ज्ञानप्रकाश - ओव्या
संत बहेणाबाईचे अभंग
३५०.
ऐका चौवाचे विवरण । स्थान मान कळा जाण । देह अवस्था निदान । संकळित कथन ऐकावे ॥१॥
कोण स्वर कोण वाचा । अभिमानी ह्या देहाचा । शक्तिमात्र स्थान याचा । अभिप्राय गुणाचा बोलिजेल ॥२॥
प्रणवाचा कोण चरण । कोण वेद तेथीचा जाण । हे स्वानुभवे जयासी ज्ञान । स्वतः तो आपण परमात्मा ॥३॥
हे अनुष्ठान कथन । पंचीकरणामाजी विवरण । आशंका नुपजे ऐसियाने । करोनी जाण ठेविले ॥४॥
त्याचे नाम ज्ञानप्रकाश । जो का ब्रह्मविद्येचा सौरस । आत्मत्वाचा ज्ञानघोष परमहंस दीक्षेचा मुगुटमणी ॥५॥
त्यामाजी कार्यकारण । काढिले वाचाविवरण । ते ऐकावी स्थानमाने । संकळित मार्गे ॥६॥
(१) जेथे महाकारणदेह । तेते तुर्यावस्था होय । अभिमानी प्रत्यगात्मा पाहे । भोग लाहे स्वानंदाचा ॥७॥
स्थान ते मूर्धनी जाण । ज्ञान शक्ति जाणिजे खूण । शुद्ध सात्विक तो गुण । मात्रा जाण ओंकाराची ॥८॥
चौथा चरण प्रणवाचा । उद्भव अथर्वण वेदाचा । प्रकाश षोडश कलेचा । बारा जनीचा रहिवासू ॥९॥
तेथेचि हे जाण परावाचा । जेथे उल्लेख उन्मेषाचा । वोघ चाले सत्रावीचा । ब्रह्मानंद सुखाचा रहिवासू ॥१०॥
स्थान ते नाभिकमळ । अंतःकरण ते निर्मळ । हे परेचे निजमंदिरस्थळ । जाणती कुशळ अनुभवी ॥११॥
(२) पश्यंतीचा जेथे रहिवास । तेते अष्टदळकमळाचा विकास । अंगुष्ठमात्रप्रमाण प्रकाश । दीपवत क्रीडतसे ॥१२॥
कारण देह सुषुप्ती अवस्था । प्राज्ञ अभिमानी आनंदभोग तत्त्वता । हृदयस्थान इच्छाशक्ति देखा । गुण तामस वर्तत ॥१३॥
मकार मातृका जाण । प्रणवाचा तिसरा चरण । वेद तो आपण । सामक जाणिजे ॥१४॥
तेथे उन्मेषाचा द्वनी । ऊष्म स्वर ये उमटोनी । पश्यंती नाम तियेलागुनी । जाणावी सज्जनी स्वानुभवे ॥१५॥
(३) आता मध्यमा वाचा जेथ । लिंगदेह जाणिजे तेथ । अवस्ता ते विशेष । स्वप्न जाणिजे ॥१६॥
अभिमानी तो तैजस । प्रत्युक्त भोग सावकाश । कंठस्थानी रहिवास । करी घोष महानाद ॥१७॥
तेथे जाणावी द्रवशक्ति । गुण तो रजोगुणस्थी । मात्रा ते उकाराची । प्रणवाचा दुसरा चरण ॥१८॥
तथे यजुर्वेद आपण । करी घोषाचे उच्चाटण । परी त्या वेखरीवाचून । न कळे काही ॥१९॥
(४) आता वैखरी नांदे जेथे । स्थूळ देह वर्ते तेथे । अवस्था जागृती वर्तते । अभिमानी जाणिजेसु विश्व पै ॥२०॥
युक्त भोग तेथीचा । रहिवास तो नेत्रींचा । गुण सात्त्विकाचा । मिश्रित साचा वर्तत ॥२१॥
मात्रा ती अक्षरांची । महिमा ते प्रथम चरणाची । जे का मूळ प्रणवाची । ऋग्वेदाची जाणिजे ॥२२॥
तेथे वैखरीचे स्थान । करी बत्तिसा अक्षरांचे उच्चारण । शब्दापशब्द आपन । कळती जाण उच्चारणी ॥२३॥
पुढे विस्तार सांगता । तरी विस्तारेल हे वार्ता । म्हणोनिया संकळित कथा । जाण तत्वता सांगितली ॥२४॥
या चौवाचेचे एकचि स्थान । व्यतिरेकान्वये केले आपण । अध्यात्मज्ञान त्यासी म्हणणे । स्वरूपज्ञान कळावया ॥२५॥
वरकड हो तितुके ज्ञाने धातमात कवित्व बांधणे । पुसो जाता अभिमाने । प्रवर्ते जाण मुष्टिधाता ॥२६॥
परि या ज्ञानाचा सौरसु । नेघेचि तो मंदविलासु । भुलती सन्मान - दारेच्या सुरवासु । तैशा जनासी हे न मानत ॥२७॥
जयासी स्वहितचि करणे । तेणे शुद्ध भावार्थ धरणे । करावे आध्यात्मज्ञानाचे शोधन । जेणे लाधे निधान परब्रह्म ॥२८॥
बहेणि म्हणे गुरूकृपा जेथे । ज्ञानासी काय उणे तेथे । परी निष्ठाबळ पाहिजे यथार्थे । तेव्हा भगवंत प्राप्त होय ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2017
TOP