करूणापर अभंग - ५३१ ते ५४४
संत बहेणाबाईचे अभंग
५३१.
आपुले कल्याण इच्छिणे जयासी । तेणे या नामासी विसंबो नये ॥१॥
करील मनीचे परिपूर्ण हेत । पाहिजे हे चित्त नामापाशी ॥२॥
भुक्ति आणि भुक्ति जोडतील सिद्धि । होईल का वृद्धि अपरिमित ॥३॥
बहेणि म्हणे पहा जपोनिया नाम । पुरतील काम जो जो हेत ॥४॥
५३२.
त्रिकाल आरती करू देवाधिदेवा । गाऊ नाचू नित्य कथा करू केशवा ॥धृ०॥
दिननिसी छंद लागो हाचि मानस । रामा रामा कृष्णा गाऊ गीतेसी ॥१॥
सारासार विचार करू नित्य विवेक । तत्त्वमसि गुरूमुख पाहू सकळीख ॥२॥
संतसंग करू आम्ही भावार्थबळे । बहेणि म्हणे येणे तुटती जन्म - मुळे ॥३॥
५३३.
भाजी घेणार केज्याचा । काढा मागतो केळाचा ॥१॥
मूर्ख न विचारी चिवी । मनी इच्छितसे मुक्ती ॥२॥
तुळा - पुरूष गाजराचा । मार्ग लक्षी वैकुंठीचा ॥३॥
बहेणि म्हणे भांबावला । मूर्ख जनायिचा बोला ॥४॥
५३४.
मायेची निवृत्ति केली जव नाही । आत्मतत्व ठायी पडे केवी ॥१॥
यालागी सद्गुरू सेविती सज्ञान । मायेचे निर्शन करावया ॥२॥
द्वैताचा हाराश केला जव नाही । आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥३॥
कल्पनेचा ठाव पुसिला जव नाही । आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥४॥
भ्रांतीचे हे स्थान छेदिले जव नाही । आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥५॥
अहंकार देहीचा गेला जव नाही । आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥६॥
बहेणि म्हणे ज्ञान साधिले जव नाही । आत्मतत्त्व ठायी पडे केवी ॥७॥
५३५.
कर्ममार्ग एक भक्तिमार्ग दुजा । अभ्यास तो तिजा वोळखावा ॥१॥
साधावे स्वहित आत्म - अनुभव । सुखाची जाणीव भोगी कारे ॥२॥
एक तो हटयोग दुसरा विषयत्याग । तिसरा योगमार्ग वोळखावा ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा साधिता हा मार्ग । सांगितला सांग आत्मप्राप्ती ॥४॥
५३६.
कर्माआदि अंती मध्ये ब्रह्मभाव । जाणे तो अनुभव ज्ञानियाचा ॥१॥
ऐसिया स्थितीचे ब्राह्मण ते खरे । येर ते पामरे वोळखावे ॥२॥
ॐकारे आदरी तत्कारे समर्पी । सत्कारे स्वरूपी ऐक्य करी ॥३॥
बहेणि म्हणे तेही ब्रह्मची निभ्रांत । अनुभवोनी तथ्य लीन होय ॥४॥
५३७.
अचेतन कर्म सचेतन ब्रह्म । वोळखीजे धर्म दोहींचाही ॥१॥
मग तो ब्राह्मण बोलिजे निश्चित । सावधान चित्त सर्वकाळ ॥२॥
मन बुद्धि चित्त अहंकार सर्व । वोळखोनी पूर्व कर्म करी ॥३॥
बहेणि म्हणे कर्म - कर्तव्य वोळखे । ब्राह्मण विवेके वोळखीजे ॥४॥
५३८.
श्रीबीज संयुक्त पांडुरंग - मंत्र । जपता पवित्र महापापी ॥१॥
नाही या संदेह पहा वेदशास्त्र । गुह्य हे सर्वत्र सांगितले ॥२॥
पाठिमोरा देव होईल सन्मुख । अंतरीचे दुःख निवारील ॥३॥
दुर्हवला मोक्ष येईल जवळी । फिटेल काजळी मानसाची ॥४॥
पापाचे पर्वत क्शणे होती दग्ध । ज्ञानाचा उद्बोध होय चित्ती ॥५॥
बहेणि म्हणे नका पाहू रिद्धिसिद्धीसी । जपे जो तयासी फळे आधी ॥६॥
५३९.
एकांती आसन घालुनिया शिव । ब्रह्मादिक देव ध्याती जया ॥१॥
ते पाय आणिले चंद्रभागे तीरी । पहा डोळेभरी एक वेळा ॥२॥
असंख्यत जन्म केले अनुष्ठान । नकळे ब्रह्मज्ञान जालेयाही ॥३॥
बहेणि म्हणे पायी सर्वांची उत्पत्ति । अंती साठवती भूतमात्रा ॥४॥
५४०.
आश्रमाचे धर्म चालविल्यावरी । शुद्ध ते अंतरी चित्त होय ॥१॥
तेणेचि वैराग्य मनासी ठसावे । श्रवण मनने होय मोक्ष तया ॥२॥
आश्रमाचे योगे सर्व सिद्धि धरा । होईल अंतरा एकनिष्ठा ॥३॥
बहेणि म्हणे काय नव्हे या आश्रमी । पाहिजे स्वधर्मी एकनिष्ठा ॥४॥
५४१.
कलियुगी घोर पाप हे खतेले । स्वधर्म सांडिले चहूवर्णी ॥१॥
बळी पै मोहाचे माहात्म्य बा जेथे । गुरूशिष्य तेथे एक होती ॥२॥
धनाचिया चाडे पुराणपठण । वेदांतश्रवणी धनालागी ॥३॥
दाटोनिया एक देती उपदेश । धरोनिया सोस कांचनाचा ॥४॥
वेदाज्ञेकरोनी न करिती स्वाहित । नव्हती अतीत देहाहूनी ॥५॥
एक स्त्रियांलागी उपदेश करिती । अंतरी लुलती रतिसुखा ॥६॥
बहेणी म्हणे नका घेऊ त्यांचे नाम । मुखी स्मरा राम सर्वकाळ ॥७॥
५४२.
काजळकुंका भुलसी वेड्या । सौरियांच्या वेशा । मुळी कामा पडिला चिरा । म्हणोनि नाचो ऐशा ॥१॥
निलाजिर्या जाय बोलसी तू काये । लटिक्यामागे हिंडोनी तुज हाता येते काये ॥२॥
विषयाचा धुमस घेऊनी हिंडसि आम्हामागे । मुळीचा तो ठाव रिता विनोद कोणासंगे ॥३॥
बहेणि म्हणे सवरीपुढे झाकणे ते काये । खरे खोटे अवघे तुझे कळे आंतरबाह्य ॥४॥
५४३.
पुरूष व्याली कन्या झाली नवल सांगू काये । कन्ये बापू गरव्हार केला तो घेतो आपुली माये ॥१॥
उगवा माझे कोडे सौरी नाचे पुढे । पहा वेदशास्त्र याचे गुज आहे थोडे ॥२॥
नर नव्हे नारी नव्हे काहीच ते फेरी । असे नव्हे तसे बाई डौर आला करी ॥३॥
बहेणि घाली साद अवघो तोडुनि वेवाद । सौरीयाच्या वेषे नाचे सारूनि भेदाभेद ॥४॥
५४४.
मुळीच काही व्यसन नाही कैचा संसार । लटिकी भ्रांती पडिली होती कैचा भव सार ॥१॥
चाल माझ्या रामा गाईन तुझ्या नामा । मने मुळा घेतली धाव म्हणउनि नाचे प्रेमा ॥२॥
सोडिली लाज जाले निर्लज्ज डौर घेतला हाती । प्रेमभरे नाचती पुढे अविद्या - साउले करूनी परती ॥३॥
अविद्याविध सारूनी सिद्ध झाले निःसंग सौरी । स्वरूपाचे जन्मस्थान दावी घरोघरी ॥४॥
विधिनिषेध कैचा आम्हा सौरीयाचे याती । बहेणि म्हणे भाव घेउनी डौर ऊर्ध्वमुखे गाती ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2017
TOP