श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४५ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:
परतंत्र असोनी जीव । होऊं म्हणती चिरंजीव ।
वेदधर्मा म्हणे जंव । तत्वभाव न कळला ॥१॥
देहास आत्मा म्हणती । अजरामरता इच्छिती ।
परी देहाची स्थिती । भंगे ती क्षणोक्षणीं ॥२॥
निगमा: प्रलयोत्पत्ती कथयन्ति प्रतिक्षणं ।
पांचभौतिकदेहस्य जडस्याग्नेरिवार्चिषाम् ॥३॥
असा एवढा मूढ असुर । करी मृत्युप्रतीकार ।
परी मृत्यु आला घोर । कोण पामर वारी तया ॥४॥
भाग्यवंत जो असे । तो देवाचे पाय धरीतसे ।
तया मृत्यु भीतसे । इतरां असे मृत्युभय ॥५॥
अजत्व आपुलें जो जाणे । भगवत्पदीं ऐक्यपणें ।
ठेवी आपुलें येणें । तो नेणें जन्ममृत्यु ॥६॥
तो होईना कां सुर । जो नेणें प्रत्यग्विचार ।
जाणावा तो क्रूर असुर । तया अमर कोण म्हणे ॥७॥
अशा नाशवंत देहासी । अजरामर करावयासी ।
हुंडासुर इच्छी त्यासी । दैवें मृत्यु पातला ॥८॥
तो सैन्य सर्व घेऊन । रथीं आपण बैसून ।
सर्व शस्त्रें घेऊन । सन्नद्ध होऊन चालिला ॥९॥
तो तेथें शत्रुसमोर । वेगें आला हुंडासुर ।
तंव पाहिला नहुषवीर । शूर इंद्ररथावरी ॥१०॥
भासे तो सूर्यापरी । धनुर्बाण घे करीं ।
किरीट कुंडलें शोभती शिरीं । पाहतां सुरारी डचकला ॥११॥
तो हस्ति अश्व रथ पदाती । देऊनियां सेनापती ।
पाठवी असुरपती । तेही जाती युद्धार्थ ॥१२॥
ते दानव महाशूर । चालिले देवसैन्यावर ।
करीती शब्द घोर । ब्रह्मांडोदर गाजविती ॥१३॥
दैत्य करिती वाद्यगजर । कोलाहलें भरे दिगंतर ।
करिती घोर समर । ते अमरशत्रुशीं ॥१४॥
ते वर्म भेदिती असुर । सोडिती शूल तोमर ।
शक्ती परशू तलवार । गदा शर सोडिती ॥१५॥
ते बलिष्ठ असुर । देवां करिती जर्जर ।
देती नाना शस्त्रांचा मार । अनिवार असुर ते ॥१६॥
वैरूप्य करिती परस्पर । शस्त्रें तोडिती परस्पर ।
असें युद्ध झालें घोर । नभीं अमर पाहती ॥१७॥
दैत्य तेजस्वी असती । देवा पराभूत करिती ।
मग खचे देवांची शक्ती । न राहती समोर ते ॥१८॥
हनन करितां दैत्यांनीं । युद्ध सोडिलें देवांनीं ।
देव आर्त झाले तें पाहूनी । पुढें होऊनी नहुष ये ॥१९॥
म्हणे रे रे हुंडासुरा । माझेवरी लोटीं असुरां ।
करितां तयांचा चुरा । यमपुरा धाडितां ॥२०॥
तुम्हीं असुर महापाप । द्विजदेवां देतां ताप ।
तुह्मांवरी म्यां केला कोप । तुम्ही झोंप उघडा आतां ॥२१॥
तुम्हीं सुरांचीं घेतलीं पदें । तुम्ही माजलेंत मदें ।
आतां तुम्हां रगडून पादें । देवपदें हिसकून घेतों ॥२२॥
अनार्याचें करितां कदन । संतोषे जनार्दन ।
असें नहुष बोलून । शरसंधान करीतसे ॥२३॥
दैत्य नानायुधें सोडिती । नहुष तत्काळ तोडी तीं ।
असुर त्याशीं भिडती । बळें पडती त्यावरी ॥२४॥
राजा मग घे इंद्रचाप । टणत्कारूनी करी कोप ।
टणत्कारें दैत्यां ये कंप । आपोआप भ्रांत होती ॥२५॥
राजा तेजस्वी प्रबळ । निर्दाळी तो दैतकुळ ।
चवतळले महाखळ । चतुरंगवळ घेऊनी ॥२६॥
सैन्य लोटिती नहुषावर । नहुष तरी महाधीर ।
महाशूर महावीर । करी जर्जर दैत्यांसी ॥२७॥
दैत्य काळाला न जुमानिती । ते ह्या नहुषाला भिती ।
बाणजाळे सोडिती । आच्छादिती भूपाला ॥२८॥
पडे अंधकार घोर । ओळखूं नये परस्पर ।
मग नहुष महावीर । तोडी शरजाळ तेव्हां ॥२९॥
आयुधे दैत्यांचीं तोडी । कित्येकांचे चाप मोडी ।
गजांची गंडस्थळें फोडी । खालीं पाडी निषाद्या ॥३०॥
त्या दानवां पाशें ओढी । घोड्याचे गळे तोडी ।
ध्वजांसह रथ मोडी । वीरां पाडी भूमीवरी ॥३१॥
बळें तयांचीं कवचें फोडी । शस्त्रांसह हात तोडी ।
एकाएकीं मान खंडी । पोटें फोडी तयांचीं ॥३२॥
दैत्य मग देती दडी । तयांपुढें मारी उडी ।
दडातांही शोधून काढी । भूमीवरी पाडे धडधडा ॥३३॥
सहसा दैत्यांची बांधी मुंडी । तयां फरफरां ओढी ।
सर्वांची तोखोड तोडी । शौर्य झाडी तयांचें ॥३४॥
तो ममद्धकोपें हांक फोडी । म्हणे भोगा पापाची जोडी ।
आली शेवटली घडी । सद्धर्मी गोडी ठेवी आतां ॥३५॥
ये मृता: समरे धर्मे शुद्धास्ते सूर्यमंडलं ।
भित्त्वा याता विरजसो योगज्ञा यतिनो यथा ॥३६॥
हें आतां मनीं आणून । पुढें समोर राहून ।
युद्धीं देह सोडून । चला भेदून सूर्यमंडळ ॥३७॥
स्वर्णस्तेय ब्रह्महनन । सुरापान गुरुतल्पगमन ।
ह्या पापांचें होईल क्षालन । युद्धीं मरन येतां धर्में ॥३८॥
असें प्रेमळ बोलून । धर्मयुद्ध करून ।
केलें दैत्यांचें हनन । सरसरोन नहुषानें ॥३९॥
त्या दैत्यांच्या सेनेचा भंग । करून टाकी तो सवेग ।
असें सैन्य मारितां मग । रत्काचे ओघ चालिले ॥४०॥
छिन्न भिन्न होतां वीर । करिती मग हाहाकार ।
तें देखूनी हुंडासूर । ये समोर नहुषाच्या ॥४१॥
हुंड गर्जोनी बोलत । असे तूं मनुष्याचा पोत ।
व्यर्थ सांडिसी जीवित । माय तात रडतील जा ॥४२॥
मी स्वछंद लोकशास्ता । माझा प्रताप नेणसी पोता ।
जरी वांछिसी जीविता । तरी आतां शरण ये ॥४३॥
तूं मतिमंद बाळ । म्हणोनी सांगतों एक वेळ ।
नको मरूं निष्फळ । पदकमळ धरी माझे ॥४४॥
जरी येसी शरण । तरी देतों जीवदान ।
नातरी देवांसहवर्तमान । तुझें हनन करीन मी ॥४५॥
अशी केवळ भीति । घालितसे दैत्यपती ।
नहूष म्हणे तूं मंतमती । नेणसी गती सोमवंशाची ॥४६॥
तूं वाचाळपणा करिसी । येणें काय मिळविसी ।
जरी तूं शूर अससी । करीं मशीं युद्ध आतां ॥४७॥
तूं आत्मस्तुती करिसी । परे धर्मतत्व नेणसी ।
तूं महापापी अससी । स्वदोष मानसीं विचारीं ॥४८॥
विरहदु:ख जननीसी । तूं देशी पापिया ॥४९॥
जो मनोरथ करून । मला आलासी घेऊन ।
तो तुझा झाला कीं पूर्ण । मला कोण मारील ॥५०॥
अत्रिज जो श्रीदत्त । तो मला राखी संतत ।
मूढा तूं माझा कसा घात । क्रिसी मृतप्राय तूं ॥५१॥
मलिना: कुदृशो हिंस्त्रा घातका: परवंचका: ।
स्वकर्मणैव ते सर्वे म्रियन्ते सहसा स्वयं ॥५२॥
खळा असा तूं घातुक । मी झालों तुझा अंतक ।
आतां दावीं युद्धकौतुक । न धरीं धाक मानसीं ॥५३॥
मृत्युनें दिल्हें आमंत्रण । म्हणोनी जिव्हेसी फांटे फोडून ।
करिसी असें वल्गन । आतां वचन पुरें हें ॥५४॥
तूं मज ठावा अससी । आतां न सोडीं युद्धासी ।
असें सांगोनी दैत्यासी । ओढी चापासी आकर्ण ॥५५॥
जोडी देवदत्त बाण । सोडी असुरा लक्षून ।
तोडी त्याचें तनुत्राण । मोडी शरासन तयाचें ॥५६॥
दैत्य कंकपत्रांचित । बाण सोडी असंख्यात ।
तितुकेही अकस्मात । आयु:सुत तोडितसे ॥५७॥
दैत्य मग काय करी । आसुरी माया पसरी ।
नहुषासी भ्रम करी । तो अमरारी तेधवां ॥५८॥
जेथें नसे तेथें भासे । जेथें भासे तेथें नसे ।
दैत्य ख्याल करी असे । जाणतसे नहुष तो ॥५९॥
तो हंसोनी म्हणे मातलीस । जेथें पाहसी दैत्यास ।
त्याच्या उलट रथास । फिरवीं खास मारितों ॥६०॥
तें राजपुत्राचें वचन । त्या मातलीनें मारून ।
उलट फिरविला स्यंदन । मग हनन करी नहुष ॥६१॥
महावीर नहुष । करी आसुरी विद्येचा नाश ।
मग समोर नहुष । भासे दैत्यास भास्करसा ॥६२॥
म्हणे योद्धा हा दुर्धर । मला नाटोपे हा वीर ।
असें म्हणूनी असुर । सोडी अपार शस्त्रें तो ॥६३॥
राजा नैसर्गिक बळेंकरून । टाकी शस्त्रें तोडून ।
मग दैत्य शक्ति तोमर बाण । सोडी प्राणहारक ॥६४॥
राजा न लागता क्षण । एका बाणें दे तोडून ।
सवेंचि बाण सोडून । छिन्न भिन्न करी दैत्या ॥६५॥
तो तद्देह भयंकरसा । शोभे पुष्पित पळस जसा ।
मूर्च्छा येऊनी सहसा । दैत्य रथावरी पडे तो ॥६६॥
जरा वारा घेऊन । पुन: सावधान होऊन ।
अमित बाण सोडून । ठेवी आच्छादून राजाला ॥६७॥
थोर आरोळी देऊन । म्हणे मी शत्रु जिंकून ।
आतां विजयी होवून । समाधान पावलों मी ॥६८॥
मामाप्नुवन्श्रीभूतिजया इति । असा तो दैत्यपती ।
गर्जना करी खोटी । प्रौढी मोठी दाऊनी ॥६९॥
ते देव गर्जना ऐकून । नहुषा न पाहून ।
जाहले दीनवदन । मुनिगण तेही तसे ॥७०॥
महान्पूर्वीं पराक्रम । ज्यानें दाविला नि:सीम ।
त्याच बालाचा होम । दैत्यपराक्रम करी कीं आतां ॥७१॥
हे सर्व आम्ही सुर । आलों ज्याचे भरंवशावर ।
तो आतां न दिसे शूर । राजकुमार कोठेंही ॥७२॥
ते अमरादिक दीन । होतां उठे आयुनंदन ।
सोडूनियां एक बाण । तोडी बाणजाळ तें ॥७३॥
विमर्शत्त्रिदशगण । त्यांचा संशय निवारून ।
दैत्याचें धनु तोडून । सहसा टाकून दे नृप ॥७४॥
पुन: तत्सारथी घोडे । मारूनी करी रथाचे तुकडे ।
मग दैत्य अन्यरथीं चढे । त्याचेही तुकडे करी तो ॥७५॥
ते सिद्धादिक पाहून । नहुषा देती आशीर्वचन ।
स्वस्त्यस्तु ते जय म्हणून । सुप्रसन्न होवूनी ॥७६॥
दानव मग शक्ती घेऊन । दे नहुषावरी सोदून ।
नहुषें बाण सोडून । तिलश: खंडन केलें तिचें ॥७७॥
मग तो नृपनंदन । वसिष्ठातें वंदून ।
भावें दोनी कर जोडून । दत्ता चिंतून बोलतसे ॥७८॥
मी अन्या न जाणतों । दत्ता तुझा मी म्हणवितों ।
आतां तुलाच स्मरतों । तरी दैत्य तो मरो आतां ॥७९॥
असें नमन करून । अर्धचंद्राकार दोन बाण ।
धनुष्यास जोडून । दे सोडून असुरावरी ॥८०॥
ते दैत्येश्वराचे हातावर । लागले दोनी शर ।
हात तोडूनी सत्वर । भूमीवर पडती ते ॥८१॥
तो अतिभयंकर । शब्द करूनी घोर ।
तोंड पसरून नृपावर । धांवे असुर भक्षावया ॥८२॥
नृपति पुन: दोन बाण । तसेचि तीक्ष्ण सोडून ।
दोनी पाद तोडून । टाकी क्षण न लागतां ॥८३॥
तो ओष्ठ चावूनी असुर । तोंड करूनी वर ।
सर्पापरी नृपावर । आला सत्वर भक्षावया ॥८४॥
श्रीदत्तपद चिंतून । नृप दे ऐंद्री शक्ती सोडून ।
तिणें तो भग होऊन । गेला मरून हुंडासुर ॥८५॥
सुविस्मित होती मुनीश्वर । आश्चर्य करिती सुर ।
पुष्पें वर्षती नृपावर । जयजयकार करूनी ॥८६॥
प्रसन्न होती सुर । म्हणती नृपा घे वर ।
नृप म्हणे धर्मावर । श्रद्धा निरंतर असावी ॥८७॥
त्या नृपोत्तमाप्रती । देव तथास्तु म्हणती ।
आज्ञा घेऊनी जाती । स्वर्गाप्रती स्वस्थानीं ॥८८॥
हातीं माळ घेऊन । रंभेसह येऊन ।
अशोकसुंदरी नमून । बोले वचन नहुषाप्रती ॥८९॥
मी ही तनू तुला अर्पिली । अंगीकारीं ही आपुली ।
असी तिची ती बोली । ऐकूनी बोले तो नहुष ॥९०॥
मीं वरितां येथें तुज । दोष लागे मज ।
गुरुआज्ञा झालिया मज । मग तुज वरीन मी ॥९१॥
तें आश्वासन मानून । ती तथास्तु म्हनून ।
रंभेसह रथारोहण । करून त्यासवें चालिली ॥९२॥
आनंद पावूनी नृपती । लुटी असुरांची संपत्ती ।
आणूनी दे वसिष्ठाप्रती । करून प्रणती बोले तो ॥९३॥
जी आधार आपुला । होता परिपूर्ण मला ।
म्हणून असुर मारिला । जय मिळाला दत्तवरें ॥९४॥
मी मतिमंद अधीर । हा तुमचा कृपावर ।
असें वदता राजकुमार । मुनीश्वर हृष्ट झाला ॥९५॥
मग तच्चरणावरी । पडे अशोकसुंदरी ।
म्हणे मला नृपाचे पदरीं । तुम्ही घाला मुनीश्वर हो ॥९६॥
आनंदें मग मुनी वदे नहुषा । ही असे निर्दोषा ।
ही आवडे मला स्नुषा । स्वीकारीं योषारत्न हें ॥९७॥
तूं आजची वरीं इला । सुमुहूर्त असे ये वेळा ।
नृप तथास्तु असें वदला । मग करविला स्वयंवर ॥९८॥
त्याप्रती म्हणे मुनी । तूं स्त्रियेसह पुरा जाऊनी ।
मायबापां भेटूनी । राज्य करूनी राहें सुखें ॥९९॥
असें तयाचें वचन । नहुषें स्वीकारून ।
अरुंधतीवसिष्ठाचे चरण । धरून प्रेमाश्रू गाळी ॥१००॥
संपन्नैश्वर्य असून । मायबाप गेले अंतरून ।
आपण मायबाप होऊन । स्नेहें पाळण केलें तें कोण विसरे ॥१०१॥
जे आजपर्यंत । स्नेहें पाळण केलें तें सतत ।
घोळतसे माझ्या मनांत । तेणें दु:खित होतसें मी ॥१०२॥
नृपति असें स्नेहें बोले । वसिष्ठें तया तत्व उपदेशिलें ।
मग तया पाठविलें । ते आले स्वनगरीं ॥१०३॥
भेटे तया मायबापा । सर्व सांगूनी म्हणे कृपा ।
मजवरी करा हो मायबापा । दैवें अपराधी असें मी ॥१०४॥
जें मद्दूरगमनादिक । तें जाणा सर्व दैविक ।
आयुराजा म्हणे तो शोक । नसे आम्हां दु:ख दत्तवरें ॥१०५॥
विसरे मी शोकमोहासी । असें म्हणून नहुषासी ।
देऊनी राज्य वनासी । चाले भार्येशीं सह आयु ॥१०६॥
तेथें तप आचरोनी । उभयही ज्ञानी होऊनी ।
दत्तरूपीं जाती मिळोनी । भक्तिप्रभाव हा दीपका ॥१०७॥
जगद्वंद्य हो नहुष । येथें राज्य करून देवेश ।
त्याच देहें झाला खास । काय भक्तांस न मिळे बरें ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये पंचचत्वारिंशोsध्याय: ॥४५॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2016
TOP