करुणासागर - पदे ३०१ ते ३५०
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
सर्व सामर्थ्य सर्व गुण । तुझे अंगीं असती जाण ॥ ऐसियासि ऐसें सध्यां दान । दिलें नाहीं कोणासी ॥१॥
दैवहीन भिकारी । भिक्षार्थ आलीं तुझे द्वारीं ॥ समर्थ असतां माघारीं । विन्मुख कैसा दवडिसी ॥२॥
माझियेसारखा भिकारी । तूंहि असतास जरी ॥ तरी तुझिये द्वारीं । भिक्षार्थ कोण येते ॥३॥
त्रिभुवनाधीश लक्ष्मीपती । सामर्थ्यवंत प्रसिद्ध जगतीं ॥ उदार दाता रक्षक बोलती । वेदशास्त्रें पुराणें ॥४॥
ऐसें जाणोनि याचक भीत । भिक्षार्थ अभयातीं शरण येत ॥ पुरविसी सर्वांचे मनोरथं । समर्था सर्वज्ञा ॥५॥
सामर्थ्य असतां उपेक्षिती । लक्ष्मी असतां भिक्षा न देती ॥ आणी उगीच प्रतिष्ठा मिरविती । ते थोर कैसे म्हणावे ॥६॥
दीनाचा त्याग करिती । समर्थातें अंगिकारिती ॥ समदर्शी म्हणविती । त्यांतें काय म्हणावें ॥७॥
जरी सामान्याचा त्याग केला । वरिष्ठ अंगिकारिला ॥ तो समदर्शी सहजचि झाला । लाजिरवाणा ॥८॥
अन्यथाकर्तुं समर्थ आहे । ‘ दैवीं नाहीं ’ बोलताहे ॥ तया बोलणें कैसें साहे । अन्यथाकर्तुं समर्थ हें ॥९॥
मिरवी क्षमावंताचा शिरोमणी । शरणागताचे अपराध गणी ॥ ऐसी ज्याची विरुद्ध करणी । काय म्हणावें तयातें ॥३१०॥
मिरवी दयाळू करुणाघन । शरणागताची कापी मान ॥ ऐसें विपरीत ज्याचें आचरण । त्यातें काय म्हणावें ॥११॥
प्रणतवत्सल ब्रीद वाहे । प्रणतचि दुःखी होत आहे ॥ पाहत असतां स्वस्थ राहे । काय म्हणावें तयातें ॥१२॥
पतीतपावन ब्रीद गाजे । पातक्याचा त्याग कीजे ॥ ऐसें असतां कैसी साजे । ब्रीदावळी ॥१३॥
आतिथाचा कल्पतरू । ऐसा नामाचा बडिवारू ॥ आश्रितासी म्हणे ‘ काय करूं । प्रारब्धीं नाहीं तूझिये ’ ॥१४॥
ऐसा कैसा कल्पतरू । इच्छित द्यावया लावी उशीरू ॥ ऐसें असतां चमत्कारू । कोणता कल्पवृक्षाचा ॥१५॥
जेणें जें इच्छिजे । तें तें त्यातें तत्काळचि दीजे ॥ त्याशींच ऐसें नाम साजे । आश्रिताचा सुरतरु ॥१६॥
कामीक कामाचा प्रदाता म्हणवी । शरणार्थी विन्मुख फिरवी ॥ पुनः तयाची करवी । विटंबना ॥१७॥
ऐसा कैसा दाता । मनोरथाचा पूर्णकर्ता ॥ कोरडीं ब्रीदेंच मिरवितां । शोभती केवीं ॥१८॥
नाम गाजे भक्तानुकंपी । भक्ताचीच मान कापी ॥ भक्तास म्हणावें ‘ पापी ’ । भक्तानुकंपी हा कैसा ॥१९॥
भक्ताइच्छेनें देह धरी । ऐसें नाम लोकांतरीं ॥ दर्शन देतां शंका करी । कैसें साजे नाम हें ॥३२०॥
नाम आहे निजलाभतुष्ट । भक्तापासूनि घेई कष्ट ॥ कैसें नाम शोभे स्पष्ट । सांग देवा ॥२१॥
स्ययंतृप्त नामधारी । साधनांची अपेक्षा करी ॥ साधन करितां अंगिकारी । नाम कैसें शोभेल हें ॥२२॥
विश्वंभर नामधारी । शरणागतातें उपाशी मारी ॥ ऐसी करितो ब आजीगरी । नाम कैसें शोभेल त्या ॥२३॥
नाम वाहे अति उदार । भक्तास हिंडवी दरोदार ॥ भीक मागतां समाचार । घेईना जो दासाचा ॥२४॥
उदार नाम वागवावें । याचक पाहतां गुप्त व्हावें ॥ मुख लपवोनि बसावें । याचकभयें ॥२५॥
ऐसा कैसा उदार । करी याचकाचा अव्हेर ॥ आतां येईं माझे समोर । उदार दात्या ॥२६॥
आजपर्यंत पाहीं । कोण वस्ताद भेटला नाहीं ॥ तुझीं ब्रीदें सर्वही । हिरोनि घेता ॥२७॥
ब्रीदें वागवितां वाटलें गोड । प्रसंग पडतां पडलें कोड ॥ आतां कोणती तोड । विचारिली ती सांगावी ॥२८॥
मागतों तैसें अभय । आतांच देईं दाखवोनि पाय ॥ विलंब होतां देवा काय । बिरुदें वागवूं पाहसी तूं ॥२९॥
एवढा लक्ष्मीचा नायक । तुझा होईल ऐसा लौकिक ॥ ब्रीदें घेवोनि गेला रंक । हिरोनियां देवाचीं ॥३३०॥
निश्चळ आणि निर्मळ । निष्कलंक सोज्वळ ॥ ऐशा कीर्तीचें तोंड काळें । करिसी कैसें गोविंदा ॥३१॥
तुझे दारींचा याचक । विन्मुख दवडिसी जरी देख ॥ तरी तुझा लौकिक । बुडेल सर्व ॥३२॥
देवा फार विलंब झाला । दास तुझा घाबरला ॥ चिंताक्रांत बैसला । वाट पाहे केव्हांची ॥३३॥
आतांच वेगीं यावें । कृपा करोनि अभय द्यावें ॥ आपले पायीं ठेवावें । मज आपुला जाणोनि ॥३४॥
तूं प्रीति राखों जाणसी । भक्तांचा कैवार घेसी ॥ मजविषयींच कैसा होसी । वज्ररूप ॥३५॥
स्नेह तुझा सुटेना । प्रेमा तुझा विटेना ॥ ममता तुझी पालटेना । भक्तांविषयीं ॥३६॥
तूं करुणेचा जलधर । तूं कृपेचा सागर ॥ तूं अनाथाचें माहेर । दत्तात्रेया ॥३७॥
तुझे चरणावांचोनि पाहीं । मज कोठेंचि ठाव नाहीं ॥ आतां धांव माझे आई । दत्तदेवा सद्गुरु ॥३८॥
आतां खुंटली माझी गती । कैसें करावें कमलापती ॥ आतां सर्वथा माझी गती । तुझेच हातीं गोविंदा ॥३९॥
कैसी करावी विनंती । कैसा येऊं काकुळती ॥ सर्वज्ञ स्वामी जाणती । अंतर माझें ॥३४०॥
जाणत असतां अंतर । कैसा लाविला जी उशीर ॥ आतां कोणता प्रकार । करावा आम्हीं ॥४१॥
माझा बूता जितका होता । तितकें आळविलें अनंता ॥ अजूनि माझा अंत पाहतां । करुणा कैसी येईना ॥४२॥
अनंतमुखी नारायणा । सर्वां मुखीं धरिलें मौना ॥ एखादे मुखीं तरी वचना । बोल मजसीं ॥४३॥
आतां देवा सोडीं मौन । वेगें बोल कांहीं वचन ॥ जेणें माझें समाधान । होय ऐसें ॥४४॥
माझी अंतवेळा आली । अजूनि निद्रा कैसी लागली ॥ मज विषयींच कोठें गेली । अपार करुणा ॥४५॥
माझी वार्ता कोणी न सांगे । सर्वज्ञ स्वामी नायके अंगें ॥ आतां ऐशिया प्रसंगें । साह्य माझें कोण करी ॥४६॥
देवा तुझाच भरंवसा । धरितां कैसा घालिसी फांसा ॥ शरणागताचिया नाशा । प्रवर्त कैसा झालासी ॥४७॥
ऐकत असतां माझी करुणा । दयाळू कैसा द्रवेना ॥ नाम तुझें करुणाघना । काय झालें ॥४८॥
माझें अरण्यरुदन झालें । तुझें कारुण्य कोणी नेलें ॥ काय सर्वज्ञपणाचें झालें । निसंतान ॥४९॥
आम्हीं अमर्याद बोलूं नये । राहवेना करावें काय ॥ सर्वज्ञ स्वामी दत्तात्रेया । जाणसी सर्व ॥३५०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 15, 2016
TOP