करुणासागर - पदे ९५१ ते १०००
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
ऐसा तूं परम गारोडी । नादीं लावोनि करिसी वेडीं ॥ होती हिंपुटीं बापुडीं । कष्ट भोगिती मनुष्यें ॥५१॥
आधीं मातें नादीं लाविलें । आतां माझें छळण आरंभिलें ॥ वंदित असतां पाउलें । मारीन म्हणसी ॥५२॥
शरणागताचा करितां अपाय । यांत तुतें लाभ काय ॥ अभय देतां दत्तात्रेय । हाणी कोणती समर्था ॥५३॥
मी तुझा आहें । केव्हां येसील वाट पाहें ॥ धांव आतां दावीं पाये । दत्तात्रेया सद्गुरो ॥५४॥
मी अधिक उणें बोलिलों । क्षमा करीं तूं दयालो ॥ काय करिसी मी भागलों । जाणसी तूं ॥५५॥
देवा कोणापुढें बोलावें । कोणास हृदय दाखवावें ॥ कोणास काकूलती यावें । तुजवांचोनि सद्गुरो ॥५६॥
कोणें माझें सोसावें । कोणें मज आपलें म्हणावें ॥ कोणें माझे लळे पुरवावे । तुजवांचोनि सद्गुरो ॥५७॥
कोण निवारी माझें दुःख । कोण पाहील माझें मुख ॥ कोण वारील तहानभूक । तुजवांचोनि ॥५८॥
कोणास देऊं परिहार । कोणास घालूं नमस्कार ॥ कोण माझा समाचार । घेईल तुजवांचोनि ॥५९॥
कैसा तरी केशवा । माझा वृत्तांत तुज कळावा ॥ म्हणोनि नानाप्रकारें सद्गुरुदेवा । आळवीं तुज ॥९६०॥
वृत्तांत आधिं कळलाच आहे । कळवावा हा बोल न साहे ॥ राहवेना करूं काये । हेंही जाणसी सर्वज्ञा ॥६१॥
तुझे सारिखा करुणाराशी । कोणी नाहीं हृषीकेशी । हेतूवांचूनि प्रीति करिसी । शरणागताची ॥६२॥
तूं ब्रह्मानंद स्वाराम । स्वयंतृप्त पूर्णकाम ॥ शुद्ध निरहं विश्राम । मुनिजनांचा ॥६३॥
तथापि आहेस करुणाघन । म्हणोनि झालासी भक्ताधीन ॥ अर्जुनाचा गाडिवान । निजलाभतुष्टा झालासी ॥६४॥
जो निजानंदें तृप्त होय । त्यातें कोणासी काज काय ॥ तथापि भक्ताचे अपाय । दूर करी निजांगें ॥६५॥
भक्त जाणोनि अंबरीशी । त्याकारणें जन्म सोशी ॥ आणिक दयाळुता कैसी । निरपेक्षाची असावी ॥६६॥
जो यज्ञभुक्त होय । तो भिल्लीणीचें उच्चिष्ट खाय ॥ हें दयाळुत्व नव्हे तरी काय । नित्यतृप्ताचें ॥६७॥
जो निजानंदीं डोले । तेणें वानर मित्र केले ॥ दंडकवनीं पायीं चाले । अनपेक्ष असतां ॥६८॥
कोठें शुद्ध निरंजन । कोठें गोपी मलिन ॥ तिचे अंकावरी लोळण । घाली स्वयें ॥६९॥
कोठें निजलाभतुष्ट । कोठें व्रजनारी व्यभिचार दुष्ट ॥ अंगसंगें त्यांचे कष्ट । दूर केले ॥९७०॥
कोठें परमानंद चिद्विलासी । कोठें निंद्य कुब्जा दासी ॥ रतला तियेसी याहूनि कैसी । दयालुता असावी ॥७१॥
रावणादि राक्षस मारिले । आणिक मोठे पराक्रम केले ॥ पराक्रम तुच्छचि गमले । अनंतबळाचे ॥७२॥
गजेंद्रें मारिलें मच्छकाचें पिलूं । भुजगेंद्रें मंडूक बाळू ॥ मृगेंद्रें मारिली अजा दुर्बळू । यांत पराक्रम कोणता ॥७३॥
तैसे काळाचे महाकाळें । अनंत बाहू अनंत बळें ॥ नाना पराक्रम केले । परंतु पराक्रम कोण म्हणे ॥७४॥
पराक्रमाचा प्रसंग पाहें । तुतें आतांच पडला आहे ॥ काळभीत शरणागताची बाहे । धरीं आतां ॥७५॥
माझा दुःखरिपू मारिसी । माझें संरक्षण करिसी ॥ तरीच पराक्रमी होसी । त्रिभुवनत्रयीं ॥७६॥
माझें दुर्दैव दारुण । आतांचि करूनि गतप्राण ॥ व्हावें तैसें देसी दान । तरि अघटित करणी म्हणावी ॥७७॥
दैव माझें खोटें । जें लोटितां न लोटे ॥ जाळूनि आतांचि येऊनि भेटें । अभयदान देसी जरी ॥७८॥
तरी म्हणों अघटित करणी । माझें दुर्दैव जाळोनी ॥ अभय देऊनि ठेविसी चरणीं । अन्यथा कर्तुं समर्था ॥७९॥
ऐसा दुर्भाग्य ऐशा समयीं । जैसें मागतों तैसें देईं ॥ सर्वज्ञाचे पडतों पायीं । म्हणॊनि देवा ॥९८०॥
लहान तोंडीं मोठा ग्रास । घ्यावया तुझी धरिली कास ॥ आतां करावा प्रकाश । अघटित करणीचा ॥८१॥
मच्छकें सागर शोषावा । मूषकें पर्वत कोसळावा ॥ ऐसाच माझा जावा । प्रसंग देवा ॥८२॥
जैसा खद्योतप्रकाशें तरणी । लोपला असतां अघटित करणी ॥ ऐसी वेळा चक्रपाणी । प्राप्त झाली तुज आतां ॥८३॥
कोठें माझे मासाचे डोळे । कोणें परब्रह्म सांवळें ॥ पाहीन म्हणतों येच वेळे । सापराधी पातकी ॥८४॥
कोठें अपवित्र भाग्यहीन । कोठें ऐसें मागणें दर्शन ॥ घेऊनि अभयदान । घेऊं पहासी आतांचि ॥८५॥
माझें सामर्थ्य कायसें । ऐसें मागणें साजे कैसे ॥ मागतां मातें लज्जा नसे । पहा केवढें साहास ॥८६॥
मी लघू तुच्छ दीन । ऐसें आतांच मागतों दान ॥ जैसा राजपत्नीचा भोग जाण । जीच इच्छी अतिरंक ॥८७॥
तेवीं भिकारी पामर । भिक्षा मागतों पसरिला पदर ॥ आतां होऊं दे चमत्कार । अन्यथा कर्तुं समर्था ॥८८॥
हेच अघटित करणीची वेळ आहे । त्वरा करीं पहासी काये ॥ दत्तात्रेया वंदितों पाये । सर्वज्ञ समर्था ॥८९॥
काळांतराची आपेक्षा । न करीं आतां रमादक्षा ॥ धांव शरणागताच्या पक्षा । दत्तात्रेया आतांचि ॥९९०॥
आपलाल्या काळीं । वृक्ष फळती भूमंडळीं ॥ नाना औषधी नाना वल्ली । काळें होती नासती ॥९१॥
काळेंचि नारी ऋतुमती । काळेंच प्रसूत होती ॥ काळें व्यथा नसती । नाना रोग ॥९२॥
काळें होय वृष्टी । काळें चाले सर्व सृष्टी ॥ म्हणोनि काळांतराच्या गोष्टी । बोलूं नको समर्था ॥९३॥
काळांतरीचें होणें । त्यास कोण म्हणे अघटित करणें ॥ म्हणूनि आतांच येऊनि देणें । व्हावें तैसें अभय मज ॥९४॥
सर्व ब्रीदांचें प्रयोजन । आतांच पडलें नारायण ॥ सकळ ब्रीदांचें स्मरण । करीं आतां सर्वज्ञा ॥९५॥
ऐसा मी आहें अधम । जेथें सर्व ब्रीदांचें पडलें काम ॥ धांव आतां विराम । काय करिसी समर्था ॥९६॥
हे बसावयाची वेळ नाहीं । धांव आतां पडतों पायीं ॥ हातीं आपलें चक्र घेईं । सद्गुरुराया ॥९७॥
पूर्वीं पराक्रमाची ख्याति झाली । अघटीत करणी केली ॥ खरीसी वेळा आतांच आली । अघटित करणीची ॥९८॥
जरी आतांच न देसी दर्शन । व्हावें तैसें अभयदान ॥ तरी तुझें व्यर्थ जाण । अघटित करणी पराक्रम ॥९९॥
न करी शरणागताचें रक्षण । व्यर्थ ऐसें ब्रीद भूषण ॥ व्यर्थ ऐसें सामर्थ्य गुण । कामा न येती दासाच्या ॥१०००॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP