पाठ १ ला
( शब्दावरून पदार्थ पुरुषजातीचा अगर स्त्रीजातीचा आहे तें कळतें. )
(१) गोपाळ रोज आंघोळ करितो.
(२) गोविंद सकाळीं दूध पितो.
(३) सीता रांगोळी घालते.
(४) यमू शिवणकाम करते.
(५) आमचा बैल बळकट आहे.
(६) तुमचा घोडा जलद पळतो.
(७) माझी गाय पुष्कळ दूध देते.
(८) तुमची घोडी देखणी आहे.
(९) कावळा काळा असतो.
(१०) बगळा पांढरा असतो.
(११) चिमणी चिव चिव करते.
(१२) कोकिळा कुहू कुहू करते.
(१३) शिंपी कपडे शिवतो.
(१४) धोबी धुणें धुतो.
(१५) गवळण दूध घालते.
(१६) माळीण भाजी विकते.
या वाक्यांत गोपाळ, गोविंद हे पुरुष जातीच्या नांवांचे शब्द आहेत. सीता, यमू हे स्त्री जातीच्या नांवांचे शब्द आहेत. बैल, घोडा हे जनावरांतील पुरुषजातीच्या नांवांचे आणि गाय, घोडी हे स्त्री जातीच्या नांवांचे शब्द आहेत. शिंपी, धोबी हे पुरुषजातीच्या व गवळण, माळीण हे स्त्री जातीच्या नांवांचे शब्द आहेत. कावळा, बगळा हे पक्ष्यांतील पुरुष जातीच्या नांवांचे आणि चिमणी, कोकिळा हे स्त्री जातीच्या नांवांचे शब्द आहेत.
शब्दावरून आपणांस पुरुष जातीचा अगर स्त्री जातीचा जो बोध होतो त्यास लिंग असे म्हणतात. ज्या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याचें पुल्लिंग समजतात व ज्या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो त्या शब्दाचें स्त्रीलिंग समजतात.
(१) शेजारीं कोणाचें तरी मूल रडतें.
(२) दूर कोणी तरी माणूस दिसतें.
(३) मळ्यांत घोडें शिरलें वाटतें.
(४) एक कुत्रें रात्रीं जोरानें भुंकतें.
(५) कबूतर घूं घूं करीत उडालें.
(६) वटवाघूळ रात्रीचें उडतें.
रडणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे हें आपणांस नक्की ठाऊक असतें तर आपण कोणाचा तरी मुलगा रडतो किंवा मुलगी रडते आसें म्हणालों असतों. किंवा मुलगी हें नक्की माहीत नसल्यामुळेंच आपण मूल रडतें असें म्हणालों.
दुरून दिसणारा पुरुष आहे किंवा स्त्री आहे हें आपणांस स्पष्ट दिसलें असतें तर आपण पुरुष दिसतो किंवा स्त्री दिसते असें म्हणालों असतों. पण तसें ठाऊक नसल्यामुळें माणूस दिसतें असें आपण म्हणतों.
जेव्हां शब्दावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा नक्की बोध होतो नाहीं, तेव्हां त्या शब्दाचें नपुंसकलिंग समजतात. मूल व माणूस हे शब्द नपुंसकलिंगी आहेत.
मळ्यांत शिरलेलें जनावर घोडा किंवा घोडी हें निश्चित माहीत नसल्यामुळें आपण घोडें म्हणतों. भुकणारें जनावर कुत्रा किंवा कुत्री हे निश्चित माहीत नसल्यामुळें आपण कुत्रें असें म्हणतों. कबूतर, वटवाघूळ हे पक्षी पुरुष जातीचे ( नर ) आहेत किंवा स्त्री जातीचे ( माद्या ) आहेत हें चटकन नीट समजत नसल्यामुळें कबुतर उडालें, वटवाघूळ उडतें असें आपण म्हणतों.
घोडें, कुत्रें, कबूतर, वटवाघूळ हे शब्द नपुंसकलिंगी होत. शब्दाची लिंगें तीन आहेद्त. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग.
(१) पुल्लिंगी शब्द - वाघ, सिंह, कुंभार, चांभार.
स्त्रीलिंगी शब्द - वाघीण, सिंहीण, कुंभारीण, चांभारीण.
(२) पुल्लिंगी शब्द - मेंढा, लांडगा, कोल्हा, बकरा.
स्त्रीलिंगी शब्द - मेंढी, लाडगी, कोल्ही, बकरी.
या दोन प्रकारच्या उदाहरणांवरून पुल्लिंगी शब्दाचें स्त्रीलिंगी रूप एका ठराविक रीतीनें होतें असें दिसून येतें.
(३) पुल्लिंगी शब्द - बाप, नवरा, भाऊ, दीर, उंट, रेडा.
स्त्रीलिंगी शब्द - आई, बायको, बहीण, जाऊ, सांड, म्हैस.
या उदाहरणांवरून कांहीं पुल्लिंगी शब्दांचे स्त्रीलिंगी शब्द ठरलेले आहेत असें दिसतें.
(४) पुल्लिंगी शब्द - बगळा, विंचू, डांस, ढेकूण, मासा, खेंकडा.
स्त्रीलिंगी शब्द - पाल, गोम, पिसूं, ऊं, साळुंकी, घार.
या उदाहरणावरून कांही शब्द नेहमी पुल्लिगी व काही शब्द नेहमी स्त्रीलिंगी समजले जातात असें दिसतें.
पिलूं, वासरूं, करडूं, कोकरूं, पारडूं, बालक, फुलपांखरू हे शब्द नपुंसकलिंगी समजतात.
(१) रात्रीं सोटा किंवा काठी हातांत असावी.
(२) प्रवासांत लोटा अगर लोटी बरोबर घ्यावी.
(३) भाजी चिरण्यास विळा अगर विली चालेल.
(४) चुन्यासाठीं एवढा मोठा डबा कशाला ? लहानशी डबीच आण. यांत सोटा, लोटा, विळा, डबा हे शब्द पुल्लिंगी समजतात आणि काठी, लोटी, विळी, डबी हे शब्द स्त्रीलिंगी समजतात. वास्तविक निर्जीव पदार्थांत पुरुष जातीचा पदार्थ अगर स्त्री जातीची वस्तु असा फरक नाहीं. वरील उदाहरणांत हे फरक आकारावरून केलेले दिसतात; पण नेहमींच असें कांहीं कारण आढळत नाहीं.
उदा०
१ पुल्लिंगी शब्द - कागद, फळा, आंबा, चाकू, झोर्या.
२ स्त्रीलिंगी शब्द - शाई, फळी, कैरी, कात्री, सुपारी.
३ नपुंसकलिंगी शब्द - घर, दार, फूल, टेबल, पान.
(अ) तो आंबा पिकला. ती कैरी हिरवी आहे. तें फूल सुंदर दिसतें. तें फूल सुंदर दिसतें. तो बूट जड आहे मला नको. ती हलकी चप्पलच घ्या. ते पायतण बाहेर ठेवा.
(ब) तो मिरची मला नको, तो फार तिखट आहे. ती ऊंस चालेल कारण ती गोड लागते. तो दार नवीन बसवा कारण ती मोडली आहे.
या दोन बोलण्यांपैकीं (अ) बोलणें आपणांस संवयीमुळें बरोवर वाटतें. परंतु दुसरें (ब) बोलणें आपल्या कानांस चमत्कारिक वाटतें. यावरून लक्षांत येईल कीं, शब्दांची जीं लिंगें ठरलेले आहेत त्याप्रमाणेंच आपण बोलले पाहिजे.
तो - तांब्या, ती - तपेली, तें भांडें, तो हांडा, ती घागर, तें पातेलें, तो कात, ती लवंग, तें पान.
यावरून ज्या शब्दाच्या मागें तो हें अक्षर जुळेल. तो शब्द पुल्लिंगी ती व तें हीं अक्षरें ज्या शब्दांच्या मागें जुळतील ते शब्द अनुक्रमें स्त्रीलिंग व नपुंसकलिंगी समजावे.