करुणासागर - पदे ५१ ते १००
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
काळांतरीं देसी भिक्षा । हें न साजे सर्वदक्षा ॥ आश्रितांच्या कल्पवृक्षा । दत्तात्रेया सद्गुरो ॥५१॥
काळांतरीं देणें । कल्पतरूंतें अश्लाघ्यवाणें ॥ तूं कैवल्य कल्पतरु अससी पूर्णपणें । दाता तत्काळ देणारा ॥५२॥
तूं स्मृतकामधेनू अससी । भक्तमनोरथ जाणसी ॥ तत्काळची पूर्ण करिसी । चिंतक चिंतामणी तूं ॥५३॥
क्षुधा लागली अंतरीं । अन्न देतां काळांतरीं ॥ हें कैसें साजेल तुज हरी । विश्वंभरा दयाळा ॥५४॥
क्षुधेंत घालितां अन्न । तृषेंत पाजितां जीवन ॥ ऐशा दात्यासि शरण । याचक येती ॥५५॥
यौवन गेलिया विवाह करणें । जळ वाळल्या सेतू बांधणें ॥ बालत्व गेलिया खळवणें । दिधलें जैसें ॥५६॥
भिक्षेसि आलों तुझीये द्वारीं । देईन म्हणतोसी काळांतरीं ॥ सर्वज्ञ समर्था श्रीहरी । केवीं साजे सर्वज्ञा ॥५७॥
आतांच देईं अभयदान । शरण शरण नारायण ॥ कांहीं माझे दोषगुण । पाहूं नमो दयाळा ॥५८॥
‘ श्रीरामातें येईल जो शरण । त्यातें देईन अभयदान ॥ हें माझें व्रतचि जाण ’ । ऐसें बोलिले श्रीस्वामी ॥५९॥
आयकोन स्वामीचें वचन । अभय मागाया आलों शरण ॥ तुझिये चरणीं लोटांगण । घातलें देवा ॥६०॥
विश्वास धरूनी धरले पाय । माझी उपेक्षा करूं नये ॥ रक्ष रक्ष नाना उपायें । दीनदयाळा गोविंदा ॥६१॥
आशा लावून निराशा करणें । शरणागतातें त्यागणें ॥ आणि बिरुदेंही मिरवणें । हें कैसें साजे सर्वज्ञा ॥६२॥
समदर्शी पतितपावन । निरपेक्ष दाता निजलाभपूर्ण ॥ क्षमावंत दयासागर जाण । ऐशीं ब्रीदें गाजती ॥६३॥
‘ अन्यथाकर्तुं समर्थ ’ । ऐसें बोलती यर्थार्थ ॥ शरण येत मनोरथ । पूर्ण करिसी श्रीरामा ॥६४॥
प्रणतार्तिविनाशन । दासाभिमानी नामपावन ॥ ऐसीं बिरुदें दयाघन । भुवनत्रयीं गर्जती ॥६५॥
बिरुदांचा धरोनि भरंवसा । शरण आलों जगदीशा ॥ आतां कैसी निराशा । करितोस माझी ॥६६॥
मी क्षुद्र माझें करणें क्षुद्र । लघू मन माझें बोलणें अभद्र ॥ आतां कैसे रामचंद्र । करावें तें सांगावें ॥६७॥
समर्थाचा मान करिती । लघूजनातें अव्हेरिती ॥ हे तों प्राकृतजनाची रीती । प्रसिद्ध आहे ॥६८॥
जे आप्त सखे सोयरे । त्यांते पूजिती आदरें ॥ पराव्यातें पाठमोरे । होती जन ॥६९॥
पूर्वीं ज्यांणीं साधन केलें । भक्तिभजनें निर्मळ झाले ॥ त्यांतें तुम्हीं सांभाळिलें । सद्गुरुराया ॥७०॥
जे आप्त सोयरे बंधुजन । त्यांचा राखिला मान ॥ मातें जाणोनी साधनहीन । उपेक्षा करितां हें काय ॥७१॥
ही तों झाली जनाची रीती । तुज न साजे रमापति ॥ खद्योत प्रकाशाची अपेक्षा गभस्ती । न करी सर्वथा तेजोमय ॥७२॥
तैसे आम्हीं क्षुद्र साधन करावं । तेणें आपण संतुष्ट व्हावें ॥ नंतर आम्हां अभग द्यावें । हें सर्वथा अनुचित ॥७३॥
आम्हांसि देवोनि कष्ट । कैसा होईन म्हणतोसी संतुष्ट ॥ ‘ मी समदर्शी ’ ऐसें स्पष्ट । स्वमुखेंची बोलतोसी ॥७४॥
तूं निजानंदेंचि संतुष्ट अससी । माझे करणीची केविं अपेक्षा करिसी ॥ तक्र मागणें अमृतासी । केवीं घडे ॥७५॥
काय करूं पाहावें साधन । आळसी अंगचोर गुणविहीन ॥ नानाप्रकारचीं अवलक्षणें । अंगीं माझ्या वागती ॥७६॥
भाग्यहीन सेवाहीन । भक्तिहीन भावहीन ॥ आचारहीन कुळहीन । अधम पापी मूढ मी ॥७७॥
दांभिक कपटी कुटिळ । खोटा घातकी कुश्चळ ॥ भूमीभार कंटकी केवळ । नष्ट दोषी दुरात्मा ॥७८॥
ऐसा हतदैव पामर । अन्यायाचा नाहीं पार । आतां तुझिये चरणीं नमस्कार । करितों स्वामी दयाळा ॥७९॥
तुझी कास धरिली । नाना अकर्में कुकर्में केलीं ॥ सर्व देवा पोटीं घातलीं । पाहिजेत स्वामी ॥८०॥
तुझिये भरंवशावरी । खरी खोटी बाजीगिरी ॥ करोनि वागलों संसारीं । क्षमावंता दयानिधे ॥८१॥
पति असतां शिरावरी । व्यभिचारकर्मीं प्रवर्ते नारी ॥ गर्भ राहिला जरी उदरीं । तरी आधार पतीचा ॥८२॥
तैसा मी खोटा परी तुझा दास । तुझीच धरिली असे कांस ॥ आतां दयाळा उदास । होऊं नको मजविषयीं ॥८३॥
माझे साधनाची अपेक्षा । काय तूतें निरपेक्षा ॥ धांव घालीं दयादक्षा । पूर्ण उदारा दयावरा ॥८४॥
तूतें आपपर नाहीं । समसमान सर्वही ॥ लहानथोर तुझे ठायीं । असेचिना ॥८५॥
सेवा अपेक्षोनि दान देणें । ही दात्याचीं नव्हे लक्षणें ॥ म्हणोनी आतांच धांवणें । घालीं सद्गुरों श्रीरामा ॥८६॥
मी आपलीच करणी करोन । जरी मनोरथ करितों पूर्ण ॥ तरी मग तुझेच चरणा शरण । कासया येतों ॥८७॥
मज प्रारब्धाचा भरंवसा नाहीं । तुझेच पायीं पडलों पाहीं ॥ आतां रक्ष रक्ष नाना उपायीं । दत्तदेवा ॥८८॥
माझिये अंतरींचें दुःख । काय जाणें दुसरा लोक ॥ जाणसे तूं सर्वज्ञ एक । कृपासिंधो सद्गुरो ॥८९॥
माझिया अंतरींची ज्वाळा । शांत करणें तमाळनीळा ॥ आलिंगन देउनी गोपाळा । निजभुजें मज ॥९०॥
जरी मी अपवित्र अमंगळ । तूं ज्ञानघन सोज्वळ ॥ तथापि तुझेंच मी दीनबाळ । कंटाळा माझा न करावा ॥९१॥
माता शुद्ध निर्मळ । बाळकातें वाहे मूत्रलाळ ॥ तरी माता प्रतिपाळ । करी अंगें आपुल्या ॥९२॥
मातेनें बाळक परतें केलें । तरी त्याचें काय चाले ॥ फिरोनि रडूं लागलें । मातेचिसाठीं ॥९३॥
तें जरी आक्रंदोनी रडे । माताच बुझावी घेउनी कडे ॥ अमंगळ असतांही आवडे । बाळक मातेसी ॥९४॥
मी अमंगळ तुझें बाळक । तूंचि माझी जननी जनक ॥ तूंचि गुरु स्वामी एक । दत्तात्रेया श्रीरामा ॥९५॥
‘ मातेकृपेपरीस । देवकृपा अनंतगुण विशेष ’ ॥ ऐसें बोलती महापुरुष । संत साधू अनुभवी ॥९६॥
हें वाक्य सत्य असावें । माझिये अनुभवास यावें ॥ आतांच येउनी सांभाळावें । दत्तात्रेया सद्गुरु ॥९७॥
मी तों कुपंथाचा वोहळ । तूं भागीरथी सोज्वळ ॥ गुरुगंगेस मिळतां गंगाजळ । होईन स्वामी ॥९८॥
म्हणोनि माझा कंटाळा । न करीं विशुद्धा निर्मळा ॥ आतांच येऊं दे कळवळा । माझा अनाथाचा ॥९९॥
आतांच मज अभय देसी । तरी काय दुष्काल तुज समर्थासी ॥ अनंतबळा अनंत गुणराशी । दत्तात्रेया ॥१००॥
N/A
References : N/A
Last Updated : December 15, 2016
TOP