श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४२ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:
दैत्यें माया जी योजिली । ती प्रात:काळीं दुरावली ।
सर्वांची झोंप खुलली । जागी झाली इंदुमती ॥१॥
ती पुत्रातेंन पाहूनी । इकडे तिकडे शोधूनी ।
पुसे दासीलागुनी । त्याही झोंपेंतूनी उठल्या ॥२॥
त्या आश्चर्य मानिती । डोळे पुसोनी पाहती ।
बाळाची न दिसे गती । चित्तीं खंटी करिती त्या ॥३॥
माता पाहे इकडे तिकडे । परी बाळ दृष्टीस न पडे ।
मग ती मोठ्यानें रडे । मूर्छित पडे भूमीवरी ॥४॥
राणी दाटे शोकेंकरून । म्हणे हाय हाय माझें जीवन ।
कोणी नेलें चोरून । हें पसरून मायाजाळ ॥५॥
म्हणे अहा हा परमेश्वरा । कोणी नेलें माझ्या पोरा ।
हाय हाय जगदीश्वरा । करुणाकरा काय करूं ॥६॥
ह्या शोकाग्नींत ढकलून । कोठें गेला माझा नंदन ।
सोमवंशभूषन । मनोरंजन न दिसे कोठें ॥७॥
पामर कोणगे आला । कसा माझा पुत्र नेला ।
हा घाला कसा घातला । मला निद्रा कां आली ॥८॥
कष्ट उत्कट करितां । दुष्कर तप आचरतां ।
तीव्रतर नियम होता । जो हातां ये सुत ॥९॥
तो एकाएकीं कसा । हाय हाय झाला नाहींसा ।
दिसे जो देवसुतसा । स्वप्नींही तसा न पाहिला ॥१०॥
तो हिरोनी कसा । कोणी नेला सहसा ।
श्रीदत्ताचा प्रसाद कसा । दे असा ताप मला ॥११॥
ज्याचा महिमा अगाध । ज्याला वंदिती विबुध ।
तोचि दत्त विबुध । दे प्रसाद आम्हांसी ॥१२॥
ज्याला काल भीतसे । त्या दत्ताचें वचन कसें ।
व्यर्थ झालें हें असें । वाटतसे आश्चर्य ॥१३॥
मनोरमा सुकुमारा । येरे वत्सा गुणाकरा ।
कोठें लपसी सुंदरा । प्राणाधारा ये त्वरें ॥१४॥
तूं कां इतुका रागावसी । मी निजल्यें म्हणोनी कीं रुससी ।
ये रे आतां त्वरेसी । हयगय ती न करीन ॥१५॥
दुर्मति हरहर मी सुता । हाय हाय काय करूं । मी अतां ॥ध्रु०॥१६॥
जरी जागीं राहती । जरि मी न निजती ।
तरि अशि कशी गती । मग होति बा पुता ॥१७॥
गुणगन मंडित । होसील पंडित ।
ही आस खंडित । केली तुवां बा पुता ॥१८॥
तूं अरि मारशिल । पुढें राज्य करशिल ।
वृद्धपणीं तारशिल । आम्हा वाटलें पुता ॥१९॥
सतत मी नवमास । ओझें पाळिलें हें त्रास ।
न मानिली तुझी आस । धरि खास बा पुता ॥२०॥
अवस्था ती स्वप्नापरी । भासली या अवसरीं ।
दु:खाद्रि हा मजवरी । कोसळला कीं पुता ॥२१॥
जो मनोरथ माझा । होता तो तूं आत्मजा ।
पुरविला नच दुजा । कोण पुरवी आतां ॥२२॥
माझी वैखरी हे शिणे । परि नोहे दु:ख उणें ।
वाटे माझें सरें जिणें । कोण भेणें नच वारितां ॥२३॥
मी विश्वास तुझा केला । कसा टाकसी तूं मला ।
द्रव कसा नये तुला । सांग मुला तूं आतां ॥२४॥
होतां न तूं ह्या दिशा । शून्य वाटती मदाशा ।
भंग होतां ये दुर्दशा । वांचूं कशाला आतां ॥२५॥
असें रोदन करून । त्याचें रूप आठवून ।
घे कपाळ फोडून । म्हणे कां मरण मला नये ॥२६॥
पुत्रा कारे मुख न दाविसी । तूं कोठें लपलासी ।
पान्हा आला स्तनासी । कां न येसी अजूनी ॥२७॥
हें उर:स्थळ जळजळतें । मन हें कळकळतें ।
मी एथें वळवळतें । परी न वळे तुझें मन ॥२८॥
पुत्र प्रसवलें तुला । हें म्हणतां लाज ये मला ।
ह्या तोंडा काळिमा आला । हें दावूं कोणाला आतां ॥२९॥
तूं प्रथमत: जरी । न येतासी उदरीं ।
दु:ख न वाटतें भारी । परी हें गिरिप्राय वाटे ॥३०॥
दूध माझें जातें वांयां । ये लौकर धावूनियां ।
तूं कोठें जाऊनियां । लपसी वांया रुसोने ॥३१॥
काय माझा अन्याय । पाहूनी लपला तनय ।
जो वाटे आनंदमय । एकदां ही पय जया न दिलें ॥३२॥
रे पुत्रा ये धावून । तुझ्या मुखीं देतें स्तन ।
न राहीं आतां लपून । कठोर मन करूनी ॥३३॥
जो प्राप्तेश्वरप्रसाद । तोही पुत्राचा खेद ।
न साहेल मी तरी मंद । हा खेद कसा वारूं ॥३४॥
ईश्वरानें पाठ केली । म्हणोनी ही दशा आली ।
जीवनकळा तुटली । आपुली आतां वाटते ॥३५॥
दिसे दिव्य दर्शन । उपजतांची नंदन ।
तयाचें म्यां लालन । न केलें पालन पापीण मी ॥३६॥
परम पुत्रा मांडीवरी । न घेतला क्षणभरी ।
पाळण्यांत घालोनी दोरी । मी न धरीं मुखें गात ॥३७॥
ममत्वानें ओढूनी । जो गेला मन सोडोनी ।
एकदांही म्यां न माखूनी । किंवा न्हाणूनी न ठेविला ॥३८॥
होते द्वारीं द्वारपाळ । त्यांच्या डोळ्यांवरी पटल ।
बांधोनियां कोण खळ । नेला बाळ कळेना ॥३९॥
हें स्वप्नोपम सर्व झालें । व्यर्थ म्यां ओझें वाहिलें ।
कष्टें व्यर्थ मी प्रसवलें । व्यर्थ केलें जातकर्म ॥४०॥
मागुति पुत्र दिसेल म्हणेन । भरंवसा धरील कोण ।
मी जाईन मरून । शोक करून पुत्राचा ॥४१॥
हळहळतें माझें मन । कशी मीही पापिण ।
कां न गेल्यें मरून । माझें प्राक्तन असें कसें ॥४२॥
वैषम्य पंक्तींत । किंवा केला विश्वासघात ।
किंवा कोणाचें वित्त । अपहृत केलें कीं ॥४३॥
किंवा सर्प मारिला । किंवा विप्र लुटला ।
किंवा गांवावरी घाला । घातला पूर्वजन्मीं ॥४४॥
जें सर्वांहूनी अधिक । ब्रह्मस्वापहारपातक ।
जें केवळ पावक । सकळ कुळ जाळी जें ॥४५॥
महान्का होईना । जरी घे ब्राह्मणधना ।
तरी जन्मांतरीं संताना । न देखे ह्या वचना ऐकें मी ॥४६॥
तरी माझ्या हातून । घडलें ब्रह्मस्वहरण ।
म्हणोनी हा नंदन । नष्ट होऊनी गेला कीं ॥४७॥
हा विना कर्मावांचून । अनर्थ न ये घडून ।
कीं केलें न्यासापहरण । तें वृजिन हें ये कीं ॥४८॥
पुत्र दिसला रत्नासमान । पूर्वीं मी कोणाचें रत्न ।
घेतलें कीं चोरून । म्हणून पुत्ररत्न नष्ट झालें ॥४९॥
हें आश्चर्य वाटे केवळ । पुढचें गेलें बाळ ।
जेवतां पुढची पत्रावळ । म्यां कोणाची ओढली कीं ॥५०॥
जो शुभलक्षणी सुत । एकाएकीं झाला गुप्त ।
हें मित्रद्रोहदुरित । झालें उदित वाटतें ॥५१॥
किंवा वधिला ब्राह्मण । किंवा बाळहत्या केली दारुण ।
त्या पापापासून । माझा नंदन नष्ट झाला ॥५२॥
किंवा यति क्षोभविला । कीं अतिथी परतविला ।
कीं ग्रास हिरोनी घेतला । म्हणूनी गेला हा पुत्र ॥५३॥
अभय देऊनी कीं कोणाला । पूर्वीं मी फसविला ।
कीं देवाला दिवा मालविला । म्हणोन गेला हा सुत ॥५४॥
पापें एवढीं जरी । न करितें जन्मांतरीं ।
तरी बाळ ये अवसरीं । कोण चोरी करूनी नेता ॥५५॥
कीं न वंदिले महांत । कीं निंदिलें परदैवत ।
कीं पूजितां स्वदैवत । अकस्मात मध्येंच उठे ॥५६॥
बरवें अन्न करून । म्यां पंक्तिभेद करून ।
केलें असेल कीं भोजन । म्हणूनी नंदन अंतरला ॥५७॥
कीं मदभरेंकरून । अपमानिला ब्राह्मण ।
कीं गोग्रास घेतला हिरोन । म्हणून नंदन अंतरला ॥५८॥
किंवा स्वजनाचा केला भेद । कीं पतीस दिधला खेद ।
कीं दंपतीसी लाविला वाद । म्हणोनी खेद हा झाला ॥५९॥
दु:स्वप्न जें पाहिलें । त्याचें हें फळ आलें ।
सूर्याचें स्तवन केलें । व्यर्थ केलें तें कसें ॥६०॥
अवस्था ही माझी असी । म्यां सांगावी कोणासी ।
धीर माझ्या जीवासी । देईल दु:खासी वारून ॥६१॥
हें मन झालें उद्विग्न । काय करावें राज्य घेऊन ।
सर्व वाटे विषासमान । पुत्रधन हरपतां ॥६२॥
समस्तैश्वर्याहून । अधिक वाटे पुत्रधन ।
जया नसे संतान । त्याचें सदन कोण पाहे ॥६३॥
जी वांज असे नारी । भिक्षा न घेती तिचे घरीं ।
पुत्रवती होय जरी । जगाभीतरी मान्य ती ॥६४॥
वनासमान तें घर । ज्या गह्रीं नसे पोर ।
कासया संपत्ती थोर । घरीं कुमार नसतां ॥६५॥
स्वर्गीं उभय कुळ । वाट पाहती निश्चळ ।
म्हणती वंशीं झालिया बाळ । आम्हा निश्चळपद ये ॥६६॥
आतां कासया वांचावें । वांज म्हणून घ्यावें ।
त्या पक्षीं वाटे मरावें । न उरावें लोकांत ॥६७॥
असें रोदन करून । ती पडे मूर्च्छा येऊन ।
दासी राजाप्रती जाऊन । वर्तमान कळविती ॥६८॥
तो उद्विग्न होऊन । तेथें आला त्वरें धांवून ।
तंव मूर्च्छा येऊन । राणी दीन पडली पाहे ॥६९॥
शोकें ती पडे भूमिवरी । वार्यानें केळ ज्यापरी ।
दासी तीसी सांवरी । परी न उठे सर्वथा ॥७०॥
त्या रायाचें मन । मग गेलें घाबरून ।
हायहाय म्हणून । तोही पतन पावला तेथें ॥७१॥
क्षणमात्र पडून मूर्च्छित । उठे उर्वशीचा सुत ।
मारी कपाळावरी हात । पुन: रडात पडे तो ॥७२॥
जें पुत्रोत्सवें झालें सुख । त्याला झांकीं पुत्रशोक ।
एकाएकीं उसळे दु:ख । त्याला लेख न करवे ॥७३॥
तें उत्कृष्ट दु:ख येतां । भूपा आली शून्यता ।
भ्रम जाहला चित्ता । म्हणे मरतों आतां शोकानें ॥७४॥
जो वर्षाकालीन घन । तो ते अश्रुपात पाहून ।
लज्जायमान होऊन । आश्चर्य पाहून राहिला ॥७५॥
थोडे उघडी नयन । ते दिसती रक्तवर्ण ।
सूर्य तया पाहून । गेला लाजून आभाळांत ॥७६॥
राजा भयभीत होऊनी । पाहे तों वत्सावांचुनी ।
गाय हंबरडे तशी राणी । तिला पाहूनी स्वयें रडे ॥७७॥
अभय देऊनी माघारी । कां देवा दु:खसागरीं ।
लोटिसी आम्हां शोकसागरीं । तूं हरी मग कसा ॥७८॥
पुत्रत्वा पाववूनी । मग अपुत्र करूनी ।
ठेविसी कां या भुवनीं । काय मनीं तुझ्या देवा ॥७९॥
मी द्वंद्वोत्कट दु:ख सोसूनी । जें फळ घेतलें मागूनी ।
तें घेसी कां हिसकूनी । काय मनीं तुझ्या असे ॥८०॥
मी सत्कर्म जें केलें । तें माझें बुडालें ।
माझें दैव आतां फुटलें । देव रुसले मजवरी ॥८१॥
जो हर्ष मज झाला । तो अकस्मात डुबाला ।
आतां वाचावें कशाला । मृत्यु आला तर बरा ॥८२॥
असति परिखा प्राकार । तयां असो धिक्कार ।
असती कपटें थोर । तयां धिक्कार सर्वथा ॥८३॥
जें व्यूह रचूनी ठेविलें सैन्य । त्यां टाकावें धिक्कारून ।
जे वीर शस्त्र धरून । होते तया धिक्कारावें ॥८४॥
कोण वैरी आला कोठून । पुत्र नेला उचलून ।
तो गेला कसा कोठून । इकडे कोण लक्ष्य न देती ॥८५॥
मी आज्ञा दिली वीरांला । वेढा द्या गर्भगृहाला ।
कशी झोंप आली त्यांला । असो तयांना धिक्कार ॥८६॥
सुर नर कीं असुर । घेऊनी पळाला कुमार ।
ठेविलें यंत्र मंत्र । तया धिक्कार असो ॥८७॥
माझी संतती खुंटली । कुळदेवता रुसली ।
तप:शक्ती वायां गेली । भंगली धर्मशक्ती ॥८८॥
वाटतसे धर्म निर्बळ । तपा अंगी नाहीं फळ ।
दान समजे निष्फळ । माझा बाळ नष्ट होतां ॥८९॥
दुर्गतिंत पितरांसहित । आतां मी पडेन निश्चित ।
जन्मांतरींचें दुरित । तें हें फळित जाहलें ॥९०॥
मला संतान नाहीं म्हणून । असें ज्योतिष्यांचें वचन ।
तें ऐकतांही मूर्ख म्हणून । केलें साधन व्यर्थ ॥९१॥
कसें माझें मूर्खपण । व्यर्थ पावलों शीण ।
हटाने तप करून । फळ कोण लाधला ॥९२॥
दैवीं नव्हतें म्हणून । धरिले देवाचे चरण ।
जो अनन्य शरण । तयाचें रक्षण करी जो ॥९३॥
तपश्चर्यादिकें करून । जो न होई प्रसन्न ।
तो भगवान अत्रिनंदन । मज प्रसन्न जाहला ॥९४॥
जो स्वभक्तांचा कैवारी । तो फळ दे माझे करीं ।
त्याच्या वचनावरी । विश्वास धरीं मी खास ॥९५॥
भगवद्भक्तां कैचें दैन्य । हेंचि सर्वांसी मान्य ।
मी भक्त अनन्य । कां वदान्य मज उपेक्षी ॥९६॥
मन्मति पालटली । कीं मला भूल पडली ।
कीं काय चूक झाली । न उमजली ती मला ॥९७॥
जो नानारूपधर । ज्याच्या माहात्म्याचा पार ।
नेणती सुर योगीश्वर । मी पामर काय जाणें ॥९८॥
सुहास्यान्वित मुख । ज्याचें पाहतां हो हरिख ।
तोचि देईल सुख । सर्व दु:ख वारूनी ॥९९॥
ज्याचा ब्रह्मादिकां पार । न कळे त्याला नमस्कार ।
असो तो सर्वेश्वर । दु:ख दूर करो माझें ॥१००॥
जो ब्रह्मचि केवळ । तयाचें वंदूं पदकमळ ।
तो करो प्रतिपाळ । दोष सकळ वारूनी ॥१०१॥
देवा विश्वेश्वरा दत्ता । सांभाळीं आपुल्या भक्ता ।
तुझ्या विना बा आतां । ह्या आर्ता कोण पाळी ॥१०२॥
तूं सत्कुल विद्या धन । न पाहसी तप आचरण ।
धरितां भावें चरण । शरण होसी निश्चित ॥१०३॥
जे भले भले असती । ते पदोपदीं चुकती ।
मी तरी मंदमती । चुकलों किती वेळ नेणें ॥१०४॥
आतां भक्तवत्सला । पदरीं घेई मला ।
आर्त होऊनी तुला । प्रार्थी मला अभय दे ॥१०५॥
तूं देव अनंत । माझा काय पाहसी अंत ।
मी करितों आकांत । होऊनी आर्त ये वेळीं ॥१०६॥
ही मति खचली आतां । पुत्र आत्मा नष्ट होतां ।
आर्तावरी दृष्टी आतां । करी दत्ता दयाब्धे ॥१०७॥
अभय दे मज आतां । सर्वापराध जातां ।
क्षमा करीं बा दत्ता । दुजा त्राता कोण मला ॥१०८॥
असा एकाग्र होऊन । श्रीदत्ता आठवून ।
आयुराजा करी नमन । अति दीन होऊनी ॥१०९॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये द्विचत्वारिंशोsध्याय: ॥४२॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2016
TOP