अभंग - ४२१ ते ४२५
संत बहेणाबाईचे अभंग
४२१.
गौळणी - रंगणी परब्रह्म खेळतो । गोमयी रूळतो बाळकृष्ण ॥१॥
क्षीरसागरीचे सुख सांडोनी परते । अनुसरला येथे भक्तीलागी ॥२॥
नवल हे आवडी न कळे निजवर्म । वेडावले ब्रह्म भक्तीलागी ॥३॥
अश्वमेधादिक यज्ञाचे आहुते । न पाहे तयाचे आळुमाळ ॥४॥
तो हा गोपाळा - करीचे उच्छिष्ट । अन्न खावया लागून वाट पाहे ॥५॥
वेद श्रुती वर्णिता न घेचि पै चित्ती । श्रमलिया म्हणती नेति नेति ॥६॥
बहेणि म्हणे फुका सापडला हरी । प्रेमसूत्रदोरी गळा लावू ॥७॥
४२२.
गौळणीबाळ देखियला डोळा । गोविंद सावळा बाइयांनो ॥१॥
वेधलीसे वृत्ति लागली हे स्थिति । गोरस हा चित्ती विसरल्या ॥२॥
माझा हरि घ्यावो । अंतरीचा भावो पालटला ॥३॥
शरीरभावाच्या पडिल्या विसरी । गोरसासी हरी म्हणताती ॥४॥
हरीच्या ह्या कैशा पडियेल्या छंदी । हिंडती बिदोबिदी बाजारेसी ॥५॥
बहेणि म्हणे जया गारसाची भूक । तयासी हरीचे सुख काय कळे ॥६॥
४२३.
देहघट लवंडोन रिता केला । निजज्ञाने पाणीया भरिन्नला ॥१॥
कैसी चाले ठुमकत जो हे बाळा । अंतरीची वेगळी प्रेमकळा ॥२॥
ज्ञानगंगे - यमुने भरी पाणी । ऊर्ध्वदृष्टी लक्षी त्या चक्रपाणी ॥३॥
सोहं दुडी वाहोनी चाले थीर । मी - तूपण मोकळे चारी पदर ॥४॥
सुखे स्वरूपी लागली निजगोडी । तेणे घराचा अहंकारारांजण फोडी ॥५॥
सारोनिया वाच्यांश - खडा थोर । लक्षुनिया सुक्षण हाणे वर ॥६॥
तेणे मिसे ते जूट जाली नारी । मग बोले वरिवरी लोकाचारी ॥७॥
ऐशा करिता मुकली येरझार । मग देव मांडीली संगिकार ॥८॥
बहेणि म्हणे लाधले सुखे सुख । जैसे जीवनी लवण समरस ॥९॥
४२४.
उठा चला जाऊ गे तेथवरी । जेथे नांदे आमुचा आत्मा हरी ॥१॥
कैसा छंद लागला तया नारी । परपुरूषी अखंड दृष्टी वरी ॥२॥
कामाधामा विसरू कैसा जाला । कृष्णप्रेमा तो अंगी ठसावला ॥३॥
विसरल्या देहभाव जेथे तेथे । पहा कैसे व्यापिले कृष्णनाथे ॥४॥
बहेणी म्हणे वेधल्या कृष्णवाणी । त्याही गाइल्या वेदशास्त्रपुराणी ॥५॥
४२५.
शब्द त्या आरता लक्ष त्या परोते । लक्षालक्ष जेथे मग्न जाले ॥१॥
तेथे काय आता पुसणे सांगणे । भलते आपण जाणताती ॥२॥
ज्याचे जितुके ज्ञान तितुक्यासी देव । शब्दाचा निर्वाह आरूताची ॥३॥
आतुरासी बोलता कैचे समाधान । म्हणोनिया मौन धरिता भले ॥४॥
पाहावे ते एक सीत चाचपोनी । अवघे घाटोनी कोण सिद्धी ॥५॥
बहेणि म्हणे अवघ्या वासनेच्या चेष्टा । तेथे ब्रह्मनिष्ठा कासयाची ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2017
TOP