श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ६ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे शिष्याप्रती । त्वां ऐकावें एकचित्तीं ।
पुत्र सांगे पित्याप्रती । तेची उक्ती सांगतों ॥१॥
सह्याद्रीवरी अर्जुन । जातां देखे पदचिन्ह ।
वज्रांकुश ध्वज नलिन । शोभायमान उमटलें ॥२॥
पाहतां सचिन्ह पाउलें । अर्जुनाचें मन दाटलें ।
अंगीं रोमांच उठले । नेत्रीं सुटले प्रेमाश्रु ॥३॥
मन झालें निश्चळ । इंद्रियें न करिती खेळ ।
बुद्धी झाली विमळ । राहिली केवळ चेष्टाहीन ॥४॥
अंतर्बाह्य नेणें कांहीं । मीतूंपण ठावें नाहीं ।
पददर्शनाची गती ही । योग्यां नाहीं ठावी जी ॥५॥
दैवयोगें ये देहावर । करीं तया नमस्कार ।
तेथें लोळे सादर । टाकी अंगावर ती माती ॥६॥
म्हणे अहो धन्य हे मही । जें पद अलभ्य देवांलाही ।
तें अश्रांत सेवी ही । ऐसी नाहीं दुजी धन्या ॥७॥
रोमांचसे तृणांकुर । उभारून पाठीवर ।
सुचवी हर्ष निर्भर । कृपापात्र हे भूमी ॥८॥
तंव देखिले वृक्ष फलित । शाखाग्रें नम्र होत ।
म्हणे अर्जुन हे निश्चित । केवळ भागवत वाटती ॥९॥
पूर्वीं केला अपराध । ताठा धरोनी मदांध ।
म्हणोनी हा तमोंध । वृक्षजन्म दधिला ॥१०॥
असें मनीं आणून । फळें पुढें करून ।
शाखामस्तकें नमून । करिती वंदन भक्तीनें ॥११॥
हा पर्वत मनोरम । वाटे हा भागवतोत्तम ।
नित्य सेवी हा सत्तम । पुरुषोत्तमचरणरजा ॥१२॥
नित्य कंदमूल फळ । भगवंता दे स्वादुजळ ।
हा भाविक प्रेमळ । भक्त केवळ वाटे हा ॥१३॥
असें म अनीं चिंतून । चाले पुढें अर्जुन ।
चकोर चांदणें पाहून । आनंदघन होय जेवी ॥१४॥
तेवी आश्रम पाहोनी । वेदध्वनी ऐकूनी ।
पुढें अर्जुन येऊन । पाहे नयनीं भगवंता ॥१५॥
कोटी कंदर्प गाळूनी । मूर्ती ओतिली वाटे मनीं ।
मंद हास्य दिसे वदनीं । पाहतां मनीं हर्ष होय ॥१६॥
आजानुबाहु सुरेख । पहातां डोळां होय सुख ।
दृष्टी चिकटे सविवेक । सेवी चोख रूपामृत ॥१७॥
प्रफुल्ल कमलवदन । वाटे घ्यावें चुंबन ।
शरीर परम शोभन । वाटे आलिंगन दृढ घ्यावें ॥१८॥
दिसे दिगंबर मूर्ती । परम गोजिरी आकृती ।
तेथोनि न फिरे मागें वृत्ती । जेवी गती योगियाची ॥१९॥
मायेची करोनियां नारी । प्रेमें तिशीं क्रीडा करी ।
तें देखोनी पळती दुरी । अविचारी मुनी जे ॥२०॥
गर्गवचन स्मरून । हा खेळ जाणून ।
केवळ प्रेमळ अर्जुन । भाव धरोनी राहिला ॥२१॥
दत्त म्हणे जा निघोन । नातरी करीन ताडन ।
येरू तथास्तु म्हणून । श्रीचरण चुरूं लागे ॥२२॥
अंकीं ठेवून चरण । भावें करी संवाहन ।
जरी दत्त करी निर्भर्त्सन । तिकडे मन न देई ॥२३॥
जसी कां सती नारी । कोपें पती मारी तरी ।
सेवेसी न अंतरीं । न अंतरीं धरी तें ॥२४॥
प्रभूचे पाय चुरतां । नखमाणिकें चमकतां ।
हार्दतम जाय अस्ता । स्वरूपीं लीनता सहज हो ॥२५॥
सहज होतां सेवन । समूळ नासे अज्ञान ।
ज्ञानें भगवत्प्रेमबंधन । हो तें तोडून कोण टाकी ॥२६॥
ट अकी पदीं लोटूनि दत्त । तरी शिष्य न सोडित ।
जेवी लोहचुंबका धरित । तसा संसक्त होई राजा ॥२७॥
करी पादसंवाहन । मद्य मांस दे आणून ।
दे सुगंधस्रक् चंदन । फळें आणून देतसे ॥२८॥
निद्रा आळस सोडून । चरणीं मन लावून ।
न सांगतां अक्री सेवन । उच्छिष्ट पानप्रसाद घे ॥२९॥
त्याचें जाणाया अंतर । कौतुक करी ईश्वर ।
बाहु पाडी धरेवर । ईक्षणमात्रेंकरून ॥३०॥
हांसोनि बोले आपण । भूपा अरिष्ट हें दारुण ।
पळत जा येथून । येईल मरण वाटतें ॥३१॥
अशुद्ध संगाचें हें फळ । मी असें अमंगळ ।
कर्म बहिष्कृत केवळ । भक्ष्याभक्ष्यवर्जित ॥३२॥
मी उन्मत्त नग्म । नग्न स्त्रिये घेऊन ।
क्रीडा तिसीं करून । राहें अनुदिनीं भूपाला ॥३३॥
माझा संसर्गदोष । तुज लागला विशेष ।
तोचि करील प्राणशोष । नि:शेष तुला झळकोन ॥३४॥
ऐसें ऐकोनि वचन । गर्गोपदेश स्मरून ।
बोले नमस्कार करून । तो अर्जुन दत्तातें ॥३५॥
देवा व्यर्थ कां मोहविशी । समजलों मी मानसीं ।
लोकानुसारें वदसी । लीला दाविसी तसाच ॥३६॥
तूं सर्वात्मा पुरुष । घेशी मायेनें हा वेश ।
असोनियां निर्विशेष । सविशेष भाससी ॥३७॥
तूं अनघ निश्चळ । अनघा ही शक्ती केवळ ।
आपुल्यावरी घेसी आळ । जगज्जाळ आधाराची ॥३८॥
हें जग उपजेल जरी । जगीं असशील तूं तरी ।
हें तो मृगजळापरी । हें विकारी दृष्ट नष्ट ॥३९॥
तूं आणि विश्व चराचर । जो उभयांचें नेणे अंतर ।
तो भेददर्शी पामर । तो शास्त्रें बद्ध होतो ॥४०॥
नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध ।
एवं यथार्थ जाणें जो बुद्ध । तो हो अशुद्ध त्वत्सम ॥४१॥
अज्ञां दिसे हा भेद । त्यां बांधी धर्मे वेद ।
त्यांचे शिरीं विधिनिषेध । तूं तो निर्बाध सर्वथा ॥४२॥
देह जावो अथवा राहो । त्वद्रूपीं मन निश्चळ होवो ।
विपरीत भावना न राहो । हा निश्चय भगवंता ॥४३॥
ऐकूनी अर्जुनाचें वचन । श्रीदत्त प्रसन्न होऊन ।
धन्य रे तूं भूपनंदन । देतों वरदान माग आतां ॥४४॥
तूं भक्तीतत्व जाणसी । ह्मणोनि मज न सोडिसी ।
जिवलग तूं आवडसी । भक्त होसी निश्चळ ॥४५॥
जे माझे अनन्य भक्त । त्यांपाशीं राहें मी सतत ।
जे असती अभक्त । दु:खयुक्त ते होती ॥४६॥
तूं न धरितां देहस्वार्थ । सोडोनियां भोग्यार्थ ।
मत्सेवा केली यथार्थ । केलें सार्थक जन्माचें ॥४७॥
ऐसें बोलतां दत्त । राजा झाला पुलकांकित ।
निरिच्छ असून निश्चिंत । प्रारब्धप्रेरित वदे तो ॥४८॥
देवा जरी प्रसन्न होसी । देईं सर्व समृद्धीसी ।
यावें मला एकुलत्यासी । प्रजापालनसामर्थ्य ॥४९॥
अविरोधें धर्मार्थकाम । असावें यश नि:सीम ।
म्या व्हावें बलधाम । देवो मन्नाम नष्टलाभ ॥५०॥
धर्में प्रजापालन । व्हावें परचित्तज्ञान ।
स्मरती त्याला घडावें दर्शन । सर्वसिद्ध्यागमन असावें ॥५१॥
सहस्त्र बाहू असावें इच्छितां । जय मिळावा सर्वथा ।
इच्छित स्थानीं जाण्याकरितां । अकुंठित गती असावी ॥५२॥
सदा सर्वज्ञता असावी । स्वर्गीं पाताळीं गती व्हावी ।
कुमार्गीं प्रवृत्ती न व्हावी । सदा असावी सत्संगती ॥५३॥
अतिथी पूज्य यावें घरीं । अक्षय द्रव्य असावें भांडारीं ।
अरी नर रहावा भूमीवरी । व्हावें महीवरी साम्राज्य ॥५४॥
आयुष्य पूर्ण असावें । धारातीर्थीं मरावें ।
भवत्तुल्यानें मारावें । तुमचें असावे नित्य स्मरण ॥५५॥
भक्ती असावी भवच्चरणीं । सदोदित अव्यभिचारिणी ।
हेचि आवडी माझे मनीं । असें म्हणोनी नमस्कारी ॥५६॥
प्रभु ह्मणे हे दिले वर । तूं होसी सप्तद्वीपेश्वर ।
ऐसें बोलतां योगेश्वर । फुटले सुंदर दोन भुज ॥५७॥
मग प्रेमें दाटून । दृढ घेई देवाचें आलिंगन ।
आलिंगितां द्वैतभान । जाऊनी निश्चळ राहिला ॥५८॥
ओळखोनी अंत:स्थिती । वरदान आणूनी चित्तीं ।
त्यावरी माया सोडिती । पुन: उठविती तयातें ॥५९॥
श्रीदत्त म्हणे तयासी । त्वां जावोनि माहिष्मतीसी ।
राज्याभिषेक आपणासी । करवी विधिसी मदाज्ञेनें ॥६०॥
तथास्तु म्हणोन अर्जुन । भावें गमन करून ।
म्हणे शिरसा मान्य वचन । विस्मरण न व्हावें तुमचें ॥६१॥
माझें असावें स्मरण । आपले हे चरण ।
हेंचि माझें जीवन । येथें प्रमाण मन तुमचें ॥६२॥
जेवी बाळा सोडून । दुरावे जरी कुर्मीण ।
त्याचें करितां स्मरण । तया जीवन येतसे ॥६३॥
जीवन येतसे भक्तां । तुम्हीं मनीं आठवितां ।
जेवीं कुर्मिणीनें विसरतां । बाळें पंचता पावती ॥६४॥
कूर्मिणीला येवो भ्रमप्रमाद । तुम्ही ईश्वर स्वच्छंद ।
तुह्मां न ठावा भ्रमप्रमाद । साक्षी वेद देतसे ॥६५॥
तुमचे आज्ञेकरून । जीवावरी आवरण ।
घाली माया दारुण । ह्मणोनी भ्रमण पावती ॥६६॥
तीच माया तुम्हांपासीं । तिचें आवरण नये तुह्मांसी ।
लौकिक मायेसी । उपमेय जी ॥६७॥
स्वाधीन स्वाश्रय माया । अन्या ठेवी मोहुनियां ।
ती नावरी स्वाश्रया । लोकत्रया ठावें हें ॥६८॥
जैसा पाळला कुतरा । छु म्हणतां धरी परा ।
धन्यावरी नये त्याच्या घरा । सेवी त्यावरी न भोके ॥६९॥
जो होई तुझा भक्त । त्यापुढें माया हो अशक्त ।
मी तुझा भक्त व्यक्त । अव्यक्त माया काय करील ॥७०॥
माह्मां मायेचें नाहीं भय । आह्मां पुढें काळ काय ।
दैवरेषेवरी पाय । देवूं हे पाय आठवितां ॥७१॥
देवा योगक्षेमाची वार्ता । सोडूनि देवूं सर्वथा ।
जेथें तेथें तुझ्या कथा । गाऊं माथा नम्र करूनी ॥७२॥
असो आतां हें मागणें । सर्वथा आह्मां न विसरणें ।
आह्मां वांचवावें स्मरणें । हें गार्हाणें पुन: पुन: ॥७३॥
असें म्हणोनी अर्जुन । चाले मागें पाहून ।
जेवीं सासुर्या जातां सून । पुन:पुन: फिरोनि मागें पाहे ॥७४॥
स्मरण ठेवूनी अंतरीं । राजा आला रेवातीरीं ।
प्रवेशला माहिष्मतीपुरीं । येती सामोरी पौरमंत्री ॥७५॥
देव ऋषी आणि महर्षी । त्यांतें आणीलें संतोषीं ।
त्यांहीं मंत्रवद्यघोषीं । अभिषेक केला विधीनें ॥७६॥
स्वर्णपवित्रयुक्त स्रेखा । औदुंबराची ओली शाखा ।
तिणें अभिषेकिती तीर्थोदका । नाना शाखामंत्रेंसी ॥७७॥
त्यांसी अभिषिक्त अर्जुन । देई क्षेत्र - गो - स्वर्ण ।
दीनांघकृपणा धन । देई अन्न यथेच्छ ॥७८॥
वसुरुद्रादित्य देव । आले मरुद्गण विश्वेदेव ।
त्यांहीं अभिषेकिला राव । महोत्सव तेव्हां झाला ॥७९॥
महाराज अर्जुन । सर्वांचें करी पूजन ।
ते देती आशीर्वचन । सुखी आयुष्यमान् हो ह्मणुनी ॥८०॥
नाना राजे करभार । घेऊनि आले समोर ।
डांगोरा पिटे नृपवर । ते सर्व पौर ऐकतां ॥८१॥
माझ्या वांचोनी जो करीं । जरी कां शत्र धरी ।
किंवा जो हिंसा चौर्य करी । त्याला मारीन ठार मी ॥८२॥
ऐसें ऐकोनी वचन । शस्त्रें देती टाकून ।
भयें पाळिती वचन । लीन होवोन सर्वदा ॥८३॥
तोचि झाला क्षेत्रपाळ । ग्रामपाळ पशुपाळ ।
सेना धान्य धनपाळ । विप्रपाळ तोचि झाला ॥८४॥
अग्नि चोर रिपु व्याळ । यांहीं प्रजा होता व्याकुळ ।
नाना रूपें धरोनी संभाळ । करी भूपाळ विपद्धर्ता ॥८५॥
नष्ट लाभे नाम घेतां । दर्शन दे ध्यान करितां ।
सर्वां झाली अरोगता । वृष्टी पडे यथाकाळीं ॥८६॥
सुफळा झाली धरा । भूपें यज्ञें भूसुरामरां ।
तृप्त केलें न्यायें नरा । पाळी फिरे जो त्रिलोकीं ॥८७॥
माघ कृष्ण अष्टमीदिनीं । अनघाष्टमी व्रत करूनी ।
ब्राह्मणां भोजन दे दुसरे दिनीं । प्रतिवर्षीं नियमानें ॥८८॥
जो हें अष्टमीव्रत करील । तो नर सुखी होईल ।
सकलाभिष्ट लाभेल । हे बोल मानील जो ॥८९॥
यद्दिनीं मिळाला वर । तद्दिनीं उत्सव करी थोर ।
श्रीदत्तदर्शन वारंवार । करी प्रेमभर होवोनी ॥९०॥
जो परम दुर्धर्ष तेजस्वी । बळी सहस्त्रकर कीं रवी ।
विजयी सुकीर्ति मिरवी । नुरवी जो दु:खवार्ता ॥९१॥
ज्याला नसे विस्मरण । करे शरणागतरक्षण ।
सर्वैश्वर्य भोगून । गाथा वदवीं जगीं हे ॥९२॥
( श्लोक ) न नूनं कार्तवीर्यस्य । गतिं यास्यंति पार्थिवा: ।
यज्ञदानतपोयोगश्रुतवीर्यजयादिभि: ॥९३॥
एके दिवशीं सहस्त्र नारी घेवोनियां रेवातीरीं ।
स्वच्छंदें अर्जुन क्रीडा करी । तंव देवारी रावण आला ॥९४॥
अर्जुन हा महाशूर । नारदवाक्यें जाणूनी निशाचर ।
आला करावया समर । तया देखती त्या नारी ॥९५॥
अर्जुनें नेत्रसंकेत करून । स्त्रियांकरवीं करविलें बंधन ।
बाळा खेळावया लागून । ठेविला नेऊन सदनांत ॥९६॥
पोर धरिती त्याच्या करा । भोवंडिती त्या निशाचरा ।
हें कळलें कुबेरा । प्रार्थुनी नृपवरा सोडविला ॥९७॥
असा बळी तो अर्जुन । नगरींही नित्य राहून ।
नानारूपीं सप्तद्वीप धुंडोन । राज्यपालन करी धर्में ॥९८॥
नसते कार्तवीर्याय । हा तयाचा मंत्र होय ।
येणें सर्वारिष्टक्षय । होय हा निश्चय जाणावा ॥९९॥
प्रणवबीज लावून । जपतां होय भवबंधमोचन ।
र्हींबीज लावून । जपतां सर्वैश्वर्य मिळेल ॥१००॥
ऐंबीज लावितां वाक्सिद्धी होई । सर्वविद्यापारंगत होई ।
लक्ष जपतां कार्यसिद्धी होई । मंत्रशक्तिप्रभावें ॥१०१॥
श्रींबीजें लक्ष्मी मिळे । द्रांबीजें अपमृत्यु टळे ।
रोगपीडा पळे । आरोग्य मिळे निश्चयें ॥१०२॥
वषट्बीजें वशीकरण । वौषट्बीजें होई आकर्षण ।
हुंबीजें होई विद्वेषण । फट्बीजें उच्चाटाण होतसे ॥१०३॥
ठ: ठ: बीजें होय स्तंभन । खें खेंबीजें होय मारण ।
नम:बीजें होय स्तंभन । होय पोषण स्वाहाबीजें ॥१०४॥
सौ:बीजें होय क्षोभन । क्लींबीजें वशीकरण ।
ग्रहभूतादि निवारण । हुंफट्बीजें होईल ॥१०५॥
अक्षिरोग मेह सन्निपात । श्लेष्मज्वर क्षय कुष्ठ ।
गुल्म पैत्तिक वात । देश कालोत्थ संगज ॥१०६॥
हे रोग समस्त । किंवा त्रिविध उत्पात ।
प्रणवबीजें होती शांत । परप्रयोगाचा अंत होईल ॥१०७॥
दत्त निवेशित नष्ट प्रयुक्त । तें सहस्त्र जपें मिळे वित्त ।
घनदीप लावून एकांत । जपतां साधे प्रयोग ॥१०८॥
( श्लोक ) । कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥१०९॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृते षष्ठोध्याय: ॥६॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2016
TOP