । झोंपेमाजी जाड्या दावी ।
मी तो प्राण होईन केंवी । साक्षीभूत असून ॥३४॥
क्षणोक्षणीं मन जाई । हा मी विभु राहें ठायीं ।
त्याचा संशय न येई । माझ्या डोईवरी खास ॥३५॥
देहा व्यापी जागेपणीं । झोंपेमाजी जाई जी लपोनी ।
ती बुद्धि विज्ञान म्हणोनी । माझ्याहूनी भिन्न असे ॥३६॥
त्रिगुणी जड अहंकार । मी तयाहून पर ।
शुद्ध बुद्ध मी अमर । नर नोहें सर्वथा ॥३७॥
असा मी माझा केला निर्धार । आतां करूं दु:खाचा विचार ।
होऊनिया सादर । जेणें दर दुरावेल ॥३८॥
नखापासूनी केशांत । ह्या देहाच्या बाहेर आंत ।
शोधितां न दिसे दु:ख येथ । त्याचें आंत पाहावें ॥३९॥
प्राण भुके तान्हेविणें । असें दु:ख कधीं नेणें ।
इंद्रियें भृत्यपणें । माझ्या सत्तेनें वावरती ॥४०॥
रागद्वेषाचें हें मूळ । मन स्वभावें चंचल ।
सुखदु:खाचा सांभाळ । सर्वकाळ करी हें ॥४१॥
हें मन अन्नमय असे । विकारानें भ्रमतसे ।
परकी तें त्याचें कैसें । दु:ख डसेल मजला ॥४२॥
असा विचार करून । दु:खकारण जाणून ।
अलर्क बोले हंसून । म्हणे शोधन केलें म्यां ॥४३॥
आकाश वायु तेज जळ । पृथ्वी हीं भूतें जड केवळ ।
यांहूनि मी विमळ । असें निश्चळ सच्चिदात्मा ॥४४॥
ज्ञानकर्मेंद्रिय प्राण । चतुर्विध अंत:करण ।
हे भौतिक विकार जाण । यांहूनि भिन्न निर्गुण मी ॥४५॥
संघातही मी नोहें । असा निश्चयें पाहें ।
जो संघाभिमान घे मोहें । तो वाहे ह्या दु:खा ॥४६॥
गुरुजी असें म्यां चाचपलें । माझें रूप ओळखिलें ।
आतां हें दु:ख मना झालें । हें मी बोलें अनुभवें ॥४७॥
दुर्बोध हा विचार । ज्याला धुंडिती मुनीश्वर ।
तुम्हा मला दिधला सत्वर । प्रश्नमात्र करूनी ॥४८॥
मी सदोदित असूनी । न पाहें माझी वृद्धि हानी ।
जें दु:ख भासतसे मनीं । त्याचा अभिमानी मी कसा ॥४९
जे असती भौतिक । ते देहेंद्रियादिक ।
तेथें जें भासे सुख । वृद्धिक्षयादिक मायिक तें ॥५०॥
त्याचा संबंध नाहीं मज । मी नित्य एकरूप अज ।
मला नाहीं करणीचें काज । तेज:पुंज निर्धूम मी ॥५१॥
मी परिणामातीत । सर्वसंगविनिर्मुक्त ।
शुद्ध बुद्ध अनंत । सुखदु:खाची मात कोण जाणें ॥५२॥
पंचभूतांचा समूह । हा जड स्थूल देह ।
सूक्ष्मभूतसमूह । सूक्ष्मदेह भौतिक हे ॥५३॥
मृद्धट आपणा न जाणे । तो परा काय जाणे ।
तसें हें शरीरद्वय नेणें । आप पर भेदातें ॥५४॥
कफ वात पित्त । ह्या धातू स्थूळ देहांत ।
ह्या होतां कुपित । हो ज्वरित स्थूळ देह ॥५५॥
परी मी ज्वरित । तेही नेणे मात ।
ज्याला हें कळत । साक्षीभूत तो पर ॥५६॥
कामादिक उठतां । सूक्ष्मदेहा ज्वर येतां ।
त्याणें ज्वरित होय कीं ज्ञाता । हें आतां मी जाणें ॥५७॥
सर्वदु:खाचें कारण । म्हणोनी म्हणती कारण ।
तेथें वसे अज्ञान । तें सुज्ञा न शिवेची ॥५८॥
विचार करितां असा । दु:ख दिसे माणसा ।
मी जशाचा तसा । मग कसा दु:खी होईन ॥५९॥
तादात्म्यानें दु:ख भासलें । म्हणोनी तुम्हां पुसलें ।
आतां तें दु:ख समजलें । नाहीं झालें मला तें ॥६०॥
परक्याच्या दु:खें करून । मी कसा दु:खी होईन ।
तेव्हां मींच केला प्रश्न । त्याचें प्रतिवचन मीच देतों ॥६१॥
सुख दु:ख स्वप्नोपम । मन हें तयाचें धाम ।
मी असें आत्माराम । पूर्णकाम भूमरूप ॥६२॥
असा रायाचा सिद्धांत । ऐकूनी पुसे दत्त ।
त्वां हें केलें निश्चित । तरी सांग यथार्थ ॥६३॥
आतां तुला पाहिजे विजय । किंवा पाहिजे राज्य ।
किंवा न व्हावा अपाय । हें अमाय सांग तूं ॥६४॥
राजा म्हणे भगवंता । आतां कायसी चिंता ।
आतां माझ्या चित्ता । नावडे सर्वथा राज्यादिक ॥६५॥
बंधूनें राज्य करितां । तें मी केलें तत्वता ।
त्याची इच्छा नाहीं आतां । गुरुदत्ता शपथ वाहे ॥६६॥
जरी देह असती भिन्न । अंतर्यामीं आत्मा अभिन्न ।
तेव्हां भ्रातृराज्येंकरून । राज्यवान् मी न होई कीं ॥६७॥
श्रीदत्त म्हणे राजासी । असें जरी मानसी ।
तरी लोकानुभवासी । तूं दिससी रंकापरी ॥६८॥
मग तुझ्या मागें पुढें । चालतील कीं हत्ती घोडे ।
किंवा भालदार पुढें । राहूनी खडे पुकारतील कीं ॥६९॥
व्यर्थ जातील मनोरथ । बसाया न मिळे रथ ।
अलर्क म्हणे वाहतों शपथ । मनोरथ पूर्ण झाले ॥७०॥
मला हात पायाचा जरी । संबंध नाहीं मग तरी ।
हे रथ अश्व करी । संबंध करी यांचा कोन ॥७१॥
मी असें असंग । देहादिकांचा संग ।
अश्वरथादिक मग । अंगोपांग कोणाचें ॥७२॥
स्वत: सिद्ध मी असें । आतां हत्ती घोडे कायसे ।
मला कांहीं इच्छा नसे । हें बोलतसें यथार्थ ॥७३॥
दातांनीं जिव्हा चावितां । कोण बळें पाडी दांतां ।
हातानें हाता मारितां । कोण हातां तोडील ॥७४॥
माझे हात माझे दांत । हें जाणतां कोण घात ।
करील कीं तसें येथ । कळतां अद्वैत कोण रिपु ॥७५॥
आतां मला शत्रू नाहीं । आतां राज्याची इच्छा नाहीं ।
दु:खही मला नाहीं । न पडें मोहीं मी आतां ॥७६॥
चित्तीं असतां भ्रम । अनिवार्य उठे काम ।
होतां आत्माराम । सुखधाम स्वयें असे ॥७७॥
माझा गेला भ्रम । आतां झलों निष्काम ।
मीच आतां आत्माराम । आप्तकाम सर्वथा ॥७८॥
एक आकाश जसें । घटमठोपाधीनें नाना दिसे ।
देहोपाधीनें हें तसें । जीव अनेकसे भासती ॥७९॥
आकाशाचा खरा भेद । जसा नसे निर्विवाद ।
तसा आत्मयाचा भेद । नाहीं परिच्छेदरहित तो ॥८०॥
हें न कळे जंववरी । दु:ख वाटे तंववरी ।
ज्ञान होतां तदुपरी । कोण करी मग दु:ख ॥८१॥
जोंवरी असे अहंता । तोंवरी असे ममता ।
जोंवरी असे अज्ञता । राहती तोंवरी कामलोभ ॥८२॥
आतां हे मजवरी । आपण कृपा केली बरी ।
अहंता ममता गेली दुरी । उजळतां अंतरीं ज्ञानदीप ॥८३॥
कोणी छी: थू: करितां । किंवा वाईट म्हणतां ।
झोंबे तत्काळ चित्ता । हे अहंता तरतरे ॥८४॥
मांजरानें उंदीर खाता । दु:ख न वाटे सर्वथा ।
मांजरानें शुका धरितां । वाटे सर्वथा वाईट ॥८५॥
आपुल्या पोरा ज्वर येतां । वाटे आपुल्याला ती व्यथा ।
शत्रूचीं पोरें मरतां । ती व्यथा न वाटे ॥८६॥
हा ममतेचा खेळ । एवं ममताsहंताची केवळ ।
सर्व अनर्थांचें मूळ । हें निर्मूळ केलें आजी ॥८७॥
आतां झालों विवेकी । मी न सुखी न दु:खी ।
कोणी कांहीं म्हणोत लोकीं । चित्तीं न लेखी मी तें हो ॥८८॥
निर्मम निरहंकार । प्रकृतीहूनी पर ।
मी असें हा निर्धार । कळला साचार मजलागीं ॥८९॥
श्रीदत्त म्हणे भूपा । होतां माझी कृपा ।
त्वां ओळखिलें निजरूपा । पुण्यपापातीत होऊनी ॥९०॥
मी म्हणतां ये संबंध । संबंधें घडे बंध ।
शोक दे नित्य संबंध । हृदया वेध करूनी ॥९१॥
( श्लोक ) ॥ यावत:कुरुते जंतु:संबंधान् मनस: प्रियान् ।
तावंतोस्य निखंन्यंते हृदये शोकशंकव: ॥९२॥
ममतेनें ये बंध । ममता तुटतां तुटे बंध ।
मग कैंचा संबंध । होई निर्बंध विवेकी ॥९३॥
( श्लोक ) ॥ द्वे पदे बंधमोक्षाय न ममेति ममेति च ।
ममेति बध्यते जंतुर्न ममेति विमुच्यते ॥९४॥
तुझी माता वरिष्ठा । सर्वदा ब्रह्मनिष्ठा ।
जी मान्य योगनिष्ठा । तपोनिष्ठा वंद्य जी ॥९५॥
तियेचें दुग्धपान । त्वां केलें म्हणोन ।
जाहलें शुद्धांत:करण । ज्ञान झालें क्षण न लागतां ॥९६॥
ही मात साधुसंगाची । कोण तुळणा करील त्याची ।
नोहे क्षण संत्संगाची । आणि स्वर्गसुखाची बरोबरी ॥९७॥
सत्संग घडला म्हणून । वैराग्य बाणलें पूर्ण ।
करितां एकची प्रश्न । आत्मज्ञान जाहलें ॥९८॥
आत्मज्ञानेंकरून । ममताsहंता दिली दवडून ।
जेवी वेगें पवन । दे उडवून शाल्मलीतून ॥९९॥
ज्याचें बीज अज्ञान । अहंकार अंकुर जाण ।
ममता शाखा विस्तीर्ण । गृहक्षेत्रधन विशाखा ॥१००॥
आप्त स्त्री पुत्र पल्लव जाण । पुण्यापुण्य प्रसून ।
सुख दु:ख हीं दोन । फळें जाण तयांचीं ॥१०१॥
हा संसारवृक्ष ऐक । मोक्षमार्गव्यापक ।
हा केवळ मायिज्क । येथें सुख कैचें रे ॥१०२॥
असंग शस्त्र घेऊनी । हा वृक्ष मुळापासूनी ।
तोडूनी टाकिला ज्यांणीं । मार्ग त्यांणीं मिळविला ॥१०३॥
तेची परपदीं जाऊन । सुखें विश्रांत घेऊन ।
अद्वितीय होऊन । राहती जाण निश्चयें ॥१०४॥
राज्य भूतेंद्रियग्राम । जें दिसे स्थावर जंगम ।
हें सर्व रूप नाम । मायेचें कर्म अगाध ॥१०५॥
जें हें देहेंद्रियादिक । तें क्षेत्र मायिक ।
याहूनी क्षेत्रज्ञाचा विवेक । करी एक धन्य जगीं ॥१०५॥
जेंवी मशक उदुंबराहून । कीं जळाहूनी मासा भिन्न ।
तेवी जडक्षेत्राहून । क्षेत्रज्ञ भिन्न तूं जाणिला ॥१०६॥
असाच शिष्य मिळावा । दृष्टीं पडता कृतार्थ व्हावा ।
अन्यथा घ्यावया सेवा । गुरुशिष्यभावा गणावें ॥१०७॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये एकत्रिंशोsध्याय: ॥३१॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2016
TOP