मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ३० वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३० वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ३० वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:गुरु म्हणे शिष्यासी । असा कोपोनी पत्नीसी ।राजा बोले अविचारेंसी । प्रवृत्तिमार्गनिरत जो ॥१॥तें तसें त्याचें वचन । मदालसा परिसून ।म्हणे कान देऊन । ऐकावें भाषण माझें हें ॥२॥हा उपदेश केला उचित । यानें पितर समस्त ।निश्चयें होतील मुक्त । हें वेदमत खास असे ॥३॥पंथा नाहीं याहून । मोक्षा जावया दुजा जाण ।अतएव हाच श्रेष्ठ म्हणून । वेदवचन ऐकिलें ॥४॥पितृभूतादि जे असती । ते स्वकर्में वांचती ।काय जीवित मनुष्याचे हातीं । केवळ भ्रांन्ति घेती नर ॥५॥जरी स्त्रीधनादि भोगावें । तरी वैराग्या नेंवागावें ।या वेदवचना दोष द्यावें । मग पाखंड व्हावें वेदबाह्य ॥६॥जो वेदमार्गें जाई । तो कसा देवद्रोही होई ।तोचि तरोनि जाई । तोचि घेई कैवल्य ॥७॥वैराग्यें संतान्य घेतां । भिक्षार्थ परद्वारीं जातां ।केंवी येईल हीनता । संतोश धरितां काय शीण ॥८॥जरी पूर्वी येथें क्लेश वाटे । तरी पुढें सुख होईल मोठें ।प्रवृत्तिमार्गीं जरी सुख वाटे । तरी मोठें दु:ख पुढें ॥९॥आत्मा हाची मुख्य लोक । हा मिळाया नको लेंक ।प्रबोधपुत्र होतां एक । मिळे आत्मलोक निश्चयें ॥१०॥तेव्हां मीं केले उचित । हें जरी तुम्हां वाटे विपरीत ।तरी आतां प्रवृत्तिनिरत । चौथा सुत होईल हा ॥११॥मी सर्व विद्या सांगतसे ह्यासी । जरी विश्वास वाटे तुम्हांसी ।तरी हा असो मजपासीं । नातरी ह्यासी तुम्हीं न्यावा ॥१२॥असें वचन ऐकून । म्हणे तूं करवी अध्ययन ।पुन: य़ेऊन पाहीन । ठेवीन खात्री झालिया ॥१३॥असें सांगूनी जाई राजा । माता म्हणे ह्या आत्मजा ।पुढें उद्धरी अधोक्षजा । अत्रिजा जा तुझ्या वांट्याचा ॥१४॥याला पांच उच्चग्रह आले । म्हणोनी हें विघ्न आलें ।आतां माझा उपाय न चाले । कर्म आले आड याचें ॥१५॥कोण अनादरील ग्रहां । सहासष्ट हजार वर्षें हा ।राज्य भोगितां सोडील मोहा । तंव न हा विरक्त होय ॥१६॥याचें दैव असें म्हणुनीयां । हा म्यां अर्पिला तुमच्या पायां ।ह्यावरी मग दत्तात्रेया । करावी दया निश्चयें ॥१७॥असी दत्ता प्रार्थूनी । मग अलर्का बोलावूनी ।वेदशास्त्र पढऊनी । करी ज्ञानी व्यवहारी ॥१८॥धर्मार्थकामसाधन । वर्णाश्रमाचरण ।षड्विधराजनीतिलक्षण । प्रजारंजनकर्म सांगे ॥१९॥धनुर्विद्या सांगून । केला व्यवहारनिषुण ।तया चतुरा पाहून । भूपाचें मन हृष्ट झालें ॥२०॥मग अलर्क स्वयंवरीं । अनेक कन्या वरीं ।प्रख्यात झाला भूमीवरी । धनुर्धारी धुरंधर ॥२१॥राजा पाहूनी पुत्रासी । ह्रुष्ट झाला मानसीं ।यौवराज्य देई त्यासी । स्वयें वनासी चाले तो ॥२२॥मदालसा म्हणे रायासी । मी येतें वनासी ।असतां समागमासी । होईल मनासी आनंद ॥२३॥राजा तथास्तु म्हणे । मग निघतां ती म्हणे ।अलर्का राज्य करी धर्मानें । पुत्राप्रमानें प्रजा पाळी ॥२४॥सहासष्ट हजार । वर्षें घेसी भूभार ।अलर्का मग या उपर । शत्रु उठेल दुर्धर ॥२५॥तेव्हां तुझें व्हावया हित । मी ठेवितें हें लिखित ।तंववर पेटींत ठेवी गुप्त । जंववरी शत्रू न उठतील ॥२६॥तंववरी करी जतन । नित्य ठेवी पूजन ।शत्रू उठतांची स्मरून । हें वाचून पाहे तूं ॥२७॥तेव्हां हें वाचून । तसें करितां आचरण ।शत्रू जातील मित्र होवून । साम्राज्य पावून सुखी होसी ॥२८॥असें अलर्का सांगून । आशीर्वचन देऊन ।माता करी प्रयाण । चरण धरून पुत्र रडे ॥२९॥माता म्हणे सुता । तूं मागें उलट आतां ।मी धरूनी पतीच्या व्रता । सार्थकता करीन ॥३०॥सदा एकत्र सहवास । घडे नित्य जीवांस ।कर्माधीन खास । असे निवास जाण बा ॥३१॥ आतां तुमचा योग सरला । म्हणोनी हा वियोग झाला ।काय उपाय याला । आपुल्या मनाला सांवरावें ॥३२॥असें तयासी सांगून । माता जाई निघोन ।पतीसह वनीं येऊन । राहिली समाधान पावुनी ॥३३॥मग अवसर पाहुनी । पतीस बोध करूनी ।पूर्ण विज्ञान ठसवूनी । धन्य मानी आपणासी ॥३४॥असी धन्य ती सती । पतीला देई सद्गती ।आपण घे विदेहमुक्ती । देव मानिती आश्चर्य ॥३५॥मदालसा धन्य सती । स्वयें सेवूनी जीवन्मुक्ती ।पुत्रा देई सद्गती । दे सद्गती पतीला जी ॥३६॥सती चूडाला जसी । तारी निजपतीसी ।मदालसाही तसी । नारी असी विरलची ॥३७॥प्रात:काळीं उठोन । ज्याचें करितां कीर्तन ।सर्व पाप जाऊन । अंत:करण शुद्ध होईल ॥३८॥असो इकडे अलर्क । प्रतापाचा जो अर्क ।न वर्णवे ज्याचा तर्क । अधर्मसंपर्क न करी जो ॥३९॥करी प्रजारंजन । न दुखवी लोकांचें मन ।ज्याला खुषी प्रजाजन । नित्य दान दे विप्रां ॥४०॥नाम घेतां ज्याचें । चित्त कांपे शत्रूचें ।अलंघ्य शासन ज्याचें । करी दुष्टांचें खंडन ॥४१॥जो धर्में दंड्या दंडी । अदंड्याते न दंडी ।लोभें क्रोधें द्रव्य न जोडी । धर्म जोडी सदैव ॥४२॥करी शिष्टाचें पालन । दीनां देई धन ।पंग्वंधांचें रक्षण । करी सदय मन ज्याचें ॥४३॥अर्थें धर्म संपादी । धर्मे अर्थ संपादी ।कोणा न करी भेदी । राहे आनंदी सदैव ॥४४॥धर्मार्थाविरोधेंकरून । करी काम पूर्ण ।सदा राहे प्रसन्न । ज्याचें मन खिन्न नसे ॥४५॥तो करी सांग याग । कधीं न होती व्यंग ।परी वाढे ज्याचा राग । तया विराग न होईल ॥४६॥ऋतुकाळीं भार्यागमन । यज्ञशेष मद्यमांससेवन ।हें अपूर्व वेदवचन । असें मानून वागे तो ॥४७॥असा तो राजवर्य । नेणें विधीचें तात्पर्य ।मानी स्वर्ग ऐश्वर्य । कार्याकार्य न विचारी ॥४८॥मद्यमांसभक्षण । आणि स्वभार्यागमन ।हें सर्वां मनापासून । आवडे पूर्वसंस्कारें ॥४९॥फिरावें यापासून । निवृत्ति व्हावी म्हणून ।वेदें संकोच करून । हें विधान सांगितलें ॥५०॥सर्वकाल सर्व स्त्रियांतें । भोगितील म्हणूनी नरातें ।ऋतुकालीं स्वस्त्रीतें । सेवावें असें वेद वदे ॥५१॥वर्जितां इतर स्त्रियांसी । भोगितां स्वस्त्रियेसी ।हा एक संकोच नरासी । वेद दावी निश्चयें ॥५२॥माझी स्त्री म्हणोन । अहोरात्र करितील गमन ।ऋतौ भार्यामुपेयात् म्हणोन । दुसरा संकोच केला हा ॥५३॥भय वाटावें म्हणून । शास्त्रें केलें शासन ।ते उल्लंघितां दारुण । नरकभय येतसे ॥५४॥( श्लोक ) ॥ येsपि गच्छंति रागांधा नरा नारीं रजस्वलां ।पर्वण्यप्सु दिवा श्राद्धे ते वै न्रकगामिन: ॥५५॥जरी द्वेषादिकेंकरून । किंवा अप्रीती मानून ।न करी भार्यागमन । तया दोष वदे शास्त्र ॥५६॥( श्लोक ) ॥ ऋतुस्नातां तु यो भार्यां संनिधौ नाधिगच्छति ।घोरायां भ्रूणहत्यायां पच्यते स न सशंय: ॥५७॥ही केली व्यवस्था । हा अपूर्व विधी नसतां ।मूढ तत्त्व नेणतां । आसक्तता ठेविती ॥५८॥मद्यमांसमैथुनापासून । निवृत्त व्हावा जन ।असें शास्त्राचें प्रतिपादन । भूपनंदन नेणे तो ॥५९॥अनेक स्त्रिया वरून । ऋतुकालीं करी गमन ।पशुसंस्था करून । मांस भक्षन करी तो ॥६०॥अभिष्टोमादि करून । नित्य करी सोमपान ।म्हणे मी अमर होऊन । स्वर्ग भोगीन निरंतर ॥६१॥असी ज्याची कुबुद्धी । नोहे तयासी शुद्धी ।वांया जोडी उपाधी । जाणे सुधी सुबाहु हें ॥६२॥सुबाहू म्हणे भ्राता । संसारी बुडाला आतां ।याला काढावा वरता । तरीच बंधुता साजेल ॥६३॥हा न्यायें राज्य करी । यज्ञ याग दान करी ।धर्में वागे जरी । तरी बहिर्निष्ठ सर्वथा ॥६४॥पशुभोग्य जे विषय । ते सुख देतील काय ।तरी ही भ्रांती होय । याला उपाय करावा ॥६५॥अनर्थ करवी धन । विषय भोगवी धन ।गर्व ताठा करवी धन । एक धन घात करी ॥६६॥तरी आतां ध्यान सोडावें । त्याच्या समीप जावें ।त्याचें धन लुटावें । मग विरागी होईल हा ॥६७॥असा निश्चय करून । जडमूढता सोडून ।सुबाहू नगरीं येऊन । बोले वचन राजाप्रति ॥६८॥म्हणे मी ज्येष्ठ भ्राता । मी राज्य करीन आतां ।हें नये तुझ्या चित्ता । तरी वांटा दे मला ॥६९॥अलर्क म्हणे तयाला । पितयानें राज्य दिल्हें मला ।तें मी न देईन तुला । तूं जा तपाला वनांतरीं ॥७०॥भूतळीं राजा मी एक । तुला देवूं काय भीक ।तुला जड म्हणती लोक । राज्यालायक तूं न होसी ॥७१॥जरी तूं क्षत्रिय अससी । तरी युद्ध करी मजसी ।घेई आपुल्या भागासी । नातरी तपासी चाल वनीं ॥७२॥तुम्ही कपटी कळलें आतां । हेंचि पूर्वीं कळतां ।तुमची बरीच व्यवस्था । करितां येती यथार्थ ॥७३॥तुम्ही दीन म्हणून । करीत होतों पाळण ।हें तुमचें कपटी मन । आतां कळोन आलें मज ॥७४॥तूं आतां येथून । शीघ्र जा निघोन ।असें निर्भर्त्सवचन । सुबाहू ऐकून फिरला ॥७५॥काशिराजापाशीं जाऊन । तया सर्व सांगून ।सुबाहू म्हणे साह्य करून । द्या मिळवून माझा भाग ॥७६॥आम्ही एकापासून । चार झालों उत्पन्न ।आम्हां तिघां अव्हेरून । राहे राज्य करून एकला ॥७७॥मागतां माझाही । मला भाग देत नाहीं ।याला शिक्षाही । द्यावी मही हिसकूनी ॥७८॥तरी तूं सहाय करी । मी होतो पुढारीं ।तूं किमपि अंतरीं । भय न धरी सर्वथा ॥७९॥मी योगी असें । मनीं आणीन जसें ।सिद्धीस नेईन तसें । जय वसे बरोबर ॥८०॥तया म्हणे काशीराजा । मी मांडलीक राजा ।सार्वभौम बंधू तुझा । तेथें माझा काय पाड ॥८१॥सुबाहु म्हणे तयासी । साह्य करावें दीनासी ।हा धर्म तुम्हांसी । दिला असे ईश्वरें ॥८२॥तो धर्म स्वीकारितां । जरी धर्मयुद्ध करितां ।रणीं ये पंचता । तरी मुक्तता मिळेल ॥८३॥युद्धीं शत्रु जिंकितां । सर्व राज्य ते हातां ।स्वर्ग मिळे रणीं मरतां । उभयतां तोटा नाहीं ॥८४॥मला राज्य मिळतां । तुला न विसरेन सर्वथा ।असें तया सांगतां । म्हणे आतां ऐक सुबाहो ॥८५॥पूर्वीं मी जाऊन । अलर्कासी भेटेन ।बुद्ध्या शिष्टाई करीन । भाग घेई मागून ॥८६॥जरी तो न ऐकेल । भाग तुझा न देईल ।तरी युद्ध होईल । हा बोल आवडे कीं ॥८७॥मग सुबाहु बोले । हें मज आवडलें ।मग दोघे चालिले । चतुरंग सेना घेऊनी ॥८८॥पूर्वीं काशीराजा जाऊन । त्या अलर्का भेटून ।शिष्टाई करून । म्हणे भागून दे राज्य ॥८९॥अलर्क म्हणे युद्धावांचून । न दे राज्य भागून ।असें वचन ऐकून । ये परतून काशीराजा ॥९०॥सुबाहूसी कळवून । युद्धाचा निश्चय करून ।चतुरंग सेना घेऊन । नगरा वेढून राहिला ॥९१॥अलर्क तें पाहून । स्वयें ये सेना घेऊन ।म्हणे करीन कंदन । मी बांधीन दोघांस ॥९२॥अचाट सामर्थ्य योग्याचें । स्वल्प सैन्य काशीराजाचें ।परी पाहतां अलर्काचें । मन खचे सर्वथा ॥९३॥वाटे समुद्र लोटला । अलर्क मनीं खचला ।म्हणे हा नावरेल मला । पूर्वींच झाला अविचार ॥९४॥या वेळीं आतां । याला शरण रिघतां ।तरी जाईल श्लाघ्यता । उपहास्यता होईल ॥९५॥आतां मागे न हटावें । यावरी सैन्य लोटावें ।यत्नें सैन्य मारावें । मग धरावे हे शत्रु ॥९६॥असा निश्चय करून । पुढें सैन्य लोटून ।अलर्क करी दारुण । त्याशीं रण जोरानें ॥९७॥दृष्टी पडतां सुबाहुची । सेना काशीराजाची ।परवा न धरी शत्रुंची । गणना बाणांची न करी ॥९८॥अलर्काची सेना । धाडिली यमसदना ।सर्व मुकती प्राणा । नसे कोणा सामर्थ्य ॥९९॥सर्व किल्ले फोडून । खंदक भरून ।तटबंदी तोडून । दरवाजे मोडून टाकिले ॥१००॥राजवाडे पाडून । रक्षकां झोडून ।सैन्यांतें दवडून । ध्वज तोडून टाकिती ॥१०१॥कित्येक भेदानें फोडिले । कित्येक दानें वळविले ।कित्येक सामें मेळविले । धाकें पळविले कित्येकां ॥१०२॥योगाचें सामर्थ्य अचाट । फोडविले किल्लेकोट ।घाली कोशांची लूट । पाडूनी फूट सुबाहू ॥१०३॥जे जे आपुले मानिले । ते ते सर्व उलटले ।अलर्काचें मन भ्यालें । म्हणे हें झालें विपरीत ॥१०४॥( श्लोक ) ॥ विपाको दारुणो राज्ञां शत्रुरल्पोप्यरुंतुद: ॥उद्वेजयति सूक्ष्मोsपि चरणं कंटकांकुर: ॥१०५॥जो आपुल्या पदरचा । काशिराजा मानिला साचा ।तो मित्र हा शत्रूचा । केला आमुचा विश्वासघात ॥१०६॥सेनाही तिकडे वळली । ही वार्ता मला कळली ।माझी शक्ती गळली । मर्यादा टळली सत्याची ॥१०७॥प्रधानादिक फुटले । सर्व कोश लुटले ।आतां बळ खुंटलें । मन विटलें आतां माझें ॥१०८॥हा आला कर्माचा भोग । हा मोठाच हृद्रोग ।रणीं होतां भंग । कासया मग रहावें ॥१०९॥संभावितांची अपकीर्ती ॥ होतां जाणावी तीच मृती ।अलर्क म्हणे आतां स्थिती । होतां भीती वाटते ॥११०॥इति श्रीदत्तमाहात्म्ये त्रिंशोsध्याय: ॥३०॥॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP