करुणासागर - पदे ८५१ ते ८७२
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
कैसा तरी तुझा आहें । तुझींच पाउलें वंदिताहें ॥ आतां कृपादृष्टी पाहें । मजकडे दयाळा ॥५१॥
तुझिये संतुष्टतेकारणें । कोणतीं करूं मी अनुष्ठानें ॥ कोणतीं कोणतीं साधनें । करूं देवा ॥५२॥
जपतपादि नाना । साधन मातें करवेना ॥ आलस्यें अथवा प्रमादें म्हणा । अथवा इच्छा तुमची ॥५३॥
मज स्नानसंध्याही करवेना । एवढा आळस संचरला जाणा ॥ शरण आलों तुझे चरणा । म्हणोनि ऐसें झालें हें ॥५४॥
समर्थाची कांस धरिली । म्हणोनि स्नानसंध्या बुडाली ॥ नाना साधनें राहिलीं । तुझे पायीं गोविंदा ॥५५॥
करितां नाना साधन । तुझें मोडतें अनुष्ठान ॥ कंटाळा आला नारायण । मजला नाना साधनांचा ॥५६॥
नाना साधनीं मजला आतां । नको घालूं दयावंता ॥ तुझे चरणीं लक्ष्मीकांता । नमस्कार करितों मी ॥५७॥
तूतें नमस्कार करावा । तुझा महिमा वर्णावा, आईकावा ॥ तुझा मुखचंद्र अवलोकावा । निरंतर ॥५८॥
तुझे सन्मुख उभें रहावें । हितगुज तूतें सांगावें ॥ तुझ्या परिचर्येंत असावें । सर्वकाळ ॥५९॥
तुझेंच करावें नामस्मरन । तुझेंच असावें अनुसंधान ॥ हेंचि मातें साधन । आवडे अंतरापासोनी ॥८६०॥
आवडे तें यथाशक्ति । करितों येतों काकुळती ॥ आतां यापरतें रमापती । कोणतें साधन करूं मी ॥६१॥
तुज आवडे जें हृषीकेशी । तेंचि मजकरवीं घडविसी ॥ आतां किती तरी छळिसी । विलंब लावोनी ॥६२॥
ज्याणें तिर्हाईत असावें । त्याणें अन्य साधन करावें ॥ फळ मागूनि वेगळें व्हावें । दात्यापाशीं ॥६३॥
तैसा पारखा मी नाहीं । मी तों तुझे घरचा गुलाम पाहीं ॥ माझी गती तुझेचि पायीं । असे सत्य ॥६४॥
माझें सर्व तें तुझेंचि साचें । तुझें तें माझ्या बापाचें ॥ तूंचि जाणसी अंतरीचें । सर्व कांहीं ॥६५॥
तूंचि माझा मायबाप अससी । माझा प्राणसखा तूं चिद्विलासी ॥ परब्रह्म अविनाशी । तूंचि माझा स्वामी गुरू ॥६६॥
म्हणोनि जपतपादि अनुष्ठान । आचार नाना विधिविधान ॥ स्नानसंध्या सर्वसाधन । तूंचि माझें ॥६७॥
तूं मायबापाहूनि मायावंत । तुझे ठायीं गुण अनंत ॥ धांव आतां निवांत । बैसूं नको दयाळा ॥६८॥
सर्व कांहीं जाणसी । किती आतां अंत पाहसी ॥ धांव दयाळा गुणराशी । दत्तात्रेया गुरुवर्या ॥६९॥
प्रसंग हाच आहे । धांव आतां पाहसी काय ॥ दत्तात्रेया सद्गुरु माये । नमस्कार करितों मी ॥८७०॥
कोठें जाऊं काय करूं । कोठें राहूं कोठें फिरूं ॥ कैसा वांचूं कैसा मरूं । दीन दयाळा सद्गुरो ॥७१॥
मज दुःखापसोनि तारीं । धांव आतां झडकरी ॥ सद्गुरुमाये अंगिकारीं । नमन करितों तुजलागीं ॥७२॥
इति श्रीमत्परमतपःपरायण श्रीमन्नारायणविरचिते करुणासागरे द्वितीयभागः समाप्तः ॥
॥ श्रीगुरुदेवदत्तचरणार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP