मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४२६

अभंग - ४२६

संत बहेणाबाईचे अभंग


देहनगरी मन राजा । राज्य चालवी आपुले । दोघी स्त्रिया तयालागी । निवृत्ती प्रवृत्ति हे भले । निवृत्ति ज्ञानाची कन्या । प्रवृत्ति अज्ञानी वोतले । सवतीमत्सर दोघी । तया भांडण लागले ॥१॥
ऐसा सावध श्रोते तुम्ही । करा निवाड दोघींचा । भांडती त्यापरोपरी । थोर गर्जताती वाचा । निवृत्ति न बीहे कोणा । मन भोगी प्रवृत्तीचा । तयाचिया बळे दोघी । वर्म काढती हे साच ॥२॥
प्रवृत्तीने व्याप केला । पुरे पठणे बसविली । देश दुर्गे नानापरी । राया पाडियेली भुली । पुत्र कन्या प्रजा कैसी । येकायेकी प्रसवली । लावण्य दाविले मना । प्रवृत्तीने ख्याती केली ॥३॥
प्रवृत्ति - “ सर सर वेडिये बाई । तुझे नामचि निवृत्ति । येथे तुज ठाव कैचा ” । घाली बाहेर प्रवृत्ति । निवृत्ति - “ ऐक वो तू म्हणने माझे । ऐक वचन तू बाई । तुज मुळी ठावो कैचा । मुळी मीचि आहे पाही ॥४॥
पठराणी माझे नाव । रावो विसरला देही । देखोनी लावण्य तुझे । भ्रम जालासे कायी । जाय वो तू परती । होय तुझे लावण्य लटिके ॥ अज्ञान हा पिता तुझा । मुळी पाहे आधी निके ” ॥५॥
प्रवृत्ति - “ प्रवृत्ति हें काय बोले । “ ऐक वचन सवती । ब्रह्मादिक बाळे माझी । ऐसी नेणती तू ख्याती । रविचंद्रादि देव अवघे । माझ्या गृहात असती । सनकादिक माझे नातू । ऐसे कळो तुझे चित्ती ” ॥६॥
निवृत्ति - “ आम्ही नारी पठाचिया । अखंड रायाचे शेजारी । घरचार करावया । दाही घातली बाहेरी । ब्रह्मादिक बाळे पाळी । पठराणी येईल सरी । चंद्रसूर्यादिक तेही । माझे सत्तेने निर्धारी ” ॥७॥
प्रवृत्ति - “ तू तव पठाची खरी । ऐसे बोलसी वचन । रावणाने सीता नेली । तै का न चाले मजविण । दंभाची स्त्रिया केली । एवं मिथ्या तू बो जाण । प्रवृत्ति मी थोर गाढी । नाही नाही मजविण ” ॥८॥
निवृत्ति - “ ऐके बा विदेह माझा । पिता ज्ञानी हा समर्थ । होते मी रामाचपासी । यज्ञ करावयया तेथ । परी मी अदृश्य रामी । तू वो नोळखसी सत्य । तुझेअंग क्रिया माझी । तुम्हा सर्व साक्षाभूत ” ॥९॥
प्रवृत्ति - “ ऐक वो का बोलतेसी । तुझे संगे सुख नाही । म्हणउनी मज प्रवृत्तीसी । माळ घातली पाही । अवतारही कृष्णादिक । मजसाठी कष्टी तेही । कासया बोलसी व्यर्थ । अदृश्य हे मिथ्या देही ” ॥१०॥
निवृत्ती - “ उन्मनी हे नाम माझे । मज निर्गुणाचा संग । सगुण आरते बाई । मी तव अव्यय अभंग । प्रवृत्ति हे माझी सत्ता । मना लागला झोटिंग । मनपण आले मना । माझिया आलेसे बघ ” ॥११॥
प्रवृत्ति - “ ऐक वो निवृत्ति एक । तुझे स्तळ येथे कोण । इतुके सांगे मज । मी वो जाईन येथून । कन्यापुत्रासमवेत । राज्य टाकून जाईन । यासी जरी मिथ्या होय । तरी रायाचीच आण ” ॥१२॥
निवृत्ति - “ निरंजनवन स्थळ । माझे निवृत्तीचे आहे । भाऊ माझा परमार्थ । यासी मिथ्या बाई नोव्हे । भाव आणि निजबोध । पुत्र शांति क्षमा होय । ऐसी निवृत्ति कन्या । ज्ञानाची हे बोलो जाय ” ॥१३॥
प्रवृत्ति - “ निवृत्तीसी शब्द नाही । निरंजनी पाहे बाई । परादिक वाचा फिरे । तरी येथे तुझे काई । बोलसी जिये वाचे । ते तव प्रवृत्तीचे आहे ठायी । तुझे बाई काय येथे । हो सावध तू देही ” ॥१४॥
निवृत्ति कुंठित झाली । प्रवृत्तीने जिंकियेले । तव एक आठवले । तुझे माहेर वहिले । निवृत्ति - “ सांग वो मजलागी । मायबाप कोण बोले । इतुके सांग वो बाई । खरे खोटे तेथे कळे ” ॥१५॥
प्रवृत्ति - “ अज्ञान हा पिता । माझा अहंकार पूर्वज । मोहो काम क्रोध पुत्र । कन्या आशादिक मज । क्षेत्र हे हो घर माझे । काय पुसतेस्सी मज । जाय तू येथोनी । आता नये बोलता लाज ॥१६॥
निवृत्ति - “ घर जेव्हा जळे तुझे । तेव्हा कोठे तू राहसी । अज्ञान हे पळे जैसे । रवि - प्रकाश तमासी । मनपण मन सांडी । तै तू कोठे गे बाई । हागवण गेली मग । कैचा ठावो कडतरासी ॥१७॥
बरे तो सवतीबाई । मग जेव्हा विषयी विटे । तेव्हा सांडिले प्रवृत्ति । तुज तव देसवटा । आला, ऐसे जाण चित्ती । बोलसी ते शब्द वाया । जाय परती प्रवृत्ति ॥१८॥
प्रवृत्तीचे भान मिथ्या । ज्ञान पाहसी जरी बाई । अज्ञान ही मान दोन्ही । जाली स्वरूपाचे ठायी । अज्ञाना ठावो नाही । मी हे आहे कोण कायी । इतुकेनिच हे आहे आधी । शरण रिघे गुरूपायी ” ॥१९॥
प्रवृत्ति - प्रवृत्ति मानली मोठी । म्हणे “ निवृत्ति बहिणी । तुम्ही आम्ही नांदो येथे । सुखे सुख मनपणी । गुरू तो कवण तेथे । मग सांग वो निर्वाणी । शरण मी आले तुज । जोडूनिया कर दोन्ही ” ॥२०॥
निवृत्ति - “ ऐक वो वचन येक । प्रवृत्ति हे तुझे नाव । प्रवृत्तीचा धर्म तोचि । भ्रतारासीच भजावे । मनाचे तू धरी पाय । सुख पावसी स्वभावे । हे मन उन्मन पदाते । ज्ञाने पावसील दैवे ” ॥२१॥
मी हे कोण आठविता । नामे प्रवृत्ति तत्त्वता । मनचि उन्मन जाले । ठेविताचि चरणी माथा । सवतीचा द्वैत गेला । अवघी निवृत्ति तत्त्वता । येकरूप दोघी झाल्या । सवती भांडता भांडता ॥२२॥
बहेणि म्हणे प्रवृत्तीत । अवघी निवृत्ति आहे । अज्ञानाचे मूळ सांडी । आपणचि द्वैत जाये । विकल्प हा स्वये तुटे । तेथे द्वैत कैचे राहे । सवती त्या एकरूपा । मनपणी मन आहे ॥२३॥


References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP