मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
पिंगा

पिंगा

संत बहेणाबाईचे अभंग

५९१.
आपली मांडी उघडिता लाज । शिकवितो राग काय तुज । न धरिसी सोय काही विवेकाचे गुज । न लाजसी तू होता भावा बापाची भाज ॥१॥
घाल पिंगा ऐसा सांगतसे तैसा । काया वाचा मने शरण रिघे जगदीशा ॥धृ०॥
इच्छेचिया संगे नको फिरू रानोरान । सांडी सांडी अभिमान नको वाया करू शीण । इंद्रियांच्या वृत्ती अवघ्या धरी सावरून । परंपरा हेचि गेले संत आचरून ॥२॥
वासना कुरण इचा नको करू पांग । आशा तृष्णा मोह यांचा आधी सांडी संग । काम क्रोध लोभ यांचा करी मनोभगं । गुणातीत स्वामी माझा ध्याई पांडुरंग ॥३॥
भक्ति आणि ज्ञान येथे धरी शुद्धभाव । दया क्षमा शांति हाचि जाण पूर्ण देव । अनुताप बरवा मनी असो सावयव । मिथ्या द्वेष त्यजुनी पाहे देही देव ॥४॥
ठेवुनिया हात कटी नीट उभी राहे । सारूनिया दृश्य बाई एकाएकी पाहे । जनवाद लोक बाई सांडी यांचे भय । प्रेमे अंतरंगी नाचे सुखाचिया सोये ॥५॥
जाणिवेचा पिंगा वाया नको धरू देही । सोंग संपादणी यासी वानिसी तू कायी । स्तुति वाद भेद याचा मान नको देही । सर्व निरंतर समभाव धरी बाई ॥६॥
बहिणी म्हणे पिंगा याची जाण कला ऐसी । साधुनी या वेळी पुढे सिद्धमुनी ऋषी । ज्ञानाचे संग हेचि जाण सर्वांविषयी । तुकारामकृपे सुखे नांदो अहर्निशी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP