करुणासागर - पदे १८०१ ते १८५०
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
जो मातें शरण येतो । तुझा आहें ऐसें म्हणतो ॥ त्यातें सर्वथा अभय देतों । ऐसें स्वमुखें बोलिला तूं ॥१॥
जे सर्व प्रकारें जाणा । शरण आले माझे चरणा ॥ त्यातें सर्वथा त्यागीना । ऐसें स्वमुखें बोलिला तूं ॥२॥
मी भक्ताचे आधीन । भक्त माझा आत्मा जाण ॥ भक्तरक्षक नारायण । ऐसें स्वमुखें बोलिला तूं ॥३॥
जो येईल मातें शरण । त्याचें भय मी नाशीन ॥ ऐसा आहे माझे पण । ऐसें स्वमुखें बोलिला तूं ॥४॥
जो भीत शरण येईल मातें । प्राणापरीस ठेवीन त्यातें ॥ त्यागीना मी शरणागतातें । ऐसा स्वमुखें बोलिला तूं ॥५॥
मज द्वेष्य प्रिय कांहीं । अधिक उणा कोणी नाहीं ॥ मी समदर्शी आहें पाहीं । ऐसें स्वमुखें बोलिला तूं ॥६॥
ऐशा तुझे वचनाचा । विश्वास धरोनि दृढतर साचा ॥ शरण आलों पातकांचा । राशी तुतें सर्वज्ञा ॥७॥
मातें उपवासी मरिसी । विश्वासघात कैसा करिसी ॥ माझे गुण दोष पाहसी । अयोग्य तुज हें विश्वंभरा ॥८॥
जरी ऐसें म्हणतासी केशवा । तपस्वी सुकृती असावा ॥ पवित्र मातें शरण यावा । त्याचा रक्षक असे मी ॥९॥
आचारशील असावा । अपराधीही नसावा ॥ साधनीं मातें शरण यावा । रक्षण त्याचें करीन मी ॥१८१०॥
तेहीं कृत त्रेत द्वापारीं । शरण येईल मातें जरी ॥ त्यातेंच मी अंगिकारीं । कलियुगीं मी रक्षीना ॥११॥
जे कोणी अपराधी दोषी । कुश्चळ कलंकी आलशी ॥ अमंगळ जे पापराशी । शरण त्यांनी येऊं नये ॥१२॥
इत्थं ऐसे प्रकार नाना । बोलिला असतास नारायणा ॥ मग हीन दीन तुझे चरणा । शरण येते कासया ॥१३॥
तप नाहीं आचार नाहीं । सेवा नाहीं साधन नाहीं ॥ विद्यावंत पवित्र नाहीं । शरण त्यांनीं येऊं नये ॥१४॥
समर्थाचा अंगिकार करितो । हीनदीन त्यागितो ॥ युगत्रयींच अभय देतो । कलियुगीं तो देईना ॥१५॥
ऐसें समजोनियां जन । करिते आपुलें समाधान ॥ तुतें कोणी न येते शरण । हीनपापी कलियुगीं ॥१६॥
मग मीही देवा आपुलें । पौरुष असतें विचारिलें ॥ समजूनि तुझीं पाउलें । धरिलीं असतीं दयाळा ॥१७॥
तूं चारी युगीं सारिखा अससी । कलियुगीं तूं लवकर भेटसी ॥ तूं दीनदयाळू समदर्शी । सर्व तुतें सारिखे ॥१८॥
तूंही बोलिला निजमुखें । शरणागत ते माझे सखे ॥ जो शरण मातें त्यातें निकें । अभय देतों सर्वथा ॥१९॥
सत्य तुतें आहें शरण । देवा घाबरा झाला प्राण ॥ आतां काय पाहसी जाण । आण तुझी दयाळो ॥१८२०॥
कांहीं केल्या राहवेना । फार झाल्या मज यातना ॥ दत्तात्रेया करुणाघना । धांव आतां सर्वज्ञा ॥२१॥
मज दुःख भोगविलें । यांत तुझे हातीं कांहीं आलें ॥ ऐसें नाहीं दयाळु देवें । दारुण कैसें योजिलें ॥२२॥
मी तुझे हातीं हात दिले । म्हणोनि तूंच करविसी ऐसें बोलें ॥ सत्य देवा घडविलें । तूंच सारें सर्वज्ञा ॥२३॥
तुतें जरी शरण नसतों । मग मीच केलें ऐसें म्हणतों ॥ शरण तुझे पायां पडतों । आतां करणें सर्व तुझें ॥२४॥
देवा दयाळो सर्वज्ञ अससी । करुणा भाकितों ती ऐकसी ॥ समर्थ असतां पाहसी । स्वयें कैसा समदर्शी ॥२५॥
तूं सच्चिदानंद पुतळा । सुखदुःखासी निराळा ॥ तथापि तुतें कळवळा । आहे शरआण्गताचा ॥२६॥
शरणागता जें दुःख होतें । तें तुझें अंगीं उमटतें ॥ ऐसा दयाळू म्हणोनि तुतें । शरण आहें सद्गुरो ॥२७॥
आतां कासया नष्ट देसी । व्यर्थ विलंब कां लाविसी ॥ धांव दयाळा समदर्शी । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥२८॥
पायीं ठेवितों माथा । आतांच येईं रमानाथा ॥ सर्वज्ञ दयाळा समर्था । दत्तात्रेया सद्गुरो ॥२९॥
कोमळ तुझें अंतःकरण । मातें मारिसी अन्नाविण ॥ ऐसा कैसा दारुण पण । देवा दयाळा केला त्वा ॥१८३०॥
प्राण माझा कालवतो । वाट तुझी पाहतों ॥ करुणा भाकीं नमन करितों । धांव आतां सर्वज्ञा ॥३१॥
मी उपवासी मरावें । अथवा कांहीं भक्षावें ॥ करणें न करणें आघवें । माझे हातीं कांहीं नसे ॥३२॥
आतां तुझे मनास जें जें आलें । तेथें माझें काय चाले ॥ तुझे हातीं हात दिले । तुझ्या आहें आधीन मी ॥३३॥
आतां उपाशी मारणें । किंवा खाऊं घालूनि दुर्दशा करणें ॥ देशीं विदेशीं दुःख देणें । व्हावें तैसें करावें ॥३४॥
तूं सर्वज्ञ सर्वांचा धनी । समर्थ दयाळू चक्रपाणी ॥ नमस्कार करितीं तुझे चरणीं । लज्जा माझी तुज असो ॥३५॥
आतां येऊं दे कळवळा । धांव समर्था दयाळा ॥ तुझे अंगीं सकळ कळा । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥३६॥
सद्गुरू तुझे पडतों पायीं । तुजवीण दयाळू कोणीच नाहीं ॥ आजचि येऊनि समाचार घेईं । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥३७॥
जे जे विनंती केली । ते ते सारी व्यर्थ झाली । आतां तरी धांव घालीं । सर्वज्ञ देवा सद्गुरो ॥३८॥
मज भोगविसी दुःख । यांत तुतें काय सुख ॥ धांव आतां लक्ष्मीनायक । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥३९॥
देवा आतां आजच येईं । दयाळू तूं दर्शन देईं ॥ दत्तात्रेया सद्गुरू आई । तुझा आहें सर्वज्ञा ॥१८४०॥
देवा अनंत कळा होत्या । एकापरिस एक चढत्या ॥ त्यांतूनि सद्गुरू मातापित्या । दारुण कैसी योजिली ॥४१॥
मज उपाशीं मारावें । दुःख दारुण भोगवावें ॥ ऐसें सद्गुरू दयाळू देवें । विपरीत कैसें योजिलें ॥४२॥
देवें शरणागत वधिला । ऐसा नाहीं आयकिला ॥ दयाळू कैसा प्रवर्तला । शरणागताचे वधासी ॥४३॥
एकदांच सुदर्शन हाणिता । तरी लागलाच प्राण जाता ॥ घोळघोळोनि रमानाथा । मारिसी कां दयाळा ॥४४॥
प्राण्यांतें दुःखें होती । ते तुझेंच स्मरण करिती ॥ तूंच गांजिसी कमळापती । तरी तुतेंच आहें शरण मी ॥४५॥
देवा तुझी दुर्बळ गाय । शरण आली वधिसी काय ॥ चारा घालीं दत्तात्रेय । गोब्राह्मणहितकर तूं ॥४६॥
जरी आहें ओढाळ । तरी तुतेंच करणें प्रतिपाळ ॥ आतां यावी कळवळ । सद्गुरो आतां श्रमलों मी ॥४७॥
आतां धीर धरवेना । फार झाल्या यातना ॥ सोडवीं आतां नारायणा । सद्गुरूराया सर्वज्ञा ॥४८॥
देवा तुझें बाळ आहें । लवपळ तुझी वाट पाहें ॥ येईं आतां सद्गुरू माये । जेऊं घालीं निजकरें ॥४९॥
जें जें मातें दुःख झालें । तें तुझे अंगीं उमटलें ॥ धांव आतां याच वेळे । सद्गुरूराया सर्वज्ञा ॥१८५०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP