करुणासागर - पदे २०१ ते २५०
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
कोणता उपाय करावा । कोणाहातीं निरोप पाठवावा ॥ कैसा वृत्तांत कळवावा । सर्वज्ञ व्यापकासी ॥१॥
जे कां मांडलीक भूपती । त्यांचे दूत सर्वत्र हिंडती ॥ दूतद्वारा जाणती । वर्तमान सर्वांचें ॥२॥
खरा खोटा कोण कैसा । आला गेला सर्वत्र ऐसा ॥ शोध घेती जगन्निवासा । सर्व राजे ॥३॥
तूं अनंत ब्रह्मांडांचा स्वामी । सर्वसाक्षी अंतर्यामी ॥ दत्तात्रेया स्मृतिगामी । वृत्तांत माझा न कळे तुज ॥४॥
दंभ माया खोटाई । जे जे केली असेल कांहीं ॥ शुभाशुभ सर्वही । तुझेसाठीं गोविंदा ॥५॥
तुम्हींच सारें घडविलें । तुम्हींच आम्हां व्बागविलें ॥ आम्हीं तुमचे हातीं हात दिधले । म्हणोनि स्वामी ॥६॥
जें जें कांहीं करितों । जें जें कांहीं करीन म्हणतों ॥ जें अकस्मात् अनुभवितों । तें सर्व स्वामीकडे ॥७॥
अथवा मजकडेच लाविसी सर्वथा । तरी पोटीं घालीं क्षमावंता ॥ दीनदयाळा अनंता । दत्तात्रेया सद्गुरो ॥८॥
तूं तुझा केला स्वभाव । कैसा करूं शकतोसि वाव ॥ जरी करणें तरी स्वयमेव । तूंचि करीं ॥९॥
चंदनाचे संगतीं । इतर वृक्ष चंदन होती ॥ तैसें करावें श्रीपती । आपुले सेवे योग्य मज ॥२१०॥
चंदना अंगीं सामर्थ्य नाहीं । म्हणोन वंशवृक्ष चंदन न होय पाहीं ॥ तुझें अंगीं सर्वही । सामर्थ्य असे ॥११॥
अन्यथाकर्तुं समर्थ अससी । पाषाणाचा चंदन करिसी ॥ ऐसें असतां श्रवविसी । शरणागतातें दयाळा ॥१२॥
देवा आतां झाली सीमा । कैसा वर्णूं तुझा महिमा ॥ आतां धांव पुरुषोत्तमा । दत्तात्रेया सद्गुरो ॥१३॥
ब्रह्मादिकांनीं आळविलें । त्यांतें तत्काळ दर्शन दिधलें ॥ तें स्वामीचे कर्णीं पडलें । तेचि वेळे ॥१४॥
मी आळवोनि मारितों हांका । हाय कैसे स्वामी नायका ॥ फार काळ झाला देखा । आळवितां तुज ॥१५॥
मी हीनदीन बापुडें । म्हणोनि माझें बोलणें नावडे ॥ समर्थाचें कैसें आवडे । समदर्शी सर्वज्ञा ॥१६॥
आतां कांहीं सुचेना । फार झाली यातना ॥ कैसें करूं नारायणा । सांग मज ॥१७॥
खरा खोटा भाव माझा । सर्व जाणसी सर्वज्ञ राजा ॥ आतां कैसा तरी तुझा । असें स्वामी ॥१८॥
दुःखितासी दुःख देसी । मृत्यासीच मारिसी ॥ आणि दयालुत्व मिरविसी । हें आश्चर्य देवा ॥१९॥
आपुल्याच कर्में भोगितों कष्ट । परी तूतें आळवितों स्पष्ट ॥ आतां पापी दुष्ट नष्ट । तरी तुझा असें दयाळा ॥२२०॥
जरी म्हणसील तुज दुःख । काय झालें असे देख ॥ तरी सर्वज्ञ तूंचि एक । सर्वही जाणसी अंतरींचें ॥२१॥
जो सर्व जाणे । तयास सांगावें कैसें कवणें ॥ अंतरींच्या खुणा जाणे । सर्वज्ञ स्वयें ॥२२॥
स्वामींनीं मज कांहीं ॥ सर्वथा उणें केलें नाहीं ॥ तथापि माझें अंतरीं पाहीं । समाधान नसे ॥२३॥
यासी आम्हीं काय करावें । कोणासि काकुळती यावें ॥ कोण जाणे आघवें । दुःख माझें तुजविण ॥२४॥
मज सर्वथा चैन नसे । याचा उपाय तुजपाशीं असे ॥ माझा त्राता कोणीच नसे । तुजवांचोनि ॥२५॥
तूं सर्व जाणसी । सर्वसमर्थ अससी ॥ कष्ट कैसे पाहसी । शरणागताचे दयाळा ॥२६॥
मोठा भरंवसा धरून । सर्वथा तूतेंच आलों शरण ॥ रक्ष रक्ष नारायण । आतांच मज ॥२७॥
आतां न लावीं उशीर । तूतें पसरीतसें पदर ॥ करितों साष्टांग नमस्कार । करुणासिंधू गुरूतें ॥२८॥
आतां न यावा राग सर्वथा न करीं माझा त्याग ॥ आतांच आपले चरणाचा योग । घडों दे मज ॥२९॥
धांव आतां वनमाळी । अभयकरें कुरवाळीं ॥ अंगेंच मजला जेवूं घालीं । प्रसाद ताटींचा ॥२३०॥
वेदसार शब्दाचें कवळ । माझिये श्रवणीं घालीं निश्चळ ॥ तेणें माझें अंतर शीतळ । करीं वेगें दयाळा ॥३१॥
भूत प्रेत रक्षोगण । यांचें करितां भजन ॥ तेही राखिती मान । शरणागताचा ॥३२॥
आपुले घरींचें श्वान । दुःख पावतां जाण ॥ त्याचाही समाचार घेती जन । आपलें जाणोनी ॥३३॥
माझी हांक पडेना कानीं । कैसें करूं मी चक्रपाणी ॥ कैशी तुझी विनवणी । करूं आतां ॥३४॥
कोठें निद्रा लागली । किंवा समाधी साधिली ॥ किंवा माझी भूल पडली । दत्तात्रेया ॥३५॥
किंवा भक्तांचे कीर्तनीं । तटस्थ बैसला जावोनी ॥ आतां कोठें गुंतोनी । पडलास देवा ॥३६॥
मी महापातकी म्हणून । मुनींचे हृदयीं बैसलासे दडून ॥ किंवा गरुड नेला हिरून । कोणी तुझा ॥३७॥
फार मारिले राक्षस । त्याचा शीण आला काय विशेष ॥ म्हणोनि बैसलासी सावकाश ॥ न येसी त्वरें ॥३८॥
तुझा भांडार असे भरला । कोणी घाला घालोनि नेला ॥ किंवा कोणी धरोनि नेला । अनंतबळा ॥३९॥
किंवा भक्तां घरीं फार जेविला । तेणें तुजला आलस आला ॥ सांग किंवा नाश झाला । अनंत गुणांचा ॥२४०॥
किंवा तुझें कोण मेलें । तेणें तुजला सुतक आलें ॥ किंवा तूतें बांधोनि नेलें । अहिरावणें मागुती ॥४१॥
तुझे पायीं घातली बेडी । कोणी कोंडोनि लाविली कडी ॥ किंवा तूतें लक्ष्मी न सोडी । म्हणोन न येशी ॥४२॥
किंवा माझा वीटचि आला । काय पतीत जाणोनि त्याग केला ॥ किंवा संकल्प केला । शरणागताचे वधाचा ॥४३॥
शरणागताचा त्याग केला । तरी तो वधचि झाला ॥ त्याग आणि वधाला । अंतरचि नसे ॥४४॥
मायेनें बाळ वधिलें । तरी बाळकाचें काय चाले ॥ तैसें जरी देवें केलें । तरी आम्हीं काय करावें ॥४५॥
जैसा फांसीं पारधी । कण घालोनि जंतू वधी ॥ तैसीच देवें मजला आधीं । लालूच दाखविली ब्रीदांची ॥४६॥
ब्रीदें ऐकोनि विश्वासलों । समर्थासी शरण आलों । दोन्हीकडे अंतरलों । प्रपंच ना परमार्थ ॥४७॥
क्षीण झाली काया । आयुष्य चाललें वायां ॥ मुकलों आतां दोहीं ठायां । हाय देवा काय हें ॥४८॥
व्याधें बीन वाजविला । लोभें मृग तल्लिन झाला ॥ तल्लिन होतां फांसी पडला । प्राण घेणें ॥४९॥
मृगापरी मातें झालें । ब्रीदें गावोनि भुलविलें ॥ शेवटीं आतां अंतर दिलें । प्रसंग पडतां ॥२५०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 15, 2016
TOP