निर्याणाचे अभंग - १६१ ते १७०
संत बहेणाबाईचे अभंग
१६१.
चौथा जन्म सांगो पाचवा सहावा । आणि तो सातवा योगभ्रष्ट ॥१॥
गौळियांचे घरी कन्याचि होऊनी । गाई संरक्षणी वर्ततसे ॥२॥
नाम - संकीर्तन काळाची क्रमणा । संगती ते जाणा वैष्णवांची ॥३॥
आवडती देव तीर्थ क्षेत्र यात्रा । ब्राह्मणा सर्वत्रा पूजा करी ॥४॥
गाईंचे रक्षण अरण्यात वास । तव जाला सहवास संन्याशाचा ॥५॥
देखोनी तयासी करी नमस्कार । जाणूनी संस्कार कृपा केली ॥६॥
सातवे जन्मीचा सांगेन वृत्तांत । मागिलाचा प्रांत सांडियेला ॥७॥
परी गौळियांचे घरी गायीचे रक्षण । करूनी कीर्तन देह पोषी ॥८॥
मग भेटले ते सिद्ध आत्मज्ञानी । तेही वोळखोनी नेले मज ॥९॥
म्हणती योगभ्रष्ट आहे हे विरक्त । दास्यत्वे सारी काळ बहु ॥१०॥
विरक्तीचे अंगी ज्ञानाचा अभ्यास । करि रात्रंदिवस एकनिष्ठे ॥११॥
सासष्टी वरूषे सातविये जन्मी । क्रमूनिया धर्मी प्रवर्तलीये ॥१२॥
अभ्यास करूनी टाकिले शरीर । तुज हा प्रकार सांगितला ॥१३॥
बहेणि म्हणे जन्म पुढे उरले साही । प्रसंगेची तेही सांगतसे ॥१४॥
१६२.
सांगेन तो जन्म आठवावे ऐक । धरूनी विवेक निश्चयाचा ॥१॥
वेरूळ ते तीर्थ शिवलाय क्षेत्र । शास्त्रज्ञ समर्थ ब्रह्मवेत्ता ॥२॥
तयाचे ते नाम धर्मदत्त क्षेत्री । पूज्य तो सर्वत्री जनामाजी ॥३॥
तयासी सुंदरा पतिव्रता भली । कीर्ती फार केली पतिधर्मे ॥४॥
तयांचिये पोटी मज जाला जन्म । कन्येचा उत्तम शांतिरूप ॥५॥
अठरा वरूषे क्रमिली आपण । करूनी श्रवण भागवत ॥६॥
लग्न केले परी भ्रतार नासला । हितावह झाला तोही मज ॥७॥
नववे ये जन्मी तेथेची जन्मले । नव वरूषे केले स्थान तेची ॥८॥
तेचि मातापिता तेचि बंधुवर्ग । अनुष्ठान सांग तेचि आम्हा ॥९॥
दहाविया जन्मी कौशिक ब्राह्मण । अग्नीचे सेवन त्याचे घरी ॥१०॥
नित्य हरिकथा वेदान्तश्रवण । नित्य करी स्नान शिवालयी ॥११॥
देवाचे दर्शन नित्य सेवाविध । आत्मज्ञाने बोध शांत देह ॥१२॥
कन्येचिया रूपे जन्म म्या घेतला । काळ तो क्रमिला काही तेथे ॥१३॥
पितयाने लग्न केले कन्यादान । पाहोनी ब्राह्मण शुक्ल दीक्षा ॥१४॥
ब्रहमणाची भिक्षा करिता कोरान्न । गाईंचे पाळण घरी तया ॥१५॥
बेचाळीस वरूषे आयुष्य घातले । तेथे पुत्र जाले तीन मज ॥१६॥
पहिला पुत्र तेथे तूचि रे जालासी । आणिक विशेषी दोन पुत्र ॥१७॥
तुझा माझा गुरू संन्यासी केशव । तेणे विद्या सर्व प्रबोधिली ॥१८॥
तयावरी तेथे ठेविले शरीर । दहा जन्म - सार सांगितले ॥१९॥
बहेणि म्हणे आता तीन जन्म शेष । सांगेन परिस ज्ञानवंता ॥२०॥
१६३.
आणिक आईक अकरावा जन्म । प्रवरासंगम गंगातीर ॥१॥
तेथे माध्यंदिन ब्राह्मण तो भला । वास तेथे केला गंगातीरी ॥२॥
अयाचित वृत्ती आलियासी अन्न । घालितसे जाण यथाकाळी ॥३॥
गोकर्ण हे नाम तयाचे उत्तम । शांति दया धर्म क्षमादिक ॥४॥
तयाची वल्लभा भली पतिव्रता । सगुणाद्भुता नाम तिचे ॥५॥
तयांचिये पोटी होऊनिया कन्या । नाम हे सौजन्या ठेवियेले ॥६॥
साता वरूषावरी केले कन्यादान । पाहोनी निधान अतिज्ञानी ॥७॥
अत्यंत विरक्त योगाभ्यासी ज्ञान । घालोनी आसन योग साधी ॥८॥
नाम की तयाचे योगेश्वर ऐसे । सिद्धी त्या मानसी वोळंगल्या ॥९॥
सेवेनी तयासी तोषविले बहू । त्याचा माझा जीऊ एक झाला ॥१०॥
सांगितले मज योगाचे आसन । धरूनिया ध्यान खेचरीचे ॥११॥
गुरू तो भ्रतार सर्वस्व आमुचा । घेतले सेवेचे सुख तेथे ॥१२॥
गुरू बंधू पुत्र सांगाती मागील । तू होसी कैवल्य जन्मोजन्मी ॥१३॥
क्रमोनिया तेथे वर्षे त्रेचाळीस । राहिला हव्यास ब्रह्मनिष्ठे ॥१४॥
बहेणि म्हणे आता जन्म तो बारावा । सांगेन धरावा हृदयामाजी ॥१५॥
१६४.
तुझे मनोगत जाणोनी अंतरी । बोलिले वैखरी जन्म नाना ॥१॥
ऐक बा बारावा सांगेन तातडी । मृत्यूची हे थोडी वेळ आहे ॥२॥
लाखणी हे स्थळ अगाधचि तोये । लक्ष तीर्थे पाहे तये स्थळी ॥३॥
शिवनद पाहे औट नदांतील । संगमीचे स्थळ महा उग्र ॥४॥
तेथे अनुष्ठानी होता एक द्विज । नाम तया सहज रामचंद्र ॥५॥
तयाची वल्लभा जानकी पवित्र । तया घरी पुत्र दोघे होती ॥६॥
थोर ब्रह्मज्ञानी शांतीचा आगर । तीर्थांचे माहेर तीर्थरूप ॥७॥
तयाचिय पोटी कन्येचिया रूपे । होउनिया तपे साधियेली ॥८॥
धरूनिया मौन वर्ततसे जनी । बोलती वचनी वाचा नसे ॥९॥
करोनिया लग्न दिधलेसे ब्राह्मणा । ज्योतिषी जो जाणा महाथोर ॥१०॥
तयासी प्रसन्न गणेश प्रत्यक्ष । बोलतसे साक्ष तयासी तो ॥११॥
तयाचिये गेही निराहार देही । सेवासुख पाही घेतले म्या ॥१२॥
विरक्त मानस विषयभोगी त्रास । सदा निजध्यास आत्मनिष्ठा ॥१३॥
रामचंद्र पिता राम - उपासक । अत्यंत विवेक ज्ञान तया ॥१४॥
माझे अंतरीचा जाणोनिया हेत । केले माझे चित्त स्थिर तेणे ॥१५॥
लाउनी समाधी बैसवी सन्निध । अंतरी तो बोध ठसावला ॥१६॥
स्वधर्म गौरव देउनिया पती । सेवा आत्मस्थिती करी त्याची ॥१७॥
कोठे चित्त अणुमात्रही न बैसे । सदा निजध्यासे देह वर्तें ॥१८॥
पडिले शरीर छत्तिषा वरूषात । व्हावे परी मुक्त शेष राहे ॥१९॥
बहेणि म्हणे जन्म बारावा तो ऐसा । तेराव्याची दशा सांगिजेल ॥२०॥
१६५.
ऐक सावधान सांगेन आणिक । मागील ते देख सांगितले ॥१॥
कित्येक संशय राहिले सांगता । त्वरा जाली चित्ता अंतकाळी ॥२॥
विवेक ते शास्त्र अनुभव अंगीचा । असेल तो साचा अर्थ जाणे ॥३॥
अवघेचि ते जन्म आठवती मज । अंतरीच गुज मृत्यु - वेळा ॥४॥
आरसियात जैसे दिसे प्रतिमुख । तैसे जन्म देख दिसती डोळा ॥५॥
लटिकेचि शब्द व्यवहारी मानीती । मूर्ख तयांप्रती बोलो नये ॥६॥
कस्तुरीचा वास घेईल काउळा । तरिच हे कळा कळे तया ॥७॥
तेरा जन्मांपूर्वील आठवे स्मरत । परी तैसा हेत नाही मज ॥८॥
मुंगीचा तो मार्ग न सापडे वाघा । जरी तो थोर गा जाला बहू ॥९॥
बहेणि म्हणे देव कृपा करी जेव्हा । सर्वही ते तेव्हा कळे मनी ॥१०॥
१६६.
तेरावा तो जन्म देहे वर्ते हाची । सांगेन तयाची मूळ कथा ॥१॥
देवगावी शाखा ‘ वासजनी ’ जाण । लेखक प्रवीण ऐक सांगो ॥२॥
मौनस कुळीचा ब्रह्मणाचा भक्त । भोळा ज्ञानवंत भाग्यनिधी ॥३॥
तयाची वल्लभा जानकी ते नाम । माता ती उत्तम पतिव्रता ॥४॥
तयाचिये घरी कन्या मी जालीये ।लग्न केले तये स्थळी जाण ॥५॥
गौतम कुळीचा भ्रतार पाहिला । अत्यंत शोभला ज्योतिषी तो ॥६॥
तयाचिये घरी ‘ शक्ती ’ उपासना । तयाचि अंगना केली मज ॥७॥
काही एक योगे दक्षिणे कोल्हापूर । तेथे तो भ्रतार वास करी ॥८॥
माझी मातापिता बंधु भगिनीसी । तयाचे भेटीसी सर्व गेलो ॥९॥
तेथे तो ‘ जयराम ’ कृष्णदास पंत । महिमा अदुभुत सिद्धि त्यासी ॥१०॥
तयाचे संगती क्रमोनिया काळ । जाला तो दयाळ कृपानिधी ॥११॥
सांगितले मज पतींचे सेवन । तीर्थ ते घेऊन नित्य राहे ॥१२॥
गीतेचे पठण करी मी सर्वदा । वेदाची मर्यादा नुल्लंघोनी ॥१३॥
वाटले भ्रतारा जावे स्वदेशासी । निघाले त्वरेसी कुटुंब हो ॥१४॥
आलो इंद्रायणी देहु - ग्राम स्थळा । कोंडाजी भेटला पंत तेथे ॥१५॥
ब्राह्मण म्हणोनी घातले भोजन । तेथे गर्भ जाण होता तुझा ॥१६॥
देखियेले मग तेणे कुटुंबासी । म्हणे या स्थळासी रहा तुम्ही ॥१७॥
आहे गरोदर तुमची स्त्री हे जाण । प्रसूत होवोन जावे पुढे ॥१८॥
येईल मी धान्य जे तुम्हा लागेल । क्रमुनिया काळ जावे स्थळा ॥१९॥
मग आम्ही राहिलो विचारोनी मनी । नामसंकीर्तनी काळ सरू ॥२०॥
पांडुरंग देव तुकाराम साधू । सर्वदा आनंदू हरिकथेचा ॥२१॥
नमस्कार करी तुकाराम यासी । चित्त पायापासी विठोबाच्या ॥२२॥
‘ आनंदवोवरी ’ देखियेली मग । देव पांडुरंग तयापासी ॥२३॥
वाटले मानसी बैसावे एकांती । तीन अहोरात्री तये स्थळी ॥२४॥
भ्रतार क्रोधाचा पुतळा सर्वही । एकांत तो पाहे केवी साधे ॥२५॥
तव अकस्मात कार्याच्या उद्देशे । भ्रतार आवेशे पुण्या गेला ॥२६॥
पुसोनी मातेसी इंद्रायणी स्नान । केले पै दर्शन पांडुरंगी ॥२७॥
मनासी आवेश सत्त्वाचा लोटला । आनंद दाटला आसनी हो ॥२८॥
तीन अहोरात्री क्रमिल्या ते ठायी । आनंद तो देही थोर जाला ॥२९॥
तिसरे दिवशी तुकारामरूपे । मंत्र तीन सोपे सांगितले ॥३०॥
“ तेरावा हा जन्म लाघलीस आता । पूर्वी योगपंथा सिद्ध केले ॥३१॥
आता तुज पुढे नाही जन्म - योनी । पतीच्या भजनी राही सुखे ॥३२॥
तुझीये वो पोटी आला असे पुत्र । तो तुवा एकत्र जन्म तेरा ॥३३॥
तोही आत्मनिष्ठ होईल ज्ञानिया । पुढे जन्म तया पाच होती ॥३४॥
कवित्वाची शक्ती दिल्ही तुझे मुखी । आत्मज्ञानी निकी बुद्धी राहे ” ॥३५॥
बोलोनिया ऐसे जाला तौ अदृश्य । लाविला अंगुष्ठ भ्रुवोमध्ये ॥३६॥
मग म्या बाहेरी केले गंगास्नान । घेतले दर्शन विठ्ठलाचे ॥३७॥
पाच पदे एक आरती लिहून । विठ्ठला ध्याऊन समर्पिली ॥३८॥
बहात्तरी वरूषे आयुष्यमर्यादा । आजी जाली सिद्धसनी पूर्ण ॥३९॥
अंतकाळ आला आला रे सन्निध । सांगितला बोध जन्मा तेरा ॥४०॥
सोळा प्रहर शेष राहिले ते आता । सावधान चित्ता करी का रे ॥४१॥
अंतकाळ वेळ पाचही असावी । ते मना पुसावी मृत्युकाळी ॥४२॥
बहेणि म्हणे तेरा जन्मांचे सर्वही । सांगितले काही गुरूकृपा ॥४३॥
१६७.
तेरा जन्म तुज सांगितले आज । दृश्य माझे मज सर्व होती ॥१॥
आज याचि परी समयो जाणोनी । तुज रे निर्वाणी सांगितले ॥२॥
अठरा दिवस मृत्यू पुढे कळो आला । परि नाही सांगितला ऐक सांगो ॥३॥
रूक्मिणीसी आधी मृत्यु जाल्यावरी । जाए गोदावरी उतरकार्या ॥४॥
अठरा दिवस मृत्यु जाला अगोदर । रुक्मिणी सादर पतिव्रता ॥५॥
माझा मृत्यु तुज सांगताचि खेद । नवजेसी गोदे क्रियाकर्मा ॥६॥
यालागी रे अंत सांगितला नाही । धरूनी हृदयी सावधान ॥७॥
तुज गेलियाने नागरिका सर्वा । सांगितला भाव अंतरीचा ॥८॥
तेरावा दिवस रूक्मिणीचा जेव्हा । तुम्ही पत्र तेव्हा पाठवावे ॥९॥
पाच दिवस मृत्यू तेथोनी उरला । हेत सांगितला नागरिकांसी ॥१०॥
आठविली ते ते लिहिविली पदे । पाहोनिया शुद्ध लिही पुढे ॥११॥
बहेणि म्हणे देवबोलवी जे वाणी । असत्य जो मानी नरक तया ॥१२॥
१६८.
मृत्यूचे प्रसंगी असावे सावध । आत्मनिष्ठ बोध राखोनिया ॥१॥
ऐसे गीतेमाजी बोलिला वैकुंठ । आज तो शेवट असे आम्हा ॥२॥
अग्नीचे ते बळ आहे आजी देही । ज्योती ते हृदयी सावधान ॥३॥
दिवसाची मृत्यू शुक्लपक्षी आहे । सांगितले पाहे विचारूनी ॥४॥
नाही एक आजी उत्तरायण खरे । सद्गुरूनिर्धारे काय काज ॥५॥
उत्तराभिमुख घालुनी आसन । धैर्य सावरून प्राण रोधी ॥६॥
सद्गुरूस्मरणी पाचही ते योग । आम्हासी ते सांग फळा आले ॥७॥
बहेणि म्हणे तुज सांगितले वर्म । पुढीलही क्रम पाहे डोळा ॥८॥
१६९.
प्रपंची विन्मुख जालियाने चित्त । उत्तरायण सत्य तेचि आम्हा ॥१॥
नाही काज तया उत्तरायणाचे । सांगितले साचे तुज पुत्रा ॥२॥
प्रपंचाभिमुख मानस सर्वदा । दक्षिण प्रसिद्धा मन तेची ॥३॥
बहेणि म्हणे वेदशास्त्राचे संमत । सांगितले मत स्वानुभवे ॥४॥
१७०.
मागीलही जन्म आठवती काही । त्वरा जाली देही मृत्युवेळे ॥१॥
यालागी राहिले सांगणे मागील । साधने प्रबळ होती खरी ॥२॥
देह - प्राक्तनाचे भोगिले संचित । स्वस्वरूपे चित्त भूमिका क्रमी ॥३॥
सप्तही भूमिका वैराग्य सांगाती । स्वधर्म विरक्ति संपादिली ॥४॥
विदेह - अवस्था भूमिका सातवी । ते येथे अनुभवी साधियेली ॥५॥
सरले संचित प्राक्तन देहाचे । माझी मज साची साक्ष याची ॥६॥
तरा जन्म सर्व भूमिका साधिल्या । वृत्तिही राहिल्या निमग्नता ॥७॥
बहेणि म्हणे काही न धरू संदेह । विवेके विदेहदशा आली ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2017
TOP