मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५६१ ते ५६९

अभंग - ५६१ ते ५६९

संत बहेणाबाईचे अभंग

५६१.
अनुतापे तापले बहुत मानसी । नये देवाजीसी करूणा कैसी ॥१॥
वाटे देह आता घालू अग्नी - आत । किंवा ही करवत घालू माथा ॥२॥
वाटे जीव द्यावा नदीचे प्रवाही । किंवा दिशा दाही उल्लंघाव्या ॥३॥
वाटे अरण्यात घेऊनी धरणे । बैसावे, पारणे करू नये ॥४॥
बहिणी म्हणे माझा जीव हा तळमळी । का रे वनमाळी मोकलिसी ॥५॥

५६२.
हरण सापडे जैसे वाघुरेत । अंध अरण्यात पडे जैसा ॥१॥
तैसे मज झाले पुसू कोणा हित । होय माझे चित्त कासावीस ॥२॥
जालावीण मत्स्य गाईवीण वत्स । मृगीविण पाडस जयापरी ॥३॥
बहिणी म्हणे देवा ऐसिया संकटी । करी कृपादृष्टी दीनावरी ॥४॥

५६३.
गांजविसी देह भ्रताराचे हाते । माझिया तो चित्ते नेम केला ॥१॥
न सोडी भजन प्राणही गेलिया । आता देवराया दीनबंधु ॥२॥
पाहातोसी काय आता माझा अंत । होतसे देहान्त पती - हाते ॥३॥
करू काय मज मांडले साकडे । नाही देहाकडे हेत माझा ॥४॥
पडो देह परी राहतसे हेत । पहावा अनंत ज्ञानदृष्टी ॥५॥
करावी हे भक्ति स्वधर्म - आचारे । तुज ज्ञानद्वारे ओळखावे ॥६॥
राहील हे काय शरीर पीडेने । का रे हे वचन नायकसी ॥७॥
हेत राहे तया जन्म घडे पुन्हा । वेदाच्या वचना आयकिले ॥८॥
आता या संकटी तुझे - शिरी हत्या । राखावी अपत्या आपुलिया ॥९॥
बहिणी म्हणे हरी बहिरा आंधळा । का रे विश्वपाळा झालासी तू ॥१०॥

५६४.
तुटले संचित जाले शुद्ध चित्त । अंतरीचा हेत ओळखिला ॥१॥
कृपा केली देवे इंद्रायणीतीरी । देहुग्रामी थार भक्तिपंथ ॥२॥
तेथे पांडुरंग देवाचे देऊळ । रहावया स्थळ प्राप्त झाले ॥३॥
तुकाराम संत संताचे कीर्तन । तिन्ही काळ तीन दृष्टीपुढे ॥४॥
नमस्कार तया न घडे पतिभये । परि चित्त राहे सदा पायी ॥५॥
तुकाराम कथा करावी ती द्वारी । ऐसा हा अंतरी हेत होता ॥६॥
बहिणी म्हणे ऐसे मास झाले सात । अवघेचि संचित सरो आले ॥७॥

५६५.
आनंदवोवरी होती तये ठायी । वाटे तेथे काही बसावेसे ॥१॥
करूनिया ध्यान लावावे लोचन । करावे स्मरण विठोबाचे ॥२॥
नेणे जपतप नेणे अनुष्ठान । घालावे आसन कळेना ते ॥३॥
ध्यानाचे लक्षण इंद्रियांचा रोध । नाही याचा बोध ऐकियेला ॥४॥
पाषाणप्रतिमा विठोबाचे ध्यान । हृदयी चिंतन राममुद्रा ॥५॥
बहिणी म्हणे तेथ पुसोनी मातेसी । क्रमियल्या निशी तीन तेथे ॥६॥

५६६.
टाळ्या - चिपोळ्य़ांचा ध्वनि आयकता । आनंद हा चित्ता सामावेना ॥१॥
लावियेले नेत्र निद्रेत जागृती । तुकाराममूर्ति देखियेली ॥२॥
तुकाराम तंव देखता देखत । आले अकस्मात गुरूरूपे ॥३॥
ठेवियला हस्त मस्तकी बोलून । दिधले वरदान कवित्वाचे ॥४॥
बहिणी म्हणे नेणे स्वप्न की जागृती । इंद्रियांच्या वृत्ती वोरसल्या ॥५॥

५६७.
आनंदे सद्गद जाहली इंद्रिये । तुकाराम पाय आठवले ॥१॥
होऊनी सावध उघडिले नेत्र । आठवला मंत्र षडक्षरी ॥२॥
ठसावला ध्यानी मनाचिये ठायी । आणिक ते काही आठवेना ॥३॥
बहिणी म्हणे हात घातला मस्तकी । देह तो या लोकी आढळेना ॥४॥

५६८.
ते सुख सांगता वाचे पडे मौन । जाणता ते धन्य गुरूभक्त ॥१॥
झालासे आनंद इंद्रियांचे द्वारी । बैसले शेजारी चैतन्याचे ॥२॥
घट हा बुडावा जैसा डोहा - आत । न फुटता ओतप्रोत पाणी ॥३॥
बहिणी म्हणे तैसे झाले माझे मना । तुकाराम खुणा ओळखी त्या ॥४॥

५६९.
वाटे उठो नये जीव जाय तरी । सुख ते अंतरी हेलावले ॥१॥
आनंदे निर्भर होऊनिया मन करू आले स्नान इंद्रायणी ॥२॥
घेतले दर्शन पांडुरंगमूर्ती । तव झाली स्फूर्ति वदावया ॥३॥
तुकोबासी तेथे करूनि नमस्कार । आले मी सत्वर बिर्‍हाडासी ॥४॥
बहिणी म्हणे जैसा लोटला समुद्र । हृदयाकाशी चंद्र बोले वाचा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP