करुणासागर - पदे २५१ ते ३००
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
वांचतां दुःखचि पहावें । मेलों तरी व्यर्थचि जावें ॥ दोहींकडे घातलें देवें । संकष्ट मज ॥५१॥
लोक जेविती स्वस्थ निजती । देशीं विदेशीं आनंद करिती ॥ माझी कैशी दुर्गती । मांडिली देवें ॥५२॥
देवास काय म्हणावें । आपले भोगावर घ्यावें ॥ केलें तैसें भोगावें । दुःख देहीं ॥५३॥
असतों कमाईचा भरपूर । तरी देवही करिता अंगिकार ॥ मी क्षुद्र म्हणोनि अव्हेर । देवही करी ॥५४॥
देव दैवें वंचिलों । चिंताडोहीं बुडालों ॥ उभय लोकां मुकलों । आपुल्या कर्में ॥५५॥
मध्यसमुद्रामाजी देखा । जशी फुटोनि गेली नौका ॥ तैशी अवस्था माझी देखा । सद्गुरो स्वामी ॥५६॥
भोंवती वन्हिज्वाळा भडकली । मध्येंच धेनू सांपडली ॥ तैसीच गती माझी झाली । सर्व जाणसी सर्वज्ञा ॥५७॥
आतवेना संध्यास्नान । राहिले नेम अनुष्ठान ॥ नाहीं धार्णा न घडे ध्यान । कांहीं मज ॥५८॥
देवा भांबावलें मन । न घडे तुझें नामस्मरण ॥ कांहीं न घडे साधन । सद्गुरू स्वामीचें ॥५९॥
जोडूनियां दोन्ही कर । स्वामीसि करितों नमस्कार ॥ भिक्षेकरितां रमावर । पसरिली अंजुळी ॥२६०॥
मज लेखूं नको परका । तूंचि माता पिता माझा सखा ॥ प्रणतदुख्हनाशका । येऊनि आतां रक्षीं मज ॥६१॥
तूं तो जवळचि अससी । सन्निध असतां अंत पाहसी ॥ म्हणोनि सर्वव्यापकासी । येईं ऐसें म्हणतसें ॥६२॥
आतां वेगीं प्रकट होईं । निजभुजें आलिंगन देईं ॥ अभय देऊनि आपुले पायीं । ठेवीं मज ॥६३॥
आतां आपुला अभयकर । ठेवीं माझे शिरावर ॥ सकळ माझें दुःख दूर । करीं वेगें दयाळा ॥६४॥
आशा धरोनि वाट पाहें । दशदिशा अवलोकिताहें ॥ अझोनि न येशी करिसी काय । कार्यभार त्रैलोकींचा ॥६५॥
पुरे आतां कार्यभार । आतां न लावीं उशीर । येऊनि माझा समाचार । घेईं शरणागताचा ॥६६॥
तूं कृपाकटाक्षें अवलोकितां । काय दुष्कर लक्ष्मीकांता ॥ तुझाच भरंवसा अनंता । आहे मज ॥६७॥
आतांच काय एक न करिसी । सकळ कळा तुजपाशीं ॥ माझा अंत कां पाहसी । सर्वभूतसुहृदा तूं ॥६८॥
घोर काळिया मर्दून । निर्विंष केलें यमुनाजीवन ॥ गोपाळ वत्स अवलोकून । सजीव केले ॥६९॥
पाषाणाची केली नारी । दगडची समुद्रीं तारी ॥ वानरांहातीं लंका नगरी । घेवविली ॥२७०॥
नखीं धरोनि गोवर्धन । केलें गोकुळाचें रक्षण ॥ दावाग्नी करोनी प्राशन । गोप धेनू रक्षियेल्या ॥७१॥
पार्थाचें सारथ्य केलें । लाक्षागृहीं रक्षिलें ॥ भीष्मावरी चक्र धरिलें । आपुली प्रतिज्ञा मोडोनी ॥७२॥
पार्थासाठीं सुभद्रा झाला । दिवसा भानू लपविला । बळीच्या द्वारीं ठाकला । द्वारपाळ होवोनी ॥७३॥
पांडवांच्या मेळीं । काढिल्या उष्ट्या पत्रावळी ॥ आपुल्या हातीं न्हाऊं घाली । पार्थाचे घोड्यातें ॥७४॥
प्रल्हादातें गांजी बाप । तयासाठीं नृसिंहरूप ॥ धरोनियां आपोआप । रक्षण केलें भक्तांचें ॥७५॥
कुब्जा केली सुंदरी । दारी असतां अंगिकारी ॥ इंद्राकरितां वामन भिकारी । झालासि तूं ॥७६॥
जाणत असतां मृगापाठीं । धांव घाली भक्तांसाठीं ॥ होतां तुझी कृपादृष्टी । पांडवें जिंकिला संग्राम ॥७७॥
ब्रह्मास्त्रतेजें पोळतां । परीक्षिती रक्षिला तत्त्वतां ॥ दुर्वासें अंबरीष गांजितां । रक्षा केली दयाळा ॥७८॥
ब्राह्मणाचें मृतबाल । जिवंत केलें तत्काळ ॥ तुझी लीला तमालनीळ । अपार असे ॥७९॥
देवा तुझी अघटित करणी । कोण लोकत्रयीं वाणी ॥ मी तों जोडॊनि दोन्ही पाणी । प्रार्थितों तुज ॥२८०॥
आतां माझी दया । येऊं देईं दत्तात्रेया ॥ अनादिपुरुषा अप्रमेया । दर्शनदेईं पायांचें ॥८१॥
फार झाली वेळ । अंतरीं झाली हळहळ ॥ आतां माझी कळवळ । येऊं देईं श्रीहरी ॥८२॥
मानवी राजाचे दरबारीं । मागूं आला भिकारी ॥ आक्रंदोनि हाका मारी । तरी राजे शोध घेती ॥८३॥
मानवी राजाचे घरीं । भिक्षा मिळते श्रीहरी ॥ साक्षात् तूं येतां तुझिये द्वारीं । भिक्षा न मिळे कैसी मज ॥८४॥
माझी दादही लागेना । कोणी येऊनि सांगेना ॥ हांकही कानीं पडेना । सर्वत्रश्रोतृ असतां तूं ॥८५॥
तूं अनंत ब्रह्मांडांचा राजा । मी कैसा तरी आहें तुझा ॥ शरण जाणूनही माझा । त्याग करिसी हें काय ॥८६॥
अपराध करोनि शरण आलों । तुझे पायीं येऊनि पडलों ॥ आतां कैसा दयाळो । त्यागिशी मज ॥८७॥
महा अपराध करिती । शरण येवोनि चरण धरिती ॥ त्यांतें चोरही रक्षिती । शरणागत जाणोनी ॥८८॥
मी तों अभयार्थीं आलो शरण । चक्र हाणोनि घेशी प्राण ॥ तरी कोणती कीर्ती देवा जाण । मेळविसी तूं ॥८९॥
अनंत मारिले राक्षस । तेणें न पुरली हौस ॥ सह्रणागताचे वधाचा उल्हास । कैसा वाटला दयाळा ॥२९०॥
शरण येवोनि भाकितों करुणा । माझी मांडिली हेळणा ॥ नाना प्रकारची विटंबना । करिसी माझी ॥९१॥
मी तों तुमचे हातीं हात दिले । शरण येवोनि चरण धरिले ॥ जैसें तुम्ही नाचविलें । तैसा नाचलों ॥९२॥
समर्थाचा अंगिकार । पतीताचा अव्हेर ॥ अपराधाचा अनादर । करिसी कैसा समदर्शी ॥९३॥
माझा अव्हेर करिसी । तरी काय भांडार आपुलें भरिसी ॥ जरी मातें अंगिकारिसी । तरी काय बुडेल हें सांग ॥९४॥
देवा दयाळा हृषीकेशी । कां मागें पुढें पाहसी ॥ माझी विनंती कैसी न घेसी । चित्तावरी ॥९५॥
देवें शरणागत त्यागिला । ऐसा देखिला ना ऐकिला ॥ मजविषयीं कैसा निष्ठुर झाला । दीनदयाळु श्रीराम ॥९६॥
आतां किती भाकूं करुणा । धांव दयाळा आनंदपूर्णा ॥ दत्तात्रेया विज्ञानघना । सर्वसमर्था सद्गुरो ॥९७॥
तुझे दयेस नाहीं पार । कैसा होतोसि वज्रधर ॥ लोकीं करुणेचा जलधर । म्हणविसी तूं ॥९८॥
मज ऐसा पापी पूर्ण । पूर्वीं कोणीच न आला शरण । मज ऐसा याचक जाण । भेटला नाहीं सर्वथा ॥९९॥
ऐसा पातकी ऐसें मागणारा । सध्यांच अभयदान घेणारा ॥ मीच एकटा तुझिये द्वारा । आलों असें सर्वज्ञा ॥३००॥
N/A
References : N/A
Last Updated : December 15, 2016
TOP