श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४९ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
जो कृपासागर । तो श्रीदत्त मुनीश्वर ।
ह्मणे राजा ऐक सादर । नवव्या गुरूचा उपदेश ॥१॥
स्त्रीपुत्रेच्छा धरून । विषयीं राहे रमून ।
तया अकस्मात ये पतन । म्हणून सोडून द्यावें घर ॥२॥
कल्याण किंवा अकल्याण । तें आपोआप ये घडून ।
त्याला कर्म कारण । मग वांयां भ्रमण कां करावें ॥३॥
सर्वांस प्रारब्ध कारण । तेणें अवश्य सुख मिळे जाण ।
जसें उद्योगाविण । दु:ख येऊन भिडतें ॥४॥
हें सत्य मानून । व्यर्थ उद्योग करून ।
सुखार्थ आयुष्य न खर्चून । राहावें पडून आरापरी ॥५॥
रहस्यार्थ हाच जाण । स्वर्गी नरकींही असतां जाण ।
इंद्रियसुख ये मिळून । प्रारब्धाधीन तें असे ॥६॥
यद्यपि कुत्रा झाला । कुत्री मिळे भोगाला ।
दैवयोगें स्वर्गीं गेला । इंद्रानी त्याला मिळेल ती ॥७॥
इंद्रहि इंद्राणीशीं रमून । सुख घे मैथुन करून ।
कुत्राही कुत्रीपाशीं जावून । घेई रमून तेंच सुख ॥८॥
परतंत्र इंद्रियसुख । सर्वांसी समान देख ।
आदि अंतीं सर्वत्र दु:ख । मध्यें हा सुखभासमात्र ॥९॥
हें तों मुख्य सुख नसे । तथापि जीव जेथें वसे ।
तेथें दैवें तेंही मिळतसे । कळे असें आरापासून ॥१०॥
मनीं खंती न धरून । आर राहे पडून ।
तसें रहावें उदासीन । नित्य धरून अजगरवृत्ती ॥११॥
संतत पडूनी आर । विश्वास ठेवी दैवावर ।
जो जेव्हां जसा आहार । संतोषें तसा तो खातसे ॥१२॥
स्वल्पत्व म्हत्व न पाहून । मिळेल तें घे खावून ।
कधीं ये मिष्ट मिळून । कधीं विरस तरी न टाकी ॥१३॥
तें सम्पूर्ण खाऊन । तेथेंच राहे पडून ।
न मिळताही तेथें अन्न । धैर्य धरून पडून जागे ॥१४॥
विशेष धैर्य नरें धरून । आरापरी रहावें पडून ।
थोडें अधिक गोड अन्न । मिळे तें जेवून तोषाचें ॥१५॥
तें अन्न तसेंही न मिळतां । धीरपणा दैवावरता ।
धरूनी पडावें न निजतां । स्वरूपीं दृष्टी लावुनी ॥१६॥
अंगीं पाहिजे तसें बळ । असतांही रहावें निश्चळ ।
असा पडतां सकळ । दर्शनादि व्यापार लोपती ॥१७॥
भाळीं वृत्ती जी लिहिली । आयुष्यरेखा जी काढिली ।
असें पडतां ती नष्ट झाली । न ऐकिली बोली ही ॥१८॥
हें जाणोन मी येथ । पडलों अजगरवत ।
सदा आनंदभरित । सांगतों आतां दहावा गुरू ॥१९॥
असा सतत पडतां । भोग मिळतां अथवा न मिळता ।
न कीजे हर्षविषादता । समुद्र गुरू करितांहें कळे ॥२०॥
तो नित्य पूर्ण असून । वर्षाकाळीं नद्या येऊन ।
मिळतां न जाय फुटून । हर्षें वेळा सोडून बाहेर ॥२१॥
विविध नद्या त्या ग्रीष्मीं वाळती । समुद्रा न मिळती ।
तरी दु:खें न वाळे सरित्पती । ती रीती घ्यावी ॥२२॥
स्वधर्माधीन राहावें । भोग मिळतां हृष्ट न व्हावें ।
न मिळतांही दीन न व्हावें । असावें एकरूप ॥२३॥
जरी यत्न केला तरी । ठाव न लागे समुद्रीं ।
रत्नें किती अंतरीं । हा लांब रूंद किती असे ॥२४॥
हेची दृढ निश्चय करून । जसें नये कळून ।
तसें योग्यानें होवून । अनुदिन स्वस्थ असावें ॥२५॥
विशिष्ट किंवाहा निकृष्ट नर । असा लोकीं करितां विचार ।
न लावूं द्यावा अंतपार । दुरत्यय असावें ॥२६॥
गुण येथें किती असती । न करूं द्यावी ही गणती ।
निर्विकारपणें स्थिती । धरूनी राहावें निश्चळ ॥२७॥
सदा पूर्ण समुद्रापरी । प्रसन्नता दावावी बाहेरी ।
हें समुद्रापासोनी स्वीकारीं । अवधारीं आतां अक्रावा गुरू ॥२८॥
जो विषय पांच पंचेंद्रियांनीं । सेवी तो जाय मरूनी ।
हे पांच गुरू करूनी । शिक्षण घेवूनी विषय सोडी ॥२९॥
स्वपन्नेव न जानाति सतोsपि विषयान्यथा ।
तथैव जागरूकश्चेत्को न मुच्येत बंधनात् ॥३०॥
जो न करी इंद्रियें स्वाधीन । स्त्रियांचे विलास लावण्य पाहून ।
जाई मोहित होवून । पतंगासमान मरे तो ॥३१॥
जो हर्षें पाहतां रूप । तो पतंग देखोनी दीप ।
त्यावरी घाली झेंप । मग आपोआप जळे तेथें ॥३२॥
जो जाय नर भुलुनी । पाहतां नवी रमणी ।
फडीं विलासिनी तरुणी । तो व्यर्थ मरून जाईल ॥३३॥
वस्त्रें मणी सुवर्ण भूषण । टिळे टिक्के भांग सोडून ।
पाहतां काय ये दिसून । प्रेतासमान जें असे ॥३४॥
ती असूनी अमंगळा । हाडामांसांचा एक बोळा ।
तेथें कां भूल घे डोळा । घ्यावया सुखकळा म्हणाल जरी ॥३५॥
अनार्थ हे त्याहुनी । मंडुकाचें पोट फाडूनी ।
कां रमाना सुख इच्छूनी । समान दोनी असती हो ॥३६॥
व्रणप्राय जें स्थळ । किड्यांचें घर केवळ ।
तेथें वाटे सुख विपुळ । तरी किड्यांचें कुळ सोडूं नका ॥३७॥
इश्श जाऊं द्या तो भाग । हर हर शिरशिरतें अंग ।
आतां बारावा गुरू भृंग । दे ज्ञानयोग द्विविध तो ॥३८॥
राजा परिसे मघुकृत । दोन असती प्रख्यात् ।
मधु कृंतति पुष्पादाच्छिद्य गृह्णातीति मधुकृत् । तो मधुकृत् भ्रमर रे ॥३९॥
हा सत्य दुसरा मधुकृत् । मधुमक्षिका नांवें ख्यात ।
आह ( हा ) रत्वेन स्वरूपेण च मधु करोतीति मधुकृत् । यांपासून शिकलों तें ऐक ॥४०॥
शास्त्र व्यूह नानाप्रकार । ते न मिळती पढतां जन्मभर ।
त्याचें घ्यावें सार । हें भ्रमर ज्ञान देई ॥४१॥
हें रहस्य दुसरेंऐक । रस मिळेल अधिक ।
म्हणोनी कमळ धरितां एक । हो दु:ख तें मावळतां ॥४२॥
मंदिर एक धरी अबुध । जरी रस मिळती विविध ।
तरी त्यांचा स्नेहें ये बंध । ध्यानछंद सुटोनी ॥४३॥
जें रश्मीश्वरापासून । घेतलें संग्रहाचें शिक्षण ।
हें जाण त्याहून । विलक्षण जाण भूपा ॥४४॥
महान्सङ्ग्रह करून । न खाती न देती जे जन ।
जिभेस कांटा लावून । धन सांठवून ठेविती जे ॥४५॥
तें समूळ नेती चोर चोरून । पूर्वी घेती त्याचा प्राण ।
जरी ठेविती लपवून । तरी शोधून काढिती ॥४६॥
जेवी हर येक प्रकारेंकरून । अडचणींत जाऊन ।
माशा उंच वृक्ष पाहून । यत्नें मधु झांकून ठेविती ॥४७॥
तसें तेथें राखतां । कोणा न देतां स्वयें न खातां ।
यत्नें त्यां जाळून सर्वथा । लोक नेती तें मधु ॥४८॥
तेव्हां जो सांठा करी । त्याचा उपयोग न करी ।
तो त्या साठ्याबरोबरी । खरोखरी नाश पावेल ॥४९॥
असा यदुराया हा उपदेश । सांगे गुरू द्वादश ।
आतां तेराव्या गुरूचा उपदेश । सावकाश ऐक तूं ॥५०॥
स्वसत्तेची किंवा पराची । नारी असो तिची ।
प्रीति धरितां स्नेहाची । बेडी दृढ पडेल ॥५१॥
जरी रूपवती काष्ठमयी । नारी असो तिला पायीं ।
स्पर्श करतां बद्ध होई । गज देई साक्ष ही ॥५२॥
गजा पंचाननावांचून । आकळी असा नसे कोण ।
तया खड्यांत घालून । ठेवी हत्तीण काष्ठाची ॥५३॥
मग कसी बरें नारी । मांसमयी असे तरी ।
न बांधील हें अंतरीं । कोण धरी सांग बा ॥५४॥
आपुल्या हितासाठीं । नारी मोहगर्तीं लोटी ।
तिचें प्रेम जो पाठीं । ठेवी तो शेवटीं नरकीं जाय ॥५५॥
हत्तीण पाहून हत्ती । आलिंगावया धांवती ।
तेथें जे बलिष्ठ असती । ते हाणती निर्बळा ॥५६॥
नर तसे जे स्त्री पाहून । जाती जरी धांवून ।
त्वरें बलिष्ठ येवून । त्याला मारून टाकिती ॥५७॥
स्त्री अमंगळ प्रेतापरी । दृष्टीही तिजवरी ।
न करावी मग दूरी । आलिंगनाची वार्ता ती ॥५८॥
जगांत भुलले हे जन । जेथूनी होती उत्पन्न ।
तेथेंची राहती रमून । मग पशूसमान कां न म्हणावें ॥५९॥
जो मत्तेभाचेपरी । पाहतांचि सुंदरी ।
धांव घे तिजवरी । तो नरकाभीतरीं लोळेल भूपा ॥६०॥
तोचि परम पावन । जो नर वयांत येवून ।
स्त्रियांसी न घे शिवून । शिवसमान जाण तो ॥६१॥
स्वर्वेश्यावलोकन करून । जसा न भुलला नारायण ।
तसें धैर्य धरून । राहे तो जाण परब्रह्म ॥६२॥
स्त्रीतमिस्रा दिसतां । विलासांधकार पसरतां ।
हर्ष वाटे कामीभूतां । नानाचेष्टा करावया ॥६३॥
धीर योगी चतुर । स्त्रीतमिस्रा दिसतां सत्वर ।
बसती सिद्धासनावर । निरंतर जागती ॥६४॥
मी असा गजापासून । उपदेश घेतला जाण ।
चौदाव्या गुरूपासून । घेतलें शिक्षण सांगतों ॥६५॥
जरी वसे ध्यानयोगीं । किंवा गुंते तपालागीं ।
विद्याभ्यासालागीं । तरी पोटालागीं न शिणावें ॥६६॥
भूपा सौख्यकारक धन । भूक लागल्या जाण ।
हातीं झोळी घेवून । भिक्षाटण करावें ॥६७॥
गृही पुरुष फिरून । अनेक उद्योग करून ।
नानाठायीं फिरून । कष्ट करून जें संपादी ॥६८॥
जो पुरुष गृहस्थ । त्याला श्रम पडती बहुत ।
ग्रामी वनीं दुकानीं हिंडत । काष्ठ भाजी धान्य घ्याया ॥६९॥
जे उष:कालापसून । इकडे तिकडे फिरून ।
धान्यादिक संपादून । स्वयंपाक करून ठेविती ॥७०॥
दु:ख सोसून पाक करिती । पोराबाळांलाही न देती ।
तंव भिक्षू घाला घालिती । मधुहा जेवीं ॥७१॥
ज्या महत्तर कष्ट करून । नाना वनीं फिरून ।
मिळेल ते संपादून । माश्या सांठवून ठेविती मधु ॥७२॥
माश्या महत्तर कष्ट करिती । यत्नें मधु मिष्ट करिती ।
स्वयें बिंदूमात्र न खाती । न देती पोरांलाही ॥७३॥
सुविस्मित मधुहा होऊन । यत्नें तेथें जावून ।
त्यांच्या खाण्यापूर्वीं घाला घालून । तें घेवून जातसे ॥७४॥
पार्थिवा पाहें हें उद्योगावांचून । अकस्मात ये मिळून ।
हें शिक्षण घेवून । सुखें जेवून असावें ॥७५॥
हीच युक्ति बरी जाण । चूल चौका करी कोण ।
धूमानें डोळे फोडून । हात भाजून कोण घेई ॥७६॥
आहारमात्र सिद्धान्न । भिक्षा मागून आणून ।
अनायासें खावून । ध्यान करून जिरवावें ॥७७॥
खावूनि जो विशेष अन्न । ध्यानादिक न करून ।
राहे बोकळून । त्याला पतन येईल खास ॥७८॥
बा ख्याल खुशाली करावया । ही वृत्ती नसे राया ।
केवळ ध्यान करूनियां । जिरवितां उभयां ये श्रेय ॥७९॥
पंच महापापें गृहस्थाचीं । भिक्षा देतां तीं जाती त्याचीं ।
अतिथि फिरविती तयांची । हानी मोठी होईल ॥८०॥
पक्षीमृगयुक्त जसें वन । तसें तें घर जाण ।
जेथूनी अतिथी जाई फिरून । पुण्य घेवून गृहस्थाचें ॥८१॥
घरांत वैश्वदेव न होतां । ब्रह्मचारी यती येतां ।
यज्ञफळ ये त्यांला अन्न देतां । त्या फिरवितां चांद्रा यण प्रायश्चित्त ॥८२॥
भूपा मला शिक्षण । मिळालें चवदाव्या गुरूपासून ।
आतां पंध्राव्यापासून । घेतलें शिक्षण तें ऐक ॥८३॥
त्वरें थेट सारखे धांवती । वायूपरी ज्यांची गती ।
जे मृग हातीं न लागती । ते बद्ध होती गीतशब्दें ॥८४॥
हें उदंड मोहन । जाई चित्ता वेधून ।
जें टाकी मृगां बांधून । एक क्षण न लागतांची ॥८५॥
वनीं भले गवयी जावून । वीणा सारंगी वाजवुन ।
नाना आलाप घेऊन । सुस्वर गावुन राहती ॥८६॥
अकस्मात तें ऐकून । त्या गीता लुब्ध होऊन ।
मृग सर्व विसरून । पडती येऊन त्यावरी सारे ॥८७॥
मृग तंत्रीवरी होतां लीन । मृगयू त्यांचें करी बंधन ।
त्यापासून घेतलें शिक्षण । नाद सोडून द्यावया ॥८८॥
गीतशब्द वाटे मधुर । ऐकतां कोमळ सुस्वर ।
तो वेधीतसे अंतर । हें दृढतर बंधन जो ॥८९॥
ज्या नारी सुस्वर गाती । कोकिळेपरी आलाप घेती ।
ऐकतांच तें चित्तीं । लागे अति मोहकसें ॥९०॥
नाना रंग दावून । तालकाल साधून ।
रागरागिनी उजळून । गाती तें दुरून ऐकावें ॥९१॥
जेथें ॐकारपूर्वक । साम गाती भक्तिपूर्वक ।
किंवा गाती भाविक । ईश्वरगुणानुवाद ॥९२॥
तें आक्रंदन जाण । हो कां सुस्वर गायन ।
जें भगवद्गुणाविण । किंवा कोल्ह्याची ओरड ॥९३॥
जसा तो ऋष्यश्रृंगमुनी । जो झाला मृगीपासुनी ।
स्त्रियांचें नृत्यादिक पाहूनी । भुलूनी बद्ध जाहला ॥९४॥
तेव्हां स्मरणसुद्धां ग्राम्यगीताचें । न कीजे हें पंध्राव्या गुरूचें ।
सांगणें आतां सोळाव्याचें । मित साचें सांगतों ॥९५॥
सत्वर गती जया असे । जो जळीं धांवतसे ।
धरितां हाता न येतसे । तो बद्ध होतसे जिव्हेमुळें ॥९६॥
नित्य कृतजळवास । जिव्हा नावरी त्यामुळें खास ।
धरिती त्या मत्स्यास । सोडुनी वडिश मांसयुक्त ॥९७॥
नको तंववरी सुखाशा । जव न सुटली रसाशा ।
मसा अशा उपदेशा । देतसे रसाशा टाकावया ॥९८॥
मनीं स्मरतां रसांला । लाल सुटे जिव्हेला ।
मग घेतां सुवासाला । त्या नराला कोण आवरी ॥९९॥
जे ही रसना नावरती । ते देशोदेशीं भडकती ।
गुरें घरें पोरें विकिती । रसनातृप्ति करावया ॥१००॥
पराक्रम थोर करिती । जे शत्रूंलाहि जिंकिती ।
तयांलाही नावरे ती । रसना बरी हुळकी जो ॥१०१॥
जरी तो विचारशीळ । सभेंत जिंकी शास्त्रीमंडळ ।
तयालाही जिव्हा केवळ । निखळ दुर्जेय हो ॥१०२॥
हा विस्मय वाटे आह्मां । चार आंगुळें जिव्हा तुह्मां ।
कां नावरे हें आह्मां । कारण सांगा विचारूनी ॥१०३॥
असा रसनेचा हा अभ्यास । चालिला बहुत दिवस ।
चालिला ह्मणतां तुम्हांस । सांगतों तसें आचरा ॥१०४॥
असें कृत्य आतां करा । थोडा थोडा रस कमी करा ।
प्राणवृत्ती परी आचरा । जिंकाल मग रसना ते ॥१०५॥
तुम्ही तंववरी जितेंद्रिय न व्हाल । जंवर रसना न जिंकाल ।
रस जिंकितां सर्व जिंकाल । जितं सर्वं जिते रसे ॥१०६॥
हेंची स्मरण ठेवून । अनुक्रमें रस जिंकून ।
सर्वत्र विजयी होऊन । येथें पडून राहिलों सुखें ॥१०७॥
असें रसना आवरण्याचें । हें सोळाव्या गुरूचें ।
शिक्षण लाधलें साचें । रसाचें प्राबल्य निवारिजे ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये एकोनपंचाशत्तमोsध्याय: ॥४९॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2016
TOP