मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३५३ ते ३६२

श्लोक - ३५३ ते ३६२

संत बहेणाबाईचे अभंग

३५३.
सांडा सांडा सांडा रजतमभजने भेद पाषांड सांडा । भंडा भंडा विभंडा अतिकुटिल जगी वासना हे विभंडा ॥ दंडा दंडा दंडा अतिचपळ मना वृत्ति एकाग्र मांडा । शरण जा देवा, दंडा म्हणतसे बहेणि मृत्युसंसार खंडा ॥
३५४.
असावे स्वधर्मे जाणावे ते वर्म । जेणे कर्मब्रह्म हातवसे ॥१॥
तेव्हा ते आतुडे ब्रह्म सर्वगत । भूती भगवंत सर्व होये ॥२॥
कर्म आणि ब्रह्म वेगळे न भासे । तया कर्म दिसे ब्रह्मरूप ॥३॥
बहेणि म्हणे ब्रह्म बळे भाविता । कर्म अधःपाता घालील देखा ॥४॥

३५५.
वेदासी विरूद्ध म्हणे आत्मज्ञानी । पडला तो पतनी रौरवाचे ॥१॥
ऐसे ते चांडाळ न पडावे दृष्टी । ज्यांच्याने हे कष्टी उभय कुळे ॥२॥
वेदासी विरूद्ध असता सर्वथा । अनर्थ परमार्था हाचि येकू ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे जळो आत्मज्ञान । त्याने नारायण वैरी केला ॥४॥

३५६.
कर्म - ज्ञान - उपासना करिती त्रिकांड । चालिला प्रचंड भक्तीवरी ॥१॥
ऐसा हा अनुभव जाणते जाणती । तया पुनरावृत्ति नाही नाही ॥२॥
भक्ति आणि ज्ञान वैराग्य विज्ञान । कर्मब्रह्मपण वेद बोले ॥३॥
ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ वानप्रथ । चौथा तो संन्यास वेदांवरी ॥४॥
गुरू शास्त्र तिसरी आत्मप्रचीती । चालिल्या निरूक्ति वेदांमाजी ॥५॥
बहेणि म्हणे जया वेद मान्य जाला । ब्रह्मी होऊन ठेला तोचि एक ॥६॥

३५७.
साधके ते कर्म साधावे ते ब्रह्म । या दोघींचाही धर्म वेदांमाजी ॥१॥
ऐसी ज्याची क्रिया तोचि ब्रह्म जाणा । ब्राह्मण या नामा म्हणती बापा ॥२॥
साध्य आणि साधन साधिता हे दोन्ही । अवघे देवाचेनि बळिवंत ॥३॥
बहेणि म्हणे देव ॐकार सर्वांचा । तेथेचि वेदांचा पसारा दिसे ॥४॥

३५८.
पृथ्वी आप तेज वायू पै गगन । विस्तार हा जाण वेदान्वये ॥१॥
अणूच्या प्रमाण नाही वेदावीण । एवढे ब्रह्म जाण कोठे वसे ॥२॥
एकवीस स्वर्गे दश दिशा पाताळ । अवघा भूगोल वेद जाणा ॥३॥
बहेणि म्हणे वेद सर्वांचे हे मूळ । स्वरूप केवळ वेद होय ॥४॥

३५९.
जिही या वेदांचा केला मानभंग । नव्हे तोचि मग ब्रह्मज्ञानी ॥१॥
दोहीकडे जया जाली नागवणी । पडिले पतनी जन्मोजन्मी ॥२॥
वरी वरी जगदंब दावी लोकाचार । भीतरीं साचार मांग जैसा ॥३॥
बहेणी म्हणे त्याचे न घडावे दर्शन । घडता पै पतन रोकडेचि ॥४॥

३६०.
ब्रह्मत्वाची खूण जप गायत्रीचा । जो सर्व वेदांचा मूळमंत्र ॥१॥
तयाहून परते आहेसे सांगती । ते जाणावे मतिमंत हीन ॥२॥
गुणासाम्य ऐसी म्हणती मूळमाया । गायत्री ते जया ब्रह्मरूप ॥३॥
अकार ऊकार मकाराचे बीज । ओंकाराचे निज उन्मनी हे ॥४॥
इजपासूनिया जाले वेदविद । गायत्री प्रसिद्ध वेदमाता ॥५॥
बहेणि म्हणे जया गायत्रीचा जप । तो ब्रह्मस्वरूप केवळ जाणा ॥६॥

३६१.
वर्णाश्रम धर्म शुद्ध आचरावा । भगवंत धरावा एका भावे ॥१॥
ऐसे जो न करी न म्हणावा तो धर्म । जाणावा अधम पापदेही ॥२॥
आधी स्नानसंध्या गायत्रीचा जप । करावा निष्पाप अष्टोत्तरशे ॥३॥
त्याउपरी मग तर्पण करावे । हा धर्म स्वभावे विप्रलागी ॥४॥
गीतावेद - नाम जपावे सादर । घेवोनी विचार प्रेमभावे ॥५॥
मग यथाविधि देवाचे पूजन । धूपदीप जाण मंत्रयुक्त ॥६॥
नैवेद्य वाढोनी वैश्वदेव कीजे । प्रांतीचे ठेविजे स्विष्टकृत ॥७॥
नैवेद्य करानी स्विष्टकृत कीजे । शेवटीजे दीजे बळिदान ॥८॥
तये काळी कोन्ही आला जो अतीत । जाणावा भगवंत देवरूप ॥९॥
आदी पूजा त्याची मग त्या इतरांची । त्याउपरी भुक्तीची पंक्ति कीजे ॥१०॥
ग्रासोग्रासी देव आठवावा जाण । असाक्षी करू नये भोजन ते ॥११॥
बहेणि म्हणे येणे कर्मब्रह्मनिष्ठ । रोकड वैकुंठ प्राप्त त्यासी ॥१२॥

३६२.
वेद तोचि जीवात्मा । वेद तोचि परमात्मा । ज्याचेनि हा एवढा महिमा । ब्रह्मसुखाचा ॥१॥
वेदुचि वेदुचि नव्हता जेवा । ब्रह्मांड कैचे तेव्हा । सुखदुःख भोगणे या जीवा । कासया पाहे ॥२॥
ॐकारब्रह्मीचा बिंदु । तेथुनी उपजला वेदू । त्रिगुणेसी वाढला भेदू । ब्रह्मांडकारे ॥३॥
ऊर्ध्वमूळ अधोशाखा । प्रसवला वेद देखा । खांद्या पत्रपुष्प सर्वथा । निर्माण जाल्या ॥४॥
छंदपदजटाक्रम । आरण्य - ब्राह्मण जाण । विस्तारला वेद आपण । ब्रह्मस्वरूप ॥५॥
कर्म तेचि ब्रह्म जाण । ब्रह्म तेचि कर्म आपण । कर्म ब्रह्म नाही रे भिन्न । वेदार्थ - बोधे ॥६॥
तत्त्वार्थ वेदींचा अर्थु । वेदान्ताचा मथितार्थु । जेणे निरसे संसार भेदू । अद्वयबोधे ॥७॥
अद्वय ऐसे हे वचन । दुसरे ते नव्हेचि जाण । स्वसंवेद्य अवघा आपण । सर्वी सर्वत्र ॥८॥
भूतमात्री व्यापक । तोचि तू वर्ततू देख । व्यतिरेकान्वये सुख । अनुभवे पाहावे ॥९॥
बहेणि म्हणे वेदान्वये । ज्ञान ते निखळ लाहे । वरकड ते मलिन होये । अंधाचे परी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP