करुणासागर - पदे १८५१ ते १८९६
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
देवा मनाचे तरंग कांहीं । नको पाहूं सद्गुरू आई ॥ देवा पडतों पायीं । तुझा आहें सर्वथा ॥५१॥
येईं आतां गुरुमाउली । मज आपले हातीं जेऊं घालीं ॥ आजच माझी कींव आली । पाहिजे तुतें दयाळा ॥५२॥
दत्तात्रेया धांव आतां । तुझे पायीं ठेवितों माथा ॥ आज मातें सर्वथा । जेऊं घालीं व्हावें तैसें ॥५३॥
तुझे दारीं ब्राह्मण । उपासी तुतें मागतो अन्न ॥ टाकोनि मातें भोजन । कैसा करिसी विश्वंभरा ॥५४॥
अतिथी तुझे द्वारीं आलों । फार देवा भुकेलों ॥ भिक्षा घालीं दयाळो । दत्तात्रेया निजहातें ॥५५॥
तुझ्या दयाळ स्वभावा । जाणूनि शरण आलों केशवा ॥ सर्वज्ञ असतां देवाधिदेवा । विरुद्ध कैसें करिसी हें ॥५६॥
अभया द्यावें शरणागता । तुझें व्रत हें लक्ष्मीकांता ॥ देवा मातें कष्ट देतां । संतोष तुझा होतसे ॥५७॥
मी काय तुतें शरण नव्हे । सर्वज्ञ देवा शोधूनि पाहें ॥ देवा तुझी आण वाहें । तुतें आहें शरण मी ॥५८॥
ऐसें असतां दयाळा । काय माझा कापिसी गळा ॥ तुझे पायीं वेळोवेळां । माथा देवा ठेवितों ॥५९॥
भक्त तुतें शरण येती । कोणी उग्र दुःख साहती ॥ कोणी आपलें शिर तोडिती । तुझेसाठीं गोविंदा ॥१८६०॥
कोणी उग्र तपें करिती । एकपादस्थित राहती । अखंड समाधि साधिती । एकाग्रचित्तें ॥६१॥
ऐसें तुझेंसाठीं पाहीं । दारुण दुःख भोगिती देहीं ॥ परंतु त्यांची स्थिती पाहीं । डळमळेना धीरांचीं ॥६२॥
देवा माझी अंतरस्थिती । घाबिरी झाली कमळापती ॥ येतों तुतें काकूळती । सोडवीं आतां सर्वशा ॥६३॥
देवा माझें धैर्य किती । लघुशक्ति मी अल्पमति ॥ धांव आतां कृपामूर्ति । सोसवेना मज दुःख ॥६४॥
धांव आतां सद्गुरूराया । दयावंता दत्तात्रेया ॥ आतांच येईम पडतों पायां । सर्वज्ञ देवा समर्था ॥६५॥
मी तों तुतें शरण आहें । तुझे हातीं माझी बाहे ॥ व्हावें तैसें सद्गुरू माये । लोकीं मातें नाचवीं ॥६६॥
माझी दुर्दशा जैसी करिसी । दारोदारीं नाचविसी ॥ याची लज्जा ऋषीकेशी । तुजच असे ॥६७॥
काय करूं मी लक्ष्मीकांता । तुझे पायीं ठेवीं माथा ॥ माझी लज्जा सद्गुरूनाथा । दत्तात्रेया रक्षीं तूं ॥६८॥
नाना विकल्प उठती । नाना कल्पना कोसळती ॥ मज गांजणूक होती । म्हणून पावें मज आतां ॥६९॥
आपलालें प्रकारें लोक ॥ मातें बोध करिती देख ॥ तथापि माझी लक्ष्मीनायक । स्थिरता नाहीं तुजविण ॥१८७०॥
कोठें राहूं कोठें फिरूं । कैसा राहूं काय करूं ॥ एवं कांहीं निर्धारू । दत्तात्रेया होईना ॥७१॥
स्वामीनीं समाधान केलें । परंतु व्हावें तैसें न झालें ॥ माझें सर्वांग निवालें । परंतु आशा राहिली तव चरणीं ॥७२॥
माझी तळमळ गेली नाहीं । हळहळ आहे शोधूनि पाहीं ॥ तुझेसाठीं सद्गुरू आई । चैन नाहीं जाणसी तूं ॥७३॥
मज स्वामींनीं भेट द्यावी । माझी आशा पुरवावी ॥ आनंदाची वृष्टी व्हावी । स्वामींसवें बोलतां ॥७४॥
माझा काबू होता । तितका उपाय केला अनंता ॥ आतां तटस्थ माझी अवस्था । झाली देवा जाणसी तूं ॥७५॥
आतां तुझीच पाहतों वाट । राहिली स्वारी खटपट ॥ नाना साधनें पोंचट । मी तीं न करीं सर्वज्ञा ॥७६॥
आतां ओघास येतें । तें तों करावेंच लागतें ॥ यावांचोन शरीर चालतें । हें तों घडेना सर्वथा ॥७७॥
प्रवाहपतित कर्माकर्म । नाना योग धर्माधर्म ॥ करावे लागतीच याचें वर्म । सद्गुरुस्वामी जाणती ॥७८॥
शरीरयात्रा लावावी । तुझी सर्वांग सेवा घडावी ॥ म्हणोनि सदसदही आघवीं । कर्में करावीं लागती ॥७९॥
मातें जीं जीं कर्में घडती । सर्व तुझेच ठायीं श्रीपती ॥ ऐसें समजोनि कृपामृर्ती । यावें आतां भागलों ॥१८८०॥
प्राणच मात्र गेलें नाहीं । वरकड सर्व झालें पाहीं ॥ देहपतन होणें कांहीं । हातीं नाहीं कोणाच्या ॥८१॥
हें तों तुझेच हातीं असे । तूं करिसी तें होतसे ॥ येथें माझा कांहीं नसे । काबू देवा सर्वेज्ञा ॥८२॥
तूं विपरीत काळ निवारिसी । अंतकाळातें टाळिसी ॥ नाना आघातीं रक्षिसी । शरणागतातें सद्गुरो ॥८३॥
जैसी माझी अवस्था होते । तैसी निवेदन केली तुतें ॥ आणीक देवा कोणातें । सांगूं आपलें सुखदुह्ख ॥८४॥
अनेक दुःखांत बुडालों आहें । हृदयीं धरिले तुझे पाये ॥ म्हणोनि देवा वांचलों आहें । ऐसें असतां सर्वज्ञा ॥८५॥
तुझे विरहित माझें जिणें । धिक् धिक् देवा लाजिरवाणें ॥ न कळे देवा कवण्यायुगें । प्राण माझा वांचला ॥८६॥
प्राण माझा कालवतो । ऊर देवा भरोनि येतो ॥ तुझे मुखाकडे पाहतों । केविलवाणें सर्वज्ञा ॥८७॥
काय करूं काबू नाहीं । तुझेच लागतों पायीं ॥ दत्तात्रेया आजच येईं । आतांच देईं मज भेटी ॥८८॥
जय परब्रह्म ब्रह्मानंदा । जयजय निरस्तातिशयानंदा ॥ जयजय सच्चिदानंदा । दत्तात्रेया सद्गुरो ॥८९॥
माझी सारी हळहळ । देवें केली शीतळ ॥ तुतें आली कळवळ । दयासिंधो ॥१८९०॥
सिद्धेश्वराचें रूप । तूंचि धरिलें आपेंआप ॥ माझा सकळ संताप । दूर केला दयाळा ॥९१॥
दयाभरित आपली वाणी । घालोनि देवें माझे कानीं ॥ प्रवेशतांचि अंतःकरणीं । शीतळ झालों दयाळा ॥९२॥
माझें कर्तव्य नेलें । संकल्प सारे बुडविले ॥ मातें देवें रिकामें केलें । ध्यान समाधी कारणें ॥९३॥
जें काय होतें माझें हित । तेंच सांगोनियां त्वरित ॥ देवें केलें कृतार्थ । धन्य मातें या जगीं ॥९४॥
निरंजनाचे चरण । भावें वंदी नारायण ॥ पूर्वार्ध झाला संपूर्ण । भाविकांचा हितकर्ता ॥९५॥
जें एकभावें वाचिती । त्यांचे मनोरथ पुरती ॥ जैसे माझे श्रीपती । पुरविते झाले निजांगें ॥१८९६॥
इति श्रीमत्परमतपःपरायण श्रीमन्नारायण विरचिते करुणासागरे पूर्वार्ध समाप्तः ॥
॥ श्रीगुरुदत्तचरणार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP