करुणासागर - पदे १६५१ ते १७००
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
दत्तात्रेया वेदवरिष्ठा । माझी करिसी अपेष्टा ॥ यांत तुझी निजलाभतुष्टा । तृप्ती कोणती दयाळा ॥५१॥
आसुर कर्म निंद्य केलें । निंद्य ऐसें आपणचि बोले ॥ माझे हातीं घडविलें । तेंच कैसें सर्वज्ञा ॥५२॥
तुझे हातीं हात दिले । म्हणोनि सारें तूंच घडविलें ॥ आतां मजकडे लाविलें । तरी माझें काय चाले ॥५३॥
पाहिजे तैसें करूनि घेईं । रुचेल तैसी बुद्धी देईं ॥ ऐसे म्हणत असतां पाहीं । त्रैलोक्याचे धन्यातें ॥५४॥
ऐसें असतां तुझे मना । हेंच भानलें नारायणा ॥ हिंडवोनि रानोराना । उपासी मातें मारिसी ॥५५॥
काय तुझे घरीं नाहीं अन्न । उपासी मारोनि घेसी प्राण ॥ विश्वाचें करिसी पोषण । भार झाला माझाची ॥५६॥
सद्गुरुराया नीतिनिपुणा । उत्तम केली योजना ॥ शरण असतां घेसी प्राणा । अन्नेंविण ॥५७॥
सकळ कळा तुझेपासी । त्यांत हीच आली मनासी ॥ शरणागतातें उपासी । समर्थ असतां मारावें ॥५८॥
यांत कोणतें तप झालें । काय साधन घडलें ॥ यांत विशेष काय केलें । सद्गुरूचें आराधन ॥५९॥
ऐशा प्रसंगीं नारायणां । धड स्नानही घडेना ॥ मग संध्यानेम अनुष्ठाना । ठाव कैचा ॥१६६०॥
यथासांग तुझी पूजा । तेही घडेना सद्गुरूराजा ॥ यांत काय संतोष तुझा । अधिक झाला ॥६१॥
पूर्वी काय होतें उणें । आतां काय झालें दुणें ॥ कैसें तुतें श्लाघ्यवाणें । वाटलें हें समर्था ॥६२॥
करीत असतां विनवणी । मज हिंडविलें रानोरानीं ॥ शेवटीं उपासी मारोनी । प्राण घेणें योजिसी ॥६३॥
प्राण माझाच आहे । दुर्दशा माझी करिसी पाहें ॥ समर्था तुझे वंदितों पाये । सर्वज्ञ दयाळू तूं अससी ॥६४॥
पूर्वीं होतीं अशुद्ध । आतां कैसा झालों शुद्ध ॥ काय ऐसें ब्रह्मानंद । योजिली ही दुर्दशा ॥६५॥
वंदित असतां तुझीं पाउलें । तेणें माझें पातक न गेलें ॥ आतां मातें तेज आले । कासयानें फारसें ॥६६॥
नाम स्मरतां अमंगळ राहिलों । आतां सोज्वळ कैसा झालों ॥ विशेष कोणतें आचरलों । आराधन तुझें ॥६७॥
आहें तैसा शरण आहें । अधिक काय केलें पाहें ॥ उपाशी मारोनि दत्तात्रेय । अधिक झालें कोणतें ॥६८॥
पूर्वीं कांहीं लक्ष्मीकांता । उणी होती तुझी सत्ता ॥ आतां कांहीं अधिकता । आली तुझ्या सत्तेतें ॥६९॥
पूर्वीं सामर्थ्य नव्हतें । आतां अधिक येईळ काय तुतें ॥ उपाशी मारोनियां मातें । समर्थ होसी दयाळा ॥१६७०॥
सर्वथा असतां तुतें शरण । कैसा दुःख देसी दारुण ॥ सर्वज्ञाचे अनंत कर्ण । बधिर कैसे जाहले ॥७१॥
जो अनेक साधनीं पूरा असे । त्यातें पावे आपैसें ॥ येरां म्हणसी अधिकार नसे । ऐसा कैसा समदर्शी ॥७२॥
मी हीनाहूनि हीन । म्हणोनि करिसी माझें छळण ॥ सर्वथा आहें तुतें शरण । काय मारिसी दयाळा ॥७३॥
कैशा हांका पडतील कानीं । कैसा ओरडूं चक्रपाणी ॥ आतां माझी दीनवाणी । कधीं घेसी चित्तावरी ॥७४॥
आपला असे जो सर्वभावें । त्याचें काय काय पहावें ॥ आतांच येऊनि अभय द्यावें । अन्यथा कर्तुं समर्था ॥७५॥
आज कांहीं उणें आहे । उद्यां कांहीं अधिक होय ॥ ऐसें नाहीं सद्गुरू माये । धांव आतां सर्वज्ञा ॥७६॥
आतांच काय एक न करिसी । सर्व सामर्थ्यवंत अससी ॥ अनंत गुण तूं चिद्विलासी । दत्तात्रेया धांव तूं ॥७७॥
माझे ऐसी दीनता । तुझे ऐसी कृपाळुता ॥ उभयतांची सार्थकता । आजच व्हावी सर्वज्ञा ॥७८॥
वत्सासाठीं धेनू धांवे । तैसें येऊनि अभय द्यावें ॥ दत्तात्रेया सर्वभावें । तुझाच आहें सर्वज्ञा ॥७९॥
अजूनि आपल्या बाळासी । काय देवा दुःख देसी ॥ सर्वज्ञ असतां पाहसी । अंत कैसा समर्था ॥१६८०॥
कैसा तरी तुझा आहें । आजच येईं सद्गुरू माये ॥ दत्तात्रेया वंदितों पाये । सर्वज्ञ दयाळा समर्था ॥८१॥
सर्व कांहीं जाणसी । जीवंत नरक भोगविसी ॥ लज्जा माझी समदर्शी । आजचि रक्षीं पावना ॥८२॥
दत्तात्रेया माझे आई । आतांचि धांवोनि येईं ॥ वारंवार ठेवितों पायीं । माथा तुझे सर्वज्ञा ॥८३॥
मी तों अपवित्र आळसाळू । दोषी भुकाळू झोपाळू ॥ अंगिकार माझा कृपाळू । कैसा आतां करिशील तूं ॥८४॥
न घडे तुझें सेवन । देवा कांहीं न घडे ध्यान ॥ अखंड न घडे नामस्मरण । कैसा मातें भेटसी ॥८५॥
अंगीं माझे आळस आहे । उगा बैसोनि वाट पाहें ॥ कैसे दाखविसी पाये । अपवित्रातें मज देवा ॥८६॥
जरी सर्व प्रकारें हीन । दोषी कलंकी दारुण ॥ तथापि तुतें आहें अनन्य शरण । म्हणोनि आहे भरंवसा ॥८७॥
देवा तुतें एकवार । केला असतां नमस्कार ॥ त्याचा करिसी अंगिकार । लज्जा तुतें नमनाची ॥८८॥
नाना दोष आचरतों । तुझा आहें ऐसा म्हणतों ॥ त्याचा तुतेंच भार पडतो । अभय देसी त्यातें तूं ॥८९॥
तुझा स्वभाव शील यश । अनंत गुणही निर्दोष ॥ पाहूनि तुझी धरिली कास । समर्थ देवा सर्वज्ञा ॥१६९०॥
तुतें न लगे नाना कर्म । अथवा कांहीं दान धर्म ॥ तुझें प्रसन्नतेचें वर्म । तुझा आहें हें असे ॥९१॥
तुतें न लगे उग्र तप । कांहीं न लगे साधन जप ॥ जरी आचरला महा पाप । नमन करितां तारिसी ॥९२॥
तुझा आहें असें म्हणतों । तुझिये चरणीं नमन करितों ॥ मुखीं तुझें नाम वरितों । यथाशक्ति आठवितों ॥९३॥
यापरतें मातें कांहीं । अन्य साधन इष्ट नाहीं ॥ एवढा भरंवसा आहे पाहीं । देशील मातें दर्शन ॥९४॥
नमनमात्रें प्रसन्न होसी । तुझा म्हणतां अभय देसी ॥ नाम स्मरतां अंगिकार करिसी । सर्वथा आपला जाणोनि ॥९५॥
मी हीनच आहें जरी । पापी कुश्चळ भिकारी ॥ दर्शन देतां अंतरीं । शंका न धरीं तुझा असें ॥९६॥
जरी आहें सामान्य । परी तुझे कृपें होईन धन्य ॥ गुणदोष माझें सामान्यपण । नको पाहूं सर्वज्ञा ॥९७॥
आजच येईं याच वेळे । देवा माझे निववीं डोळे ॥ मनोहर सुंदर सांवळें । दावीं आतां निजरूप ॥९८॥
दत्तात्रेया दयाळा । आतांच येऊं दे कळवळा ॥ पायीं तुझें वेळोवेळां । माथा ठेवीं सर्वज्ञा ॥९९॥
स्वकृतेंच होईं तुष्ट । आतांच नाशीं माझे कष्ट ॥ कैसा जरी आहें भ्रष्ट । परी तुझा आहें मी ॥१७००॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP